गोडी अपुर्णतेची (प्रेमकथा)
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
‘‘निनाद, लग्नाला जाणार नाहीस?’’ आईने विचारलंच. सकाळपासून खरं तर निनाद आईच्या समोर यायचं टाळत होता. कारण तिला त्याच्या मनातलं कळल्याशिवाय राहिलं नसतं. तसंही तिने खूप प्रयत्न केले होते, पण निनाद आपल्या निश्चयापासून ढळला नव्हता. तो आपल्या तत्त्वाशी ठाम होता.
‘‘नाही, ग आई, आज कंपनीत महत्त्वाची मिटींग आहे. मला गेलंच पाहिजे.’’ त्याने आईला आपलं तोंड न दाखवताच, आवाजातला कातरपणा न जाणवू देताच उत्तर दिलं. पण आईची ती. ती त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि म्हणाली,
‘‘वृंदापेक्षा महत्त्वाचं?’’ आईच्या या प्रश्नाने मात्र निनादला आपले अश्रू आवरले नाहीत. ‘‘आई’’ म्हणून तो आईच्या कुशीत शिरला आणि दहा मिनिटं रडत राहिला. आईने त्याला थोपटले. तुझी घालमेल मला कळत आहे, पण तू लग्नाला जावंस असं मला वाटतं. वृंदा वाट बघत असेल. बाकी तुझं तू ठरव.’’
‘‘आई, माझी इच्छा नाहीये ग जायची. ’’ निनाद
म्हणाला.
‘‘सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नसतात निनाद. तसं असतं तर..’’ आई म्हणाली. खरं तर तीही मनातून खूप दु:खी होती, आपल्यामुळे, आपल्या परिस्थितीमुळे असे विचारही तिच्या मनात येत होते, पण ती तरी काय करणार होती. ती म्हणाली, ‘‘चल मीही येते बरोबर आपण मिळून जाऊ. तयार हो पटकन.’’
निनाद आणि त्याची आई कार्यालयात पोहोचताच वृंदाला आणि तिच्या आईला भेटायला गेले. खरंतर वृंदा आणि तिची आई निनादची वाटच पाहात होती. कारण कालपर्यंत निनाद लग्नघरात राबत होता, सगळं काम करत होता. कुठची वस्तू कुठे ठेवली आहे हे निनाद इतकं कोणालाच माहीत नव्हतं. अगदी पु. ल. देशपांडेंचा नारायण झाला होता निनाद आणि आज मात्र त्याचा पत्ताच नव्हता.
‘‘निनाद, अरे कुठे होतास तू? किती कामं राहिली आहेत, सकाळपासून सगळी विचारत होती, ‘निनाद, कुठे आहे?’’ वृंदाची आई म्हणाली.
‘‘मावशी, एक महत्त्वाचं काम होतं.’’ म्हणत निनाद वृंदाकडे वळला. वधूवेशातल्या वृंदाकडे निनाद पाहातच राहिला आणि त्याला एकदम भरून आलं. तिथल्या तिथे सारं सोडून पळून जावं असं त्याला वाटू लागलं. निनादला पाहताच वृंदा मात्र त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात हातात धरून म्हणाली, ‘‘अरे, कुठे होतास तू? सांग बरं मी कशी दिसते?’’
‘‘खूप छान वृंदा, खूप छान. इतकी की...’’
‘‘इतकी की काय? पुढे सांग ना?’’
‘‘इतकी की आज एका माणसाचे डोळे दिपून जाणारेत.’’ असं म्हणून तो हसला. ‘‘चल काहीतरीच,’’ म्हणत गोड हसून वृंदा लाजून चूर झाली. तिचे ते हावभाव बघतच राहावे असे त्याला वाटत होतं, पण सत्याची जाणीव होताच त्याचे डोळे भरून येऊ लागले. मग मनाचा निग्रह करून, डोळ्यांतील पाणी मागे सारून कामाला लागला. नंतर जणू त्याने सर्व मांडवावर कमांड घेतली. सगळी कामं सटासट मार्गी लावली. लग्न यथासांग पार पाडलं. वृंदा सासरी जायला निघाली. निनाद तिथेच उभा होता.
वृंदाचा नवरा निनादकडे बघून म्हणाला, ‘‘किती
राबला हो तुम्ही या लग्नासाठी!’’
‘‘हो मैत्रिणीसाठी इतकं करायलाच हवं.’’ निनाद म्हणाला. असं निनादने म्हणताच तिच्या नवर्याने त्याच्याकडे हसून पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आजपासून आपली तिघांची मैत्री मलाही तुमच्या मैत्रीत सामील करून घ्या. निनाद हसला आणि त्याने तिच्या नवर्याच्या हातात प्रेमाने हात दिला. निनाद आणि त्याची आई आपल्या गाडीतून परत आली आणि आता आईने निनादला एकटं सोडलं. निनाद त्याच्या आवडत्या जागेवर म्हणजे त्याच्या खोलीतल्या गच्चीत जाऊन बसला आणि त्याला हळूहळू एकेक गोष्टी आठवू लागल्या. आईच्या मैत्रिणीची मुलगी वृंदा, जणू रोजचंच जाणं येणं झालं होतं तिचं आपल्या घरात. आपल्यापेक्षा एक 2-3 महिन्यांनी लहान असेल ती. शाळा मात्र वेगळ्या होत्या. वृंदा गर्ल्स हायस्कूल इंग्रजी माध्यमात शिकत होती, तर आपण मराठी माध्यमात.
