अघोरी प्रेम
सौ. प्रेरणा प्रदीप उपाध्ये
रात्रीचे नऊ वाजून गेले होते. शेवटच्या पेशंशी बोलणं झालं की मी लगेच निघणार होते. पण मानसोपचार तज्ञाचं बोलणं हेच पेशंटसाठी औषध असतं. डोक्यात विचार चालू असतानाच तन्वी आणि तिची मैत्रीण केबिनमध्ये आल्या. क्षणभर मी तन्वीला ओळखलं नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळं, एका बाजूने सुजलेल्या चेहरा, शून्यात हरवलेली नजर आणि खालच्या बाजूने फाटलेला ओठ हे एका नजरेत ओळखता येत होतं. तशी माझी तन्वीशी व्यक्तिशः ओळख नव्हती. माझ्या भावाच्या सोसायटीमध्ये ती राहायची त्यामुळे तिच्याबद्दल थोडीफार माहिती होती व एक दोन वेळा मैत्रिणींबरोबर बोलताना बघितलं होतं. तेव्हाच तिचं हसरं, रसरशीत दिसणारे रूप आता पार काळवंडून गेलं होतं.
मी त्या दोघींना बसायला सांगितलं व नक्की काय त्रास होत आहे असं विचारलं. तिच्या मैत्रिणीनेच बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली,
" डॉक्टर, मी तन्वीची मैत्रीण वंदना आहे. मी आणि तन्वी अगदी शाळेपासून एकत्र आहोत व खास मैत्रिणी आहोत. प्रत्येक अडचणीच्या वेळी एकमेकींच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलो त्यामुळेच बहुदा ही तन्वीला वाचवू शकले. आम्ही इतक्या जीवाभावाच्या मैत्रिणी असून सुद्धा तिने मात्र माझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या ही गोष्ट माझ्या मनाला फारच लागली आहे. जर मी आज तिच्या घरी गेले नसते तर कदाचित तन्वीच्या जीवावर बेतलं असतं. एवढ्या वाईट परिस्थितीत असून सुद्धा तिला कधीच तिच्या आई-बाबांची किंवा माझ्याशी बोलावं असं का वाटलं नाही?" इतकं बोलून ती रडू लागली.
तिला शांत करत विचारलं," मला तू पहिल्यापासून काय घडलं हे नीट सांगशील का? म्हणजे मला तन्वीशी संवाद साधता येईल". त्यावर ती म्हणाली," डॉक्टर, तन्वी पहिल्यापासून हसरी, बडबडी पण हळव्या स्वभावाची आहे. अभ्यासात हुशार आहे पण दुसऱ्याची लबाडी ओळखण्याची हुशारी तिच्यामध्ये अजिबात नाही. तिचे आई-बाबा दोघेही नोकरी करतात. दिवसभर घरात तन्वी, तिचा लहान भाऊ व आजी असे तिघेजण असायचे. मी बऱ्याच वेळा तिच्या घरी अभ्यासाला जायचे त्यामुळे तिच्या घरचं वातावरण छान असायचं की मी खात्रीपूर्वक सांगू शकते.
आम्ही बायोटेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाला असताना तिच्या आयुष्यात अमर आला. कोणत्यातरी नातेवाईकांच्या लग्नात त्यांची ओळख झाली. तन्वी सारखी हुशार, करिअर कडे लक्ष देणारी, स्वतंत्र विचारांची मुलगी फार लवकर प्रेमात पडली, बऱ्याच गोष्टी त्याच्या सांगण्यानुसार करू लागली याचं मला आजही आश्चर्य वाटतं. एम एस सी झाल्यावर तिला पीएचडी करायचं होतं पण तरीही अमरचं ऐकून ती नोकरी करू लागली. तिने अमर बद्दल घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला तो योग्य मुलगा नाही, असं परोपरीने सांगितलं तरी तिला पटलं नाही. मग पराकोटीचे वाद झाले. घरच्यांनी कडाडून विरोध केला म्हणून ही घरातून निघून गेली व सहा महिने त्याच्याबरोबर एकत्र राहत होती. चार दिवसांपूर्वी तिचा फोन आला म्हणून मी तिने पाठवलेल्या पत्त्यावर तिच्या घरी गेले. दरवाजा किंचित उघडा असल्यामुळे थेट आत गेले तेव्हा अमर तन्वीला गुरासारखा मारत होता. क्षणभर मला काय करावं ते सूचना पण लगेच भानावर येत शक्य तितक्या जोराने मी अमरला ढकललं. त्याला हे अनपेक्षित असल्यामुळे त्याचा तोल गेला व त्याचा डोकं बाजूच्या भिंतीवर जोरात आपटलं. तो खाली पडलेला बघून मी लगेच तन्वीला कसंतरी त्या घरातून बाहेर काढलं व तिच्या घरी घेऊन आले. तेव्हापासून तिची मानसिक अवस्था अतिशय वाईट आहे. मनाला झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी इथे आणलं आहे.
