प्रेमाला उपमा नाही - अर्जुन आहेर

 "प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे  देणे..." 

अर्जुन आहेर... 

 

निवांत असल्याने विश्वासराव सकाळीच तयार होऊन मोठ्या आवाजात गाणं म्हणत होते. तेवढ्यात किचनमधून आवाज आला... 

अहो, बंद करा...तुम्हाला उपमा पाहिजे मला कळत नाही काय?..पोहे केलेत खावा गुपचूप..मी तुम्हाला काय आज ओळखते का चांगली पंचवीस वर्षे झालेत संसार करतेय..अन् काय सकाळी सकाळी भोंगा चालू केलाय कळत नाही...काय तो मेला भसाडा आवाज.. 

अगं सुनिता, एवढं चांगलं गाणं आहे तरी पण.... 

 (मध्येच वाक्य तोडत).. 

गाणं चांगलं आहे हो पण आवाजाचं काय.. त्यापेक्षा ओरीजनल गाणं लावा... 

तू मला असं  बोलतेस जसा काही तुझा आवाज पार कोकीळेसारखा नाजूक आहे...तू तर किचनमध्ये  गाणं असं म्हणतेस की, गाणं राहतंय बाजूला पण नुसती चिरकत असतेस... 

असू द्या तुमच्या पेक्षा बराच आहे..आमच्या हळदी कुंकू कार्यक्रमात माझ्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला हो..दोनदा वन्स मोअर मिळाला होता कळाले का...तुमचा इगो हर्ट होईल म्हणून मुद्दाम सांगितले नाही... 

वन्स मोअर मुद्दामहून दिला असेल गं.. लवकर आटपून घ्यावं म्हणून टाळ्या वाजवल्या असतील.. 

असू द्या.. तुम्हाला तर काहीच कौतुक नसतंय... 

पोह्यांची प्लेट हातात देत, "घ्या नाष्टा करून म्हणजे  सोफ्यावर पाय पसरून टाईमपास करायला मोकळे.. 

अगं, पोह्यातील शेंगदाणे काय संपावर गेले की काय?.. दिसत नाहीत... 

शेंगदाणे आहेत जरा नीट बघा.. मुद्दामहून कमी टाकलेत.. वजन वाढतंय तिकडे लक्ष नाही अन् शेंगदाणे खायचेत.. घ्या खाऊन.. 

विश्वासरावांनी पुढे काही न बोलता गुपचूप पोहे खायला सुरूवात केली...

नाष्टा झाला..

 नंतर गरमागरम चहा पिऊन झाल्यावर त्याने हळूच विचारले, " मी तुला गाण्याबद्दल टोमणा मारल्याचा तुला राग तर नाही ना आला.."

कशाला राग येईल.. मला आता टोमणा समजून घ्यायची चांगली सवय झालीय.. 

ते दोघे बोलत असतानाच फोन आला...तिसऱ्या मजल्यावरील सुधीरचा फोन होता..

हॅलो, बोल सुधीर... 

अहो काका, लवकर घरी या..तुमच्याकडे अर्जंट काम आहे.. 

ठीक आहे, आलोच... 

सुधीरचे काय काम असणार हे एव्हाना विश्वासरावांच्या लक्षात आले होते... 

सुधीर आणि मालती हे प्रेमविवाह झालेले जोडपे मागच्या वर्षी सोसायटीत रहायला आले.. दोघेही एकाच आयटी कंपनीत कामाला..दोघांना मिळून चांगला एक दिड लाख पगार.. दोघेही सुस्वभावी..पण छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे व्हायची...मग हक्काच्या विश्वासकाका-सुमनकाकींना बोलावणार... 

विश्वास रावांनी बायकोला विचारले, "अगं येते का सुधीर-मालतीचे भांडण सोडवायला..चल येत असेल तर तेवढाच टाईमपास..."

नाही नाही..मोक्कार कामे पडलीत ते काय तुम्ही करणार आहात काय..  या तुम्ही एकटे जाऊन ...समजावले की समजतात..सुशिक्षित असूनही ऐकतात,ऐकून घेतात..अन् पुन्हा कामाला लागतात..या जाऊन तुम्ही... 

त्यांनी सुधीरच्या घरी जाऊन बेल वाजवली...सुधीरनेच दरवाजा उघडला. मालती दुसऱ्या कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसलेली होती.... 

विश्वासराव जाताच मालती उठून उभी राहिली... 

सुधीरने खुर्ची ओढत बसायला देत, "नमस्कार, या काका..बसा..पाणी देऊ.." 

अरे नको, नाष्टा करून तिच्यासोबत वादच घालत बसलो होतो तेवढ्यात तुझा फोन आला अन् आमच्या भांडणाला ब्रेक मिळाला.. 

अहो, तुम्ही पण भांडता काय?

