सोलमेट - निशा वर्तक

सोलमेट
निशा वर्तक

"हॅल़ो... जयदिप, ऐक न माझं जरा... मला बोलायचे आहे तुझ्याशी. मला खूप टेंशन आले आहे." 
" जानू, अग आताच तर आपण ऑफिस मधून येताना सारे बोललो आणि उद्या मला लवकर निघायचे आहे ,सारी तयारी करायची आहे मला! आता काय बोलायचे आहे तुला?"
 " जय, तू उद्या टुरवर चेन्नयीला जाणार आहेस आणि चार दिवसांनी येणार आहेस!! तोपर्यंत माझे डॅडी माझे लग्न लावून मोकळे होतील असंच वाटतेय मला... माझ्या डॅडीना आपल्याबद्दल सर्व समजले आहे!  मी ,ममा आणि डॅडच बोलणे चोरून  ऐकले आहे.  जॉन डिसोजा नाव आहे त्याचे! तो त्यांना खूप पसंत आहे‌. तो ही आमच्या सारखाच धर्मांतरीत ख्रिश्चन आहे.... थोडंफार मराठी बोलणारा आहे. ' एका हिंदू मुलांशी मी माझ्या मुलीचं मुळीच लग्न लावून देणार नाही' अस डॅड  जोर जोरात ममाला सांगत होते... जय मी काय करू... मला खूप भीती वाटतेय... ही धर्माची भिंत आपल्या प्रेमाच्या आड येणार !" आणि  जेनीफरला हुंदका आवरता आला नाही.. 
"अग शांत हो, शांत हो, रडु नकोस"
 " कशी शांत होऊ जय? जय तू नको न जाऊस उद्या... मला काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतेय.. जय मी तुझ्या शिवाय एक क्षणही जगु शकत नाही. मी तुझ्यासाठी सारे काही सोडायला तयार आहे... माझा धर्मही मी सोडून तुझा धर्म स्विकारीन, तु सांगशील तसे करीन, मला फक्त तु हवा आहेस. मी माझं मांसाहारी खाणेही सोडुन दिले आहे तुझ्यासाठी".
"अग हो..‌. हो किती बोलशील.. प्रेम फक्त तुझेच आहे !!आणि माझे नाही? हे बघ  जानु तु फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार आहेस आणि मी तुला काही धर्म वगैरे बदलायला लावणार नाही...... सर्व धर्मांच मर्म सारखेच असते. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावं हाच खरा धर्म. माझ्या बाबांना मी तुझ्याबद्दल सांगितले आहे!! ते  पण थोडे वेगळे रिऍक्ट झालेत,  मला स्पष्ट म्हणाले  'कि हिंदू धर्म सोडून इतर धर्माची मुलगी केलीस तर तुला आम्हाला आणि ह्या घरालाही मुकावे लागेल.  तुला तुझा रस्ता मोकळा आहे, ह्या घराचे दरवाजे कायम तुझ्यासाठी बंद असतील.'  मी पण त्यांना म्हंटले कि मी जेनीफरशिवाय इतर कुणाशीही लग्न करणार नाही. बाबा   काहीच बोलले नाहीत . पण ते जेव्हा आईला सांगतील तेव्हा आई  मात्र खूप अस्वस्थ होईल....ती  खूपच सोवळ ओवळ पाळते. तिला समजावणे थोडे कठीण आहे पण अशक्य नाही. आईचं माझ्यावर कीती  प्रेम आहे तुला माहितच आहे, तुला मी सारे किस्से सांगितले आहेत तिच्या हळवेपणाचे आणि माझ्यावरील तिच्या वेड्या प्रेमाचे.  आईने मराठमोळ्या सुंदर सुनेचं स्वप्न जपलं आहे गं!! पण तु नक्किच तिच्या स्वप्नातल्या सुनेसारखीच आहेस.... तू नक्किच तिला आवडशील मला खात्री आहे. तुझा तो नववारितला सुंदर फोटो मी अगदी जपुन ठेवला आहे माझ्या पाकिटात!  काय दिसतेस तू त्या फोटोत!! आई नक्कीच फिदा होईल तुझ्यावर! मी आधी तो फोटो आईला दाखवीन आणि नाव नंतर सांगीन.... नावात काय असतं.... ते तर बदलता येतच! "
" ये जय, गप्प बसरे, तुझ आपलं काहीतरीच! " 
" अग खरच मी बाबांना सर्व सांगितले आहे कि तुम्ही खरेतर जन्माने हिंदूच आहात ,  तुला किती छान मराठी बोलता येते आणि तु पुन्हा हिंदू धर्मात येण्यास किती उत्सुक आहेस, मी सारे सांगितले आहे. तू काळजी करू नकोस, मी चेन्नयीला जाऊन येतो मग आपण बघु , सारे ठिक होईल, काळजी घे " असं म्हणुन जयदिपने फोन ठेवला.

