नवीन पर्व - मृणाल गोसावी

                                                                “नवीन पर्व”

-सौ. मृणाल गोसावी

 लॅच-कीने दार उघडून नीता घरात आली. पंखा सुद्धा लावण्याचं न सुचून सोफ्यावर सुन्न बसून राहिली. डोकं कोणताही विचार करण्याच्या पलीकडे गेलं होतं. विचाररहीत अशा स्थितीचा नकोसा अनुभव घेता घेता, काल संध्याकाळपासून घडलेल्या सर्व घटनांचा एक क्रम समोरून निघून गेला. आतापर्यंत आयुष्यात अनेक कडू आठवणींचा अत्यंत खोल ओरखडा ओढला गेला होता. नेहा आणि स्नेहल साठी म्हणून सहन केलेल्या सगळ्या गोष्टींवर पडदा पडला होता. प्रदीप ने केलेली प्रतारणा, त्याचं सुनीला वर असलेलं प्रेम, त्यातून दोन जुळ्या मुलींच्या जन्मानंतर त्याला त्या प्रेमाची झालेली उपस्थिती, हे सारं सहन करण्याच्या पलीकडे होतं. राहत असलेलं घर जरी प्रदीप ने घेतलेलं होतं, तरी सुदैवानं ते नीताच्याच नावावर होतं. बऱ्यापैकी पगार देणारी कायमस्वरूपी नोकरी तिला होती. दोन सोन्यासारख्या मुली होत्या. सगळ्यात महत्त्वाचं, प्रदीपची आई खंबीरपणानी तिच्या बाजूनी होती. २० एक वर्षाच्या एका मुलीच्या मदतीने दोघींचा संगोपन अतिशय प्रेमाने त्या करत होत्या. त्यामुळे एका बाजूनी मी जरा निर्धास्त होते, पण मूळ जे पाहिजे ते आपल्या मानलेल्या माणसाचं प्रेम  मिळवण्याच्या बाबतीत मात्र पूर्ण अपयश पदरी पडलं होतं.

कालची संध्याकाळ तर अगदीच काळी कुट्ट होऊन आली होती. साडेसहा सातच्या सुमाराला मोबाईल खणखणला. प्रदीप आणि सुनीला मोटरसायकल वरून कुठेतरी जात असताना, मागून आलेल्या भरघाव मोटारीची धडक बसली होती. त्यात सुनीला जागीच ठार झाली होती आणि प्रदीपला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. त्याच्या जवळच्या मोबाईल वरून आजूबाजूच्या लोकांनी मला कळवलं होतं. तशीच धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अर्धवट शुद्धीत असलेल्या प्रदीप ने मला ओळखलं, हात हातात घेऊन म्हणाला, "नीता, सॉरी माझ्यामुळे खूप मानसिक त्रास तुला सहन करावा लागला. पण तुझी आणि मुलींची भविष्याची पूर्ण तरतूद करून ठेवली आहे. त्याचा अव्हेर करू नकोस. माझं जितक सुनीला वर प्रेम होतं, तेवढच तुझ्यावर आणि मुलींवर देखील होतं. पण भूतकाळात तिला दिलेली वचनं आणि मी तुझ्याशी लग्न केल्यामुळे तिला आलेला एकाकीपणा मला आतून खूप त्रास देत होता. आपल्याकरता ती एकटे राहिली हे सत्य सतत टाचत होतं. त्या अपराधीपणाच्या भूमिकेतून मी खरंतर तिच्याजवळ राहायला गेलो. पण खरं सांगतो आता जेव्हा शेवट जवळ आल्याची खात्री पटते आहे, तेव्हा तरी मी हे नक्कीच कबूल करतो. माझ्यावर विश्वास ठेव, मी मनानी सतत सतत तुमच्याच जवळ होतो. आई खंबीरपणानी तुझ्या बाजूनी होती कारण तिच्या मुलाची मानसिक दुर्बलता तिला असह्य करून गेली होती. तिचा मुलगा पूर्ण चुकला आहे याची तिला खात्री होती. असं होण्यात कदाचित आपल्या वाढवण्यात काहीतरी कमी राहिली आहे अशी बोचही कदाचित तिच्या मनात असेल. पण तिच्या तिथे असण्याने मला मी तिथे 70 टक्के उपस्थित असल्याचं समाधान मिळत होतं. रविवारी संध्याकाळी मुलींना भेटून परत जाताना दरवेळी अपराधी वाटायचं. पण मोकळेपणा आणि कबूल करायचं धाडस कधी झालं नाही. हे मात्र मनापासून कबूल करतो, परत गेल्यावर नकळत तुम्हा दोघांमध्ये तुलना व्हायची. पण हा मार्ग मी स्वतः स्वीकारला असल्यामुळे मनात येऊन सुद्धा माघारी फिरणं शक्य नव्हतं."

