#बोलण्याला अर्थ आहे...!!!!
©Velvet Kavisha
प्रसंग १ -------
" ए पक्या, ए पक्या, ए प्रकाश बाबा आमटे"..."
मागच्या पाचसहा मुलांच्या घोळक्यातील मुले, पुढे चालणाऱ्या मुलांमधील एकाला आवाज देत आहेत...
"मा.डॉ. प्रकाश आमटेंचं नाव ऐकून माझी उत्सुकता वाढतेय..."
मी माझ्या चालण्याचा वेग वाढवून त्या घोळक्यापर्यंत पोचलेयं..
" Hi boys"..
"Hi काकू"...
"मला डॉ. प्रकाश आमटे सरांना भेटायचे आहे."
"कोणाला दिसली एवढी महान व्यक्ती???"
माझ्या प्रश्नाने मुले गोंधळली आहेत.
त्यातला एक मुलगा माझ्या बाजूने चालत मला समजवायचा प्रयत्न करतोय.
"काकू, पुढे चार मुले चाललीत ना, त्यात रेड टी-शर्ट घातलेला जयेश आहे आणि त्याच्या पप्पांचं नाव प्रकाश आहे"..
माझ्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह पाहत..
"आम्ही मुलं आमच्या मित्रांना त्यांच्या वडीलांच्या नावाने हाक मारतो नेहमी..."
डोक्यातली तिडीक ओठांवर आलीयं.
"का?"
"तुमच्या मित्रांना नावे नाहीत का?"
स्तब्धता..
"बरं काय चिडवायचे, म्हणायचं ते तुमच्या मित्रांना म्हणा."
"काय वाट लावायची ती तुमच्या मित्राच्या नावाची लावा."
"त्याच्या पप्पांचे मित्र असतीलच ना त्यांच्या नावाची वाट लावायला..??"
(आयला एवढे दिवस कोणी काही बोललं नाही आणि या काकू कुठून उलथल्या मध्येच)
मुलांचा अविर्भाव.
"आणि तुमच्या मित्राच्या प्रकाश नाव असणाऱ्या वडिलांचे असे काय कर्तृत्व आहे की तुम्ही त्यांना एका थोर व्यक्तीचे नाव देताय???..." मी.
" काकू, हे काय त्यांचं कर्तृत्व म्हणजे आमचा ग्रेट मित्र."
"सर याला रोज क्लासच्या बाहेर काढतात."
दुसरा मला सांगतोय.
आता ओठांवर आलेली तिडीक हातांकडे सरकू पाहतेयं.
स्वतःच्या शरीरयष्टीचा अंदाज असल्याने मी कमालीच्या संयमाने शब्दांनाच भरीस घालतेयं...
" अरे कशी रे तुम्ही भावी पिढी..??"
"आमचे पोखरलेले आधारस्तंभ...??"
(माझ्या प्रश्नाने शांतता).
"काय घालायचा तो गोंधळ घाला."
"किमान कर्तृत्ववान व्यक्तींचा अपमान तरी नका रे करू."
माझ्या डोळ्याच्या कडा ओलसर झाल्यात, हतबलता कदाचित चेहऱ्यावर दिसतेयं आणि राग शब्दांत काढून झालायं.
यांना काही बोलण्यात अर्थ नाही अशी समजूत घालत पुढे निघालेयं.
वीसपंचवीस पावले चालत पुढे आलेयं इतक्यात...
" काकू~ काकू, थांबा जरा."
"सॉरी..खरचं आमच्या सर्वांकडून."
मी थांबून सगळ्यांकडे पाहतेयं.
मी निघालेयं ...
डोळ्यातील पाण्यासहीत स्मितहास्य करत...
त्या सिकंदरासारखं....
"it's ok" न म्हणताच...
मुलांना थोडा विचार करत राहू देत.
कारण आता मला कळलयं बोलण्याला अर्थ आहे फक्त योग्य बोललं पाहिजे...
प्रसंग २------
" अग काय करतेस तु ..???"
"जशी असशील तशी माझ्या घरी ये." प्रिया.
"अग हो प्रिया..! "
"मी येते घरी पण काय झालं ते सांगशील का?" मी.
"नाही."
"मला असं नाही सांगता येणार."
"माझं मलाच काही कळत नाहीयं."
"तु ये ना लगेच." प्रिया
"ओके, येते मी."
मी निघालेय पण विचारचक्र सुरु आहे.
प्रिया माझी जवळची मैत्रीण.
खुप घट्ट मैत्री आहे आमची.
प्रियाचा मोठा मुलगा इंजिनिअरिंग करतोय तर मुलीने बारावीची परीक्षा दिलीय.
नवरा पुण्यात नोकरी करतोय.
शनिवार रविवारी घरी येतो.
त्याचा स्वभाव थोडासा तापट आणि हेकेखोर.
