वसंत पालवी - श्रीपाद टेंबे



वसंत-पालवी

लेखक श्रीपाद टेंबे

वसंताच्या आगमनाच्या सूचनेने पालवी नक्कीच मोहरली होती.

वसंताचे येणे तसं तिला अजिबात नवीन नव्हतं, आणि अनपेक्षित तर मुळीच नाही. तरीही

ती दरवेळेस त्याच्या आगमनाची सूचना देणारं कोकीळाचे कुहू कुहू ऐकले की ती अंतर्बाह्य

थरारून जात असे. जणू काही त्याला तिच्या शृंगाराच्या जाळ्यात अडकवून तिचा वसंत

कायमचा तिच्याजवळच राहणार होता.

तिच्या मनात जसं असेल तसं होणे शक्य नाही, हे मात्र तिला पुरेपूर माहित होत. एक दीड

महिन्याचा तो पाहुणा. पाहुणचाराचा मनसोक्त आनंद आणि उपभोग घेऊन तो मातृभूमीचे

रक्षण करण्यासाठी वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशाप्रमाणे सीमेवर जाण्यासाठी निघायचा.

त्यानंतर होताच ग्रीष्म पालवीचे तनमन जाळण्यासाठी.

‘कुहू ऽऽकुहूऽऽकुहूऽऽऽ”’

कोकिळेचा आवाज असलेली डोअरबेल वाजल्याचा आवाज ऐकला, तेंव्हा कुठे पालवी तिच्या

सुंदर अशा काव्यमय सुखस्वप्नातून बाहेर आली.

“आला वाटतं वसंत...” असं स्वत:शीच बोलत पालवी दरवाजा उघडण्यासाठी निघाली.

दरवाजा उघडताच वसंताला प्रथम दर्शन कुणाचं व्हावंतर ते पालवीचंच, असा आता बऱ्याच

वर्षापासून पायंडा पडला होता. जणु तो एक अलिखित नियमच होता.

प्रवासाने शिणलेला, परंतु उत्साहाने सळसळण्याऱ्या वसंतने पालवीला समोर बघून

हळूवारपणे व लाडीकपणे विचारले,” काय म्हणते आमची पालवी, चांगलीच बहरलेली

दिसते आहे”.

 

त्याचा नेहमीचा प्रश्न ऐकून पालवी मनोमन खूप लाजली. वसंतच्या खेरीज तिला कुणीच

पालवी म्हणून हाक मारीत नव्हते. सगळेजण तिला पल्लू पल्लू म्हणूनच बोलवत असत.

पालवी हे नावं फक्त शाळा, कॉलेजच्या दाखल्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले होते. बाहेरच्या

जगासाठी ती फक्त “पल्लू” होती. याला अपवाद होता तो फक्त तिच्या आणि वसंतच्या

असीम प्रेमाने भरलेल्या स्वप्नवत दुनियेचा. हे प्रेमाचे विश्व फक्त त्या दोघांचेच होते. केवळ

दोघांपुरतेच होते. त्यात वसंतने असं तिचं पूर्ण नाव घेणं हा जणू त्यांच्या प्रेमाने भरलेल्या

स्वप्नवत जगात प्रवेश करण्यचा पासवर्ड होता. अगदी अलीबाबाच्या गुहेवरची शिळ

हटवण्यासाठी असायचा त्याप्रमाणे.

“या पामराला दारातच उभं ठेवणार आहात, की घरात देखील येऊ देणार आहात ?” वसंत

गमतीने पालवीला मुजरा करण्याचा आवेश आणून म्हणाला, तेंव्हा ती आणखीनच लाजली.

दरवाज्यातून बाजूला होत वसंतला घराच्या आत येण्यासाठी जागा करून दिली. परंतु

वसंतने थेट आत येण्याच्या ऐवजी हातातले सामान बाजूला ठेवत आपल्या तिला आपल्या

बाहुपाशात घेतले.

विरह आणि प्रतीक्षेमुळे प्रेम दुप्पट वेगाने वाढतं असं म्हणतात, ते नक्कीच खर असावं. इतक्या

दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या जिवलगाच्या मिठीमध्ये सामाऊन जाण्याचं सुख पालवी

अनुभवू लागली. वसंताची अवस्था काही वेगळी नव्हती. पालवीला हे वसंताच्या मिठीतील

जोरानं जाणवलं होत. तिला आणि त्याला दोघांनाही प्रचंड उब जाणवली होती. दोघांनीही

एकमेकांच्या बाहुपाशात साऱ्या दुनियेच विसर पडला होता.

