प्राक्तन - कादंबरी आकोलकर.

 प्राक्तन

कादंबरी आकोलकर.

'अरे बापरे, आज फारच उशीर झालाय. आता गुरुजी ओरडतीलच. कार्यक्रम अगदी तोंडावर आलाय सराव करायचा आहे नि नेमकं मला उशीर झालाय पोहोचायला', असा विचार करत पळत पळत मधुरा निघाली होती. 

मधुरा चिटणीस, रोज सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळात वसंतराव वाडकर यांच्याकडे गायनाच्या क्लासला जायची. तिच घर आणि क्लास जवळच असल्याने ती चालतच जायची. साडेआठला क्लास सुटला की समोरच्याच बसस्टॉप वरून बस घेऊन ऑफिसला जायची. M.com झालेली मधुरा एका C A फर्म मध्ये काम करायची. गाणं तिला लहानपणापासून आवडत होत. शाळेत असताना तिने क्लासही लावला होता. पण, अचानक वडिलांची नोकरी गेली. मालकाने विदेशातून मशिन आणली आणि कित्येक कामगारांची नोकरी गेली. शिक्षण कमी इतर क्षेत्रात अनुभव नसल्याने त्यांना दुसरी नोकरी मिळायला फारच वेळ लागला. त्यामुळे मधुराला गाण्याचा क्लास सोडावा लागला. काही झाले तरी मुलीचे शिक्षण सोडायचे नाही, याबाबत आग्रही असलेल्या मधुराच्या बाबांनी तिला B.com पर्यंत शिकवले. मधुराही समजूतदार नि हुशार होती B.com झाल्यावर तिने एका छोट्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. पुढे M.com ला ऍडमिशन घेतलं कॉलेजची फी सुद्धा स्वतःच भरायची. आता कुठे परिस्थिती व्यवस्थित होत होती. तेव्हा पुन्हा एकदा वर्षभरापूर्वी मधुराने गाण्याचा क्लास लावला. गाणं तिला फक्त आवड म्हणूनच शिकायचं होतं. वाडकर गुरुजी तिचं नेहमी कौतुक करायचे. ते तिला म्हणायचे, 'मधुरा गाणं तुझी आवड आहे. ठीक आहे.पण  संधी मिळाली तर आपली कला अर्थार्जनासाठी वापरणे यात काहीच गैर नाही.' त्यांनीच एक दोन कार्यक्रमामधून तिची ओळख वाढवली होती. पुढच्याच महिन्यात स्वरमल्हार या कार्यक्रमात तिला जायचे होते. रोज वेळेवर पोहोचणारी मधुरा दोन-तीन दिवस झाले उशिरा पोहोचायची. मार्च अखेर असल्यामुळे तिला रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावे लागायचे. आजही त्यामुळेच तिला उशीर झाला होता. 

ती क्लासला तर पोहोचली पण तिथे पोहोचताच तिला दुसऱ्याच कोणाच्या गाणं म्हणण्याचा आवाज आला. तो आवाज,  लागलेला सूर,  गाण्याची लय इतकी मोहित करणारी होती की मधुरा तिच्याही नकळत त्या आवाजाकडे खेचली  गेली. साधारण तिच्याच वयाचा असणारा मुलगा मंत्रमुग्ध होऊन गात होता ती एकटक त्याच्याकडेच पाहत राहिली. 

'वा शुभंकर वा.तू फक्त गातच राहावं आणि श्रोत्यांनी केवळ तुलाच ऐकत रहाव.  जादू आहे तुझ्या आवाजात', वाडकर गुरुजींच्या बोलण्याने ती भानावर आली नि तिला जाणवले ती शुभंकर कडे एकटक बघत उभी आहे आणि तोही तिच्याकडेच बघून हसतो आहे. तिला अवघडायलाच झाले.

'मधुरा, हा शुभंकर. माझा भाचा. तुला सांगितलं नव्हतं अमेरिकेत असतो एम एस करतो आहे . आता सुट्टी साठी आलाय'.

मधुराला एकदम आठवले गुरुजींचा भाचा आई वडील लहानपणीच वारले होते म्हणून गुरुजींनीच त्याला लहानाचं मोठ केल. दोन वर्षांपूर्वी तो अमेरिकेला गेला.  तिने त्यानंतर क्लास लावला होता त्यामुळे तिला माहित नव्हतं. ती अवघडलेल्या अवस्थेत त्याच्याकडे पहात कसंनुस हसली.