हो मग.. भांडणाशिवाय मजा नाही...(मालती कडे पाहत) आम्ही भांडतो पण रूसत नाही..रुसलो तरी लगेच गोड होतो...आमच्या भांडणात गोडवा आहे... 

तेवढ्यात मालती चहा घेऊन येत बोलली, " अहो काका, भांडणाला सुरूवात सुधीरच करतो..मग बोलायला सुचले नाही की चिडतो..दुसरी गोष्ट म्हणजे काही हिताचे सांगायला गेले की तो माझं ऐकतच नाही.. त्याचंच खरं करतो..

विश्वासराव चहा पिता पिता बोलले, "नक्की भांडण कशावरून झाले?.." 

अहो काका, सुधीर म्हणत होता की आपण आठवडा भर कुठेतरी ट्रीपला जाऊ...मी बोलले की, सध्या लोन वगैरे आहे त्यामुळे थोडी आर्थिक घडी बसून स्थिरस्थावर होऊ दे मग जाऊ... पण तो ऐकायलाच तयार नाही... 

पण काका, मी काय म्हणतो... 

(सुधीरला मध्येच बोलायचे  थांबवत).... 

मालती, होईल हळूहळू सवय.. तू पण वाद न घालता थोडे समजून सांगायला हवे ना..बचत हा मुद्दा लक्षात घेता तू योग्यच बोललीस..यावेळी तुझा रास्त मुद्दा पाहता सुधीरने भांडायला नको होते..कशाला उगीच भांडून रुसून बसायचे...दोघेही रुसून बसले की कोणीतरी एकाने माघार घेत तोंडावरून, पाठीवरून हात फिरवत रुसवा दूर करण्यात खरी मजा आहे..खरं प्रेम असंच वाढतं बरं का...खरेतर सामंजस्याने घ्यायची ही संधी सुधीरला होती पण त्याने भांडणात मध्यस्थी करायला मला फोन केला. . 

आणि तुम्हा दोघांनाही सांगून ठेवतो...आता यापुढे  आम्हाला फोन केला तरी आम्ही लुडबुड करायला येऊन तुमचे प्रेम वाढण्याची   संधी वाया घालवायला येणार नाही..तुमची काकी आणि मी गेले पंचवीस वर्षे भांडतो, रुसतो अन् पुन्हा गोड होतो.... आणि नंतर गोडधोड जेवण करून भांडणाचा गोड शेवट करतो..तुम्ही सुद्धा असेच भांडत रहा..रुसत रहा आणि पुन्हा गोड व्हा म्हणजे संसारात वाढेल गोडवा...(हसत).. बघ कसं यमक जुळवले...आता यापुढे आम्ही दोघेही भांडण सोडवायला नाही तर महिन्यातून एकदा फक्त गप्पा मारायला येऊ..काय चालेल ना तुम्हाला..

सुधीर आणि मालतीने  हसत एकमेकांकडे पाहून मान डोलवली.. 

चला मग.. आज तुम्ही दोघेही आमच्या घरी पाहुणचार आणि गप्पा मारायला या... 

तेवढ्यात मालती म्हणाली, "काका,आज आम्ही दुपारी बाहेर जाणार आहोत.. पुढच्या वेळी नक्की येऊ.."

बरं..तुमच्या मनावर.. सुधीर,मालती चला येतो मी.. बचत करत रहा..पैशाला पैसा जोडत रहा..लक्ष्मी घरात आली की भंजून खायची माजोरीपणा करून नाही असे वडीलधारी मंडळी म्हणायचे ते ध्यानात ठेवा कळाले का..अन् असेच भांडत रहा.. 

असे बोलल्यावर तिघेही खळखळून हसले... 

दोघेही काकांना सोडवायला दरवाजापर्यंत आले.. 

विश्वासराव घरी आल्यावर तिने विचारले, "काय हो मिटले का भांडण..चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय की, तहाची बोलणी यशस्वीपणे पार पाडली असावी... 

"अगं,नवीन आहेत त्यामुळे चालायचंच..हिताच्या दोन गोष्टी सांगत आलो भांडण मिटवून...बरं ते जाऊ दे तू  जरा इकडे येऊन बस..तुझ्याशी बोलायचंय"

असे म्हणत त्यांनी तिचा हात धरत  बाजूला बसवले... 

सुमन,सध्या थोडी मस्करी बाजूला ठेवून गंभीरपणे बोलतो.. 

आपणही सुरूवातीला असेच भांडत होतो अन् अजूनही भांडतो...पुन्हा गोड  होतो.. आता  आपण संसारात चांगलेच मुरले आहोत..आपल्या संसाराला जवळपास पंचवीस वर्षे झाली..ही वर्षे कशी भुर्रकन निघून गेली कळलेच नाही..मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की,आपले हक्काचे घर होईल..खाजगी नोकरीतील तुटपुंज्या पगारात तू संसाराची नाव यशस्वीपणे पैलतीरावर नेली.. याचे सर्व श्रेय तुझेच आहे यात तिळमात्र शंका नाही... 

