असाही अनोखा मधुचंद्र
रोहिणी संतोष गभाले.
शर्विलने त्याच्या खोलीत जसे पाऊल टाकले तसे गुलाब
मोगरा चा सुगंध त्याच्या नाकात शिरला आपोआप त्याच्या ओठांवर हसू उमटले. त्याची नजर
पलंगावर बसलेल्या नदिंनीवर गेली. दरवाजाला कडी लावून तो हळूहळू पलंगाजवळ गेला. त्याची
चाहुल लागताच तिची धडधड दुपटीने वाढली. तो तिच्या बाजूला बसला. काय बोलावे? हे मात्र
त्यालाही सुचत नव्हते. त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावर असलेला पदर बाजूला केला. तिने
डोळे मिटून घेतलेले पण तिला सजलेल पाहुन तो अगदी शहारला.
शर्विल आणि नंदिनी दोघांच ठरवून झालेलं लग्न. इतर
लोकांसारखा कांदेपोहे कार्यक्रम, होकार आणि नंतर लग्न पण दोघांमध्ये बराच फरक होता.
शर्विल पुण्यासारख्या ठिकाणी मोठा झालेला. आई, वडील एक मोठी बहीण असा परिवार. बहिणी
च लग्न झालेलं तिही चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती तसचं शर्विलनेही इंजिनीयरींग
केलेलं आणि आता तो चांगल्या कंपनीत नोकरीला होता त्याउलट नंदिनी गावात शिकलेली ते ही
फक्त बारावी. शिवणकाम करायची तेवढीच काय ती घरातून तिला मिळालेली सहमती. आई, वडील आणि
त्या तीन बहिणी. नंदिनी त्यात मोठी होती त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचं लवकर लग्न करण्याचा
निर्णयच घेतला होता. एका लग्नात शर्विलच्या बहिणीने तिला पाहिलं आणि ती तिच्या मनातच
बसली . शर्विलचा अगोदर ठाम नकार होता. एक तर ती कमी शिकलेली त्यात गावात राहिलेली त्याला
नकोच होत ते स्थळ पण त्याच्या बहिणीच्या हट्टापुढे त्याच काहीच चाललं नाही आणि मुलगी
बघायला हरकत काय? हे समजून बघण्यासाठी तो तयार झाला. गावाला त्याचे काका राहायचे. ते
गावात सरपंच होते त्यामुळे त्याच्यां घराण्याच नावही चांगल होत. नंदिनी च्या वडिलांना
शहरातून नंदिनी ला बघायला मुलगा येणार म्हणून धांदल उडालेली. नंदिनीला एवढया लवकर लग्न
करायचं नव्हतं पण तिच्या वडिलांच्या मनाविरूद्ध ही जायचं नव्हतं त्यामुळे जे आहे त्याला
सामोरे जायचे तिने ठरवलं.
शेवटी कांदेपोहे चा कार्यक्रम ठरला. साधसं कौलारू
घर बघून त्यांची परिस्थिती शर्विलच्या लक्षात आली. तसाही नकार दयायचा ठरवून आलेला तो
फक्त वर वर हसून बोलत होता. नंदिनीची आई तिच्या हातात चहा देऊन तिला बाहेर घेऊन आली
तेव्हा तिच्या वर नजर जाताच तो स्तब्धच झाला.
गोरा रंग, कंबरेपर्यंत रुळणारे केस, मेकअपचा लवलेश
ही तिच्या चेहऱ्यावर नव्हता.
"चहा घे." तिला पाहण्यात गुगं असलेल्या
त्याला त्याच्या बहिणी ने हलवून भानावर आणले तसं बिचारा ओशाळला. आई आणि बहिणी ने विचारलेल्या
प्रश्नावर तिची घाबरत आलेली उत्तर आणि तिचा मधूर आवाज त्याच्या कानाला तॄप्त करुन गेला.
घरी गेल्यागेल्या सर्वानुमते पसंती ठरवून लग्न ठरलं.
दोन दिवसाअगोदर लग्नसोहळा गावाला पार पडला.
देवदर्शन आणि सत्यनारायण पार पडून दोघंही नंदिनीच्या घरीही जाऊन आलेले. दोघांमध्ये
बोलणं असं झालचं नव्हतं. नंदिनी थोडीशी घाबरलेली, दबलेली वाटली त्याला. आज त्याच्या
बहिणी ने खासकरून शर्विल साठी रुम सजवलेली. आज दोघांची मधुचंद्राची रात्र होती.