' मधुरा मला काय वाटतं, स्वर-मल्हार मध्ये तुम्ही दोघं मिळून एखादं गाणं म्हणा मी बोलून घेतो तस. अर्थात, तुम्हाला दोघांना काही हरकत नसेल तर' वसंतराव म्हणाले.

'मामा अरे नको. असा अचानक मी मध्येच कार्यक्रमात गाणं म्हणायचं आणि तूच म्हटलास ना यांची तयारी सुरू आहे. मग असं मध्येच मी येणं बरोबर नाही' मधुराच्या चेहऱ्यावरचे नाराजी पाहत शुभंकर लागलीच बोलला.

' नाही नाही माझी काही हरकत नाही. गुरुजींची इच्छा असेल तर आपण दोघे गाणं म्हणूयात.' खरंतर मधुराला हे अजिबात आवडले नव्हते,पण तिला गुरुजींचा शब्द मोडायचा नव्हता म्हणून नाखुशीनेच ती तयार झाली. 

दुसऱ्याच दिवसापासून दोघांनी गाण्याचा सराव सुरू केला. एकमेकांसोबत गाण्याचे सूर जुळवताना दोघांनाही फार कष्ट  घ्यावे लागले नाहीत. अलगदपणे ते जुळले.  गाण्याचे सूर जुळले तसेच त्यांच्या मनाचेही सूर अलगद जुळू लागले होते. मधुरा गाण गायला लागली की शुभंकर एकटक तिच्याकडेच पाहत राहायचा.' किती कमी काळासाठी गाणं शिकली आहे ही. पण तरी इतकं परिपूर्ण कसं गाते?' याचे त्याला नेहमीच कौतुक वाटायचे.मधुराला तर शुभंकर च्या आवाजाने पहिल्याच दिवशी भुरळ घातली होती. कधी कधी ती एकटक त्याच्याकडे पाहत राहायची. अगदी त्याला पाहताक्षणी तिला जशी तंद्री लागली होती,  तशीच नेहमी हरवायची ती, आणि भानावर आल्यावर खरंतर घाबरायची. प्रयत्नपूर्वक ती त्याच्यापासून लांब राहायची. शुभंकरने अनेकदा त्याच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण तिने अगदी शिताफीने विषय टाळला. तिचे हे वागणे त्याला कोड्यात टाकत होते. 

एके दिवशी गप्पा मारत असताना शुभंकरने  वसंतरावांजवळ मधुराचा विषय काढला.

' मामा, ही मधुरा कुठे राहते? आणि तिच्या घरी कोण कोण असतं?'

' अरे इथे, आपल्या घराजवळच राहते. दोन लेन सोडून मागे. तिच्या घरी ती आणि तिचे आई-बाबा राहतात. आता सध्या ते भाड्याने राहतात. तिच्या वडिलांचे काम अचानक सुटल होत मागे. त्यामुळे खूप वाईट परिस्थितीत राहावं लागलं पोरीला. पण पोरगी मोठी हिमतीची परिस्थितीमुळे खचून न जाता तिने शिक्षण पूर्ण केलं. तिची आवड ही जपते आहे. घर पण भागवते आहे. आता फक्त देवाकडे एकच मागणं आहे तिचा होणारा नवरा चांगला निघू दे, सुखात राहू दे पोरगी.'

'तिचा होणारा नवरा म्हणजे?'  शुभंकरच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

' अरे तिचे लग्न ठरलं आहे. पुढल्या महिन्यात आपला कार्यक्रम झाला की दहा दिवसांनी लग्न आहे. कार्यक्रमात कोणताही व्यत्यय नको, म्हणून तिनेच अशी तारीख काढायला सांगितली.'

हे सर्व ऐकून शुभंकरला तर घेरीच आली. कसबसं स्वतःला सावरत तो खोलीत गेला.