               **************
रात्री जेनिफरला झोप लागली नाही. सकाळी ती लवकरच उठली आणि ऑफिसला जायला निघाली.  तेवढ्यात जेनीफरच्या डॅडनी तिला विचारले ' ईतक्या लवकर कुठे निघाली आहेस? आज तुला संध्याकाळी जॉन नावाचा एक मुलगा भेटायला येईल ऑफिसर मध्ये, त्याला तुझ्याशी बोलायचे आहे, खूप चांगला मुलगा आहे, मी पसंत केला आहे तुझ्यासाठी". जेनिफर ने डॅडकडे पाहीले आणि फक्त मान डोलावली.  
जय सकाळी नऊ पर्यंत पोहचणार होता आणि त्याची मिटिंग साडेदहाला सुरू होणार होती. रात्रभर ती जयचाच विचार करत होती , तिला त्याची मिटींग सुरु व्हायच्या आत त्याच्याशी बोलायचे होते. का कुणास ठाऊक पण तिला आतुन एक अनामिक भिती वाटतं होती‌ ... आपली पुन्हा भेट होईल की नाही अशी शंका तिला येत होती  आणि इथे जयदिप  मात्र विमानात बसुन जेनीफरबरोबर घालवलेले सारे क्षण आठवत होता आणि भविष्यातील स्वप्न रंगवत होता. तिच्याबरोबरचे ते अविस्मरणीय रम्य क्षण आठवुन त्याला गोड गुदगुल्या होत होत्या.  लवकरात लवकर आई-बाबांची समजुत घालुन जेनिफरशी लग्न करायच असा विचार करत होता. 

जयदीप चे विमान अगदी राईट टाईम होते. विमान लॅंड झाले आणि जयदीप भानावर आला. त्यांने लगेच आपला मोबाईल फ्लाईटमोड वरून नॉर्मल मोड वर आणला आणि लगेचच त्याला जेनिफरचा फोन आला... त्यांने लागलीच उचलला.." अग जानू... किती परफेक्ट टायमींग तुझे!! मी जस्ट लॅंड झालोय, अजुन बाहेरही आलो नाही तेवढ्यात तुझा फोन!! किती मिस करतेस मला!! अग मी येतोय चारच दिवसात, धीर धर जरा. ". 

" जय, तुझे चार दिवस मला चार युगासारखे वाटु लागले आहेत!! तुला आणि मला अंधारात ठेवून ममा आणि डॅडने वेगळेच प्लॅन आखले आहेत!! मी आता ऑफिसमध्ये आले आहे पण संध्याकाळी मला तो भेटायला येणार आहे, मला त्याच्याबरोबर जावे लागणार आहे माझ्या मनाविरुद्ध.... मी कशी जाऊ त्याच्या बरोबर ... जय, तुला नाहि समजणार रे माझ मन....कसं सांगु तुला....  मला नाही जायचे त्यांच्याबरोबर....तु  तुझे काम लवकर आटपून दोन दिवसांत नाही का येऊ शकत?"

अग तु इतकी का पॅनिक झाली आहेस! वेडाबाई थोडा धीर धर न!! हे बघ मला आता लगेच मिटींगला जायचे आहे, तु काळजी करू नकोस, चारच दिवस तु धीराने  खिंड लढव मग मी आहेच. हवं तर आपण लगेचच रजिस्टर मॅरेज करू मग तर झालं.... चल बाय.. टेक केअर...लव यू."  आणि जयदिपने फोन ठेवला.