ते दोन्ही प्रेमी जीव आपला विरहाचा दुष्काळ संपवण्यासाठी आतुर असतांनाच त्यांना

कुणाची तरी चाहूल लागली, ते दोघेही अनिच्छेनेच आणि मोठ्या कष्टाने एकमेकांपासून दूर

झाले.

“आई !” वसंत उद्गगारला.

लाजेने पालवी बाजूला सरकली, चेहऱ्यावरचे आपले भाव लपवण्यासाठी तिने पट्कन वाकून

वसंतच्या बॅग्ज उचलल्या आणि वसंतच्या आईकडे म्हणजेच सुधाबाईंच्या नजरेला चुकवत

इकडे तिकडे न बघता ती पट्कन आत गेली.

तिची धांदल बघून सूधाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित तरळून गेलं.

तेवढ्यात वसंत समोर आला आणि त्याने वाकून आईला नमस्कार केला.

“आयुष्यमान भव !” असा आशीर्वाद देत त्यांनी वसंताच्या खांद्याला धरून त्याला उठवलं.

गेले कित्येक दिवसांपासून सुधाबाईंच्या आईची माया आपल्या लाडक्या मुलाला डोळे भरून

बघण्यासाठी आसुसलेली दिसत होती. स्त्रीसुलभ स्वभावानुसार कर्तबगार मुलाला प्रत्यक्ष

नजरेसमोर बघून त्या अधिकच भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ते

अश्रू त्यांना बिलगलेल्या वसंतने निमुटपणे आशीर्वाद समजून आपल्या डोक्यावर पडू दिले.

“या वेळेस आलास ना वसंत चांगली मोठी रजा काढून ?” सुधाबाईंनी आपला नेहमीचाच

प्रश्न विचारला. वसंतने देखील नेहमी सारखं हसून त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.

“चल आटोप आता, अगोदर पटकन फ्रेश हो, मी तुला लगेच जेवायला वाढते.” असं म्हणत

सुधाबाई लगबगीने स्वयंपाक घराकडे वळल्या .

“आई तू नको त्रास करून घेऊ, अग पालवी बघेल की स्वयंपाकाच. असं अगदी जिभेवर आले

होते वसंतच्या. पण त्याने स्वत:ला कंट्रोल केल, आणि तो काहीच बोलला नाही. सुधाबाई

वयोमानामुळे जरी थकल्या होत्या तरी पोटच्या मुलाला दोन घास स्वत:च्या हाताने खावू

घालण्यात आपल्या आईला किती सुख मिळत हे वसंत जाणून होता. आणि वसंत आपल्या

आईचे ते सुख हिरावून घेऊ इच्छित नव्हता.

वसंतच्या आगमनाची पालवीने देखील जय्यत तयारी केली होती. डायनिंग टेबलवरील

खाण्यापिण्याचे पदार्थ बघून वसंताची तर छाती दडपूनच गेली. पण तो तयार केलेल्या

प्रत्येक पदार्थाचा चवीने आस्वाद घेवू लागला. याचा अर्थ असा नव्हता की तो फक्त जेवणात

मग्न होता. खरं तर तो आपल्या आई आणि बायकोच्या निस्सीम प्रेमाचा पदार्थांच्या रूपाने

मनापासून आस्वाद घेत होता. त्याचे पोट तर तेव्हाच भरले होते, जेव्हा त्या दोघींच्या

चेहऱ्यावर फुललेलं समाधानाचं हसु पाहून. त्या दोघींच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने वसंत

बहरलेला दिसत होता.

“वसंत, सुधाबाई आपल्या कापऱ्या आवाजात म्हणाला,”वसंत, आम्हाला तुझा फार अभिमान

आहे, आपल्या देशमुख घराण्याचं नाव राखलेस रे बाबा तू. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती”.