 इकडे मधुराच्या मनाची अवस्था ही काही वेगळी नव्हती. तिच्या मनाची चलबिचल तर ती कोणाला सांगू ही शकत नव्हती .तिला महिनाभरापूर्वीच विकास सरदेसाईचे स्थळ सांगून आले होते. चांगला शिकलेला मुलगा, स्वतःचे घर, व्यवस्थित कमावणारा, कोणतेही व्यसन नाही, शिवाय मायलेक दोघेच जण राहात होते. मागच्या वर्षीच छोट्याशा आजाराच्या निमित्त झालं नि विकासचे वडील गेले. त्यामुळे एक वर्षाच्या आत विकासच लग्न करणं गरजेचं होतं. कोण्या एका लांबच्या नात्यातून मधुराचे स्थळ सांगून आले. मधुरा होतीच इतकी सालस की तिला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मधुराच्या वडिलांनाही विकास योग्य मुलगा वाटला त्यामुळे त्यांनी होकार कळवला. खरंतर मधुराला आपण ज्या मुलाशी लग्न करतोय त्याचा स्वभाव, त्याची आवड जाणून घ्यायची होती. आपल्याबद्दल त्यालाही सांगायचं होतं. इतर प्रेमीयुगलांसारखं त्याच्यासोबत फिरायचं होतं. पण घरची परिस्थिती पाहता ती काही बोलू शकली नाही ती लग्नाला तयार झाली दोन्ही घरात लग्नाची गडबड सुरू झाली. आपलं लग्न ठरलं आहे ही गोष्ट स्वीकारण्याआधीच शुभंकर नावाचे वादळ तिच्या आयुष्यात आले, फक्त आलेच नाही तर काही काळ स्थिरावले आणि तिच्या शांत असलेल्या मनात त्याने वादळ निर्माण केले.

'मधुरा, मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे तुला माहित आहे नि तुला माझ्या बद्दल काय वाटतं हे मलाही माहित आहे. तुझं लग्न ठरलं हे तू का लपवलं माझ्यापासून?', शुभंकर.

'मी लपवलं नाही. खरं तर माझ लग्न ठरलंय हे मान्य करायला मलाच वेळ मिळाला नाही', मधुरा.

'मी प्रेमात पडलो मधुरा तुझ्या आणि तुलाही माझ्याबद्दल असंच वाटतं ना?', शुभंकर.

'कोणाला काय वाटतं, हे महत्त्वाचं नाही शुभंकर. कारण आता वेळच नाही. असही आपली ओळख ही महिनाभरापूर्वी तर झाली आहे. अमेरिकेला गेलास की विसरून जाशील तु मला', मधुरा.

'बर, मी तुला विसरेन ठीक आहे. तू विसरशील का मला? गाण्याचा सूर लावताना तुझ्या प्रत्येक सुरात मी असेन, मग काय करशील? स्वतः सोबत खोटं बोलू नको मधुरा. आपण घरच्यांशी बोलूया. मान्य आहे परिस्थिती अवघड आहे पण, आपण प्रयत्न तर करु', शुभंकर.

'बरोबर आहे तुझ शुभंकर. माझ्या प्रत्येक सुरात फक्त तूच असशील. तुझीच आठवण असेल आणि म्हणूनच इथून पुढे मी कधीच गाणं गाणार नाही. आयुष्यात कधीच नाही. तुझे नी माझे एकत्र येणे या जन्मी तरी शक्य नाही. आपले मार्ग वेगळे आहेत', मधुरा.

 खरं तर मधुराला खूप काही बोलायचं होतं पण शब्दाने फक्त शब्द वाढणार ज्याला अंत नसणार. एवढं समजण्याइतका शहाणपण तिच्याकडे नक्कीच होत. पाठमोरी होऊन ती निघून गेली परत कधीही न येण्याकरिता. 

 शुभंकरला जोर जोराने तिला आवाज द्यायचा होता पण जणू काही त्याचा आवाज गळ्यातच गोठला होता. तो तसाच निश्चल उभा राहिला. इतका वेळ त्या दोघांच बोलणं ऐकणारे वसंतराव त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याला खाली बसवले, जवळ घेतले नि त्याला मनसोक्त रडू दिले.

' माझ्याच बाबतीत असं का व्हावं रे मामा. आई-वडिलांवर प्रेम करण्याआधी ते मला सोडून गेले आणि आता ही सुद्धा. मला खूप प्रेम करायचं होतं मधुरावर. माझ्याच बाबतीत का अस व्हाव?'

 'नशिबापुढे आपण काहीच करू शकत नाही बाळा. होईल सगळं नीट.'

दोनच दिवसात शुभंकर अमेरिकेला निघून गेला.

अगदी वाजत गाजत विकासच्या घरी मधुराचा गृहप्रवेश झाला नि मधुरा चिटणीस आता मधुरा विकास सरदेसाई झाली. नव्या नवरीचे उत्साहात स्वागत झाले. विकासची आई सुमतीबाईंना तर मधुराला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते.