जेनीफरच्या समोर   लॅपटॉप होता पण जेनीफरची नजर शुन्यात लागली होती. ईतक्यात टेबलवरचा इंटरकॉम वाजला आणि जेनीफर भानावर आली. तिने पटकन फोन उचलला.....पलिकडून कर्णिक सरांचा आवाज ..' Jeni come into my cabin immediately.' 

'येस सर' म्हणुन जेनी पेन आणि रायटिंग पॅड घेऊन पळतच गेली..  कर्णिकसरांचा मुड काही ठिक दिसत नव्हता. चेहऱ्यावर राग आणि नाराजी दिसत होती.  अगदी हळु आवाजात जेनी ने  विचारले," May I come in?"

"Come in, come in Jeni, what is wrong with you? Are u alright?  सरांनी पेपरच्या बंच टेबलवर आपटला आणि म्हणाले, " How many mistake!!! You know , this is very important report which goes to MD and Chairman. How can you do like this?" सरांचा तो अवतार पाहुन जेनीफर एकदम घाबरली आणि "I am very sorry Sir!" येवढंच बोलली आणि ती स्वत:ला सावरू शकली नाही... तिच्या डोळ्यात पाणि आले आणि  ती रडतच पुन्हा म्हणाली "I am very sorry Sir",  असं म्हणुन ती उठली आणि बाहेर जाऊ लागली पण सरांनी तिला थांबवले..." जेनी ,थांब, जाऊ नकोस बस दोन मिनिटे. काय झाले आहे ? काही अडचण आहे का? तुझी तब्येत बरी नाही का?  कि जयदीप चार दिवस टुरवर आहे तर त्याला इतकं मिस करतेस!!" 
सरांचे बोल ऐकून तिला आणखी रडु येऊ लागले. सर तिला म्हणाले...ओके ओके सांगण्यासारखे नसेल तर नको सांगुस पण हा रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे,  आता जागेवर जा आणि लगेचच व्यवस्थीत टाईप करून आजच मला दे, थोडे उशीरा बसायला लागले तरी चालेल पण आजच हवा आहे." जेनिफर हो म्हणाली आणि उठून जागेवर गेली.
               ***************
जेनिफर धर्माने  ख्रिश्चन जरी असली तरी वसईची होती, ती उत्तम मराठी बोलायची,  तिचे नाव जेनिफर होते पण जयदीप तिला जानु म्हणायचा आणि तिचा देव जरी  येसु होता तरी तीला बाप्पा खूप आवडायचा !! बाकी सारे संस्कार हिंदूचेच झाले असावेत असं तिच्याकडे पाहिल्यावर वाटायचे. पुर्वीच्या काळी बाटवून धर्म बुडवत तसला काहीतरी प्रकार होता. जेनिफर आणि जयदीपचे प्रेमप्रकरण ऑफिसमध्ये सर्वांना ठाऊक होते. त्या दोघांना सारे लव्हबर्डच  म्हणायचे.  
जेनिफर अगदी मनापासून रिपोर्ट टाईप करायचा प्रयत्न करत होती पण तिचे लक्षच लागत नव्हते. शेवटी तिला रिपोर्ट टाईप करता करता खूपच उशीर झाला. ऑफिसची वेळ कधीच संपुन गेली होती. तिला जवळ जवळ एक तास जास्त थांबावे लागले होते. तिने रिपोर्ट पुन्हा एकदा निट तपासून पाहिला आणि नंतरच सरांना नेऊन दिला‌. ती आता तिचे टेबल आवरत होती आणि तिने तिचा मोबाईल चेक केला तर.... जाॅन डिसोजाचे पाच मिस कॉल!!!  तिला धस्स झाले आणि ती त्याला फोन करणार तेवढ्यात पुन्हा त्याचाच फोन आला, तिने तो पटकन रिसीव्ह केला आणि ती हॅलो म्हणायच्या अगोदरच  पलीकडून फायरींग सुरू झाले... ", Why are you not answering my calls? Are you still in the office? I want to meet you , I am coming there to pick you up, wait there only " .