तिच्या बांगडयांच्या आवाजाने तो भानावर आला.
"आपलं बोलणे झालं नाही ना. " काही तरी
सुरुवात करावी तसं तो बोलला पण ती मात्र अजूनही बुजलेल्या सारखी बसलेली. नवविवाहित
वरासारखं तो ही आसुसलेला तिला मिठीत घ्यायला. तिचा शरीराचा सुगंध मनात साठवायला. हळूच
तो तिच्या जवळ सरकला आणि तिचा हनुवटी ला वर करत तिचा चेहरा वर केला . भितीने तिने गिळलेला
आवंढा बघून तो अजूनच भान हरपून गेला. तिचे थरथरणारे ओठ जसं त्याला सादच घालत होते.
तो तिच्या ओठांच्या दिशेने झुकला तोच त्याला तिच्या कपाळावर घाबरुन पडलेली आठी दिसली
तसेच त्याच्या एवढ्या कॄतीने ही ती घामाघूम झालेली. त्याने स्वतः ला सावरलं आणि तिच्या
कपाळावर ओठ टेकवून तो लांब झाला.
तिचे डोळे अजूनही बंदच होते.
"नंदिनी खूप गरम होतं ना? चल जरा बाहेर बसू.
" त्याचा आवाज कानावर पडतात तिने डोळे उघडले. आज पहिल्यांदा ती नजरेसमोर पुर्णपणे
त्याला बघत होती. सकाळी घातलेला मेहंदी कुर्ता अजून अंगावर होता. गोरा रंग, जिममध्ये
जाऊन कसलेले शरीर, उंचपुरा दिसायला तो ही रुबाब दार होता.
"ते... कुणी बघितलं तर? " तिने दबकतच नजर
चोरत विचारलं. मघाशी ओठांवर ओठ न ठेकवता कपाळावर झालेला त्याचा स्पर्श तिच्या अंगावर
रोमांच उभे करायला पुरेसा होता.
"वर नाही येणार कुणी. चल. " एवढं बोलून
तो बाहेर ही गेला . आपल्या मुळे तो रागवला की काय? समजून तिला भिती वाटली. ती पण त्याच्या
मागे आली तर तो मस्त भिंतीला टेकून पाय पसरुन खाली बसलेला .
"इथे बस म्हणजे बाहेर कुणी आलं गेलं तरी त्यांना
आपण दिसणार नाही पण हळू बोलावं लागेल हां.. " हळू आवाजात बाजूला हात दाखवत तो
म्हणाला. थोड अंतर राखून ती त्याच्या बाजूला बसली.
"बोल आता. " शर्विल.
"तुम्ही च बोला . " ती लाजतच म्हणाली.
त्याच्या ओठांवर हसू बघून तिच्या मनाला शांती मिळाली .
"खर सांगू का? मला तुझ्या शी लग्नच करायचं नव्हतं.
" शर्विल.
"काय? " आश्चर्याने तिने त्याच्याकडे पाहिलं.
"असं बघून बोल ना माझ्या कडे. " शर्विल
हसतच म्हणाला.
"अहो .. " तिने लगेच नजर चोरली.
"खरचं नव्हतं करायचं लग्न. " शर्विल पुन्हा
म्हणाला तसं डोळे भरुन तिने त्याच्याकडे पाहिलं.
"तुला बघितलं नव्हतं तेव्हा पण तुला बघितलं
आणि नकारचं देता नाही आला. " शर्विलने अलगद तिच्या डोळयातून आलेले अश्रू पुसले.
"मी गावात राहिलेली आहे म्हणून? " नंदिनी.
"नाही माहित पण मी आनंदी आहे आज तुझ्या सोबत
. " शर्विल. ती तिच्या पदराशी चाळा करत खुदकन हसली.
"मी एक विचारु? " शर्विल . तिने होकारार्थी
मान हलवली.
"तू मी बघायला आलो तेव्हा नजर वर करुन पाहिलं
नाही. बाकी कधी सगळयांसोबत भेटलो तेव्हा ही पाहिलं नाही मग होकार कसा दिला?
" शर्विलने तिला विचारलं.
"ताईंनी तुमचा फोटो दिला होता. " नंदिनी
लाजत उत्तरली.
"मग फोटोत चांगला दिसतो? का असा? " शर्विल.
"दोन्ही ही . " नंदिनी.
