कबीराज्ञी
अनघा लिखिते
राज्ञी.... आता राज्ञी रविंद्र अधिकारी. कोकणात प्रशस्त वाडा, गर्भश्रीमंत घराणं, वाड्याच्या मोठ्या परिसरात आंबा, नारळ, पोफळीची आणि इतर फळा-फुलांची गर्द झाडी. ती आपल्या खोलीतून हळूच बाहेर पडली. रात्रीच्या अंधारात स्वतःला संपविण्यासाठी निघाली होती. समुद्राची गाज रात्रीची शांतता चिरत होती. स्वतःच्या चुकीने ओढवलेल्या संकटात अडकलेली ती, लग्नाच्या पहिल्या रात्री जीव द्यायला निघाली समुद्राच्या दिशेने...
मंगळसूत्र, लाल गडद लिपस्टिक तिच्या गौर वर्णावर अतिशय सुंदर दिसत होतं, लाल गर्द शालु, लाल चुडा, सरळ मोकळे सोडलेले केस, चंद्रप्रकाशात सुंदर दिसणाऱ्या राज्ञीचा चेहरा मलूल दिसत होता. नव-वधूच्या चेहऱ्यावरील तेज एका वादळाने नैराश्येत बदललं. काल ते आज या मधल्या काळात तिचं आयुष्यच बदलून गेलं. ती आज या घरात येऊन अडकली.
गर्द झाडीतून जात होती, वर पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश साथीला होता. तेवढ्यात मागून तिचा पदर कोणीतरी पकडला, तशी ती घाबरली. ती शहरात वाढलेली. कोकणात भुतं असतात, असं ऐकून होती. खरं तर आत्महत्याच करायला निघाली होती. पण भितीने तिथेच गारठली, मागे वळून पहायची हिंमत नाही झाली. तिला जाणवु लागलं की हळूहळू तिच्या जवळ कोणी तरी येऊ लागले. त्याने तिला मागून मिठी मारली.
रविंद्र.. रविंद्र होता तो.
"व्वा ! लग्न तसं आणि हनिमून असा साजरा करायचा का ?"
गार हवा, चंद्राच्या प्रकाशात तिचा गौरवर्ण खुलून दिसत होता. तो तिच्याकडे पहात होता. ती रागात होती. रविंद्रने तिला जवळ ओढले. त्याने तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.
राज्ञी, "प्लीज लिव्ह मी अलोन. यु चिटर. सोडा मला नाही तर ओरडेल मी."
'राज्ञी, ऐक तरी.', रविंद्र तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
"प्लीज लिव्ह."
"ओके.", असं म्हणुन तो निघून गेला. ती तिथे रडत तशीच बसून राहीली, भुतकाळातल्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या...
*****
कॉलेजचा पहिला दिवस राज्ञी, मालिनी सोबत तिच्या स्कुटी बसुन आली. बोल्ड, ब्युटीफूल आणि हूशार राज्ञीने पहिल्याच दिवशी सगळ्यांवर आपली छाप पाडली. आठवड्याभरात मित्र-मैत्रिणींचे ग्रुप पडले. क्षितिज, कबीर, पुष्कर, मालिनी आणि राज्ञी सगळे श्रीमंत, हूशार. त्यांचे मस्त बॉन्डींग महिन्याभरात झाले. राज्ञी, क्षितिज, पुष्कर आणि हे बंड स्वभावाचे, मनाला येईल तसं वागायचं, मालिनी सुद्धा बिनधास्त पण त्यातल्या त्यात समजुतदार, तर कबीर शांत, संयमी, दुधाने धुतलेला. सगळे त्याला संत कबीर म्हणून चिडवायचे.
तो आला की सगळे जण एकसुरात, "एका तळ्यात होते बदके पिले सुरेख... होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक..."
"ए नाय रे. तो कुरूप नाही.", राज्ञी हसत म्हणाली.
कबीर, "यु नो व्हॉट... नशा करणं म्हणजे तुम्ही फॉरवर्ड विचारांचे आहात, असा अर्थ नाही होत. विचाराने प्रगल्भ असायला हवं. तुम्ही कधी पाहिले का की ते लोकं आपल्या संस्कृतीप्रमाणे वागतात ? यु आर मंकीज, ओन्ली इमिटेटींग देम."