इतकं सगळं एका दमात बोलल्यामुळे प्रदीप ला धाप लागली. मी त्याच्या छातीवर हळुवार हात फिरवत निश:ब्द बसून राहिले होते. एक आवंढा गिळून तो परत बोलायला लागला, "ज्यावेळी मी तुला तिच्याबद्दल सांगितलं तेव्हा सुरुवातीला अपेक्षित अशीच प्रतिक्रिया तुझ्याकडून आली. पण त्यात तुझी चूक काहीच नव्हती. उलट तू माझ्यावर खूप निर्व्याज प्रेम करत होतीस. दुधात साखर आणि केशर असा मिलाफ घडावा अशा दोन गोंडस मुली तू मला दिल्यास. आणि त्या बदल्यात मी तुला काय दिलं होतं तर सोडून जाण्याचं दुःख. त्यावेळी तू स्वतःला लावून घेतलेला बोल अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. पण हे सगळं वादळ तू इतक्या सामर्थ्याने शांतवलस की तुला सलाम करावासा वाटतो. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता, वरवर शांत भासणाऱ्या वातावरणात तू मला निरोप दिलास. माझ्या आईला आपली आई मानलं. स्वतःच्या माहेरी न जाता आपल्याच घरी राहून, आल्या परिस्थितीला धीरानी तोंड दिलस. माझ्या, सॉरी, आपल्या मुलींना आईच्या मदतीने इतकं छान सांभाळतेस त्याबद्दल तुझे आभार तरी कसे मानू? त्यात सुद्धा माझ्या मनाचा कोतेपणाच दिसून येईल."

"नीता, माझ्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये तीन फाइल्स आहेत. त्यावर तुम्हा तिघींची नाव घातली आहेत. त्यामध्ये तुमच्या नावाने केलेल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटशी सविस्तर कागदपत्र आहेत. खरं सांगू,मला आम्हा दोघांच्या नावावर काही ठेवावसं वाटलंच नाही. जे आहे ते तुम्हा तिघींच्या नावावर ठेवलं आहे."

मी म्हणाले, "शांत हो आधी. या सगळ्यातून तू आधी बरा हो, मग पाहूयात. आमच्यासाठी तू महत्त्वाचा आहेस, बाकी काही नाही." माझ्याच्याने अधिक काही बोलवेना. एखाद्या चित्रपटात घडाव्यात तशा घटना माझ्या आयुष्यात घडत होत्या. मधल्या काळात घरी फोन करून सासूबाईंना पूर्ण कल्पना दिली. दवाखान्याचा पत्ता सांगून फोन ठेवला, तेवढ्यात समोर एक इसम उभा राहिला. रुबाबदार आणि देखणं व्यक्तिमत्व होतं. तिथे प्रदीप पुन्हा बेशुद्ध अवस्थेत केला होता. श्वास चालू होता, इतकच जिवंतपणाचं लक्षण होतं.

समोर उभ्या असलेल्या व्यक्तीशी बोलायची सुद्धा ताकद त्याच्यात नव्हती. मी सुन्न अशी त्याच्याकडे एकटक पहात उभी होते. माझी ती स्थिती पाहून तो इसम तिथून निघून गेला. काही वेळातच सासूबाई तिथे येऊन पोहोचल्या आतापर्यंत मनावर दगड ठेवून आपल्या एकुलत्या एका मुलाशी कठोरपणाने त्या वागत होत्या. त्यांचा असा निश्चित पडलेल्या आपल्या लेकाकडे पाहून मनावर घातलेला सारा आवर संपला. मायेने त्याच्या अंगावर हात फिरवत त्या रडायला लागल्या. ते पाहून माझ्या मनात अपराधीपणाची भावना उसळून आली. माझ्यामुळे आई मुलाची ताटातूट झाली होती. कितीही झालं तरी तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मामंजींच्या पश्चात त्यांचा मानसिक आधार होता.

