समरस
सायली वझे पानसे
रमेशराव आणि सीमा ताई नेहमीप्रमाणे मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडले. रमेशराव ७५ चे तर सीमाताई ७० च्या. दोघांनाही गाण्याची खूप आवड. गाणी ऐकायला आवडायची, तितकीच म्हणायलाही. संध्याकाळ हळूहळू गडद होत चाललेली, सूर्य अस्ताला चाललेला, एक सरळसोट एकाकी रस्ता, दुतर्फा असलेली हिरवीगार झाडं, हवेतला गारवा असं एकंदरीत खूप छान वातावरण. दोघं तिथल्याच एका बाकावर बसले. अचानक कुठूनश्या, 'वो चाँद खिला, वो तारे हँसी, ये रात अजब मतवाली है, समझने वाले समझ गये हैं, न समझे वो अनाड़ी है ' या गाण्याच्या ओळी दोघांच्याही कानावर पडल्या. सीमाताई लाजल्याच. सीमाताईंच्या सुरकुतल्या चेहेऱ्यावरही लाजेची गुलाबी लाली चढली. रमेशराव म्हणाले,
"काय गं, आठवलं का तुला? कॉलेज मध्ये तू समोर आलीस की लगेच हॆ गाणं म्हणायचो. तू मला आवडायचीस. तुला गाण्यातून हेच सांगायचा प्रयत्न करायचो. तू मात्र बाकी सगळ्यांशी बोलायचीस तसंच माझ्याशी त्यामुळे मला वाटायचं, अरे मी आवडतो का नाही हिला?
" सीमाताई परत एकदा लाजल्या आणि म्हणाल्या, " हो तर मलाही तुम्ही खूप आवडायचात. एक दिवस जरी भेटलो नाही तर चुकल्यासारखं वाटायचं. तेव्हा लक्षात आलं की हेच तर प्रेम. बरं झालं हं तुम्हीच पुढाकार घेतलात, नाहीतर मी आपली विचारच करत बसले असते.
" रमेशरावांनी सीमाताईंच्या खांद्यावर हात ठेवताच सीमाताई बिलगल्याच त्यांना.
अंधार पडला तसं दोघं घराकडे परतले.
दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होताच पुन्हा दोघंही चालायला बाहेर पडले. निसर्गाच्या सानिध्यात दोघांनाही खूप छान वाटायचं.चालून झाल्यावर त्या दिवशीही ते बाकावर बसले.
" लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो, शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो' सीमाताई गाणं म्हणू लागल्या. त्या दोघांनी एकमेकांना मिठीच मारली. " मी तुमच्या आधी जाणार कारण मला तुमच्याशिवाय मी ही कल्पनाच सहन होत नाही.
", सीमाताई असं म्हणताना रमेशरावांनी त्यांना शांत केले. दोघंही त्या दिवशी जरा अस्वस्थ मनानेच घरी परतले.
मधे काही महिने गेले. अजय आणि अनूच्या दारावर टकटक झाली. दारात रमेशराव होते.
"काय मग?… कसं वाटतंय नवीन घर?"
अजय आणि अनू नुकतेच त्या घरात शिफ्ट झाले होते. घर अजून अस्ताव्यस्तच होतं. सामान जागच्याजागी लागायचं होतं. दोघंही एकेक बॉक्स उघडून सामान लावत होते. प्रसन्न चेहेऱ्याच्या आजोबांना दारात बघून खुर्चीवरची धूळ झटकत अजय म्हणाला,
" आजोबा या या, बसा. अनू बाहेर ये गं.
" रमेशराव म्हणाले,
" असूदेत असूदेत, मी नंतर येतो निवांत. तुमचं चालूदेत. हिने सकाळी सामान येताना पाहिलं ना, म्हणून म्हणलं बघावं कोण आलंय शेजारी राहायला."
एवढं म्हणून रमेशराव परत गेलेदेखील.
"असं कसं जाऊ दिलंस रे? निदान चहा तरी केला असता ना पटकन. पहिल्यांदाच आले होते ना ते?", अनू म्हणाली.
"अगं हो. मी काही बोलायच्या आत तर ते गेलेसुद्धा पण परत येतो म्हणालेत.. आणि आता शेजारीच आहेत ना. येणं जाणं होईलच की." अजय तिला म्हणाला.