वसंतने भिंतीवरील त्याच्या बाबांच्या तस्वीरीकडे बघितले तेंव्हा त्याला आपले वडील

खरोखरीच आनंदी आहे, आणि तस्वीरीतून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं त्याला

भास झाला. त्याने मनापासून नमस्कार केला. ब्रिगेडियर आनंद देशमुख ! आर्मीच्या संपूर्ण

ड्रेसमध्ये त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व वसंत साठी कायमच प्रेरणास्थान ठरले होते. त्यांचा

युनिफॉर्म घातलेला फोटो व त्यांना रणांगणावरील दैदिप्यमान कामगिरीसाठी मिळालेली

खूप सारे मेडल्स बघून, आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या शौर्याच्या कथा सुधाबाईच्या तोंडून ऐकून वसंतने शाळेतच असतांना आपणही आपल्या बाबांसारखं सैन्यात भरती व्हायचे,

देशाची सेवा करायची, असा निश्चय केला होता. आज त्याच्या आईकडून प्रशंसेचे शब्द ऐकून

त्याला भरून आले. जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटलं वसंतला. बसल्या बसल्या त्याच्या

डोळ्यासमोर दोन महिन्यापूर्वी असलेल्या परिस्थितचे चित्र तरळून गेले.

त्याला आठवले ते नाजूक, कमजोर क्षण, मनाला कमकुवत करणारे विचार. आपला निर्धार

कमकुवत करणारी मोहाची ती वेळ. दोन महिन्यापूर्वी हो अगदी दोन महिन्यापूर्वीच वेळ

होती. परंतु आता किती दुरचा भूतकाळ वाटतोय तो !

काश्मीर सीमेवरची, आणि आता नेहमीचीच झालेली चकमक पाहता पाहता मोठ्या युद्धात

केंव्हा परिवर्तीत झाली, ते कुणालाच कळले नाही. आणि वसंतच्या परीक्षेची वेळ अशीच

अचानक आली. वसंतच्या खांद्याला खांदा लावून लढणारा त्याचा सहकारी, जीवलग मित्र

विजय अचानक शत्रूच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने विरगतीला प्राप्त झाला. आणि

क्षणभरच वसंताचे लक्ष शत्रुवरून विचलित झालं. त्याच्या हातात असलेली मशीनगन

क्षणभर शांत झाली होती, त्याच क्षणाचा फायदा शत्रूने घेत वसंतचा बेस कॅम्पवर बॉम्बचा

मारा केला. तो बॉम्ब वसंतपासून केवळ पाच सहा फुटावर पडला आणि त्यामुळे धूर आणि

धुळीच्या मोठ्या लोटापुढे कुणी कुणाला दिसलेच नाही. सगळे एकदम दिसेनासे झाले होते.

धूर आणि धुळीच्या वातावणात वसंतने आपल्या धारातीर्थी पडलेल्या सहकाऱ्याकडे

बघितले. थेट वर्मी लागलेली गोळी त्याच्या मित्राची प्राणज्योत मालवून गेली होती. हेच

विदारक सत्य होते. वसंत क्षणभर विचलित झाला हाच तो क्षण होता. सैन्यात असला तरी

मृत्यूला इतक्या जवळून त्याने आयुष्यात प्रथमच अनुभवलं होत, इतक्या निकट बघितलं

होत.. हाच तो क्षण त्याला विचलित करणारा.

आकाशात जोरदार वीज चमकावी आणि पाठोपाठ क्षणाचाही विलंब न करता विचाररूपी

टपोऱ्या अशा थेंबांचा मुसळधार पाऊस यावा तसे एका क्षणात असंख्य विचार वसंतच्या

मनात येऊन गेले. कडाडणाऱ्या विजेसारख्या कित्येक प्रतिमा त्याच्या नजरेसमोर चमकून

गेल्या. त्या विचलित करणाऱ्या क्षणामध्येच धारातीर्थी पडलेला त्याचा मित्र विजय नुकताच

एका मुलीचा पिता बनला होता. पुढच्या महिन्यात मोठी रजा घेऊन त्याने त्याच्या गावी

जाण्याचे ठरवले होते. रजा मंजूर पण झाली होती. विजयच्या गावाकडे सगळेजण अतिशय

आतुरतेने त्याचा येण्याची वाट बघा होते. क्षणार्धात वसंतच्या तळपायाची आग मस्तकात

गेली. सगळं दृश्य कसं चीड आणणारे आणि समस्त मानव जातीला कलंक फासणारे होते.

माणसाचं रक्त पिणाऱ्या, जिवलगांची ताटातूट करवून आणणाऱ्या अशा प्रकारे निरर्थक

आणि निर्बुद्ध लढाया करण्याची गरज खरंच आहे ? उद्या या निरर्थक लढाईत आपलं काही

बर वाईट झाले तर आपल्या पालवीचे आणि आईचे काय होईल?

त्या आपल्या कायमचे त्यांच्या जीवनातून जाण्याचा धक्का सहन करू शकतील?