"ओ sss", सगळ्यांनी त्याला लाईटली घेतलं.
सगळे जण पब मध्ये झिंगत असतांना फक्त कबीर पाण्यावर असायचा, ते पण घरून आणलेले. त्यामुळे त्या रात्री तोच ड्रायव्हर असायचा. सगळ्यांना ड्रॉप करत करत शेवटी राज्ञीला सोडवायला जायचे. त्यात तिचे तोकडे कपडे, अस्ताव्यस्त झालेले, नीट करताना कधी कधी मनात वाईट साईट यायचं. राज्ञीला तेच हवं असायचं, आवडायचा तिला येवढी काळजी घेणारा कबीर. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना समज द्यायचा रागात. पण ऐकतील ते मित्र कसचे. आपलं कर्तव्य म्हणून पुन्हा कबीर ड्युटी वर...
राज्ञीला त्याचं वेगळेपण आवडायला लागलं. ती प्रेमात पडली त्याच्या. फिरायला जाताना त्याच्याच बाईकवर पाठीमागे मुद्दाम कधी कधी त्याला गच्च पकडून बसायचे, त्याच्या सोबत पिक्स काढायचे, मुद्दाम हॉरर मुव्हीला जायचं, म्हणजे भिती वाटली की त्याचा हात घट्ट धरायचा. कबीर सोडून सगळ्यांना समजलं की ती त्याच्या प्रेमात बुडाली आहे. एकदा तर तो अचानक गावी निघून गेला आणि तो आल्यावर जाम चिडली होती.
"ए, तु अशा मुलाला कसं निवडलंस गं... रडशील आयुष्याभर.", क्षितिज गंमतीने म्हणाला.
मालिनी तिची चेष्टा करत म्हणाली, "बरं, तु त्याला कधी सांगणार आहेस ? तो संत आहे."
"मी करेल उद्या प्रपोज."
दुसऱ्या दिवशी सगळे नेहमी प्रमाणे पब मध्ये गेले. राज्ञीने यावेळी ड्रिंक्स घेण्याचं नाटक केले होते. कबीर आपली ड्युटी बजावत होता. प्रत्येकाला गुड नाईट करत शेवटी तो राज्ञीला सोडण्यासाठी निघाला. नेहमी प्रमाणे तिच्या सोसायटीच्या काही अंतरावर त्याने गाडी थांबवली. त्याने तिला मागे वळून आवाज दिला.
"राज्ञी मॅडम उठा. तुमचं स्टेशन आलं आहे. या पामराला घरी सुद्धा जायचं आहे."
झोपेचं नाटक करणारा कधीच उठत नसतो. शेवटी त्यानेच उतरून तिला हलविले. तिने त्याला जवळ ओढले आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याने दुर होण्याचा प्रयत्न केला. पण तो असमर्थ ठरला.
"काय करतेस राज्ञी ? प्लीज कंट्रोल योरसेल्फ."
"कबीर, तु म्हण आय लव्ह यु. तर मी तुला सोडेल."
"नाही... मी असं काही करणार नाही. माझ्या घरचे ऑर्थोडॉक्स आहेत. हे पब, पार्टी, दारू, नशा हे चालणार नाही. त्यामुळे तु नको पडूस माझ्या भानगडीत. मला नाही कळत असं नाहीये की तुझं प्रेम आहे माझ्यावर. पण तुला ते अशक्य आहे. तुझी रात्र दारूचा डोस घेतल्याशिवाय होत नाही."
"सोडेल मी तुझ्या साठी सर्व. बघ आज नाही घेतली."
तेवढ्यात मागून बाईक येताना दिसली. पेट्रोलिंग करणारे असतील. पकडतील म्हणून लगेच त्यांनी स्वतः सावरलं आणि गाडी बंद पडली असं भासवले. त्यांनी अल्कोहोलिक टेस्ट केली, त्यात त्या दोघांनी ड्रिंक केलं नव्हतं, फक्त फॅमिली फंक्शन मधुन घरी जातोय, असं सांगितलं. म्हणून निभावलं.
ते निघून गेल्यावर, "राज्ञी, जा आता.. खुप रात्र झाली आहे."