शाळा जरी वेगळ्या असल्या तरी जाण्या-येण्याचा मार्ग एकच होता त्यामुळे ते दोघं आणि ओळखीतली बरीच मुलं बरोबरच जात येत असत. शाळेत जाताना भरपूर मस्ती, दंगा करत असत. एकदा शाळेतून घरी येताना सर्व मुलांनी धावण्याची शर्यत लावली. खरंतर निनाद पुढे होता, पण अचानक त्याच्या लक्षात आलं की, वृंदा कुठेच दिसत नाहीये. तो तसाच मागे आला तर वृंदा रडत खाली बसली होती. पळता पळता तिचा पाय एका दगडाला अडकून ती पडली होती. निनादने तिचे डोळे पुसले, तिला आधार दिला आणि तिला तो घरी घेऊन गेला. वृंदाला वाईट वाटत होतं, तिला ती पडल्याचं दु:ख नव्हतं, पण आपल्यामुळे निनादचा शर्यतीतला पहिला नंबर हुकला म्हणून तिला वाईट वाटत होतं. अत्ता ती घटना आठवताना निनादला वाईट वाटलं,
तो मनात म्हणाला, ‘‘आयुष्यात असं खूप काही राहून जातं नाही, पण तेव्हा आपण हरलो त्याचं त्याला तेव्हाही वाईट वाटलं नव्हतं आणि आत्ताही. कारण वृंदाला आपली गरज असताना तिला सोडून नंबर काढण्यात त्याला काहीच स्वारस्य नव्हते. वृंदाचा आनंद हाच त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. तेव्हाही आणि आजही. एकदा वृंदाच्या वाढदिवसाला तो गेला नव्हता निनाद येत नाही तोपर्यंत केक कापणार नाही, म्हणून लहान वृंदा हटून बसली होती. निनादच्या आईने त्याला न जाण्याचे कारण विचारताच निनाद म्हणाला, ‘‘तिथे सगळी मोठी मोठी लोकं असतात, मला कसंतरी वाटतं.’’
तेव्हा आईने त्याला समजावलं होतं, ‘अरे वृंदा किंवा तिच्या घरच्यांना तू यावं असं वाटतं ना मग जायचं आपण.’ खरं कारण हे होतं की, वृंदाला गिफ्ट द्यायला त्याच्याकडे काहीच नव्हतं. सूज्ञ आईने ते ओळखले आणि एक छानसे कानातले त्याच्या हातात ठेवले. ते गिफ्ट बघून निनादला आनंद झाला आणि तो उड्या मारतच वाढदिवसाला गेला. त्याने दिलेले कानातले बघून वृंदा खूश झाली आणि लगेच केकही कापला. कितीतरी दिवस ती ते कानातले अगदी आवडीने घालत होती. आणि त्यातच निनाद खूश होता. हळूहळू निनाद आणि वृंदा मोठी होत गेली, त्यांची मैत्री आणखीनच गाढ होत चालली. अनेक मित्र-मैत्रिणी त्यांच्या आयुष्यात येत गेले. पण या दोघांची मैत्री तुटली नाही. दोघांनाही एकमेकांच्या सर्व गोष्टी माहीत असत. कधी कॉलेज चुकवून कोण पिक्चरला गेलं, तर कोणी कुठे सारी गुपितं एकमेकांना सांगत असत. फक्त निनादने वृंदाच्या प्रेमाचं गुपीत मात्रं मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी दडपून ठेवलं होतं. कालांतराने दोघांचीही शिक्षणं पूर्ण झाली होती.
निनादचे वडील तो लहान असतानाच वारले होते. आई एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होती. त्यामुळे आईच्या एकटीच्या पगारात जे आपल्याला परवडेल, सोसेल तेवढेच आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे वागत होतो. निनादने डिग्री घेतली आणि तो एका कंपनीत अत्ता नोकरीला लागला. खरं तर अजून खूप शिकावे अशी त्याची इच्छा होती, पण परिस्थितीमुळे त्याने माघार घेतली.
एक-दोन वेळा निनादला वाटलं होतं की, तिच्याविषयी आपल्याला वाटणारं प्रेम व्यक्त करावं, पण परत निनाद असा विचार करायचा की,आपली परिस्थिती आणि वृंदाची परिस्थिती यात जमीन-आस्मानाचे अंतर आहे, कशाला तिला या दु:खात लोटा. वृंदा आणि त्याची मैत्री मात्रं घट्ट होती. ती त्याला सर्व काही सांगत असे. तिचं ते अवखळ, अल्लड वागणं निनादला खूप आवडे, तिचं खळखळून हसणं त्याच्या मनाला हळूवार फुंकर घालत असे. एकदा वृंदा येऊन गेल्यावर प्रफुल्लित झालेल्या निनादला त्याची आई म्हणाली, ‘‘निनाद, आवडते ना तुला वृंदा, मग घालुया का मागणी?’’