"ए नंदिनी बघून बोल ना यार. आज मनसोक्त गप्पा
मारुया अगोदर मला कपडे बदलून येऊ दे. तू बस. " एवढं बोलून पटकन तो उठून आतही गेला.
ती मात्र त्याच्या एवढया मोकळेपणाने वागण्याचा विचार करत होती. मघाशी घाबरलेली तिची
भिती काहीशी कमी झालेली.
"हुशशश् आता मोकळं वाटतयं. अगं तू काय एवढे
दागिने आणि जड साडी घातली आहे . जा तू ही साडी बदल. " तिच्या बाजूला बसत तो म्हणाला
तसं ती भानावर आली.
"मी.... मी जाऊ? " गोंधळून तिने विचारलं.
त्याने होकारार्थी मान हलवली.
"एक मिनिट. " ती उठणार की त्याने तिचा
हात पकडला. दचकून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने अलगद तिच्या गळयातलं काढून दिलं.
तिच्या कानातले काढले. त्याच्या होणाऱ्या बोटांचा स्पर्श होताच तिचा रोम रोम शहारुन
येत होता.
"घे. तुझं अर्ध काम तर झालं. जा साडी बदल."
शर्विल हसत तिला म्हणाला. ती श्वास सोडत आत निघून गेली.
"हे काय साडीच? " तिला पुन्हा साडी नेसून
आलेलं पाहून त्याने विचारल.
"हो साडीच आहेत माझ्या कडे. " ती त्याच्या
बाजूला बसली आता दोघांमध्ये अंतर कमी होत.
"बरं आपण पुण्यात गेलो की ड्रेस घेऊया.
" शर्विल.
"अहो नको आईंना नाही आवडणार. " नंदिनी
घाबरत म्हणाली.
"मी आहे कुणी काही बोलणार नाही आणि आई काहीच
नाही बोलणार. " शर्विल तिला समजावत म्हणाला.
"एक विचारु? " नंदिनी.
"बोल. " शर्विल. तिला कसं बोलावं कळतं
नव्हतं.
"बोल ना. " शर्विल.
"ते आज... " तिला बोलायला ही लाज वाटत
होती.
"आपली पहिली राञ. " त्याने तिचं वाक्य
पुर्ण केलं.
"तू तयार आहेस का? " शर्विलने तिला विचारलं.
"असं काही नाही. " तिने नजर चोरतच उत्तर
दिलं.
"वेडाबाई, इतर मुलांसारखा मी ही उतावीळ होतो
पण मी जवळ येताच तुला दरदरून फुटलेला घाम, तुझी घाबरलेली अवस्था बघून कळलं तू तर तयारच
नाही. " शर्विलने हसत तिला सांगितलं.
"तसं नाही ओ. " नंदिनी.
"मग तू तयार आहेस? " शर्विलने मुद्दाम
तिला छेडत विचारलं.
"नका ना शब्दात अडकवू. " ती वैतागत म्हणाली
. विषय निघाला तरी तिची धडधड वाढलेली.
"बरं बोल. " तो हसतच म्हणाला.
"नक्की म्हणजे तुम्ही गैरसमज नाही ना करुन घेणार?
" नंदिनी.
"बोल बाबा. " तो थोडं अजून तिच्या बाजूला
सरकला. दोघांना एकमेकांच्या खांदयाचा स्पर्श होत होता.
"माझी एकच मैत्रीण आहे. काही महिन्यांपूर्वी
च तिचं लग्न झालं. आपलं लग्न ठरलं तेव्हा तिने मला सांगितलं." ती म्हणाली तसा
तो सावध झाला.
"काय सांगितलं? " शर्विल.
"तिला झालेला ञास आणि... " नंदिनी गप्प
झाली.
"भाऊजींनीही तिला समजून नाही घेतलं. "
मान खाली घालून तिने त्याला सांगितलं.
"हे बघ नंदिनी सगळयांचे स्वभाव सारखे नसतात.
माझ्या मते विचारशील तर लग्न शरीरापेक्षा मनाने जुळलेले नातं असतं. सगळ्या दांम्पत्यांना
शरिरसुखाच आकर्षण असतं आणि काही अंशी त्यामुळे नातं ही घट्ट होत पण ते तेव्हा होत जेव्हा
दोघं मनाने एकमेकांजवळ येतात आणि तू ञासाबद्दल बोलत होतीस तो साहजिक थोडाफार होईल
. माझ्या बाजूने तो होऊ न देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल पण कधीही आपल्यात संबंध येतील
ते तुझ्या स्वखुशीने. " तो तिचा हात हातात घेत म्हणाला. ती मात्र एकटक त्याला
न्याहाळत होती.
