संवाद - रोहिणी गभाले.

संवाद

रोहिणी संतोष गभाले.

ऋषिकेश विचार करत एका सुमसान जागी बसलेला. का तिने असा निर्णय घेतला असेल? खर तर ती असं बोललीच कशी? तिचे शब्द् न शब्द त्याच्या मनात रुतलेले.

सकाळी तो ऑफिस साठी तयार होऊन आला.

"काय मग आज जायचं ना डिनरडेट ला?" ऋषिकेशने हसत मस्तीच्या सुरात तिला विचारलं.  आज दोघांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता.

"ऋषी मला जरा बोलायचं होतं." ती अडखळत त्याला म्हणाली.

"काय हवं आहे आज राणीसरकारांना? " त्याचे मोहक डोळे तिच्यावर स्थिरावले तसं तिने नजर चोरली.

"ते.. " मृणालला कळत नव्हतं कसा विषय काढावा.

"अगं काय झालं? बोल ना. " ऋषिकेश.

"मला डिवोर्स हवा आहे. " मृणाल म्हणाली तसं पोहयांचा चमचा त्याच्या ओठांजवळ गेलेला थांबला.

"काय? मृण सकाळ सकाळी मस्ती करायचा मुड आला आहे का? " हसतच नकारार्थी मान हलवत त्याने घास खाल्ला.

"नाही ऋषी मी खर बोलते आहे. मला डिवोर्स हवा आहे. " आता मात्र तिचा गंभीर स्वर ऐकून त्याने तिच्या डोळयात पाहिलं कुणास ठाऊक पण ते कोरडे दिसत होते. तो काही न बोलता , न खाता बॅग घेऊन घराबाहेर पडला.

                       मृणाल आणि ऋषिकेश दोघांचा प्रेमविवाह . कॉलेजमधल्या प्रेमाच्या आणाभाका आणि लगेच घरात विषय मांडताच मिळालेला घरातल्यांचा होकार. लग्न झालं आणि कायमचे दोघंही विवाहबद्ध झाले. ऋषिकेश तिच्या प्रत्येक हौस पुरवायचा. ती काही मागण्याअगोदर वस्तू तिच्यासमोर हाजीर असायची मग असं काय होत? ज्यामुळे मृणालने डिवोर्सबद्दल विषय काढला? अजूनही त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. तोच त्याचा फोन खणखणला.

"सर मिटींग आहे. " समोरून आवाज आला.

"वेद आजच्या सगळया मिटींग  कॅन्सल कर. संध्याकाळी कळवतो पुढचं शेड्युल. " एवढचं बोलून त्याने कॉल डिसकनेक्ट केला . आतापर्यंत दोघांची झालेली भेट ते आजपर्यंतचा पुर्ण प्रवास तो आठवत होता की , नक्की त्याच काय चुकलं की तिला वेगळं व्हायचं आहे? जसं एखादया दांम्पत्यामध्ये लुटुपुटू भांडण होतात तशी त्यांच्यात ही व्हायची पण ती एवढी मोठी नक्कीच नव्हती. काही तरी ठरवून तो तिथून निघाला सगळयात पहिले त्याने एका फुलवाल्याला गाठलं त्याच्याकडून छान गुलाबांचा गुलदस्ता घेतला. तिथून तो निघाला आणि एका शॉपिंगसेटंरच्या पार्किंगमध्ये गाडी लावून महागडया दुकानात घुसला. मृणालसाठी त्याने त्याच्या आवडीची मोरपंखी रंगाची पदरावर मोर असलेली महागडी पैठणी घेतली आणि तो घराच्या दिशेने निघाला.

                 घरी मात्र तो असाच काही न बोलता निघून गेलेला ऋषिकेश आठवून मृणाल रडत होती. किती वेळ ती अशी बसलेली तिलाच पत्ता नव्हता. डोअरबेल वाजली तसं तिने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला. समोर ऋषिकेशला बघून मात्र ती गोंधळली. कालपासून महत्त्वाची मिटींग आहे सांगणारा ऋषिकेश पुन्हा येणे शक्यच नव्हतं.

"आत येऊ ना?"  ऋषिकेशने हसत विचारलं. ती अजूनही भ्रमातच होती काही वेळापुर्वी निघून गेलेला ऋषिकेश आणि आता हसत बोलणारा ऋषिकेश ? काही कळतचं नव्हतं तिला. शेवटी ती काही बोलत नाही समजून ऋषिकेशने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन आत येत दरवाजा लावला. तिच्या चेहऱ्यावरुन ती रडलेली त्याला ही समजून आलेलं.

"मृण कसला विचार करते आहेस? " ऋषिकेश.

"तू... मघाशी गेलेला? पुन्हा कसा आला? " मृणाल.

"आपली एनिवर्सरी आहे विसरली का? " ऋषिकेश थट्टा करत म्हणाला.

"मला वाटतं मघाशी मी जे बोलली ते तू विसरलास? " मृणालने त्याच्या डोळयात आरपार बघत त्याला विचारलं.