तितक्यात मॉनिटर वरच्या लाईन्स जोरात वर खाली होत होत्या. प्रदीप ने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. आपल्या आईला समोर बघून डोळ्यात पाणी आलं. आईचा हात हातात घेऊन "सॉरी", इतकच तो बोलू शकला. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. मी त्याला आश्वासक थोपटलं. त्याला खात्री होती की कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आईला मी कधीच अंतर देणार नव्हते. तो आमच्याशी बोलतोय हा आनंद अगदीच अल्पकाळ टिकला.

तितक्यात त्याला कसंतरी व्हायला लागलं. त्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला होता. आणि तितक्यात त्याला दरदरून घाम फुटला. डॉक्टर येईपर्यंत सर्वकाही संपलं होतं. आमच्या हातात त्याचे थंडगार हात राहिले होते. आम्हा दोघांना काहीच सुचेना. घरी दोन्ही मुलींनी रडून गोंधळ घातला होता. सांभाळणाऱ्या मुलींनी स्वतःच निर्णय घेऊन माझ्या आई-बाबांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी प्रदीप आपल्यात नसल्याचं जाहीर केलं. विमनस्क अवस्थेत मी प्रदीपच्या दोन-तीन जवळच्या मित्रांना बोलावून घेतलं. आणि पुढच्या सोपस्करांना सामोरे गेले.

बिलिंग काउंटरला कळलं की सर्व पेमेंट आधीच पूर्ण केलं होतं. त्या व्यक्तीने स्वतःच नाव मात्र कळू दिलं नाही. त्यावेळी दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे आईंना सांगून अंतिम कार्य मी स्वतः केलं. अगदी त्यावेळी काहीही न सुचल्यामुळे त्यांनी देखील परवानगी दिली. माझ्याकडे नंबर असलेल्या काही नातेवाईकांना आणि त्याच्या ऑफिसमधल्या कलिग्जना फोन करून पुढच्या अर्ध्या तासातच त्याचे अंतिम संस्कार पार पाडले. सगळं उरकून घरी परतायला रात्रीचे साडेअकरा वाजले होते. आईला पाहिल्यावर मात्र माझ्या मनाचा बांध फुटला. आईच्या कुशीत आणि दोन्ही मुलींना जवळ घेऊन खूप रडले. आंघोळ करून झोपेची गोळी घेऊन अंथरुणावर पडले. सगळा जीवन प्रवास झरझर डोळ्यासमोरून जात होता.

पुढचे १३ दिवस कसेतरी पार पाडले. मी माझ्या ऑफिसमध्ये पंधरा दिवसाची सुट्टी घेतली होती. त्यातला एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये गेले. त्याचा ड्रॉवर उघडला त्यातून खरंचच तीन फाइल्स निघाल्या. आम्हा तिघांसाठी त्यांनी केलेली तरतूद पाहिली. काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजत नव्हतं. त्याच्या साहेबांनी केबिनमध्ये बोलावून घेतलं. तिथल्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून मी चेक ताब्यात घेतले. स्पेशल केस आणि त्याचा ऑफिस रेकॉर्ड उत्तम असल्यामुळे संपूर्ण मेडिकल बेनिफिट्स दिले होते. तसंच त्यावर्षीचा परफॉर्मन्स ऍडव्हान्स देखील दिला. ते सगळं घेऊन घरी आले, पुन्हा एकदा भडभडून आलं. आता ऑफिसमध्ये जाणं आवश्यक होतं. मी ऑफिस जॉईन केलं. आई बाबा पण आपल्या घरी परत केले.