अहो, असे काय बोलता.. संसार दोघांचा असतो मग श्रेय माझे एकट्याचे नसून दोघांचेही आहे... 

अगं, तरीपण तुझी साथ खूप लाखमोलाची आहे...तू तुझ्या परीने संसाराला हातभार लावला.. सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर 

न डगमगता, न कुरकुरता, संयमाने, समजुतदार पणे, आपुलकीने, प्रेमाने कुटुंबाला समर्थपणे सांभाळले.. माझ्या खाजगी नोकरीतील कमी पगारामुळे संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी तू मुलांच्या शिकवण्या घेतल्या,शिवणकाम केले..स्वतः आजारी असूनही बरेचदा तू चेहऱ्यावर कायम हसू ठेवत त्रास दाखवून दिला नाही.. 

मुलांना चांगले संस्कार देऊन शिक्षण पूर्ण केले.. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला लागला...माझा मित्र मला सांगत होता की, आजकाल विवाह टिकत नाही...लग्नानंतर पाचसहा महिन्यात कुरबुरी सुरू होतात अन् त्याचे कारण सुद्धा बरेचदा क्षुल्लक असते.. थोडक्यात सध्याच्या जोडप्यांमध्ये सयंम आणि समजदारपणाचा अभाव आहे..त्यामुळे भांडणाला वेगळेच वळण लागते...आपलं  लग्न तर घरच्यांनी जुळवलेले पण सुधीर, मालतीचा तर प्रेमविवाह  असूनही भांडतात... 

अहो, त्या दोघांनी समजुतदार पणा दाखवायला हवाच...कधी कधी दोघेही कमावते  असले की पैशामुळे अहंकार निर्माण होतो अन् मग माघार कोणी घ्यायची हा प्रश्न पडतो..त्या मानाने ते दोघेही आपले ऐकतात..आपल्या सुखी संसाराचे रहस्यही संयम आणि समजदारपणा हेच तर आहे...नाही तर आपल्या कडे काय होते..पैसा कमी होता पण संयम, समजुतदार पणा जास्त होता..खरेतर परीस्थितीने सर्व शिकवले होते..आनंदी, समृद्ध आयुष्य जगायला पैसा लागतोच पण तो आनंदाने  उपभोगण्यासाठी समाधान हवेच..जाऊ द्या तो विषय बाजूला ठेवते..बरं तुम्ही मघाशी सुरेल आवाजात गाणं म्हणत होते तेव्हा मी किती तोंड भरून कौतुक करत होते.. जरा पुन्हा एकदा ते गाणं म्हणा ना... 

अगं, मस्करी तर करत नाहीस ना.. मी खरंच सुरेल गातो का? ..

खरेतर का गातो असे विचारायला पाहिजे..रुसू नका बरं जरा विनोद केला...अहो, पण खरंच काय आवाज आहे..सेम टू सेम सुरेश वाडकर... 

तुझी सवयच आहे म्हणा उगीचच हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं अन् दणक्यात आपटवायचं...बरं, तू एवढं कौतुक करतेच आहे तर मग मघाचे गाणं पुर्णच करतो... 

तुम्ही मला ऐकू येणार नाही अशा तुमच्या भसाड्या पण हळू आवाजात गाणं म्हणत बसा तोपर्यंत मी स्वयंपाकाचे बघते... 

तू खरं बोलते की मस्करी करते तेच मला एवढी वर्षे सोबत राहून कळाले नाही..जाऊ दे आता समजून तरी काय फायदा म्हणा...तरीसुद्धा असू दे भसाडा आवाज.. मला आवडतो.. तुला तर कधी कौतुकच नाही.. जा तू स्वयंपाक करायला..

विश्वासराव मनातल्या मनात विचार करत होते की, "जाऊ दे ती मस्करी करत असली तरी लय मोठ्या मनाची आहे..गोड, प्रेमळ आहे..गेली पंचवीस वर्षे किती काळजी घेतली अन् अजूनही घेतच आहे..एवढी प्रेमळ, समजूतदार बायको मिळायला भाग्य लागते आणि तो भाग्यवान माणूस मी आहे..देवा, अशी मनापासून प्रेम करणारी, साथ देणारी, कुटुंबातील  सर्वांची काळजी घेणाऱ्या बायकोची सोबत दिली याबद्दल तुझे खूप खूप आभार... खरोखरच त्या गाण्यातील शब्दांप्रमाणेच प्रेमाला उपमा नाही कारण ते देवा घरचेच देणे आहे..."

आणि विश्वासराव पुन्हा तेच गाणे मनापासून सुरात गाऊ लागले... 

"प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे...

 हे देवा घरचे देणे..."

 

अर्जुन आहेर... 





disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.   

 

Post a Comment

0 Comments