त्यापेक्षा या धुराचा आणि गोंधळाचा फायदा घेवून पळून जायचं का ? राहायला स्वत:चं

घर आहे, मोलमजुरी करू, आणि निवांतपणे आपले आयुष्य जगू. निदान रोज आपण

आपल्या कुटुंबासोबत तर राहू शकू. सुखाची व्याख्या या पेक्षा आणखीन वेगळी असूच शकत

नाही.

मग घ्यायचा का या गोंधळाचा फायदा, आणि जायचे पळून लढाईच्या रणांगांतून ? जायचे

नाही, जायचे नाही जायचे या विचारांच्या द्वंदात तो अधिकच गुरफटत गेला. बॉम्बस्फोट

आणि धुमश्चक्रीमुळे परिसरात निर्माण झालेली धूळ व धुर हळूहळू कमी कमी झाल्याने त्या

ठिकाणचे चित्र बऱ्यापैकी स्वच्छ झाले होते. तसचं काहीसं वसंतच्या बाबतीत घडलं.

त्याच्या मनात उठलेले धूळ रुपी विचारांचे वादळ देखील शमू लागले होते.

त्याच्या नजरेसमोर त्याला दिसले तस्वीरीतून त्याच्यावर लक्ष ठेवून असणारे कर्मठ आणि

कडक शिस्तीचे ब्रिगेडियर देशमुख त्याचे बाबा. ते काय म्हणतील? आपला मुलगा पळपुटा,

भ्याड, देशाला आणि कुटुंबाला कलंक? बाबांच्या सोबत वसंतला त्याची आई दिसली. तिला

काय वाटेल? लढाईच्या मैदानातून पळ काढणाऱ्या भेकड मुलाला जन्माला घालण्या ऐवजी

आपली कूस वांझोटी राहिली असती तर बरे झाले असते. आणि त्याला दिसली पालवी. ज्या

शूर सैनिका साठी आपले आयुष्य अर्पण केलं होते, ज्याच्या हातात तिने मोठ्या विश्वासाने

स्वत:चा हात दिला होता, त्या पळपुट्या नवऱ्याची साथ देईल कां? घरी पोचल्यावर

अभिमानी नजरेच्या पंचारती ओवाळणारी पालवीची मान असल्या भेकड नवऱ्यामुळे

कायमचीच खाली जाणार होती, त्याचं काय ?

एव्हांना वातावरणातील धूर आणि धूळ खाली बसली होती. वसंतलला देखिल सर्व काही

स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागले होते. मग पुढे काय घडल, हे त्यालाही निट आठवत नव्हत.

त्याला आठवलं ते इतकेच की लढाई थांबलेली आहे. धूळ आणि रक्ताने माखलेला वसंत

आर्मीच्या दवाखान्यात आहे. त्याचे वरिष्ठ अधिकारी सुधाबाईंशी बोलत आहे. पालवी आणि

सुधाबाई दोघीही कौतुकाने आणि अभिमानाने त्याच्याकडे बघत होत्या. वसंताचे शरीर

झालेल्या जखमांमुळे बधीर झाले होते. त्याला फक्त एवढच ऐकू आलं की, “आई तुमचा

मुलगा एकटा शत्रूच्या गोटात वाघासारखा शिरला आणि त्यांचा संपूर्ण खात्मा केला.

आपल्या देशाचं नाव राखलं त्याने. त्याच्या या महान कामगिरीचा आम्हाला गर्व आहे. मी

त्याला सॅल्युट करतो ”.

असे काही शब्द अर्धवट त्याच्या कानावर पडत होते मात्र ते शब्द ऐकून त्याचा डोळ्यातून

आनंदाश्रू वाहू लागले. ते आनंदाश्रू पालवीने आपल्या साडीच्या पदराने टिपून काढले. तेंव्हा

त्याला पुन्हा तेच जाणवलं की त्याच्या त्या कमकुवत क्षणाच्या दिवशी त्याला साक्षात्कार

झाला होता. सुधाबाईंची ममता, पालवीचे जीवापाड प्रेम, त्याच्या बाबांचा आदर्श, आणि

देशप्रेम हेच त्याचे सगळ्यात मोठे सामर्थ्य होते.

हे पुन्हा आठवून त्याचा चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमललं. ते पाहून पालवीला देखील हसू

आले आणि अगदी सहजपणे ती म्हणाली, माझा वसंत फुलला ग बाई फुलला माझा वसंत

फुलला.


समाप्त.

 

लेखक श्रीपाद टेंबे.


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box