ती फक्त  ओके  म्हणाली, तिचे डोळे पुन्हा भरून आले,  तिने फोन ठेवला आणि टेबल आवरून निघणार तेवढ्यात  सरही घरी निघण्यासाठी केबीन बाहेर आले आणि जेनीला म्हणाले, " जेनी तुला खूपच उशीर झाला आहे, खालीच थांब मी तुला घरी सोडतो, जयदीप नाही तर तुझी येवढी काळजी तर घ्यायलाच हवी!"  जेनी त्यांना लगेचच म्हणाली, " नको सर, आज मला जरा दुसरीकडे जायचे आहे." सर तिला ओके, ठिक आहे  म्हणाले आणि निघुन गेले. जेनिफर खाली उतरली आणि लगेचच जाॅन तिथे बाईक घेऊन हजर झाला. जेनिफर त्याला खूप आवडली होती, त्याने तीचा हात हातात घेतला  आणि तिला जवळ घेतले. जेनिफरला मात्र अवघडल्यासारखे झाले. जाॅन तिला म्हणाला ," come,   we will go to nearby restaurant, I want to talk to you and actually I want to discuss with you about our future plan."  जेनिफर नाईलाजाने त्याच्या बाईकवर अवघडल्या सारखी बसली . जाॅन तिला सांगत होता , " Jeni sit properly, hold me , why are you feeling so shy Jeni? Now we are getting married very soon."  
जेनिफर  दोन्ही बाजूला पाय न टाकता एका बाजूला पाय टाकून बसली आणि त्याचा स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घेत होती.  तिला ह्या क्षणी जयदीप ची खूप आठवण येत होती.. तिला आठवत होतं ते दोघे ऑफिस नंतर कसे बाईकवर बसुन बिचवर जायचे,  जयदीप मधुनच बाईक अशी जोरात उडवायचा कि ती आपसुकच उडायची आणि जयदीपच्या पाठीवर आदळायची आणि जयदीपच्या अगदी जवळ चिकटुन बसायची‌. बाईक चालु असताना अलगद हळुहळु होणारा तो स्पर्श  दोघांनाही खरंतर हवा हवासा वाटायचा. कधी कधी तर भान विसरून ती मागुन त्याला घट्ट मीठी मारायची आणि त्यांच्या पाठीवर विसावायची. जयदीपही तिच्या उबदार चेतवणा-या स्पर्शाने मोहरुन जायचा. हे सारं  तिला आठवत होते आणि जाॅनच्या स्पर्शाची तिला शिसारी येते होती, तो स्पर्श तिला नकोसा वाटत होता. एकदाचे ते एका रेस्टॉरंट मध्ये पोहचले आणि जेनिफरने निश्वास सोडला. जाॅनने तिला न विचारताच दोन सॉफ्ट ड्रिंक  मागवली. जेनिफर जास्त काहीच बोलत नव्हती, गप्पगप्पच होती. जाॅन मात्र खूप आनंदात होता. जाॅनने अचानक तिचा हात हातात घेतला आणि आनंदाने हात जोरात दाबत म्हणाला " Jeni, you know why I called you here urgently today !  मी तुला एक सरप्राइज देणार आहे... आपण परवा रजिस्टर मेरेज करतोय.... तुझ्या डॅडनाच खूप घाई आहे आणि मला काहीच हरकत नाही. रजिस्टर मॅरेज आणि दुस-या दिवशी मोठं रिसेप्शन आणि पार्टी ठेवायची अस सारं ठरलं आहे." जेनिफरला हे ऐकून एकदम धक्काच बसला. तिला अंधारात ठेवून डॅडने हे सारं ठरवून जाॅनकडुन तिच्या पर्यंत असे पोहचवले होते. हे ऐकून मात्र जेनिफर एकदम भेदरून गोंधळून जाॅनकडे पाहात होती. जाॅन तिला म्हणाला , " what happened Jeny? I think you are not mentally prepared!" 
"नाही तसे काही नाही! पण जरा घाईच होतेय न!  आता आपण निघु या मला घरी पोहचायला उशीर होईल आणि आता एकच दिवस उरला आहे न!" 
" Ok , I will drop you to the station."
नाईलाजाने जेनीफरला पुन्हा जाॅनच्या बाईकवर पाठी बसावे लागले. जेनिफर एकदाची अंधेरी स्टेशनवर पोहचली आणि जाॅनला टाटा करून‌ धावतच विरार ट्रेन पकडायला निघुन गेली. 