 दिवसा मागून दिवस जात होते पण शुभंकरची आठवण ही काही मधुराच्या मनातून जात नव्हती. विकास खरंतर खूप चांगला मुलगा होता फक्त परिस्थितीमुळे तो थोडासा मितभाषी आणि बुजरा होता. लहानपणापासून गरिबीत दिवस काढलेल्या विकासने पुढे चांगले शिक्षण घेतले होते. स्वतःच्या हिमतीने चांगली नोकरी मिळवली. छोटं का होईना स्वतःचा असं घरही घेतलं होतं आणि आता मधुरा त्याच्या आयुष्यात होती. त्यालाही मधुरा पाहताक्षणी आवडली होती. खरंतर आईला आवडली म्हणून त्याने लग्नाला होकार दिला होता पण आता लग्न झाल्यानंतर तोही तिच्यावर प्रेम करू लागला होता. तिला काय हवं नको याकडे तो जातीने लक्ष देत होता. तिची आवड तिचं ऑफिस एकंदरीत तिला काय पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला रस होता. पण मधुरा मात्र त्याच्यासाठी काहीच भरभरून करू शकत नव्हती. तिलाही मनातून वाईट वाटायचे. विकासची काही चूक नसताना त्याला ही शिक्षा का मिळावी? पण तिचं काही इलाज नव्हता. तिच्या मनाने हिय्या करून ठरवलं आणि शुभंकर चा विषय एका कोपऱ्यात बंद करून ठेवला. कधीही न उघडण्यासाठी. विकास हेच आपलं भविष्य आहे आणि हेच आपले आयुष्य आहे हे तिने मान्य केले.

 मधुरा आणि विकासचा सुखाचा संसार सुरू झाला. काही दिवसातच त्यांच्या संसार वेलीवर एक फुल येणार आहे हे त्यांना कळलं. मधुरा आई होणार आहे हे विकासला जेव्हा कळलं तेव्हा तर  त्याला इतका आनंद झाला होता की मधुरा साठी काय करू नि काय नको हेच त्याला कळत नव्हतं. इतकं सुख, इतका आनंद तो खूप वर्षानंतर अनुभवत होता आणि याचं कारण फक्त मधुरा होती. दिवसेंदिवस तो तिच्यावर अधिक प्रेम करू लागला. नऊ महिने त्याने आणि सुमतीबाईंनी मधुराची खूप काळजी घेतली तिला आणि बाळाला काय पाहिजे, काय त्रास होतोय, डॉक्टरकडे कधी जायचं, औषधे कोणती घ्यायची या सर्व गोष्टींची वेळच्या वेळी काळजी घेतली आणि आज तो दिवस उजाडला जेव्हा मधुराला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात ऍडमिट केले. ऑपरेशन थिएटर बाहेर सर्वजण आनंदात आणि काळजीत वाट बघत होते, डॉक्टर कधी बाहेर येऊन काय सांगतात. विकासला तर कधी एकदा त्याच्या छोट्या परीला हातात घेतो असं झालं होतं. त्याने मधुराला सांगितलं होतं 'बघ आपल्याला मुलगीच होणार आणि मी तर तिचं नावही ठरवलय, 'श्रेया'. ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर आले.  त्यांचा चेहरा बघून सगळ्यांनाच काळजी वाटू लागली. विकास लागलीच उठून त्यांच्याकडे गेला.

' सर्व ठीक आहे ना डॉक्टर? मधुरा कशी आहे? बाळ कस आहे?'

' हे बघा मिस्टर विकास अचानक मधुराच ब्लडप्रेशर वाढल्याने बाळ जन्माच्या आधीच गेले आहे आणि मधुराची अवस्था सुद्धा क्रिटिकल आहे.  तुम्ही बाळाला घ्या आणि पुढची विधी करून या. आम्ही मधुराला आय सी यु मध्ये शिफ्ट करतो आहोत.'

