रंग भंगलेल्या प्रेमाचा
लेखक श्रीपाद टेंबे.
तिने कॉलेजमध्ये बि.ए. ला प्रवेश घेतला होता. दिसायला तशी ती अगदी चारचौघींसारखी, शरीरयष्टीने साधारण, उंची बऱ्यापैकी आणि रंगाने उजळ पण चारजणीत उठून दिसणारी.
तो मात्र हुशार आणि नशिबाशी झुंज देणारा, परिश्रमाला अजिबात न घाबरणारा. अशा स्वभावाचा असूनही आजकाल त्याचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. कारण त्याचे त्या मुलीवर असलेले प्रेम, हो तो त्या मुलीवर प्रेम करू लागला होता. काही दिवसांनी त्याची तपश्चर्या फळाला आली आणि त्याच्या प्रेमाला पंख फुटले होते. बघता बघता ते बहरू लागले. त्या दोघांच्या चोरून भेटीगाठी होऊ लागल्या. ते भेटायच्या ठिकाणी एक विशाल वडाचे झाड होते. कधीकाळी तो एकटाच तासनतास त्या झाडाच्या सावलीत बसून घालवायचा. सुदैवाने त्याच्या बसण्याच्या जागेवर अद्याप तरी इतरांनी कोणी अतिक्रमण केलेले नव्हते. त्याच विशाल वृक्षाखाली ती दोघे आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न बघत असत.
त्यांच्या प्रेमाचा रथ त्यांच्या स्वप्नांना सोबत घेऊन वेगाने सुटला होता. त्या दोघानांही पुसटशीही कल्पना नव्हती की ते दोघेही जे काही करत आहे ते क्षणिक आहे. कधीतरी त्यांच्या प्रेमाला समाजाच्या बेड्या पडणार होत्या. ती दोघे मात्र त्यांच्या विश्वातच हरवली होती. एक गोष्ट मात्र निर्विवाद सत्य होती आणि ती म्हणजे त्यांच्या प्रेमाला वासनेचा गंध अजिबात नव्हता. शारीरिक आकर्षणाबद्धल त्या दोघांनाही रस नव्हता. विवाहा अगोदर शरीर सबंध किंवा मिलन म्हणजे नैतिकतेचा विनाश या विचारावर दोघांचेही एकमत होते.
एक दिवस असेच तिने त्याच्यासमोर खाली मानेने त्याच्या हातात हात देऊन लग्नाचे वचन दिले होते. परंतु त्याचवेळेस तिच्या घरात काहीतरी वेगळेच घडत होते. तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवले होते. मुलाला चांगली नोकरी होती.
सर्व काही उत्तम होते. ही गोष्ट तिच्या वडिलांनी मुलीच्या कानावर घातली. घरातील
हे गृहीत धरून मुलाकडच्यांना होकार कळविला. कारण आपल्या संस्कृतीमध्ये अद्यापतरी मुलगी आपला होकार स्वत:हून देत नसते. आपल्या प्रेयसीचे लग्न ठरल्याची गोष्ट त्याच्यापर्यंत पोचलीच. त्याने हर तऱ्हेने प्रयत्न केले अन तोपर्यंत पुष्कळ उशीर झालेला होता. त्यांच्या प्रेमाची कहाणी कुणासही ठाऊक नव्हती, त्यामुळे झालेल्या घटनेसाठी कुणालाही हळहळ वाटली नाही. त्यांच्या प्रेमाला एकमेव साक्षीदार फक्त तो विशालवृक्षच होता.
एक दिवस असाच उदास होऊन त्या वृक्षाच्या खाली तो बसलेला असतांना त्याला ती दुरून येतांना दिसली. थोडावेळ अगदी क्षणभर तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. तो समजला की ती सर्व बंधने झुगारून माझ्याकडे येत आहे अगदी कायमची. पण घडलं ते वेगळंच. काही क्षणातच त्याची सर्व स्वप्ने, आशा आकांक्षा धुळीस मिळाल्या. अतिशय निर्विकारपणे पण जड अंत:करणाने तिच्या लग्नाची पत्रिका त्याच्या हातात ठेवत म्हणाली, “झालंच तर विसरून जा मला”. अन ती परत जायला निघाली. त्याने तिला दोन मिनिटे थांबायला सांगितले.