‘‘आई, काहीही काय? वृंदा मला आवडते हे खरं आहे, पण तिला उगाच हे असले भलते सलते प्रश्न विचारून मी पेचात पाडू इच्छित नाही.’’
खरं तर आईने निनादला समजवायचा खूप प्रयत्न केला होता, की असं काही नसतं, तिला होकार द्यावासा वाटला तर देईल पण ती, पण निनादच्या हट्टापुढे तिचं काही चाललं नाही. तो म्हणाला, ‘‘आई, मी वृंदावर प्रेम करतो, तिला आनंदी पाहू इच्छितो, आपली पण परिस्थिती सुधारेल, नाही म्हणत नाही मी. पण त्याला अजून थोडा काळ जावा लागेल. अत्ता तिच्या मनात असलेली नव्याची नवलाई, हौस-मौज या गोष्टी आपण तिच्यासाठी देऊ शकत नाही आणि जर तिच्या मनात माझ्याविषयी एक हळवा कोपरा प्रेमाच्या दृष्टीने असता, तिने तसं मला सांगितलं असतं तर मी तिला अजून थोडे दिवस थांब असं नक्की सांगितलं असतं, पण तिच्या मनात अत्ता लग्न, प्रेम त्याची आतुरता आहे तर मी तिला माझ्या बंधनात अडकवू शकत नाही,
कदाचित मी तिला विचारलं असतं तर मला दुखवायला नको म्हणून तिने होकारही होता, पण मला तसं नको होतं. माझं तिच्यावर प्रेम आहे, राहीलच. आणि कधीतरी अपुर्णातही एक वेगळीच गोडी असते आई.’’ यावर आई गप्प बसली होती.
वृंदा ही अभ्यासात तशी हुशार होती, पण परिस्थिती अतिशय उत्तम असल्याने आणि तिला नोकरीची वगैरे आवड नसल्याने तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि अगदी काही दिवसांतच तिच्या लग्नाचा योगही अनपेक्षितरित्या जुळून आला. वडिलांच्या मित्राच्या मुलाचे उत्तम स्थळ तिच्यासाठी आले त्यांनी आपणहून तिला मागणी घातली आणि तिचं लग्न ठरलं पण. निनादला बसलेला हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून तो कसबसा सावरला. इलाजच नव्हता. कारण तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची नाही हा त्याचाच तर हट्ट होता. निनादला या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्याने उगाचंच हातात घेतलेलं पुस्तक अर्धवट मिटून घेतलं आणि आता मनोमन निश्चय केला की यापुढे वृंदाचा विचार बंद करून टाकायचा. वृंदा हे प्रकरण या दृष्टीने बंद करायचं.
****
दुसर्या दिवसापासून तो आपल्या उद्योगाला लागला आता त्याला काही महिन्यांतच आत्ताची नोकरी सोडून अजून पुढचं शिक्षण घ्यायचं होतं त्यासाठीची बेगमी अत्ताच करून ठेवायची होती. त्यासाठी त्याने नोकरीचा राजीनामाही तयार ठेवला होता. तो आपल्या कामात इतका बुडून गेला की जणू सर्व जगाचा त्याला विसर पडला. आणि अचानक महिन्यानंतर एका अनोळखी नंबरवरून निनादला फोन आला, ‘‘अरे निनाद, विसरलास की काय आम्हाला?’’
‘‘कोण बोलतंय?’’ निनादने विचारलं.
‘‘म्हणजे तू खरंच विसरलास. घे बोल.’’ असं म्हणत फोन कुणाच्या तरी हातात दिला.
‘‘निनाद, अरे इतके दिवसांत तुला माझी आठवण नाही
का आली?’’
‘‘वृंदा, तू? कशी आहेस? आलात का फिरून?’’
‘‘हो! कालच आलो. मी मस्त आहे, खूप सुखात आहे.’’ तिच्या आवाजात नवथर विवाहितेचा उत्साह जाणवत होता. ‘‘तू कधी येतोस आम्हाला भेटायला?’’
‘‘येईन असाच कधीतरी.’’ निनाद म्हणाला. परत तिच्या नवर्याने तिच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, ‘‘असंच वगैरे काही नाही हा उद्या संध्याकाळी आम्ही मित्रांसाठी मस्त पार्टी ठेवलीय आणि त्यात तू यायचंस. तू आमचा पाहुणचार केलास आता आम्ही बघ तुझी कसा पाहुणचार करतो. मैत्र पार्टी. वृंदा पत्ता पाठवेल तू नक्की ये. आणि हो माझाही नंबर सेव्ह करून ठेव बरं का.’’
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box