"काय गं प्रेमात पडली की काय? " हसत त्याने
तिच्या डोळयांसमोरुन हात फिरवला.
"अहो, काही ही बोलता तुम्ही." ती खूपच
गोड लाजली.
"मी तर पडलो बुवा तुझ्या प्रेमात. " तो
तिचं ते लाजणं पाहुन म्हणाला. ती मात्र त्यावर खळखळून हसू लागली. त्याने तिच्या तोडांवर
हात ठेवला.
"अगं हळू. खाली आवाज जाईल ना. " शर्विल.
ती शांत होत त्याच्या डोळयात पाहु लागली.
"मी खूप सौभाग्यशाली आहे. " त्याच्या हाताला
विळखा घालत तिने त्याच्या खांदयावर डोकं टेकवलं.
"ते का? " अलगद त्याने तिच्या केसांवर
ओठ टेकवले.
"तुमच्या सारखा समजूतदार नवरा मला देवाने पदरात
दिला. " नंदिनी.
"ए पदरात काय? तुझ्या पदरात मी मावेल का? आपलं
मुलं मावेल हा.. " खटयाळ हसत तो म्हणाला .
"अहो.. " ती लाजून त्याच्या मिठीत शिरली.
आपोआप मिठीत आलेल्या तिला कितीतरी वेळ तो कुरवाळत होता. ती ही त्याच्या मिठीत शांत
पडून होती. एक सुरक्षितता, समाधान मिळालं होत तिला त्याच्या मिठीत.
"नंदिनी लग्नात आपण वचन दिलं आहे एकमेकांना
आनंदी ठेवायचं. एकमेकांच सुख:दुख: वाटायचं तर कायम लक्षात ठेव आपण तसचं वागायचं. हसत
खेळत,भांडत संसार करायचा. भांडण ही महत्त्वाची असतात हा त्याने प्रेम अजून च वाढतं
जातं. नंदिनी आपलं ही प्रेम.. " ती काहीच बोलत नाही म्हणून त्याने खाली पाहिलं
तर त्याच्या कुरवाळण्याने ती झोपून ही गेलेली.
"झोपली ही." त्याला हसूच आलं. अंधारात
तिच्या चेहऱ्यावर आलेला चंद्र प्रकाशात तिचा चेहरा अजून सुदंर दिसत होता.
घाई न करता वेळीच तिला समजून स्वतःला सावरल्याचं समाधान त्याला मिळालं होतं आणि तिचा
खर्या अर्थाने त्याच्यावर विश्वास बसला होता. तिच्यातला अवघडलेपणा आपोआप दुर झालेला.
"किती सुंदर आहेस तू आणि निरागस ही. हा निरागसपणा
जपायची जबाबदारी आजपासून माझी. " तिच्या कपाळावर ओठ टेकवत त्याने तिला हळूच उचलून
घेतलं आणि आत घेऊन आला. तो तिला बेडवर ठेवून दुर होणार की तिने त्याचा हात पकडला.
"काय?" भुवया उडवत हसत त्याने तिच्याकडे
पाहिलं.
"मी... मी तयार आहे. " गालात हसत थोड लाजत
ती म्हणाली. तो हसत तिच्याजवळ आला आणि तिच्यावर झुकला.
"माहिती आहे पण डोळयावर झोप बघ. आपण उदया आपल्या
घरी जातो आहे मग परवा फिरायला जाऊ तेव्हा. " तिच्या गालावर रुळणारी बट बाजूला
करत तो म्हणाला.
"तुम्ही नक्की नाराज नाही झालात ना? "
नंदिनीला अजूनही तो तिच्यामुळे दुखावला तर नसेल ना? असेच वाटत होते.
त्याने नकारार्थी मान हलवत अलगद तिच्या ओठांवर ओठ
टेकवले. न घाबरता तिचेही हात त्याच्या मानेभोवती गुंफले गेले. काही क्षणाने तो विलग
झाला. ती डोळे मिटुनच होती पण आता ओठांवर गोड हसू होतं.
"हे आपल्या मधुचंद्राच तुझ्याकडून मिळालेल
गिफ्ट. सगळयात सुंदर. " तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला. डोळे उघडून त्याच्या
डोळयात बघत ती त्याच्या मिठीत शिरली.
समाप्त.
रोहिणी संतोष गभाले.
disclaiimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box