तो तिला शेवटच्या क्षणी तिला डोळे भरून पाहू इच्छित होता. काही क्षणांसाठी ती उभी राहिली आणि म्हणाली,”येते मी आता, आणि हो महत्वाचे म्हणजे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. मी यापुढे तुला कधीच भेटणार नाही”. तिच्या या शब्दांनी त्याच्या हृदयाचा अक्षरशः थरकाप उडाला. ज्या प्रेमाने आज त्याच्यावर आघात केले त्यात त्याचा काय अपराध होता हे कळलेच नाही. त्याने तिला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. माझ्या निस्वार्थी प्रेमाला समजून घे. तू माझ्या जीवनात नसशील तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. तू घरच्यांच्या दबावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. नानाप्रकारे तिला समजावत असतांना त्याचा डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. तरी देखील तिला त्याची दया आली नाही. उलट जाताजाता ती म्हणाली,“माझे तुझ्याशी लग्न एकाच अटीवर होऊ शकते, आणि ती अट म्हणजे पळून जाऊन लग्न करणे. परंतु मी ते आता करणार नाही कारण मला ते शक्य नाही,” असे म्हणून ती निघून गेली.तो मात्र अनावर झालेला हुंदका दाबत त्या वृक्षाला बिलगून रडू लागला. त्याच्या विश्वासाची, प्रेमाची हत्या झालेली त्याला दिसत होती. खऱ्या केलेल्या प्रेमात सुडाची भावना नसते, हे समजून तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता.
दिवस भराभर जात होते. पण प्रेम विरहाच्या आठवणींने तो विरहाचे चटके सहन करीत शांत राहिला वेड्यासारखा त्या विशाल वृक्षाच्या खाली बसून त्याच्याशी हितगुज करायचा.
आयुष्यात कोणते तरी पाप केल्याची भावना त्याला एकसारखी सतावत होती. म्हणूनच देवाने एवढी मोठी शिक्षा आपल्याला दिली असावी. त्याने आपला प्रेमाचा वृक्ष मोठ्या जोमाने आणि प्रेमाने मोठा केला होता पण, त्याची फळे मात्र दुसऱ्याच्या अंगणात पडणार होती. अशा परिस्थितीमध्ये तो आजारी पडला नाही तर ते नवलच. तो खरेच आजारी पडला. हॉस्पिटलमधून अक्षरशः मरणाच्या दारातून तो बाहेर आला. पण भूतकाळातील आठवणींमुळे तो जास्तच कासावीस व्हायचा.
एक दिवस असाच आठवणींमध्ये हरवल्यानंतर त्याच्या कानावर मधुर शब्द ऐकू आले. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. विशेष म्हणजे त्याच्या सोबत कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी अगदी तिच्यासारखीच दिसायची. तिला पाहताच त्याला सगळ्या आठवणींचा बंधारा फुटल्यासारखा तो एकदम रडायला लागला. घरातले वातावरण विनाकारण गंभीर होऊ नये म्हणून त्याने थंडगार पाण्याने तोंड धुतले आणि भावनांना आवर घातला. त्याच्यामते आता प्रेम या शब्दाला काहीच महत्व उरलेले नव्हते. त्या विचारांच्या तंद्रीत असतांनाच त्याच्या कानावर लवकर बाहेर या असे ऐकू आले. अरे ते आपल्या घराचे जवळ असलेले मोठे झाड आहे ते आज तोडणार आहे म्हणतात. झाड तोडणारी माणसे देखील आलेली आहेत हे ऐकल्याबरोबर त्याचक्षणी तो घराबाहेर पडला. आपल्या प्रेमाचा एकुलता एक आधार हा समाज आपल्यापासून हिरावून नेत आहे याची त्याला खूपच चीड आली होती. स्वत:च्या आजारपणाची काळजी न करता तो त्या त्याच्या प्रेमाचा साक्षीदार असलेल्या वृक्षाच्या दिशेने धावत सुटला. परन्तु तो पोहोचण्यापूर्वीच लोकांनी ते झाड केंव्हाच तोडलेले होते. त्या विशाल वृक्षाच्या फांद्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. नियतीने केलेला हा त्याच्यावर दुसरा मोठा घाव होता.
इतकी वर्षे दिमाखाने उभा राहिलेला तो वृक्षराज शांत होऊन निपचित पडलेला होता.आणि तो त्या निपचित पडलेल्या वृक्षाला बिलगून रडत होता. समोरचे सगळे उपस्थित चकित होऊन त्याच्याकडे बघत होती. त्याला त्याची परवा नव्हती. त्याच्या आयुष्यातील प्रेमाचा एकमेव साक्षीदार या भूतलावरून कायमचा विस्मृतीमध्ये गेला होता. त्याच्यासोबत त्याच्या प्रेमाच्या आठवणीपण कायम विझणार या गोष्टीने त्याला फार त्रास होत होता. त्या जिवलग वृक्षाचे मिळतील ते अवशेष आपल्या हृदयाशी कवटाळून त्याने त्यांना अश्रुपूर्ण नयनांनी निरोप देत त्याने देखील आपली जीवनयात्रा संपवली होती.
समाप्त
लेखक श्रीपाद टेंबे.
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box