पुन्हा एकदा आम्ही चौघी आणि मुलींना सांभाळणारी मुलगी, असं आमचं रुटीन चालू झालं. आई खूपच खचल्या होत्या. स्वाभाविकच होतं ते. रविवारी का होईना त्यांचा मुलगा त्यांना भेटत होता. आता यानंतर तो कधीच दिसणारही नव्हता. त्यांच्या तब्येतीची कुरकुर चालू झाली. घर ऑफिस अशी कसरत पुन्हा सुरू झाली. कुठेतरी माझ्याही आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण स्वतःला व्यक्तच करता येत नव्हतं. स्वतःला पूर्ण विसरून, या तिघींसाठी जगणं सुरू झालं. हळूहळू सगळं निवळत होतं, पण कसं ते माहिती नाही.

पण सासूबाई पुष्कळ पहिल्यासारख्या वागत होत्या. त्याचं कारण एक दिवस अचानक कळलं. काही कारणांनी ऑफिस मधून मी लवकर घरी आले होते. आणि अचानक बेल वाजली दार उघडलं तर एक तिशीतला अनोळखी माणूस दारात उभा होता. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं, पण काही लिंक लागत नव्हती. पाठीमागून सासूबाई आल्या आणि त्यांनी त्याचं हसून स्वागत केलं. याचाच अर्थ ती व्यक्ती वरचेवर येत असणार. मी पूर्ती गोंधळून गेले होते.

तोच आतून माझ्या दोन्ही मुली पळत आल्या आणि त्याला विलगल्या. मला काही केल्या हे कोडं उलगडेना. चहा पाणी झाल्यावर तो स्वतःच्याच घरात असल्यासारखा रिलॅक्स झाला आणि माझ्याशी आपण होऊन बोलायला लागला.

"प्रथम मी माझं नाव सांगतो, माझा परिचय देतो, आणि माझं बोलणं पूर्ण झालं की मग तुमची प्रतिक्रिया द्या." थोड्यावेळ थांबून एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, "माझं नाव प्रतिक देव. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. जाहिरात क्षेत्रात आमची संस्था काम करते. नेहा ऍडज नावाने मी ती चालवतो. माझ्या घरात माझं म्हणावसं कोणी नाही. जवळचे नातेवाईकही फारसे नाहीत. दोन चार मित्र आहेत इतकाच काय तो गोतावळा. तसा मला माणूस घाण म्हटलं तरी चालेल, कारण आई-वडिलांच्या पश्चात मला जे काही बरे वाईट अनुभव आले त्यामुळे असेल कदाचित, पण मी माणसांपासून चार हात लांब राहतो. हे खरंय. ज्या दिवशी तुमच्या यजमानांचा अपघात झाला त्यावेळी माझ्या गाडी समोरून एक लहान मुलगा धावत जात होता. त्याला वाचवण्यासाठी मी जोरात ब्रेक लावला आणि मागून या दोघांची गाडी वेगात माझ्या गाडीवर आदळली. आणि पुढच्या सगळ्या घटना घडल्या. प्रत्यक्षात माझी काहीच चूक नव्हती, तरी मी त्या दोघांना दवाखान्यात दाखल केलं. पोलिसांचे सगळे सोपस्कार पार पाडले. पण तुमच्यापर्यंत त्यांना येऊ दिलं नाही. तशी विनंती मी कमिशनर साहेबांना केली होती. आणि मी तुम्हाला भेटायला दवाखान्यात आलो तेव्हा तुमची मानसिक स्थिती इतकी वाईट होती की काहीही ओळख न देता निघून गेलो."

 "पण तिथली बिल चुकती करून मला स्वतःला खूप अपराधी वाटत होतं. गाडीला ती दोघं मागून धडकली होती आणि तिथे असलेल्यांनी दिलेल्या साक्षीमुळे ती केस तिथेच बंद झाली. तरी परंतु मी स्वतःला तुमचा अपराधी समजतो. याआधी मी तुम्हाला भेटायला आलो होतो, पण भेट होऊ शकली नाही. पण या दोघी मुलींनी आणि त्यांच्या आजींनी मला इतका लळा लावला, की मी आठवड्यातून एकदा तरी त्यांना भेटल्यावाचून राहू शकत नाही. मी समजू शकतो तुमच्या मनात काय आंदोलन चालू असतील, पण आजीने आणि मुलींनी मला स्वीकारल्याबद्दल प्लीज त्यांना कोणताही दोष देऊ नका. खरंच खूप चांगल्या आहेत त्या. आपली आज भेट झाली ते खरंच चांगलं झालं. माझं मन जरा मोकळा करता आलं."