"मला उत्तर नाही नं मिळालं.", तिने लाडीक स्वरात म्हटले.
"मिळेल... तुला उत्तर मिळेल. तुझ्या घरच्यांना ऑब्जेक्शन नसेल. तर यावेळी तुझा वाढदिवस आपण माझ्या घरी करु. म्हणजे तुला कल्पना येईल. त्या प्रमाणे तुला स्वतः मध्ये ड्रास्टिक चेंज करावा. जर झाला तर हा कबीर आयुष्यभर तुझाच."
त्याच्या खांद्यावर हात ठेवून, "राज्ञीला काहीच अशक्य नाही. ठरलं माझा वाढदिवस तुझ्या घरी, तुमच्या चालीरीतीने."
दुसऱ्या दिवशी सगळ्यांमध्ये आनंदी-आनंद होता. वाढदिवस म्हणजे मस्त कोकणात पिकनिकच होती सगळ्यांसाठी. राज्ञीने मम्मा-पप्पांना आधीच सांगून ठेवले.
क्षितिज आपली कार घेऊन आला. सगळे आनंदात निघाले. कोकण सहल, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, सगळीकडे हिरवेगार वातावरण, कुठे कुठे डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, तर कधी काही वेळा ऊन पावसाचा खेळ, जाता जाता फोटो काढण्याची ईच्छा नसती झाली, तर नवलच. क्षितिज कॅंडीड फोटो घेत होता. राज्ञीच्या म्हणण्यावरून त्याने त्या दोघांचे काही फोटो त्याने असे घेतले की कबीरला मनातुन नाही आवडलं.
"सॉरी रे. मीच सांगितले त्याला. नको ना चिडु त्याच्या वर."
"एक तर तु दहा हात दूर रहा आणि ते फोटो आधी डिलीट कर."
"म्हणजे तिला कारच्या सोबत सोबत पळायचे, असं म्हणतोस का ?", पुष्कर चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला.
"शिक्षा म्हणून आयडियली तसंच करायला हवे."
"ते फोटो नको करू डिलीट, हवं तर मला पहिली शिक्षा मान्य आहे.", राज्ञी सहजपणे म्हणाली.
कबीर, "क्षितिज, गाडी थांबव. गेट डाऊन, राज्ञी."
"ए बाबा, रात्रीचे आठ वाजताहेत. काही काय सांगतो तिला.", मालिनी.
"आय से गेट डाऊन राज्ञी.", त्याने आवाज वाढवून म्हटले.
"ओ.के.", त्याचा चढलेला पारा पाहून ती उतरली.
आता क्षितिज स्लो चालवत होता, ती सोबत सोबत पळत होती. कमीतकमी एक किलोमीटर पर्यंत ती पळत राहीली. नंतर पाय लचकुन पडली. मग त्याने तिला उचलून गाडीत बसवलं.
कबीर, "सॉरी गाईज्, आमच्या घरचे नियम याहून कडक आहेत. तिला याची सवय असावी आणि नो अल्कोहोल ॲन नो स्मोकिंग ड्युरींग धीस वीक."
पुष्कर, "तु सरळ सरळ सांग ना की आठवडाभर उपास करायचा."
पुन्हा सगळे 'बॅक टू नॉर्मल' झाले.
पोहोचले एकदाचे. नोकरांनी त्यांच्या बॅग्ज् सामान आत नेले. कबीरने पहिले विहीरीतुन पाणी काढून स्वतःचे पाय हात धुतले. मग राज्ञीला पाणी काढायला लावले सगळ्यांसाठी. क्षितिज, पुष्कर पाहून हसत होते. त्याच्या आईने माठातील थंडगार पाणी दिले प्यायला. खाली बसून सगळ्यांनी जेवण केलं. जेवणात सोलकढी, पातळभाजी, पोळी, आमटी - भात ई. सुग्रास बेत होता. चुलीवरचे जेवण...
"गॅस आहे नं काकु ?", राज्ञीने न राहवून कबीरच्या आईला विचारले.
"हो. पण आमच्या कडे चुलीवरचं जेवणच लागतं, त्याची चव वेगळीच असते.", आई.
"आणि सोवळ्यात हं, राज्ञी.", कबीरने पुस्ती जोडली.