"तुझं ना, खरंच अवघडे… !" म्हणून अनू पुन्हा आत गेली.
सकाळी सकाळी प्रसन्न आवाजातलं भजन ऐकू आल्यावर कोण म्हणतंय बघायला अजय बाहेर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आवाज आजोबांच्या घरातूनच येत होता. त्यांच्या दारातली तुळस, उंबऱ्यावर काढलेली छोटीशी पण सुंदर रांगोळी, बघूनच खूप प्रसन्न वाटलं त्याला. त्याला एकदम त्याच्या आजोळच्या घराची आठवण आली. आजी आजोबांचा सहवास लाभणार म्हणून मनोमन आनंद झाला त्याला. लवकरच अनुचीही आजींशी भेट घालून द्यावी असं त्याच्या मनात आलं.तितक्यात अनुने आवाज दिला, " काय आज ऑफीसला जायचं नाहीये का? निवांत चाललंय अगदी "
" अरे बापरे, खरंच की उशीर झाला. आवरतो पटकन. तू चहा ठेव. मी आलोच आंघोळ करुन ", म्हणत अजय अंघोळीला पळाला.
लगेचच्या शनिवारी अजय ला सुट्टी होती पण अनूला मात्र कामाला जायचे होते. अनू तिचं आवरुन ऑफिसला गेली. अजय आज जरा निवांत उठला. बाहेर गॅलरीत आला तर रमेशराव गॅलरीत उभे होते.
अजय :
" गुडमॉर्निंग आजोबा "
रमेशराव :
" गुडमॉर्निंग.. काय रे आज सकाळ उशिरा झाली वाटतं. रात्री जागरण झालं की काय ", असं म्हणत आजोबा हसले.
अजय :
" असं काही नाही हो आजोबा. काय चेष्टा करता. आज मला सुट्टी आहे. म्हणून निवांत. अनू गेली ऑफिसला. आवरुन येतो, मस्त गप्पा मारु "
अंघोळ उरकून, आवरुन अजय बाहेर आला तेव्हा रमेशराव पिशवी घेऊन बाहेर जायच्या तयारीत होते.
अजय :
"काय आजोबा बाहेर निघालात वाटतं?
रमेशराव : "हो रे, भाजी आणायला निघालोय. आज फर्माईश आलीये… वांगं… तेही भरलेलं"
अजय :
"अरे वा, क्या बात है आजोबा…"
रमेशराव :
" चल येतोस का तू पण? "
अजय :
" चला येतो की, मस्त गप्पा होतील.
"
अजय आणि अनु तसं नवपरिणीत जोडपं त्यामुळेच अजय ला आजीआजोबांची लग्नकहाणी जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. त्यात आजोबांकडून जेव्हा त्यांच्या प्रेमाविवाहबद्दल समजलं, तेव्हा तर ही उत्सुकता अजूनच वाढली. आजोबांच्या गप्पातून त्याला आजींबद्दल असलेलं प्रेम पदोपदी जाणवत होतं. या वयात बायकोच्या हट्टाखातर सकाळी सकाळी मंडईत निघालेले आजोबा त्याला एकदम वेगळेच वाटले.
" नशीब अनू घरात नाहीये. तिला जर हॆ कळलं ना, तर आपलं काही खरं नाही ", अजयच्या मनात आलं. या वयात हट्ट पुरवणारे आजोबा तर पाहिले, हट्ट करणाऱ्या आजी कशा असतील , त्यांना भेटायला अजय आतुर झाला होता.
अजय आणि अनू ऑफिस आणि घरच्या कामामध्ये बुडून गेले. अधेमध्ये फक्त आजोबांची नजरानजर व्हायची. अजय आणि अनुचं घर आता बऱ्यापैकी लागलं होतं. अधूनमधून खटकेही उडत होते दोघांमध्ये. म्हणजे आता खऱ्या अर्थाने संसार सुरु झाला होता दोघांचा. शनिवार असल्यामुळे अजय जरा उशिरानेच उठला. झालं, एवढं कारण पुरेसं होतं.
अनू :
"सगळी कामं मीच करायची. तू आणि तुझं ऑफिस. बाकी काहीच करत नाहीस तू ."