 एक मिनिटभर थांबून तो परत म्हणाला, "गेल्या काही दिवसात या मुलींचा आणि आजींचा मला खरंच खूप लळा लागलाय. माझं  फारसं  जवळचं  कोणीच नाही. कृपा करून त्यांच्याशी जी जवळीक निर्माण झाली आहे ती बंद करू नका. प्लीज, माझ्यामुळे तुमच्या संबंधात कोणताही फरक पडणार नाही, याची काळजी मी नक्की घेईन. पण खरं सांगतो, आजींना भेटल्यापासून मला आई मिळाल्यासारखं वाटतंय. माझं हे सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नका."

 इतकं बोलून माझ्या प्रतिक्रियेची वाटही न बघता तो निघून गेला. मी होते तशीच बसून राहिले. थोड्यावेळाने सासूबाई बाहेर आल्या, तेव्हा त्यांचा चेहरा ओशाळल्यासारखा झाला होता. मी कोणतीच ओळख दिली नाही आणि रोजचा दिनक्रम चालू ठेवला. आता म्हातारपणी त्यांना यातून आनंद मिळत असेल तर मिळत राहावा.  आणि जर माझ्या रुटीनमुळे यामध्ये फरक पडत नसेल आणि मुलींच्या सवयी बदलत नसतील, तर असंच चालू दे. त्यामुळे घरातलं वातावरण तरी शांत राहील.

 असेच दिवस जात राहिले. दोघींनाही शाळेत घालायचं होतं. पुन्हा याही वेळी प्रतीक ची मदत झाली. चांगल्या शाळेत डोनेशनशिवाय ऍडमिशन घेऊनही झाली. अर्थात आभार मानायची औपचारिकता मी लगेच कर्तव्य बुद्धीने पार पाडली. पण त्यांनी "माय प्लेजर" इतकाच प्रतिसाद देऊन विषय मिटवून टाकला. मुलींच्या शाळा सुरू व्हायच्या आधी आजी आणि मुली त्याच्याकडे मुक्कामी गेल्या होत्या. दोनच दिवसात परतल्या होत्या पण तिथे राहण्यानी चेहरे इतके प्रफुल्लित झाले होते, की सगळं काही न विचारताच सांगून टाकलं.

 गेली दोन वर्ष अशीच निघून गेली. कशी गेली काही कळलं नाही. आता मुली मोठ्या होत होत्या. एकटीने त्यांना सांभाळणं दिवसेंदिवस कठीण बनत चाललं होतं. त्यातच सासूबाईंची  तब्येत अधून मधून ठीक नव्हती. त्यांच्या मधुमेहानी चांगलंच डोकं वर काढलं होतं. एका दिवशी संध्याकाळी एकटीच बसले होते. मुली खाली खेळायला गेल्या होत्या, आणि आजीबाई फिरायला. अगदी एकटं आणि सुनं सुनं वाटत होतं. तितक्यात घराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात प्रतीक उभा होता. दारातच त्याला सांगितलं घरात कोणी नाही म्हणून. त्याला आत या म्हणायचं देखील सौजन्य दाखवलं नाही. तो इतका देखणा दिसत होता. आणि त्याच्या नजरेत मी स्वतःला आवरू शकत नव्हते. तो माझी ही सगळी घालमेल नीट टिपत होता. तो शांतपणे म्हणाला, "पण मी तुम्हालाच भेटायला आलोय. आत येऊ?"