विकास तिथेच मटकन खाली बसला. असं काही होऊ शकतं याचा त्याने विचारच केला नव्हता. मुक्त हस्ताने भरभरून दिलेल्या आनंदाचे सगळे सुख नशिबाने एका झटक्यात ओढून घेतले होते. मधुराचा मलूल चेहरा बघून त्याला रडूच  फुटले. त्याला भावनांना आवर घालणे कठीण होतं पण फक्त तिच्याकडे बघून त्याने स्वतःला सावरलं. पुढचे दोन दिवस मधुरा बेशुद्ध होती आणि जेव्हा शुद्धीत आली तेव्हा बाजूला तिचे बाळ नव्हतं. आपल्या बाळाला काय झाले? हे विचारायचा तिने खूप प्रयत्न केला पण तिला कोणी काही सांगितलं नाही. तिची तब्येत आणखीनच खालावल्याने नाईलाजाने विकासला तिला खरं काय ते सांगावे लागले त्याच क्षणी मधुराने जे डोळे बंद केले ते पुन्हा उघडलेच नाहीत.

' डॉक्टर, हे बघा ना मधुराला काय झालं. तिला पुन्हा चक्कर आली आहे.' विकास ओरडा करू लागला बाजूला असलेल्या नर्सने त्याला बाहेर जायला सांगितलं मी पळतच डॉक्टर मधुराजवळ आले काही काळाने डॉक्टर बाहेर आले नि त्यांनी सांगितले 'मिस्टर विकास मधुराला तिचं बाळ गेल्याचा धक्का बसला आहे आणि तो धक्का पचवू न शकल्याने ती कोमात गेली आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करून पण ती बरी होईल की नाही हे मात्र आम्ही सांगू शकत नाही.

 आपल्या सुखाला कोणाची नजर लागली हे विकासला कळतच नव्हतं. तो मधुराला जवळ घेऊन समजावणार होता. तिच सांत्वन करणार होता आणि पुन्हा तिला घरी घेऊन जाणार होता. पण त्यातलं काहीच झालं नव्हत. दिवसांमागून दिवस जात होते पण मधुराची तब्येत मात्र सुधारतच नव्हती. महिना होऊन गेला पण ती मात्र उठली नाही. 

मध्यंतरी दोन वेळा वसंतराव दवाखान्यात येऊन गेल होते. आजही ते आले होते सगळ्यांची अवस्था वाईट होती. विकास तर जिवंतपणीच मेल्यासारखा झाला होता. डॉक्टरांनी सांगितले होते आणखी किती दिवस किती महिने नि किती वर्ष मधुराला शुद्धीवर यायला लागतील हे आम्ही सांगू शकत नाही. आता फक्त देवावर विश्वास ठेवा. गुरुजी तसेच तडक निघून गेले नि चार दिवसांनी पुन्हा आले ते शुभंकरला घेऊनच. त्याला तिथे कोणीच ओळखत नव्हते. डॉक्टरांसोबत काहीतरी बोलून ते त्याला मधुराच्या कॉटजवळ घेऊन गेले. विकासला काहीच कळत नव्हते तो शुभंकरकडे फक्त पाहत राहिला.

 शुभंकर मधुराजवळ गेला नि जागीच कोसळला. त्याने त्याच्या मधुराला कधी असेल इमॅजिनच केल नव्हत. त्यानी तिचा हात जवळ घेतला आपल्या ओठांना लावला आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. विकासला तर कळेच ना आता यावेळी त्यानी काय करावे. एक परपुरुष आपल्या बायकोचा हात हातात घेऊन बसला आहे म्हणून त्याला माराव की आपली बायको आता शुद्धीवर येईल म्हणून तिच्याकडे बघत बसावं की आपल्या बायकोने आपल्याला फसवलं याचा दुःख करत बसावं. शुभंकर ला काहीतरी जाणवलं आणि त्याने वसंतरावांना सांगितल. वसंतरावांनी डॉक्टरांना आवाज दिला आणि डॉक्टरांनी पाहिल मधुराच्या शरीरात काहीतरी हालचाल होत होती तिच्या संवेदना जागृत होत होत्या आणि ती प्रतिसाद देत होती. त्यांनी शुभंकरला तिथेच बसायला सांगितले आणि थोड्या थोड्या वेळाने ते मधुराला चेक करू लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं 'मिस्टर विकास अभिनंदन तुमच्या प्रार्थनेला यश आल आहे. मधुरा शुद्धीवर आली आहे. तुम्ही तिला भेटू शकता.'  विकास मात्र शून्यातच बघत होता. त्याला माहीत होतं हे यश त्याच्या प्रार्थनेच नाही. तो उठला. यंत्रवत मधुराजवळ गेला. त्याने तिच्याकडे एकवार पाहिले. तिचे डोळे बंद होते. त्यानेतिच्या कपाळावर हात फिरवला, कपाळाचे चुंबन घेतले आणि तो मागे फिरला. तो पाठमोरा झाला आणि मधुराने डोळे उघडले. तिला त्याला आवाज द्यायचा होता पण तिच्या तोंडातून आवाज फुटेना. मागे वळून न बघता विकास तिथून निघून गेला होता. 