मालिनी पुटपुटली, "वाट लागणार बाईसाहेबांची."
कबीर, "आई, राज्ञी कोकणाच्या जीवनशैलीवर आर्टिकल लिहितेय. तिला तुझ्या सोबत रहायचं आहे. तु सकाळी उठली की उठव तिला."
"तसं किती वाजता उठायचे. म्हणजे मी अलार्म सेट करते."
"चार ला.", आई.
सगळ्यांनी भुवया उंचावल्या. राज्ञीचा चेहऱ्यावर बारा वाजले.
आई, "कोकणातील घरांची रचना आजही आम्ही तशीच टिकून ठेवली आहे. चौसेपी वाडय़ासारखं घर… बाहेरचे अंगण शेणानं सावरायचे. एक मंद सुगंध त्याला असतो. दळण कांडण घरीच करायचं. अजून बरंच काही."
सुंदर, गोऱ्यापान राज्ञीने कधी घरातील भांडी देखील घासली नव्हती. पण कबीर साठी हे सगळं करायला ती तयार झाली. सगळ्यांना वाटलं की एक दिवस करेल आणि मग नाद सोडून देईल.
रात्री ते सर्व बाहेर बसले. मोठा परिसर होता. आंब्याच्या वाडी, फणस, नारळ, पोफळीचे झाडे आणि फुलं इत्यादींनी बहरलेली बाग, पुढे पाऊल वाटेने गेल्यावर दहा मिनिटांच्या अंतरावर अथांग समुद्र.
"व्वा ! इतक्या सुंदर ठिकाणी घर असल्यावर हनिमूनला दुसरीकडे जायची गरजच नाही.", ती कबीरच्या कानात कुजबुजली.
रात्री रातकिड्यांचा आवाज, समुद्राची गाज ऐकू येत होती, कधी सु..सु... करत वाहणारा वारा आणि त्यामुळे हलणार झाडांच्या फांद्यांच्या सावल्या मनात भिती निर्माण करायच्या.
कबीर, "चला रे... रात्री जागेवाला येईल. नको रिस्क घ्यायला."
त्याने आधीच गोष्ट सांगितली होती, म्हणून सगळे घाबरून झोपी गेले.
राज्ञी सकाळी लवकर उठायचं म्हणून रात्रभर जागीच राहीली. शेणाने सारवल्याने किती वेळा हात धुवत बसली. जेवताना सुद्धा तिला कसंस वाटत होतं. नंतर, सकाळी आंघोळीसाठी पाणी काढण्यापासून ते रात्री स्वयंपाक घर आवरेपर्यंत ती मदत करत होती. राज्ञीने मनाने सर्व केलं. कबीर नकळत तिच्या प्रेमात पडला. त्याच्या घरच्यांना सुद्धा तिचं कौतुक केलं. निघायच्या आदल्या दिवशी तिचा वाढदिवस होता. सकाळी उटणं लावून आंघोळ केली. ग्रामदेवतेच्या मंदिरात सगळे जाऊन आले. गोडाचा स्वयंपाक, तिच्या ताटाभोवती सुबक रांगोळी, बाजूला सुवासिक उदबत्ती लावली. सगळ्यांनी तिला एक घास भरवला. गिफ्ट्स दिलं आणि संध्याकाळी पाच जण फिरायला गेले. तिथे कबीरने प्रेमाची कबुली दिली. तिने त्याला मिठी मारली. क्षितिजने कॅमेरा मध्ये तो क्षण टिपला.
"सॉरी डिलीट करतो. नाही तर मला पदडमपट्टी करवशील.", क्षितिज.
"असु दे.", कबीर
कबीर तिच्या डोळ्यात बघून,
"किल्मिषं ही मनातली, आता दूर झाली...
बंधन मनातली अशी सैल झाली...
प्रथम तुज पाहता, विरलो तुझ्या नयनी.
उत्क्षृंखल तुझ्या मनाला, भयभीत झालो राज्ञी...
कशी जुळतील मनं आपली, होईल कसा संसार आपला...
करीत असे हा प्रश्न मी या सागराला...
क्षण मिलनाचा, साक्ष रवि-सागराची...
राज्ञी झाली आता, जन्मोजन्मी कबीराची..."
