अवेळीच आता जडला हा जीव - मीनाक्षी मोहरील

" अवेळीच आता जडला हा जीव "

 

संध्याकाळचे पाच वाजत आले.

मी हातातलं पुस्तक ठेवून उठले. एकीकडे चहा करायला ठेवला आणि तयारी करायला घेतली.

शॉवर घेऊन आल्यावर आधी चहा घेतला.

साडी नेसावी, ड्रेस घालावा, की सुटसुटीत जीन्स टी शर्ट घालावं हा विचार दोन मिनिटं मनात केला.

मनाशीच हसत माझी आवडती , फिक्कट गुलाबी रंगाची प्युअर सिल्कची साडी कपाटातून बाहेर काढली.

कधीतरी बोलता बोलता, शिशिर म्हणाला होता, 

" ए पियू, तू नं कोणत्याही ड्रेसमध्ये छानच दिसतेस, पण तुला नं साडी सगळ्यात खुलून दिसते. मला तू जुनाट विचारांचा नको हं समजूस! पण मला मनापासून वाटलं ते मी आपलं सांगितलं ."

आता तेच आठवून मी पटकन साडी नेसून तयार झाले. किंचित फाउंडेशन लावून , हलकीशी लिपस्टिक फिरवली, आणि माझ्या आवडीचं कलोन अंगभर शिंपडून घेतलं. अगदी कोणत्याही सीझन मध्ये मी फक्त आणि फक्त कलोनच वापरते. मनापासून आवडतं मला ते! त्या सुगंधाची वेगळीच अशी धुंदी येते.

मला माझंच आश्र्चर्य वाटत होतं, एखाद्या नवतरुणीच्या उत्साहानी मी तयारी करत होते.

पन्नाशीच्या आसपास पोहोचल्यावर मनात या उत्साहाला उधाण आलं होतं. मी खुदकन हसले, शिशिरच्या आठवणीनं! ही कसली जादू झाली होती माझ्यावर? काही चुकत तर नव्हतं नं?

मनातला विचार मी क्षणाभरात झटकून टाकला आणि कॅब बुक करून घाईनं लिफ्टनी खाली आले. दोनच मिनिटात कॅब समोर येऊन थांबली. मी चटकन आत बसले. खरं तर शिशिर पोहोचण्याआधी मी पोहोचायला हवी होते.त्याला उगाच ताटकळत ठेवायला मला नको वाटतं.

हॉटेल " सिल्वर सॅण्ड " समोर कॅब थांबली.

शिशिर आधीच पोहोचला होता. काळी टी शर्ट आणि निळ्या जीन्समधये किती देखणा दिसत होता शिशिर ! त्याची मजबूत शरीरयष्टी , चेहऱ्यावर पसरलेलं रुंद हास्य त्याच्या आत्मविश्वासात भर घालत होतं. मला बघून रुबाबदार पावलं टाकत तो घाईनं समोर आला.माझं न ऐकता त्यानं कॅबचं पेमेंट दिलं.

 माझ्या बाजूचा दरवाजा उघडून खाली उतरताना सहज हात दिला. मी सुखावून गेले,

इतक्या चांगल्या वागणुकीची मला आयुष्यात कधी सवय नव्हती. सगळ्या आयुष्याची नुसती

वाताहत झाली होती. संशयी, विकृत आणि व्यसनी नवऱ्यानी माझं आयुष्य पार उध्वस्त केलं होतं. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर मी खरोखरच सुटले होते. मूलबाळ काही नव्हतंच! उगाच जवाबदारी नको, म्हणून नातेवाईक कधीच दूर झाले होते. माझ्या बॅंकेच्या नौकरीत माझं आयुष्य सुखात चाललं होतं. आयुष्याच्या या वळणावर झालेली शिशिरची भेट, त्याचा सहवास , त्याच्या सोबत गप्पा मारत घालवलेले मोजकेच क्षण म्हणजे अगदी रखरखीत उन्हात लाभलेला सुखद थंडावा होता. होरपळलेल्या मनावर झालेला गुलाबपाण्याचा शिडकावा होता.

" पियू, ये.... कसला विचार करते आहेस एवढा? हॅपी बर्थडे डिअर पियू...."!

माझा हात हातात घेऊन, चालता चालता शिशिर म्हणाला.

" थॅंक्यू शिशिर! "मी पण हसुन म्हणाले.

हॉटेल मध्ये जाऊन टेबलशी बसल्यावर शिशिरनं मेनूकार्ड माझ्या कडे सरकवत हसत विचारलं , 

" पियू , तू काही सांगणार की नेहमीप्रमाणे मलाच सांग म्हणणार? तर आधीच मी ऑर्डर करतो...."