अजय :
"केली तरी कुणाला काही आहे का त्याचं"
अनू :
"म्हणजे?.."
अजय :
"कोणाला काही कदर आहे का त्याची? "
अनू :
"कदर ? म्हणजे काय करायचं नक्की? संसार दोघांचा आहे ना. केलं म्हणून कुठे बिघडलं."
अजय :
"जाऊ दे. काही बोलण्यात अर्थच नाहीये."
अनू :
"नाही आज तू सांगच.तुझं हे नेहमी चाललंय.. आज होऊन जाऊ दे एकदाचं"
अजय :
"काय होऊन जाऊ दे एकदाचं?
जे काही चांगलं होईल ते तुझ्यामुळे आणि सगळ्या गोष्टी बिघडवण्याचा ठेका मीच घेतलाय ना.."
अनू :
"जरा हळू… आजूबाजूला काही बहिरे रहात नाहीत…"
अजय :
"हां………. इथे पण तस्संच… घरातून जर आमचा आवाज वाढला तर..
'काही अक्कल आहे की नाही' आणि तोच जर तुमचा असेल तर 'सहन तरी किती दिवस करणार? कधी तरी बांध फुटणारंच'."
अनू :
"मग मी काय करू अशी इच्छा आहे तुझी? जाऊदेत मला ऑफिस ला उशीर होतोय तुझ्यामुळे. मी निघते. तुला काय उद्योग नाही म्हणून भांडण उकरुन काढतोस उगाच."
अजय :
" काय.. मी भांडण उकरुन काढतो. अवघडे तुझ्यापुढे. बोलण्यात काही अर्थ नाही "
चिडून अजय बाहेर आला खरं पण नंतर त्याचं त्यालाच वाईट वाटलं.
"आपली अजून मनं एक झाली नाहीत. एकदुसऱ्यावर कुरघोडी करण्यात, दुसऱ्याला दोष देण्यात समाधान वाटतंय दोघांनाही.
", विचारांच्या तंद्रित असतानाच पाठीवर एक आश्वासक हात पडला. बघितलं तर आजोबा.
रमेशराव :
"आय अॅम सॉरी.. पण माझ्या कानावर पडलंय सगळं.
मी मुद्दाम ऐकलं नाही तरी दाराला दार लागून आहे आपलं.
मला माहितीये की हा सर्वस्वी तुमचा खाजगी प्रश्न आहे आणि मी त्यात काही बोलणं योग्य होणार नाही. पण तरीही … बरेच दिवस मी ऐकतोय तुमचं थोडंफार... तेंव्हा वडीलकीच्या अधिकारानं थोडं बोलू??"
अजय :"त्यात काय आजोबा........ बोला ना …."
रमेशराव :
"जगताना दरवेळेस स्पर्धा असायलाच हवी का? म्हणजे कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवं का? मलातरी हरण्यापेक्षा माघार घेण्याचा पर्याय चांगला वाटतो की ज्यामध्ये जिंकणार्याला जिंकण्याचं श्रेय तर मिळतंच पण हरणार्याला हरल्याचं शल्य टोचत नाही. अर्थात ह्याची जाण दोन्हीबाजूंनी ठेवायला हवी. आम्ही दोघं एकमेकांना सांभाळतो ते असंच. आताशा आम्हाला सोसवत नाही म्हणून खाणं होत नाही पण पाणीपुरीची एक प्लेट दोघांमध्ये खाण्यात ब्रह्मांडा एवढा आनंद कसा लपलेला आहे हे तिचेच डोळे मला शिकवतात.. आमच्या दोघांमध्ये फार काही गप्पा होतात अश्यातला काही भाग नाही पण 'मला तुझ्याशी काही बोलायचंय' हे आपण होऊन सांगायची वेळ आमच्यामध्ये कधीच आली नाही.
"
रमेशराव :
" तुझ्याशी बोलता बोलता किती वाजले कळलंच नाही. चल हिची देव देव करायची वेळ झाली. देवाला दिवा मीच लावायचा असा नियम आहे बर का रे हिचा . तरी तिला म्हणतो, काय मागायचंय आता देवाकडे. सगळं तर दिलंय. यावर तिचं म्हणणं असतं ,
" देवाकडे मागत नाही, आभार मानते एवढं प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणून."