राज्ञी आयुष्यात पहिल्यांदाच लाजली.
"चला.. राज्ञीने आपली जागा पक्की केली.", मालिनी.
या सात दिवसांत सगळ्यांमध्ये ड्रास्टिक चेंज झाला. व्यसनमुक्त राहून आपण छान जगु शकतो, याची जाणीव झाली. राज्ञीने त्याच्या आईकडून स्वयंपाक शिकुन घेतला. घरी आल्यावर ती थोडं थोडं मम्मा-पप्पांंसाठी बनवायची. दोघांनीही कौतुक केले. आता कबीर बद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आपल्या मुलीने योग्य, संस्कारी, सुशील, हुशार आणि श्रीमंत मुलगा निवडलाय यात त्यांना आनंद झाला. त्यांच्या कडूनही लग्नाला संमती होती.
कबीर आणि राज्ञीच्या भेटी-गाठी वाढल्या. एकमेकांना भेटल्या शिवाय चैन पडत नसायचे. कितीवेळा तर राज्ञीचा संयम सुटायचा.
"राज्ञी, ही गोष्ट लग्नानंतर. तरच उत्कंठा असेल. आतुरता असेल."
"कबीर, आपण पळून जाऊन लग्न करूयात का ?"
"वेडी आहेस का ? आपल्या घरचे आनंदाने तयार आहेत. मग काय गरज आहे."
"मला तसं थ्रील अनुभवायचं आहे रे. मग हवं तर आपण रितसर लग्न करू."
"नाही."
"मी तुझ्यासाठी येवढी चेंज झाले."
"ओके... पण हनिमून प्रॉपर लग्नानंतरच हं..", कबीर या अटीवर तयार झाला.
नंतर लॉकडाऊन लागले. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. त्याला घरचे बोलवत होते. त्याचा भाऊ त्याला परमिशन घेऊन घ्यायला आला. राज्ञीला विरह सहन होत नसायचा. म्हणून मग फोन वर तासंतास बोलत बसायचे. चार पाच दिवसांनी त्याचा फोन बंद येऊ लागला. ती बेचैन झाली. तिच्याच काय तर नाही तिच्या मित्रांजवळ इतर कोणाचे नंबर नव्हते.
महिन्याभराने त्याच्या मोबाईल वरून मॅसेज आला - 'हाय.'
तिने आधी त्याला खूप झापले. त्याने सांगितले की मी इथे कोरोना रूग्णांसाठी कार्य करतोय.
"वेड लागलंय का ? अरे तुला काही झालं तर नाही जगू शकणार मी. तु महिनाभर गायब होता, तर कसले नको नको ते विचार यायचे मनात. काही नाही हं. तु मुकाट्याने घरी बैस."
"आय एम टेकींग ऑल प्रिकॉशन्स्. तु जोशींच्या घरची सुन होणार लवकरच. कारण दादा चे लग्न होणार आहे."
"अरे व्वा ! अभिनंदन. मला बोलवणार की नाही ?"
"तुला न बोलवून कसं होईल. तुच तर लागशील."
"ए तुला सांगु. रवि तुझ्या पेक्षा हॅन्डसम आहे हं. तुझ्या आधी त्याला भेटली असती. तर तुला मी कधीच नसती भेटली."
"अच्छा. अजून ?"
"मॅग्नेट आहे त्याच्यात. यांवर मालिनी आणि माझं एकमत झालं. मालिनीला दुःख होईल. पण कोणी तरी एक मुलगी तर नशीबवान आहे.", मुद्दाम त्याला जळवायला ती म्हणाली.
"तुला व्हायचे आहे का ? तसंही राज्ञी ही रवी म्हणजे सुर्याच्या पत्नीचं नाव असतं."
"नाही. मी फक्त आणि फक्त तुझीच आहे. तुझ्या शिवाय जगणं मला आता माहीत नाही."
असंच पाच सहा महिने चॅटिंग सुरू राहीलं. व्हिडिओ कॉल तो उचलायचा नाही.
"आधीच्या काळात असं होतं, त्यामुळे कसं एक उत्कंठा असायची आणि आपण पुढच्या आठवड्यात पळून जाऊन लग्न करणार आहोत. तु तयार आहेस नं ?"