" तूच सांग शिशिर....! फक्त मोजकं सांग, मला नाही खूप एकदम खायला जमत. आणि हो...

आज नं ' फ्रुटसॅलड विथ आईस्क्रीम ' घेऊ शेवटी! मनापासून आवडतं मला ते!"

" हो... नक्की घ्यायचंच! अजून काय हवं?आज तुझा दिवस आहे , तू म्हणशील तसंच सगळं करूया ! "

" बस रे ! तीच कधीची इच्छा होती. पण एकटी कशी नं येणार अशी? नेहमी मैत्रिणींना वेळ किंवा मूड असतोच असं नाही नं? आणि काही गोष्टी एकट्यानं नाही एन्जॉय करता येत रे, हो नं?"

" अगं कुठे एकटी आहेस? आठव बरं, आपण असतो की सोबतच इतक्यात! तू एकटी थोडीच आहेस , कळतंय का वेडाबाई? " 

 

शिशिरची हळूवारपणे, प्रेमानं , लाघवी भाषेत बोलण्याची पद्धत मला फार आवडते. असं वाटतं ही व्यक्ती कधीच कुणाला दुखावणं शक्य नाही. दुसऱ्याच्या दु:खानं पटकन हळवा होतो तो, अगदी कासावीस होऊन जातो! माझ्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला सहनच नाही होऊ शकत! खरंच, माणसं इतक्याही चांगल्या स्वभावाची असतात? मला हा चांगुलपणाचा अनुभव अगदी नवीन होता .माझे डोळे उगाच तुडुंब भरले. माझ्या पालथ्या हातावर हात ठेवून शिशिरनी

विचारलं,

" पियू.... अगं काय झालं? कुठे हरवतेय सारखी अधूनमधून? आज अजिबात दुसरं काही मनात आणायचं नाहीये हं! गोड मुलगी आहेस नं तू? ऐकायचं मग आज माझं ! छान हसून दे... मला आवडतं तसं !"

शिशिरनी माझ्या हातावर थोपटत म्हटलं.मी पण एखाद्या लहान मुली सारखी खुदकन हसले. 

" व्हेरी नाईस ! दॅट्स लाईक अ गुड गर्ल " शिशिर हसत म्हणाला.

मग मस्त हसत खेळत जेवणं झाली.

शिशिरनं एक पार्सल माझ्या हातात दिलं आणि म्हणाला,

" पियू, ही तुझी वाढदिवसाची भेट! पण आवड मात्र माझी आहे हं! बघ नं उघडून , आवडतेय का? साडीचा हा पारवा रंग मला फार आवडतो. " शिशिर उत्साहाने बोलत माझ्या चेहऱ्याकडे बघत होता.

माझ्या चेहऱ्यावर आनंदाची, हास्याची समाधानाची उधळण झाली.मन मोरपिसासारखं हलकं झालं. अंगावर चांदणं बरसलं जणू! मी त्या पारव्या रंगाच्या सिल्कच्या साडीवर अलगद गाल टेकवत म्हणाले,

" खूप खूप आवडली मला साडी शिशिर! पण एवढं काही आणायची काही गरज होती का रे?

छान एकत्र जेवलो , सोबत आनंदात वेळ घालवला , वाढदिवस झाला की साजरा !"

" ए..... चूप !असलं काही तरी नको हं बोलूस ! मला राग येईल अशानं!"

" नको रे रागावूस.... खूप खूप आवडली मला साडी आणि तिचा पारवा रंग पण ! पुढच्या वेळी नक्की ही साडी नेसून येईन मी! "

तेवढ्यात आमचं फ्रुटसॅलड विथ आईस्क्रीम आलं. गप्पा मारत मारत, ते संपवून आम्ही निघालो.

शिशिर कारनी मला घरी सोडणार होता. आत बसता बसता सहज मी म्हटलं, 

" शिशिर, जरा वेळ गेट वे ला बसायचं आपण?

खूप शांत वाटतं तिथे! आणि अजून नऊच वाजतात आहेत. अर्ध्या तासात परत येऊ ! जरा निवांत माणसांच्या गर्दीपासून दूर बरं वाटतं.तिथे माणसं नाही फार येत , कारण अजून तिथल्या किनाऱ्याचं बाजारीकरण नाही झालेलं! जाऊयात आपण?"

" अगं हो....त्यात काय एवढं? नक्की जाऊया, चल....!"