अजय : "अरे वा किती छान "
रमेशराव खिशात काहीतरी शोधू लागले.
अजय :
"काही हरवलं आहे का आजोबा? काय शोधताय? "
रमेशराव :
" सापडला बाबा, अरे हिला गजरा खूप आवडतो.
मी दररोज न चुकता, कोपर्यावरच्या फुलवाल्याकडून एक गजरा आणतो. सगळं घर सुगंधित होऊन जातं. अरे एवढं सगळं बोललो पण हिचा निरोप द्यायला विसरलोच बघ. उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अनायसे उद्या रविवार आहे. तुम्ही दोघं आमच्याकडे जेवायला या. मस्त गप्पा मारु. अनुला पण सांग "
अजयला तशीही आजींना भेटायची उत्सुकता होतीच त्यामुळे काहीही आढेवेढे न घेता तो लगेच हो म्हणाला. संध्याकाळी अनुलाही सांगितलं त्याने.
रविवारचा दिवस उजाडला. घरची साफसफाई आणि बाकीचं आवरुन अनू आणि अजय बाहेर जाऊन आजी आजोबांसाठी केक घेऊन आले. आजोबांचं दार वाजवलं. आजोबांनी दार उघडून हसून स्वागत केलं त्यांचं. दोघं घरात जाऊन खुर्चीवर बसले. स्वयंपाकघरातून खूप छान वास येत होता. अनू आजींना मदत करायला म्हणून स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. तितक्यात आजोबा म्हणाले,
" अजय, अनू,या इकडे आत या. "
रमेशराव :
" सीमा, अगं बघितलंस का कोण आलंय?
आतल्या खोलीत बेडवर सीमाताई झोपल्या होत्या. अगदी बारीक कुडी, डोक्यावर जेमतेमच केस पण तरीही चेहेऱ्यावर विलक्षण तेज असलेल्या आजी चाहूल लागताच सावकाश उठून बसायचा प्रयत्न करु लागल्या. अनू लगेच पुढे होऊन त्यांना आधार देऊ लागली.
सीमाताई : "कसे आहात रे मुलांनो? ह्यांच्याकडून तुमच्याबद्दल ऐकून होतेच. आज योग आला भेटायचा. छान वाटलं रे या म्हातारीला भेटायला आलात स्वतःहून "
अनू :
" आम्ही पण आजोबांकडून खूप ऐकलंय हं तुमच्याबद्दल. तुम्ही अगदी तशाच आहात. हो ना रे अजय?
"
अजय :
" आजी, खूप उत्सुकता होती तुम्हाला भेटायची. छान वाटले भेटून "
आजींशी बोलताना दोघंही हळूच आजोबांकडे प्रश्नार्थक चेहेऱ्याने बघत होते. आजोबा लगेच म्हणाले,
" मुलांनो, 2 वर्षांपूर्वी हिला ब्रेस्ट कॅन्सर चं निदान झालं आणि..."
अजय,अनू त्यांना आजींसमोर हॆ बोलणं नको म्हणून खुणावू लागले.
रमेशराव :
( सीमाताईंकडे बघत ) " तिला सगळं माहितीये. माझी सीमा खूप धीराची आहे रे . हॆ सगळं पॉसिटीव्हली घेतलं तिने आणि म्हणूनच ती आता बरीच बरी आहे.
"
सीमाताई :
" अहो, हॆ काय बोलत बसलो आपण? त्यांना जेवायला बोलावलंय ना, मस्त गप्पा मारु, जेवण करु. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रसमलाई खावीशी वाटतीये. आणाल का प्लिज?"
रमेशराव : काय आज तुला चक्क गोड खायची इच्छा झालीये आणि तेही रसमलाई, प्लिज काय, लगेच आणतो. असा जातो आणि असा येतो "
रमेशराव लगेचच निघाले. अजयही गेला त्यांच्याबरोबर.