"व्हॉट ?", ती आनंदाने ओरडली.
"से अगेन. ओ माय गॉड ! आय डोन्ट बिलिव्ह. खरंय तुझं असं दुर राहुन अचानक असं कळलं की आपण लग्न करणार, ते सुद्धा माझ्या मनाने. खुप भारी वाटतं...."
"तुला पत्ता पाठवला आहे. आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात ये. पुजारी काकांना सगळं तयार करायला सांगितले आहे. तुला तयार होण्यासाठी त्यांच्या घरी जा. काकु तयार करून देतील."
"ओके. दॅट्स ग्रेट."
सगळी तयारीनिशी ती पोहोचली, दोघांनी पुर्ण चेहरा झाकला होता. गुरूजींनी विधिवत लग्न लावून दिलं. दोघे घरी आले. सगळे हैराण झाले त्यांना पाहून. आईने औक्षवण करून, राज्ञीला माप ओलांडायला दिले. गृहप्रवेश झाला. राज्ञीला त्याने त्याच्या खोलीत नेले. तिला ते खटकलं. तो निघून गेला, त्याने नाराज असलेल्या घरच्यांना खरं कारण सांगितले.
राज्ञी वाट पाहत होती कबीरची. पण तो आला नाही. रात्री जेवण करताना सुद्धा तो कुठेच नव्हता. तिची हिंमत नव्हती तो कुठेय विचारण्याची. कारण त्यांच्या घरचे नियम खुप कडक होते.
रात्री काकुने सजवलेल्या खोलीत नेताना खट्याळपणे म्हटलं, "रवीला यायला थोडा उशीर होईल. वाट बघवेल नं ?"
"रवी... का ? कबीर कुठेय ?"
"वेडीस का.. रवी सोबत लग्न केले नं ?"
"व्हॉट ?", ती किंचाळलीच. "नाही.. तुमचा काही तरी गैरसमज होतोय."
"नाही पोरी. कबीर तर कायमचा निघून गेला.", असं म्हणताना त्यांचे डोळे पाणावले. त्या निघून गेल्या.
तिच्या मनांत असंख्य प्रश्न होते. निघून का गेला हा ? आणि कुठे ? तेही न सांगता. मागच्याच आठवड्यात तर लग्नाबद्दल बोललो आम्ही. त्याने मला सांगितले तर असतं नं. तो असा बेजबाबदार मुलगा कधीच नव्हता. हेच लोक मला मुद्दाम रवीच्या गळ्यात बांधत असतील. मी जातेच, आता घरी तोंड दाखवायची सुद्धा हिंमत नाही.
.....
ती पुन्हा उठली आणि जायला निघाली. रवि मागेच होता त्याने तिचा हात धरला.
"चल घरी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो."
त्याचा हात झटकून, "खोटारडे आहात तुम्ही. मला फसवले. मला कबीर कुठेय ते सांगा. मी फक्त त्याच्यावरच प्रेम केलं आहे. मला हे फसवुन केलेलं लग्न मुळीच मान्य नाही."
"ठिक आहे चल. मी तुला दाखवतो कबीर कुठे आहे. मग तु हवा तो निर्णय घ्यायला मोकळी आहेस."
"नाही, इथेच सांगा."
"राज्ञी, त्याला कोरोना झाला होता. शेवटच्या एक दिवस आधी त्याने फोन करून मला वचन मागितले होते की मी तुझ्याशी लग्न करून तुला सुखात ठेवावे. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याच्या मृत्यूची बातमी आली. आम्ही खूप तुटलो. तुझ्याशी लग्न करण्याचं एकमेव हेच कारण आहे. मी तुझ्या निर्णयाची वाट पाहतो.", असं म्हणुन तो जाऊ लागला.
राज्ञी, "क्षण मिलनाचा, साक्ष रवि-सागराची...
राज्ञी झाली आता, जन्मोजन्मी कबीराची..."
तिने स्वतःला सागरात झोकून दिले. त्या आवाजाने रवि मागे वळला. धावत धावत आला, ती गटांगळ्या खात होती.
"राज्ञी.", असं जोरात ओरडून उडी घेतली.
समाप्त
लेखिका अनघा लिखिते, पुणे.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box