अगदी पंधरा दिवसात मधुरा व्यवस्थित बरी झाली होती. स्वतः उठून बसू लागली होती. पण एवढ्या दिवसात एकदाही विकास तिला बघायला आला नव्हता आणि ना सुमती बाई तिथे होत्या. दोन दिवसांनी मधुराला घरी सोडले. तिचे आई वडील तिला घरी घेऊन आले तोच घरात तिला शुभंकर दिसला. शुभंकरला पाहिल्यावर मात्र तिचा स्वतःवरती ताबा राहिलाच नाही. त्याच्या गळ्यात पडून रडू लागली ती. हे रडू तिच्या नशिबासाठी होत. शुभंकर गेला, तिचं बाळ गेलं, विकासही गेला. आयुष्य कुठल्या बाजूला जाणार हे तिला कळत नव्हत.  ती शांत झाल्यावर शुभंकरने बोलायला सुरुवात केली 'मधुरा तुझ आणि माझ एकमेकांवर प्रेम होतं हे विकासला कळल होत. तू शुद्धीवर येत नव्हतीस तेव्हा मामाने मला इकडे बोलावलं आणि मी तुला भेटायला आलो. नंतर तू लगेच रिस्पॉन्स करू लागली. विकास हे सहन करू शकला नाही कारण त्याचा तुझ्यावर खूप प्रेम होतं. दोन दिवसातच तो मला भेटला त्याने रीतसरपणे तुला घटस्फोट दिला नि आपल्या दोघांच्या आयुष्यातून तो निघून जात आहे, असं सांगून तो निघून गेला. तो कुठे गेला? याचा शोध घेण्याचा मी खूप प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही.त्याचा नंबरही बंद आहे आणि घरीही कोणीच नाही.' हे सगळं ऐकून मधुराला अक्षरशः धरती फाटावी आणि तिने आपल्याला तिच्या कुशीत घ्यावे असे वाटू लागले. ज्या शुभंकरवर ती प्रेम करत होती त्याला ती सोडून गेली होती आणि जो विकास तिच्यावर प्रेम करत होता तो तिला काही न सांगता सोडून गेला होता. आयुष्यात अजून काय राहिल आहे याचाच विचार ती करू लागली.

मधुराने विकासला संपर्क करण्याचा हर एक तऱ्हेने प्रयत्न केला पण ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. पुढचे चार-पाच वर्ष मधुरा आणि शुभंकर हे धक्क्यामध्येच होते. आयुष्यात पुढे काय करायचं? कसं जायचं? हे दोघांनाही कळत नव्हतं. तेव्हा दोघांच्या घरच्यांनी त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करावं असा सल्ला दिला पण त्यांच्यामध्ये आता प्रेम राहिल नव्हत. त्याची जागा एका अवघडलेपणाने घेतली होती. त्यातल्या त्यात मधुरा तर जे काही झालं ते विसरू शकत नव्हती. तिने या लग्नाला ठामपणे नकार दिला. पण मारताना तिच्या आईची शेवटची इच्छा म्हणून त्या दोघांनी लग्न केले. 

लग्नानंतरही झालेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी दोघांना वेळ लागला. दोघांचा संसार सुरू झाला, परंतु तो संसार फुलवण्यासाठी त्यांच्या घरात एक छोटं बाळ कधीच येणार नव्हत. कारण मधुरा कधीच आई होऊ शकत नव्हती. दोघांनीही बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आजच्या दिवशी म्हणजेच जेव्हा मधुराची छोटी परी या जगात येण्याआधीच निघून गेली होती त्याच दिवशी ते दोघेही अनाथ आश्रमात गेले.