ट्रेनमधे शिरल्या शिरल्या तिने जयला फोन लावला आणि जयला सारे कथन केले आणि रडू लागली. जयने तिची खूप समजुत घातली आणि म्हणाला,  फक्त एक दिवस कसाही करुन धीर धर आणि  सारा प्लॅन तिला समजून सांगितला. जेनिफर घरी आली आणि पाहते तर घरी सारी लग्नाची  जोरदार तयारी सुरू होती. पुर्ण घराला रोषणाई केली होती‌. तिला भयानक राग आला पण  न संतापता   तिने आनंदाचा दिखावा करायचा.... नाटक करायचे ठरवले... तिला जय बरोबर पळुन जाण्याचा प्लॅन यशस्वी करायचा होता. तिने हाताला मेंदीसुद्धा लाऊन घेतली पण तिच्या मनात घालमेल आणि काळजात धडधड होत होती. थोड्या वेळाने ती सर्वांना म्हणाली ," मी आता खूप थकले आहे आणि आता मी माझ्या रूममध्ये झोपायला जातेय." असं म्हणुन ती आत गेली आणि  आतुन दरवाजा लाऊन घेतला. तिने तिची बॅग भरायला घेतली. भराभरा तिने कपडे बॅगेत कोंबले आणि जवळ होते तेवढे सारे पैसेही पर्समधे ठेवले आणि सर्व  तयारी करून तिने जयला फोन लावला....  " हॅलो जय, मी पुर्ण तयारीत आहे..‌‌.. रिटा पण रिक्षा घेऊन नाक्यावर उभी राहणार आहे... मी जशी संधी मिळेल तशी निघतेच आहे....तु वेळेवर ठरल्या ठिकाणी ये, मी वाट पाहते."
"  अग ऐक, थोडा एक प्राॅब्लेम झाला आहे ...‌माझे फ्लाईट दोन तास डिले होतेय, येथे खूप वादळ आणि पाऊस सुरू झाला आहे तर तुला थोडी वाट पाहावी लागेल पण तु काळजी करू नकोस मी नक्की येतोय.
" काय रे हे!! मधेच पाउस आणि दोन तास डिले? ठिक आहे, मी तिनं वाजेपर्यंत निघतेय, रिटा मला मिसकॉल देणार आहे  मग मी निघणार आहे.... राजेश येणार आहे न एअरपोर्टला? राजेश आणि रिटा दोघे एकमेकांच्या कान्टॅक्ट मधे असतीलच न!"
"हो गं काळजी करू नकोस... चल बाय.... टेक केअर... भेटु लवकरच ... लव यु !" असं म्हणुन जय ने फोन ठेवला आणि .....जयच्या फोनवर मेसेज आला वादळाची तिव्रता वाढल्याने विमान आणखी दोन तास लेट होणार आहे!! राजेशने कपाळाला हात लावला!
         ********************
बरोबर तीन वाजता रिटाचा काॅल आला.  जेनी वाटच पाहात होती, ती तयारच होती.  जेनीने हळुच बाहेरचा कानोसा घेतला... दरवाजा किलकिला करून पाहिलं तर....... बाहेर लाईट चालु होता आणि दोन पहारेकरी खुर्चीवर बसले होते. डॅडीच्या ह्या अशा वागण्याने तिच्या सा-या आशा मालवल्या. पळुन जाण्यासाठी तिला मार्गच दिसत नव्हता. तिला काहीच सुचत नव्हते..पुढे फक्त अंधार दाटला आहे आणि एका तळ नसलेल्या खोल खोल काळ्या डोहात आपण उडी मारतो आहोत असं काहीसा तिला भास होत होता ..‌.तिने लगेचच जयला फोन लावला पण सारखा  नाॅट रिचेबल लागत होता. रिटाला फोन करून तिने सारी परिस्थिती सांगितली आणि ती हतबल होऊन रडु लागली. शेवटी तिने  जयला एक मेसेज टाईप करून पाठवला......" जय तुझ्याशिवाय मी आता एक क्षणही जगु शकत नाही..... आणि नियती तुझी माझी भेट होऊ देत नाही... तुझ्याशिवाय मला एक श्वासही घ्यायचा नाही...‌आता मला जगायची इच्छाच नाही. तु वेळेत आलास तरच आपली भेट होऊ शकते  आणि नाही आलास तर...... तर आपली भेट पुढच्या जन्मी..... Love you....bye!"
रिटाने बराच वेळ जेनीची वाट पाहिली आणि राजेशला कळवले.... 'काहीतरी गडबड वाटतेय, जेनी बाहेर पडू शकत नाहीये! काय करायचं?'