मला साधारण अंदाज आला. पुढची चार-पाच सिटिंग्ज मी तनवीशी वेगवेगळे विषयांवर बोलत होते व तिला बोलतं करायचा प्रयत्न करत होते. शक्यतो वैयक्तिक गोष्टींवर बोलणं टाळत होते. सहाव्या सिटिंनंतर हळूहळू तन्वी बोलू लागली. मी तिला फक्त एवढाच दिलासा देत राहिले की पूर्वायुष्यात घडलेल्या चुकांची ब़ोच मनात ठेवून रडत जगण्यापेक्षा, चुका दुरुस्त करून नव्याने आयुष्याची सुरुवात करु. तिची मनःस्थिती सुधारल्यावर मी तिला थेट प्रश्न केला," अमर तुझा छळ करत होता, तुला मारझोड करत होता तरीसुद्धा तू त्याच्याबरोबर का राहत होतीस? एक शिकलेली, कमावती मुलगी असून सुद्धा तुझा आत्मसन्मान बाजूला ठेवून, एवढा त्रास का सहन करत होतीस?"
तन्वी म्हणाली,' मी सुरुवातीपासून घडलेल्या घटना सांगते म्हणजे मी कशी फसत गेले, अडकत गेले हे तुम्हाला कळेल. आमच्या दोघांची भेट माझ्या मावस बहिणीच्या लग्नात झाली. तो नवरदेवाचा मित्र होता. अमर दिसायला देखणा, उंच आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा असल्याने त्याच्याकडे मी सहज आकर्षित झाले. बोलायला तर एवढा मिठ्ठास होता की मी त्याच्या बोलण्यावर पुरती भाळले. त्याने हे अचूक हेरलं. मी जेमतेम वीस वर्षांची असल्याने वरच्या देखाव्यावर फसले. फार चटकन विश्वास ठेवला. अमरने मला तो आयटी इंजिनियर असून एका नामांकित कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगितले. त्याचं कंपनीचं ओळखपत्र पण दाखवलं. माझी निवड बरोबर असल्याची खात्री मला पटली.
प्रेमात पडल्यानंतरचं एक वर्ष इतकं गोड गेलं की मी जणू आभाळात तरंगत होते. माझ्याशिवाय त्याचं मान हलत नव्हतं. त्याच्यासाठी मी अतिशय महत्त्वाची होते ही भावना फार सुखकारक होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचे अनेक वेळा फोन मेसेज यायचे. भेटल्यावर तर माझ्यावरून नजर हटवायचा नाही. सारखं माझं कौतुक करायचा, सुंदर दिसतेस म्हणायचा. मला वेगवेगळ्या भेटवस्तू द्यायचा. हळूहळू मला त्याची इतकी सवय झाली की एक दिवस जरी आम्ही भेटू शकलो नाही तरी मी बेचैन व्हायचे.
जस जसे आम्ही रोज भेटत गेलो तसतशी आमच्यातली जवळीक पण वाढत गेली. त्याचा स्पर्श अतिशय हळुवार तरल असायचा. माझ्या सर्वांगावर शहारे यायचे तरीही मी माझी मर्यादा राखून होते. मात्र कळत नकळत त्याच्या आहारी जात होते हे मला समजत नव्हतं. मी एमएससीच्या दुसऱ्या वर्षाला असताना अभ्यासाच्या दडपणामुळे अमरला भेटणं थोडसं कमी केलं तेव्हापासून त्याचं वागणं बदलायला सुरुवात झाली. जेव्हा आम्ही आठ दहा दिवसांनी भेटलो तेव्हा अत्यंत किरकोळ कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात त्यांने पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला. मला प्रचंड धक्का बसला, राग आला आणि वाईटही वाटलं. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला.