शिशिरनी कार गेटवे कडे घेतली. दूर कार पार्क करून, आम्ही चालत किनाऱ्याकडे निघालो.

लांबूनच समुद्राचा ओलसर खारट वारा नाकातून थेट मस्तकात गेला. मी मोकळेपणाने भरभरून श्र्वास घेतला. शिशिरनी केव्हा माझा हात हातात घेतला, ते ही मला समजलं नाही. मी त्या भव्य दिव्य समुद्राकडे बघत , एका अनामिक ओढीने समोर निघाले होते. 

समुद्राच्या अगदी जवळ गेल्यावर मी शिशिरला

विचारलं,

" बसूयात नं शिशिर इथे जरा वेळ?"

" हो पियू, बसूयात की ! रुमाल हवाय तुला खाली टाकायला?"

" नाही नं, नको शिशिर.....! मग रेतीचा स्पर्श कसा होणार? ओल्या रेतीचा स्पर्श किती सुखद असतो , हवाहवासा ! "

आम्ही एकमेकांच्या शेजारी निवांतपणे बसलो.

मी एकटक समुद्राकडे बघत, शांतपणे बसून राहिले. शिशिर माझ्या कडे बघत शांत बसला होता.

  लाटांचं अवखळपण शांत होऊन, एकट दुकट लाट पायापर्यंत येऊन स्पर्शून जात होती.

अगदी शांतपणे, सारं अवखळ पण मागे ठेवून! मन सुखावून जात होतं. 

किती वेळ गेला कुणास ठाऊक! शिशिरनी आवाज दिला,

" पियू , कुठे हरवलीस? काही बोलायचं नाही का? मग घरी जायची वेळ होईल की! "

"शिशिर, इथे समुद्रासमोर मी अशीच नि:शब्द

होऊन जाते. किती किती वेळ अशी न बोलता

बसून राहते. पण आता बोलूया आपण! तुझ्या सोबत या समुद्र किनारी किती शांत, निवांत वाटतंय! असं वाटतंय असंच निवांत बसून रहावं, सगळ्या जगाच्या दूर, शांतपणे आपल्याच दुनियेत!"

" पियू, रागावणार नसलीस तर एक विचारू मी? "

" शिशिर, कसं शक्य आहे मी तुझ्यावर रागावणं? विचार नं, इतकी प्रस्तावना कशाला हवीये? आपण इतके काही परके नाही नं एकमेकांना?"

" हो, पियू.....तेच म्हणत होतो मी! हे उरलेलं

जरासं परकेपण आपण दूर करूया का? संसाराचं सुख तुझ्या नशिबात नव्हतं आणि माझ्या नशिबातही नव्हतंच.कारणं काहीही असोत, ती महत्त्वाची नाहीत. तुझी हरकत नसेल तर आपण नेहमीसाठी एकमेकांना सोबत करूया का? "

मला आज आत्ता असं काही शिशिर विचारेल असं वाटलंच नव्हतं. अचानक प्रश्न समोर आला आणि मी जरा दचकले. तसं फारच अनपेक्षित नव्हतं मला ते, पण तरी....! 

शिशिरची पहिली बायको कॅन्सरनी , लग्नानंतर

वर्षभरातच गेली होती.नंतर त्यानंही लग्न केलंच नव्हतं.शिशिर एका आय टी कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करत होता. मुख्य म्हणजे स्वभावानं अतिशय साधा ,सरळ , सज्जन आणि माणसातली माणुसकी जपणारा होता,

निर्व्यसनी होता. हे सगळं माझ्या मनात एका क्षणात येऊन गेलं. मी काही बोलत नाही असं बघून शिशिरच परत म्हणाला,

" पियू.... शांतपणे घे! आपण काही आता ऐन 

त्या अवखळ अल्लड वयातील तरुण तरुणी नाही आहोत, की आकर्षणाला प्रेम समजून , भावनेच्या भरात काही निर्णय घेऊ! आपल्या विचारांमध्ये जरूर ती परिपक्वता निश्चितच आहे पियू....! भावनांना ही योग्य ती खोली आहे, कुठेही उथळपणा नाहीये ! तुझी इच्छा नसेल तर जबरदस्ती अजिबात नाहीये बेटा! फक्त आपल्याला जरा जास्त सुख कसं मिळू शकेल त्याचा मी विचार करत होतो. तू नाही म्हणालीस तरी मी रागावणार थोडाच आहे?