राजेश एअरपोर्टला सकाळ होई पर्यंत जयची वाट पाहात बसला होता आणि रिटा नाक्यावर जेनीची वाट पहुन थकली.  पहाटे पहाटे जेनीच्या घराजवळ रिटाला काहीतरी  गडबड जाणवली. थोड्या वेळाने भयानक बातमी तिच्या कानावर आली आणि तिने लगेच राजेशला फोनवर रडत रडत, भीत भीत बातमी सांगितली आणि ती सरळ घरी गेली. 
जयचे विमान सकाळी अकरा वाजता सांताक्रुझ एअरपोर्टला लॅंड झाले. जयने  जेनीफरचा मेसेज वाचला होता...त्याला काहीच कळत नव्हते... पुढे काय वाढुन ठेवले आहे.....त्याचे मन था-यावर नव्हते...अनेक भयावह विचारांनी  थैमान घातले होते. एअरपोर्टच्या बाहेर पडताच त्याला समोर अस्वस्थ, असहाय्य  राजेश दिसला. राजेश स्वत:ला सावरू शकला नाही..‌. त्याने जयला घटृ मिठी मारली आणि तो नि:शब्द झाला... त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते... त्याने जयचा एक हात घट्ट पकडला होता आणि एका हाताने जयच्या पाठीवरून हात फिरवित होता. जय समजायचे ते समजला आणि निर्विकार भावनेने तो राजेशला म्हणाला.. ‌
" मी ठिक आहे , तू आता घरी जा, मीपण घरीच जातोय." 
" नाही जय, मी येतोय तुझ्या बरोबर, मी सोडतोय तुला तुझ्या घरी....तुला एकट्याला कसे जाउ देईन मी!"
दोघेही  टॅक्सीत बसले, दोघेही नि:शब्द होते , थोड्याच वेळात ते जयच्या घरी पोहचले. जयच्या आई-बाबांना कसलाही थांगपत्ता नव्हता.थोड्या वेळाने राजेश आपल्या घरी निघून गेला आणि जयही  पाठोपाठ आई-बाबांना म्हणाला मी जरा ऑफिसला जाऊन येतोय,  काम आहे महत्त्वाचे असे म्हणुन आपली नेहमीची बॅग घेऊन निघाला. जय थेट विरार ट्रेन पकडुन वसईला आला आणि सरळ जेनिफरच्या घराजवळील जे  ग्रेव्हयार्ड होते तेथे गेला.... तो पर्यंत संध्याकाळ झाली होती. जेनिफरच्या बाबांनी काही गडबड होऊ नये म्हणुन घाईघाईने जेनिफरचा दफनविधी उरकला होता. नविनच बांधलेले ग्रेव्हयार्ड जयने ओळखले... ताजी फुले विखुरली होती... मेणबत्ती जळत होती. ते पाहिल्यावर तो स्वत:ला सावरू शकला नाही... त्याने मोठ्याने जेनिफर ला हाक मारली..." जानु,... का केलंस तु असे...आपलं ठरलं होतं ना एकमेकांची साथ सोडायची नाही..... तू तिथे मी आणि मी तिथे तू! मग का मला सोडुन गेलीस? मी आलोय आता मी माझं वचन पाळणार आहे... जिथे तू तिथे मी.....आणि त्याने तिथेच स्वत:च्या‌ डाव्या हाताची शीर कापुन टाकली.. सारा रक्ताचा पाट ग्रेव्हयार्डवरून वाहात होता... आणि त्याच्या त्याच डाव्या हातात जेनिफरचा नववारी साडीतला नथ घातलेला फोटो होता.. सारे संपले होते.. एकमेकांनी एकमेकांसाठी जीव दिला होता... दोघेही एक झाले होते.

निशा वर्तक



disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.   

Post a Comment

0 Comments