मग मात्र त्याने माझी अक्षरशः शंभर वेळा माफी मागितली. चक्क उठाबश्या काढल्या आणि कितीही राग आला तरी असा वागणार नाही असं वचन दिलं. पुढचे काही दिवस त्याने माझ्यावर प्रेमाची बरसात केली. माझ्या मनातलं सगळं मळभ दूर झालं. पण ती केवळ सुरुवात होती. त्यानंतर असे प्रसंग साधारण अडीच तीन महिन्यांच्या अंतराने आणि मग वारंवार घडू लागले. प्रत्येक वेळी त्याचं माफी मागणं नंतर प्रेमाचा वर्षाव करणं हेही घडलं. एवढं घडूनही माझ्या मनावरचा त्याचा पगडा कमी व्हायच्या ऐवजी वाढला होता.
मी एमएससी झाल्यावर पीएचडी करायचं ठरवलं. त्याला ही गोष्ट सांगितल्यावर माझ्या निर्णयाला त्याने विरोध केला. त्याच्यामते पीएचडी पूर्ण होईपर्यंत चार-पाच वर्षे जातील आणि तोपर्यंत लग्न करता येणार नाही. आमच्यामध्ये आठ वर्षांचं अंतर होतं त्यामुळे मी बावीस वर्षांची असले तरी तो तीस वर्षांचा होता. म्हणून तो लग्नाची घाई करत होता. मला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं पण त्याला गमवायचंही नव्हतं. म्हणून मी माझ्या घरी अमर बद्दल सांगितलं. आई-बाबांनी त्याची सगळी माहिती काढली तेव्हा बाबांना त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती समजली
अमर आयटी इंजिनियर नव्हता तर बारावीनंतर त्याने कम्प्युटरचे दोन-तीन कोर्स केले होते. तो ज्या कंपनीत नोकरीला आहे असं सांगत होता त्या कंपनीतून त्याला काढून टाकलं होतं. त्याने त्या कंपनी मधल्या चार-पाच जणांना थापा मारून पैशांचा गंडा घातला होता. हे समजल्यावर त्यांनी आमच्या लग्नाला कडाडून विरोध केला. मी हे सगळं अमरला सांगितल्यावर त्याने सगळे आरोप फेटाळले. त्याचं म्हणणं असं होतं की आई-बाबांना मी त्यांच्या तोलामोलाचा नाही म्हणून आवडत नाही आणि म्हणून ते आपल्या लग्नाला विरोध करत आहेत. माझी खात्री पटण्याकरता त्याने त्याचे इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्र दाखवले शिवाय कंपनीतल्या कोणालातरी फोन केला व मला बोलायला सांगितलं. फोनवरच्या माणसाने मला खात्रीपूर्वक सांगितलं की अमर त्याच कंपनीत काम करतो मग मला पण त्याचं म्हणणं पटलं.
साहजिकच माझे व आई-बाबांचे वारंवार वाद होऊ लागले इकडे अमर मला घर सोडून यायला सांगत होता मला काय करावं कळत नव्हतं मला नोकरी लागली असल्यामुळे मी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाले होते या जमेच्या बाजूवर मी अखेर घर सोडायचा निर्णय घेतला अमरच्या घरी तो एकटाच राहत होता माझ्या फक्त डोळ्यांवर त्याच्या प्रेमाची पट्टी नव्हती तर बुद्धीवर सुद्धा प्रेमाचा पडदा पडला होता त्याचे आई-वडील गावी असतात असं त्यांनी सांगितलं होतं आणि मी प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता एकही गोष्ट खरी आहे की नाही हे पडताळून पाहिलं नव्हतं लवकरच प्रेमाची पट्टी पडते सगळं गळून पडलं आणि सत्य समोर आलं
अमरच्या ज्या प्रेमावर विश्वास ठेवून मी घर सोडून आले होते त्या विश्वासाला तडा गेला. अमर खरंच कोणतीही नोकरी करत नव्हता. ज्या माणसाने मला खात्रीपूर्वक सांगितलं होतं की अमर नोकरी करतो तो त्याचाच मित्र होता. ज्या भाड्याच्या घरात तो राहत होता त्याचं भाडं थकलेलं होतं. त्याचं शैक्षणिक प्रमाणपत्र खोटं होतं. तो माझ्या कमाईवर आता जगत होता. आई-बाबा जे म्हणत होते ते पूर्णपणे खरं होतं तरीही मी हार मानली नाही. अमरला सुधरवायचं असं ठरवलं. मी अमरला नोकरी करण्यासाठी आग्रह करू लागले. त्याला खुश करण्यासाठी त्याच्या मनासारखं वागू लागले.