सीमाताई अनुला म्हणाल्या,
" माझ्या आजारपणाच्या काळजीने, आणि दगदगीने ह्यांना शुगर निघाली. ह्यांनी मला काळजी वाटेल म्हणून सांगितलंच नाही. पण लॅबमध्ये माझा मेल आयडी दिलाय हॆ लक्षातच नाही ह्यांच्या. मी रिपोर्ट बघितला तेव्हा आधी खूप घाबरले. गोड पूर्ण बंद करा असं लिहिलं होतं त्यात. आम्हाला दोघांनाही गोड खूप आवडतं. पण मी मुद्दामहून गोड नकोच वाटतंय, त्रास होतो त्याने असं सतत म्हणायचे. मला त्रास नको म्हणून माझे सगळे हट्ट पुरवतात हॆ. आपोआपच दोघांचही गोड बंद झालं. सकाळ संध्याकाळ मुद्दाम काही न काही हट्ट करुन ह्यांना बाहेर पाठवायचं निमित्त शोधते . त्या निमित्ताने त्यांचं चालणं होतं , कोणीतरी भेटतं, बोलणं होतं. तेवढंच त्यांचा मूड चांगला होतो. नाहीतर इथे माझ्यापाशी कोंडून घेतलं असतं त्यांनी स्वतःला. एकदा घरी आले की आहेच माझं आजारपण, औषधं, केमो, माझी सेवा...
( सीमाताईचे डोळे ओलावले. )
हिंडणं फिरणं, पथ्य यामुळे कालच्याच रिपोर्ट मधे त्यांची शुगर एकदम नॉर्मल आलीये . म्हणूनच आज त्यांना आमच्या दोघांच्या आवडीची रसमलाई आणा म्हणलं. माझ्यासाठी खूप करतात गं घे. मी निदान एवढं तर नक्कीच करुच शकते."
यावर अनू निःशब्द झाली. काय बोलू कळेचना तिला.
इकडे रमेशराव अजयला म्हणाले,
"किती दिवस राहिलेत हे देवालाच माहित. जोपर्यंत ह्या कुडीत प्राण आहे तोपर्यंत एकत्र आहोत. एकदा का हा पिंजरा तुटला कि आपण मोकळे पुढच्या प्रवासाला. पण हे जे काही शेवटचं स्टेशन आहे, ते ही सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा, आपल्यापरीने… दुसरं काय… हां आता गाडी सुटण्याचा भोंगा थोडा थोडा ऐकू येतोय. बघायचं गाडी कधी सुटतीये ते… तोपर्यंत त्या भाजीला, साडीला, पाणीपुरीला, गजऱ्याला आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या प्रेमाला विसरुन कसं चालेल?"
अजय :
"तुमची मुलं वगैरे… "
रमेशराव :
"नाही. आम्हाला एकही मुल नाही. आमची एकही निशाणी मागे ठेवावी असं त्या वरच्याला वाटलंच नसावं. पण हिनं त्याचीही कधी तक्रार केली नाही आणि मलाही तशी संधी दिली नाही. आम्ही दोघांसाठीच होतो… आहोत… आणि… राहू सुद्धा…!"
थोड्या वेळात अजय आणि रमेशराव दोघंही घरी पोचले. अनू आणि अजयने आणलेला केक कापून आजीआजोबांनी एकमेकांना केक भरवला. आजोबा त्या दिवशीही साडी आणि गजरा आणायला विसरले नव्हते. तब्बेतीच्या कारणास्तव साडी झेपत नाही म्हणून रोज गाऊन घालणाऱ्या सीमाताईंनी त्या दिवशी मात्र अनुच्या मदतीने साडी नेसली, जेमतेम उरलेल्या केसांवरच गजरा माळला. खूप सुंदर दिसत होत्या त्या आज.
"ये चांदसा रोशन चेहेरा,ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया" आजोबा आजींकडे बघत गाणं म्हणू लागले. सीमाताई परत एकदा लाजल्या. दोघांनी एकमेकांना केक आणि रसमलाई भरवली.
शमी कपूर आणि शर्मिला टागोर अनू आणि अजयच्या समोर अवतरले होते. कुठे एकमेकांवर कुरघोडी करणारे आपण आणि कुठे हॆ आजीआजोबा, त्यांची समरसता बघून अनू आणि अजयच्या डोळ्यातलं पाणी बंड करत होतं वाहून जाण्यासाठी!
सायली वझे पानसे
पुणे
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

5 Comments
सुंदर
ReplyDeleteSunder ashay asaleli katha
Deleteछान
ReplyDelete👌👌
ReplyDeleteछान कथा
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box