 माझ्या मागे दरवाजा नीट लावून तो आतमध्ये आला. मी खिडकीत उभी होते, तिथे माझ्या मागे येऊन उभा राहिला. त्याच्या हे असं वागणं मला अस्वस्थ करत होतं. माझं हृदय धडधडत होतं. श्वासाची गती वाढली होती. मी मागे वळले तर आमच्यात अगदीच वीतभर अंतर होतं. गेल्या चार-पाच वर्षात कोणत्याही पुरुषाचा श्वास इतक्या जवळच्या अंतरावरून माझ्या जवळून गेला नव्हता. माझी दुर्बलता लपवण्यासाठी त्याच्या अंगावर ओरडले, "नक्की तुम्हाला काय हवंय? का माझ्या आयुष्यात अशी ढवळाढवळ करताय? आधी त्या प्रदीप ने पुष्कळ मानसिक त्रास दिला आहे. दोन्ही मुलींकडे आणि सासूबाईंकडे पाहून मी माझा आयुष्य रेटते आहे. त्यात तुम्ही माझा दुःख का वाढवताय? सांगा ना काय संबंध आहे आपला, म्हणून तुम्ही असे आमच्या घरी येता? त्यामुळे मला किती त्रास होतो याची काही कल्पना आहे का तुम्हाला? प्लीज! कृपा करा आणि माझा हा छळ थांबवा! मी हात जोडते तुमच्यापुढे!"

नंतर इतकं रडू आल की काहीच कळत नव्हतं. त्यानी त्याचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. पण मी ते झटकून टाकले. त्याच्यात इतकी ताकद होती की माझा प्रतिकार तोकडा पडला. काहीही न बोलता त्यानी जवळ घेतल. मी देखिल त्याच्या मिठीत विश्वासाने रडून घेतल. तो फक्त मला थोपटत राहिला. त्या स्पर्शात मला जाणवली फक्त माया. एकदम हलकं वाटल. भानावर आले तशी पटकन बाजूला झाले. ते पाहून तो पटकन निघून गेला. मला बोलायला काही अवधी दिला नाही. पुतळा बनून किती वेळ उभी होते काय जाणे. अंधार पडल्याची जाणीव झाली. दिवे लावल्यावर लक्षात आल, इतके दिवस जे ओझं,  जे दडपण घेऊन मी जगत होते त्याचा भार कितीतरी हलका झाला होता. झाल्या गोष्टीची वाच्यता अर्थातच मी केली नव्हती.

पण एक दोन दिवसात सासूबाईंच्या वागण्यात बदल दिसायला लागला. माझ्याकडे बघून त्या हसतायत अस सारख वाटत होत. पंधरा वीस दिवस गेले असतील, माझी घालमेल वाढत होती, नकळत मी प्रतीक ची वाट बघत होते. त्याचा तो भक्कम आणि आश्वासक विश्वासच स्पर्श राहून राहून आठवत होता. त्या स्पर्शासाठी त्या अनुभवासाठी आतून आसुसले होते, पण मन मानायला तयार नव्हतं. अजूनही मला ते मागे मागे खेचत होतं. एके दिवशी संध्याकाळी खेळून आल्यानंतर जेवायच्या वेळी दोघीजणी मुसमुसत होत्या. जेवायला यायला देखील तयार नव्हत्या. खरं तर सगळा त्यांच्या आवडीचा बेत होता. उद्या वाढदिवस म्हणून सगळी तयारी करून ठेवली होती. त्यांना शाळेत द्यायची गिफ्ट दाखवत होते, पण त्यांचं कशातच लक्ष नव्हतं. शेवटी खूप विचारल्यावर नेहा म्हणाली, "प्रतीक अंकलची आठवण येते आहे. त्यांनी प्रॉमिस केलं होतं काही झालं तरी आज येतो. आल्या आल्या फोन करतो. नाही केला फोन त्यांनी. आता उद्या ते वाढदिवसाला नसतील तर आम्ही आमचा वाढदिवस करणार नाही. आणि त्यांच्याशी कट्टी."