अमरला नोकरी लागली तेव्हा मला वाटलं की माझ्या प्रयत्नांना यश आलं पण तो आनंद क्षणिक ठरला. तो जरी नोकरी करू लागला तरी घर खर्चासाठी एकही पैसा देत नव्हता. मी लग्न करूया म्हणत होते तर तो माझं म्हणणं उडवून लावत होता. त्याचा स्पर्श पूर्वीसारखा हळुवार न राहता आक्रमक आणि रानटी झाला होता. मी त्याला नकार दिलेला चालत नसे. त्याला हवं असलेलं सुख मिळवताना तो मला ओरबाडत असे. आधी माझ्यावर इतकं प्रेम करणारा, माझी काळजी घेणारा, मला जपणारा अमर हरवला होता किंबहुना तो त्याचा मुखवटा होता जो आता गळून पडला होता आणि खरा चेहरा समोर आला होता.
काही दिवसानंतर मला हे सगळं असह्य झालं. माझी चूक लक्षात आली तरी आई-बाबांना सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं. त्याचं मारझोड करायचं प्रमाण वाढलं होतं. आता मी त्याच्या नंतरच्या गोड बोलण्याला फसत नव्हते. त्याचं गोड बोलणं किती वरवरचं आहे हे कळायला लागलं. खूप विचार करून मी शेवटी वंदनाला फोन केला व बोलावून घेतलं. आजपर्यंत मी वंदनापासून कधीच काही लपवलं नव्हतं पण अमर कडे राहायला आल्यापासून मी त्याच्या सांगण्यावरून तिच्याशी संपर्क तोडला होता. त्याने माझी माणसं माझ्यापासून दूर केली, माझा आत्मविश्वास मी गमावला, माझा विश्वासघात केला या सगळ्याची जाणीव खूप उशिरा झाली. वंदनाला मी अमर घरी नसेल असं बघून बोलावलं पण नेमका तो लवकर घरी आला. पुढचं तुम्हाला माहित आहे."
इतकं बोलून तन्वी थांबली व माझ्याकडे बघून म्हणाली," आता मी काय करू? सगळं गमावलं आहे." मी तिला म्हणाले," असा विचार करू नकोस. तुझं कुटुंब, मित्र-मैत्रिणी सगळे तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. तुझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम खोटं, अघोरी निघालं याचा तुला धक्का बसणं साहजिक आहे पण तू ज्याला प्रेम समजत होतीस ते प्रेम नव्हतंच. खरं प्रेम कधीच आपल्या जोडीदाराला दुखवत नाही, त्याच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही. तुझं वय लहान असल्यामुळे तुला त्याच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा ओळखायला वेळ लागला. तरीही एक गोष्ट चांगली झाली की तुम्ही लग्न केलं नाही त्यामुळे कोर्ट कचेरी वगैरे टळलं आहे व तू या सगळ्या मधून लवकर बाहेर पडशील याची मला खात्री आहे.
एक चुकीचा माणूस आयुष्यात आला म्हणून सगळेच तसे नसतात. तुला हवं असलेलं खरं प्रेम नक्कीच मिळेल फक्त ते प्रेम डोळसपणे पारखून घे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रेम तुझं आत्मसन्मान जपेल, तुझ्या मतांचा, तुझ्या भावनांचा आदर करेल, तेच खरं प्रेम असेल. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा."
--------------
सौ. प्रेरणा प्रदीप उपाध्ये
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box