तिथे पोहोचल्यावर मधुराला विकास दिसला समोर त्याला बघून तिला धक्काच बसला. त्याने तिला पाहिले नव्हते. ती शुभंकरला बाजूला ओढून एका ठिकाणी लपली. विकास एका मुलीला कडेवर घेऊन आनंदाने नाचत होता, बागडत होता. बहुतेक तो आश्रमातील मुलांसाठी जेवण घेऊन आला होता. तासभर ती त्याच्याकडे पाहत होती. तासाभराने त्याने त्याच्या कडेवर असलेल्या मुलीचा पापा घेतला आणि तिला खाली ठेवून तो निघाला तू जाऊ लागला. तशी ती चिमुरडी रडू लागली. तितक्यात आश्रमातील मॅडम आल्या आणि त्यांनी तिला उचलून घेतल, 'तुम्ही जा मिस्टर विकास मी सांभाळते तिला' असं म्हणत त्या तिला आत घेऊन गेल्या. भरल्या डोळ्यांनी विकास तिथून निघून गेला.आपण विकासच्या नजरेस पडणार नाही याची पुरेपूर काळजी मधुराने घेतली होती. कारण एकतर ती विकासला नजर मिळवू शकणार नव्हती आणि त्याच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या जखमेवरची खपली तिला काढायची नव्हती. तो जाताच ती धावतच आश्रमतल्या मॅडमकडे गेली.

' मिसेस अवसरे, मी मधुरा. आपलं बोलणं झालं होतं.'

 'हो या या. बसा मी तुम्हाला सविस्तर आश्रमातील मुलांची आणि बाकी फॉर्मॅलिटीची माहिती देते.'

' नाही. आधी मला सांगा हे कोण होते?'

'हे मिस्टर विकास सरदेसाई. ते दरवर्षी याच दिवशी आश्रमातील मुलांना जेवण घेऊन येतात. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी त्यांची मुलगी याच दिवशी गेली होती म्हणून तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते आजच्या दिवशी इथे येतात.'

' आणि त्यांच्याकडे होती ती मुलगी?'

' ती मुलगी होय? ती आश्रमातलीच. जेव्हा मिस्टर विकास पहिल्यांदा आश्रमात आले तेव्हा या मुलीला बाहेर पाळण्यात कोणीतरी ठेवले होते तेव्हा पाळण्यातून तेच तिला आत घेऊन आले. त्यांना त्या मुलीचा इतका लळा लागला की त्यांनी तिला दत्तक घेतल पण ते घरी एकटेच असतात आणि ती लहान आहे म्हणून तिला इथेच ठेवलय त्यांनी.'

' एकटेच म्हणजे त्यांच्या घरी दुसर कोणी नाही?'

' जेव्हा त्यांची मुलगी गेली त्यानंतर काही महिन्यातच त्यांची आई वारली आणि बायको होती. पण बहुतेक त्यांचा घटस्फोट झाला असावा,  सविस्तर माहिती मला माहित नाही. पण तुम्ही हे सर्व का विचारताय?'

' तुम्ही एकदा त्या मुलीला घेऊन याल का?' मधुराने काकुळतीला येऊन विचारले.

' ठीक आहे' असे म्हणून विकासच्या कडेवर असणारी छोटी परी त्यांनी आता मधुराकडे दिली. तिने तिला घट्ट आवळून धरले होते. ती तिचे मुके घेत होती, डोळे मात्र अव्यहात ओघळत होते. अवजारेबाईंना कळलं नाही नक्की काय चाललय.

'तुला ही मुलगी घ्यायची आहे का दत्तक?'शुभंकर काळजीनेच विचारले. 

'नाही नाही शुभंकर हा विचार मनात आणणे पाप आहे. हीच एकमेव आहे जी विकासच्या जगण्याचं कारण आहे आणि मी त्याच्यापासून ते घेऊ शकत नाही.' 

मी असे म्हणून तिने पुन्हा एकदा त्या मुलीला जवळ घेतले. त्या मुलीच्या गालावर पापा घेतला आणि तिला विचारले तुझे नाव काय बाळा.

तितक्याच निरागसतेने तिने उच्चारले,' श्रेया.'

नाव ऐकताच मधुराने तिला छातीशी घट्ट कवटाळले नि ती धाय मोकलून रडू लागली.

आयुष्यातली अनेक वादळे शमवण्याची ताकद असणारे प्रेम आयुष्यात सगळयांनाच मिळते अस नाही. मधुरा, शुभंकर आणि विकास यांना प्रेम मिळाले पण त्याने तिघांच्याही आयुष्यात कधीही न संपणारे वादळ आणले. तेच त्यांचे प्राक्तन होते.


©कादंबरी


कादंबरी विकास आकोलकर.

पुणे.


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.   

Post a Comment

1 Comments

  1. वा वा.. सुंदर, अप्रतिम ☺️

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box