आपण अशीही मैत्री जपू शकतो आपली! "

 

शिशिरचं बोलणं ऐकून मला भरूनच आलं एकदम! नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. मला इतक्या चांगल्या, प्रेमळ शब्दांची कधी सवयच नव्हती. कुणी मला असं सन्मानानं वागवलंच नव्हतं. मी भावनाविवश होऊन थरथरत मी शिशिरला म्हटलं...

" शिशिर, पण आता इतक्या उशिरा भेटलोय आपण, ही आयुष्याची अवेळ तर नाही ना झाली रे ? आता पुन्हा डाव मांडला तर तो सुखानं , मनापासून खेळता आला पाहिजे.

माझं मन नं फार फार हळवं होऊन गेलंय ! आयुष्यात कधीच प्रेमाची सन्मानानं कुणी वागलंच नाही रे...ही प्रेमाची भावना अवेळी तर नाही ना आली आपल्या आयुष्यात?"

 

" पियू, कसली वेळ आणि अवेळ गं? आपल्या भेटीची हीच वेळ देवानं निश्चित ठरवली असेल, मग तीच वेळ योग्य आणि शुभ असणार नं?

एखादी चांगली गोष्ट घडण्याची जी वेळ, ती अवेळ कशी असेल, सांग बरं मला?"

बोलता बोलता शिशिरनं माझा हात हातात घेतला. समुद्रावरून येणाऱ्या थंड खाऱ्या वाऱ्यामुळे, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंमुळे असहाय्यपणे , भावनातिरेकानं माझं डोकं आपोआपच शिशिरच्या खांद्यावर टेकलं गेलं.

शिशिरनं हलकेच माझ्या डोक्यावर थोपटलं, आणि म्हणाला , 

" चल पियू, निघू आपण ! जबरदस्ती उगाच जास्त विचार नको करूस. हवं तर विसरून जा हं मी जे काही बोललो असेन "!

" नाही शिशिर....! आता वेळ नको घालवायला आपण! मला फक्त एकच वाटत होतं की फार उशीर झालाय की काय , आपण हा निर्णय अवेळी तर घेत नाहीये नं? तू मनाशी विचार करूनच सगळं बोलला असशील , खात्री आहे मला! आपण उरलेलं आयुष्य, एकमेकांच्या सोबतीनं आनंदात घालवूया ! आपलं राहून गेलेलं जगणं, जगून घेऊया ! आधीच आपण उशीर केलाय, आता वेळ नको वाया जायला.कधीतरी लोक काय म्हणतील असं मनात येतं, पण आता लोकांचा विचार करणं मी खूप आधीच सोडून दिलंय! चल शिशिर, निघायचं आपण?"

" हो पियू....! खूप समाधान वाटलं मला, खूप आनंद झाला! तू जो विश्र्वास टाकलास नं माझ्यावर, मी नेहमीच लक्षात ठेवेन! शक्यतोवर कधीही तू दुखावली जाणार नाहीस याची काळजी घेईन मी! आजवर आपल्याला जी सुखं मिळाली नाहीत, ती आपण एकमेकांना देऊया !"

" हो शिशिर, नक्की असंच करूया ! आता या क्षणी एक इच्छा आहे..... करशील पूर्ण? फक्त माझ्यासाठी एक गाणं म्हणशील आज? "

" हो पियू....त्यात काय एवढं? कारनं जाताना ड्राईव्ह करता करता म्हणतो की! तुझ्या लाडक्या समुद्राच्या साक्षीनं आपण आयुष्यातला मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे . त्याला हात जोडून आशीर्वाद मागू आणि निघूया"! 

आम्ही दोघांनी त्या अथांग पसरलेल्या समुद्राला मनापासून हात जोडून आशीर्वाद घेतले आणि परत निघालो. दोघांची मनं समाधानानी , आनंदानी जडावली होती. हातात हात घेऊन चालत चालत आम्ही कारपर्यंत आलो. माझ्या बाजूचा दरवाजा उघडून धरत शिशिर उभा होता.मी आत बसल्यावर शिशिरनं कार हलकेच सुरू केली. हळूवार रेशमी आवाजात त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली,

 " आ चलके तुझे , मै लेके चलू ....

     एक ऐसे गगन के तले...

जहाँ गम भी ना हो आसू भी ना हो..

बस प्यार ही प्यार पले......"

आम्ही अवेळ न करता योग्य निर्णय योग्य वेळीच घेतला होता. मी सुखातिशयाने डोळे मिटून घेतले, माझा एक हात नकळतच शिशिरच्या हातावर अलगद विसावला होता...

 

मीनाक्षी मोहरील


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 


Post a Comment

0 Comments