"मृण हे बघ तुझ्यासाठी बुके आणि ही बघ साडी. " त्याला अजूनही असचं वाटतं होत छोटया गोष्टीवरुन ती रुसली असेल.

"ऋषी तुला कळतयं का? मला हे काही नको आहे. मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे.

नाही राहायचं आहे मला तुझ्यासोबत. " त्याने समोर केलेला बुके ,साडी झिडकारत ती चिडून म्हणाली. त्यालाही राग आलाच त्याने तिच्या दंडाला पकडून तिला कळकळीने विचारलं.

"मृण का अशी बोलते आहेस? काय चुकलं माझं? किती छान संसार आहे आपला? कुठे कमी पडतो आहे मी ? सांग ना. " त्याच्या डोळयातली तळमळ तिला ही कळत होती.

"माझ्या काही प्रश्नांची उत्तर देशील? " मृणाल. तो मात्र तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.

"मला कोणता कलर आवडतो? " मृणाल.

"हा काय प्रश्न आहे मृणाल? " ऋषिकेश गोंधळला कारण खरचं त्याला माहित नव्हतं तिला कोणता कलर आवडतो.

"मला उत्तर हवं आहे ऋषी. " त्याला शांत पाहुन ती म्हणाली. तो निरुत्तर होता.

"बरं जाऊ दे मला खायला काय आवडतं? " त्याचा दंडावरचा हात तिने काढून टाकला.

"हे उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं फक्त पैसा ,हौस करुन प्रेम होत नाही त्यासाठी एकमेकांच्या मताचा, आवडीचा आदर करावा लागतो जो आपल्यात नाही. वर्कलोड आहे म्हणून उशिरापर्यंत काम करायचं पण इथे दिवसभर जे झालं मला बोलता यावं म्हणून मी ही वाट बघत असते ते कधी कळलं का तुला?  तू फक्त मला गृहित धरतो. तुला वाटतं मला सगळं तू केलेलं आवडतं. महागडी वस्तू दिली की मृण खूश. बरोबर ना? " तिने चिडून त्याला विचारलं.

"मृण." तो जवळ येणार तोच तिने त्याला हाताने अडवलं.

"मला बोलू दे ऋषी. आय नो एकमेकांना जास्त ओळखण्याअगोदरच आपलं लग्न झालं. मला जॉब करायला तू फोर्स केला नाही आणि हो मी ही आनंदी होते माझ्या संसारात. तुला रोज नवनवीन पदार्थ करुन खाऊन घालण्यात पण तू तुझ्या कामात ,पैसे कमवण्यात एवढा गुरफटला आहे की मी फक्त तुझी गरज आहे. " मृणाल. हे मात्र ऋषिकेशला चांगलच झोंबल.

"तू काहीही बोलते आहेस आणि हो मी जर कामात गुरफटलो तो आपल्या साठीच ना? हे घर, घरच्यांची जबाबदारी कसं होणार? त्यासाठीच ना?  " ऋषिकेशचा आवाज वाढला.

"हो पण मी कुठे आहे ऋषी ? " मृणाल.

"कायम माझ्या मनात. " ऋषिकेश.

"हे फक्त बोलण्यासाठी झालं. " ती उदास हसली.

"मृण ऐक ना मी आपल्या साठीच हे सगळ करतो आहे ना? मग माझं काय चुकलं? मला हवी आहेस यार तू. कायमची माझ्यासोबत, माझ्याजवळ. " ऋषिकेश.

"मी तुझं चुकलं हे कुठे बोलली? बसं मला नाही जमत आहे कुढत राहणं. हे बघ आज ही हा जो कलर आणला मला नाही आवडत ऋषी . जाऊ दे प्लिज मला मोकळं कर ह्या नात्यातून. " ती डोळे घट्ट मिटत म्हणाली. त्याने सुस्कारा सोडत केसांवरुन हात फिरवला.

"तू खुश राहणार आहेस? " ऋषिकेश.

"नाही माहित पण मनासारखं राहिल. " मृणाल. त्याने तिचा चेहरा ओजंळीत घेतला.

"हे माझ्या डोळयात बघून बोल. " ऋषिकेश . तिने नजर चोरली.

"माझ्या सगळया चुका मान्य पण ह्यामध्ये तुझी काहीच चुक नाही का ? " त्याने विचारलं तसं तिने प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहिल.

"जेव्हा आपण प्रेमात पडलो तेव्हा सर्व गोष्टी तू मला विचारुन करायची. मी कधीच तुला जॉब करु नको बोललो नव्हतो. लग्न झाल्यानंतर मला जे आवडतं ते मी आणलं पण तू ही मला ती जाणीव करुन दिली नाही की ती वस्तू तुला आवडली नाही. कामाचं म्हणशील तर हो असतो प्रेशर असेल होत माझ्याकडून दुर्लक्ष पण मी भरकटलो नाही ना? तुला फसवत तर नाही ना? हो आता नक्की तुझ्यासाठी वेळ काढेल.  माणूस आहे मी कधीतरी समोरच्याने भावना मांडल्या तर कळू शकतात ना? आज लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर मला तू ही जाणीव करून देते आणि ते ही डिवोर्स पेपर हातात देऊन. हे चुक नाही का?" त्याच्या डोळयात पाणी तरळलं. जेवढं मृणालची अपेक्षा त्याने तिची आवड जपावी होती तेवढं तिने ते कधी बोलून न दाखवणं हे ही चुक होतं.