मी गप्पही झाले आणि निराशही. माझी हार मला अगदी जाणवत होती. मुली मनाने केव्हाच प्रतीकच्या  झाल्या होत्या. समोर सासुबाई बसल्या होत्या, त्यांनी त्यांची समजूत घालायचा क्षीण प्रयत्न केला. तो सफल झाला नाही. मी डोकं धरून बसले आणि अश्रूंची धार सुरू झाली. रात्रीचे साडेदहा वाजले होते. दोघीही जेवल्या नव्हत्या, झोपायला जायचा तर प्रश्नच नव्हता. खिडकीत दोघी डोकं घालून उभ्या होत्या. तितक्यात बेल वाजली. सासूबाईंनी दार उघडलं, आणि बच्चा लोग म्हणून त्यांनी दारातच हात पसरले. दोघीजणी वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडे धावल्या. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. मी देखील न राहवून बाहेर आले. दोघीजणी त्याच्या कडेवर बसून त्याला घट्ट  बिलगल्या होत्या. आणि तो त्यांचे पटापट मुके घेत होता. जणू किती दिवसांचा विरह सरला होता! त्याची माझ्यावर खेळलेली स्नेहाद्र आणि आळवणी करणारी नजर माझ्या सहनशक्तीचा अंत करणारी होती. मी पाठ फिरवून आत निघून गेले. जसा काही माझा इगो दुखावला गेला होता. गेल्या वीस दिवसात तो कुठे होता काय करत होता मला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी मला काहीही सांगितलं नव्हतं, याचा मला अपमान वाटत होता. परत हाही विचार मनात आला, आपण इतक्या दिवसात त्याला कधी काही महत्व दिलं? त्याच्या व्यवसायासंबंधी, घराविषयी काही माहिती करून घेतली? मग काय अधिकार आहे आपल्याला?

स्वतःवर चिडणं चालूच होतं, खोलीचं दार कधी बंद झालं ते मला कळलं नाही. हलक्या पावलांनी माझ्याजवळ आला. अगदी जवळ आला. मला जवळ घेऊन म्हणाला, "राणी का स्वतःवर चिडतेस? मी मुलींना तुझ्या आधी जवळ घेतलं म्हणून? माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात बघ तुला कळेल तुझी जागा कुठे आहे ते. तू माझ्यासाठी काय आहेस ते सांगण्याची मी गेली तीन वर्ष वाट पाहतोय." मी म्हणाले, "मला सोडा. आई येतील, मुली येतील. उगीच फाटे फोडू नकोस."

"त्या तिघीही इथे येणार नाहीयेत, त्यांना सगळं माहिती आहे. मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. आजी त्या दोघींना जेवायला देत आहेत आणि आता तुझ्याकडे कोणतीही पळवाट नाहीये. आणि हो, तुझ्या आई-वडिलांना देखील हे माहिती आहे. आणि त्यांची परवानगी देखील आहे. आता फक्त तुझ्या होकाराची वाट बघतोय. आणि हो, तो आत्ता मिळवल्याशिवाय मी जाणार नाही."

असली पुरुषी अरेरावी मला हवी होती. ते दशमसळ प्रेम हवं होतं. आणि ते माझ्या हक्काचं होतं. हातांच्या ओंजळीत तोंड लपवून मी उभी राहिले. माझ्या मनातच त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. "माझी नीता, तुला कसं सांगू तू मला काय दिलं आहेस ते. आत्तापर्यंत जे निर्व्याज निरपेक्ष प्रेम मला हवं होतं ते आज मिळालं आहे. या जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे आयुष्यात खूप मुली येऊन गेल्या. पण मला अपेक्षित सौंदर्य फक्त तुझ्याकडे आहे. तुला दवाखान्यात पाहिलं तेव्हाच तू आवडून गेली होतीस. पण मी तुला तुझा वेळ घेऊ दिला. मला तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती करायची नव्हती. आपण होऊन तू माझ्याकडे यावस, असं मला वाटत होतं. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आज मला जे हवं होतं आणि जे तुझ्या हक्काचं होतं ते आपल्या दोघांनाही मिळालय. आज मी खूप आनंदात आहे."

पुन्हा एकदा मला छातीशी कवटाळून मी त्याला म्हणाले, "आज खूप मोठा मळप दूर झाला. आणि एक निरभ्र मोकळं आकाश समोर आहे. आपण पाच जण छान राहू, पण मला सोडून परत कुठेही जायचं नाही."

त्यावर तो जोरात हसला आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

 

-सौ. मृणाल गोसावी

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

Post a Comment

0 Comments