तिलाही ती जाणीव झाली.

"फक्त एक संधी दे ना. प्लिज. " ऋषिकेश अपेक्षेने तिला बघत म्हणाला. रडतच ती त्याच्या कुशीत शिरली. त्याने ही निर्धास्त होत तिच्याभोवतीची मिठी घट्ट केली.

"शु... नको रडू. मला नाही आवडत तुझ्या डोळयात पाणी. " त्याने तिला समोर करत तिचे डोळे पुसले.

"खूप घुसमट होत होती रे माझी. एकटं एकटं वाटत होतं. " मृणाल.

"मग का बोलली नाही ? भांडली असतीस त्या वरुन. जाब विचारला असता. " ऋषिकेश.

"सॉरी. नाही जमल मला बोलायला ,तुला दुखवायचं नव्हतं म्हणून घरी ही निघून जाणार होते पण पुन्हा तेच प्रश्न आले असते म्हणून ठरवलं की...  " डोळयातून एक अश्रू ओघळलाच. त्याने अंगठयाने तिचे डोळे पुसले.

"डिवोर्स घेऊन मला मोकळं करावं." त्याने तिचं वाक्य पुर्ण केलं.

"मी आताही मान्य करतो माझं चुकलं की मी तुला गृहित धरलं तितकचं तुझंही चुकलं की तू तुझं मत नाही मांडलसं. नात्यामध्ये संवाद खूप महत्त्वाचा असतो नाहीतर गैरसमज वाढतात आणि नातं टोकाला पोहचतं , आज आपलं नातं टोकाला पोहचता पोहचता वाचलं.  " ऋषिकेश तिला समजावत म्हणाला.

"सॉरी ह्यापुढे लक्षात ठेवेलं. आय लव्ह यू ऋषी." ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली.

"आय लव्ह यू टु." त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

"हॅप्पी एनिवर्सरी. मला आताच तुझ्याकडून एक वचन हवं आहे." त्याने तिच्यासमोर हात केला.

"कोणतं?" मृणाल.

"कधीही मनात काही आलं तरी ते मनात न ठेवता माझ्यासोबत बोलशील . मी दुखावेल ,मला वाईट वाटेल किवां काहीही विचार न करता. " ऋषिकेश.

"प्रोमिस. हॅपी ऍनिवसरी. " ती त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली. क्षणातच त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्या स्पर्शात ही तिला त्याला तिला गमवायची किती भिती होती ते कळतं होतं. ती ही त्याच्या स्पर्शात हरवली. श्वास अपूरा पडताच त्याने ओठ विलग केले तसं लाजून ती त्याला बिलगली.

"मला अशी माझी लाजाळू मृण खूप खूप आवडते. चला आता. " ऋषिकेश तिचं नाक खेचत म्हणाला.

"कुठे? " मृणाल.

"साडी बदलायला." ऋषिकेश.

"नको राहु दे तू आवडीने आणली आहेस. " मृणाल साडी हातात घेत म्हणाली.

"काय? बघ आता पुन्हा. मृण काय समजावलं आता मी?   " ऋषिकेशने कपाळावर हात मारला.

"सॉरी . सॉरी. जाऊया. " ती हसत आवरायला निघून गेली . ऋषिकेशने ही मनातच ठरवलं ज्या चुका झाल्या त्या सुधरायच्या. दोघं घरुन बाहेर पडले.

"ऋषी. " मृणालने त्याला हाक मारली.

"बोल मृण. " ऋषिकेश समोर बघत म्हणाला.

"तुझी आज महत्त्वाची मिटींग होती ना? " मृणाल.

"हो पण पोस्टपोन केली. " ऋषिकेश.

"सॉरी माझ्या मुर्खपणामुळे ना? " तिला माहित होत कामात तो खूप प्रामाणिक होता.

"एखादं वेळेस ती डिल नाही मला मिळाली तरी चालेल पण आपल्या संसाराची घडी मला विस्कटायची नव्हती. " तिच्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला. तिच्या मुर्खपणावर मात्र तिलाच राग आला. आता विषय वाढवून पुन्हा तिला त्याचा आणि स्वतःचाही मुड खराब करायचा नव्हता.

"ऋषी." तिने लाडीक आवाजात त्याला साद घातली. भुवया उंचावून हसत त्याने तिच्याकडे पाहिलं.

"मला गुलाब नाही मोगरा आवडतो. " मृणाल हसू दाबत म्हणाली.

" ए मृण अजिबात नाही हा. मी बुके नाही चेंज करणार भले गजरा घेऊन देतो. " ऋषिकेश गोंधळून म्हणाला . त्याला तसं बघून ती खळखळून हसू लागली.

                                                                   समाप्त..

रोहिणी गभाले.

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.   


Post a Comment

0 Comments