बायकापोरांवर सगळीच बंधने.
माझ्या घरी जायला आणि यायला मात्र त्याची काहीच हरकत नाहीयं.
त्यामुळे प्रियाही माझ्या घरी हक्काने येते जाते.
आज असं काय झालं असेलं??
एवढ्या तातडीने कधी मला बोलावलं नाही प्रियाने.
विचाराच्या तंद्रीतच मी पोचली प्रियाकडे.
दरवाजा उघडताच प्रिया माझ्या गळ्यात पडून रडू लागली.
तिला शांत करत...
"काय झालं ते आता तरी सांगणार आहेस का? "
माझा प्रश्न.
"अग माझी पल्लु ग,"
" काय झालं तिचं ??"
"आता बोल पटपट"
" ती म्हणते, तुम्ही कसले आईबाबा आहात."
"जीवन नकोसं केलय तुम्ही, मला आता suicide करावसं वाटतयं असं म्हणतेय."
"म्हणून तुला बोलावलयं..."
"अशी कशी बोलते ग ही..!"
"रडून रडून हंगामा केला आणि आता आत बसलीय."
"तिला माहित नाहीय, मी तुला बोलावलं ते."
"बरं बघते मी.."
आता वाढलेल्या जबाबदारीसह मी पिल्लूच्या बेडरूमकडे निघालेय.
(प्रियाच्या पल्लुला मी लाडाने पिल्लू म्हणते.)
"Hi माझं पिल्लू!"
"Hi मावशी!"
"पिल्लू तु काय आमरस खाल्लास? "
"नाही??"
" मग डोळे कसे सुजले..??"
"रडलीस...??"
"हो मावशी! "
तिला जवळ घेत...
"का रडलं माझं पिल्लू ??"
"काही नाही ग मावशी."
"कसे आईबाबा आहेत हे..!!"
"मी बारावीला गेले, तरी मम्मी अजून सोडायला येते."
"हा बघ वीस हजारांचा फोन आहे पण यात तुला fb, insta, twitter , whatsapp काही सापडणार नाही."
"माझे phone calls पण रेकॉर्ड होतात."
"माझ्या शाळा कॉलेजच्या मित्रमैत्रिणींनी दहावी बारावीच्या Batch चे ग्रुप बनवलेत."
"त्यात मी कुठेच नाही."
"मी कोणाशीही connect नाही."
"सगळे मिळून काही ना काही धमाल करत असतात."
"पण मला कोणी सांगतही नाहीत."
"out dated म्हणतात मला सगळे."
"आज परीक्षा संपली म्हणून सगळ्यांनी पार्टी ठेवली तर ही मम्मी मला सोडायला आली."
"बरं सोडायला आली ते ठीक तर पुन्हा घ्यायला आली."
"माझे सगळे friends हसत होते मला."
"आता यापुढे पल्लवीला पार्टीला बोलवायला नको."
"ती तिचा CCTV camera घेऊन फिरते असं म्हणतात."
(मी प्रियाकडे प्रश्नार्थक पाहिलं. काय करू ग मी तरी? तुला माहिती आहे ना यांचा स्वभाव असचं ती मला नजरेने सांगत होती.)
"आता तुच सांग मावशी, काय करायचं मी."
"Suicide करावसं नाही का वाटणार मला ??"
"माझ्या जागी तु असतीस तर काय केलं असतसं..??"
पिल्लूने मलाच प्रश्न विचारला.
आता मला खुप विचारपुर्वक बोलाव लागणार आहे.
माझ्या बोलण्याला अर्थ असायला हवा नाहीतर सगळाच अनर्थ!!!
" हे बघ पल्लु. तु -- तु आहेस आणि मी-- मी आहे."
"त्यामुळे तुझे आणि माझे विचार वेगळे असू शकतात हे तुला पटत असेल तर बोलते."
"बोलू का...? "
"बोलं."
"अग आम्ही आईबाप धास्तावलेले असतो."
"हल्ली एकतर्फी प्रेम, जवळच्या मित्रांकडून होणारे बलात्कार, खून याविषयीच्या बातम्या ऐकून घाबरून जातो."
"तुझ्यावर खूप विश्वास आहे पण लोकांवर नाही."
"त्यात तुझे पप्पा महिन्यातून आठ दिवस फक्त तुमच्या सोबत असतात."
"तुमच्या काळजी पोटी त्यांनी काही गोष्टींना मनाई केली असेल."
"Fb , insta, whatsapp नसल्यामुळे आपलं काही खुप मोठ्ठ नुकसान होणार आहे का..?"
"आणि तुझ्या मैत्रिणी तरी कशा ग... त्यांनी तुझ्या मम्मीचा respect नको का करायला.."
"त्या जर तुझ्या खरचं मैत्रिणी असत्या तर तुला नक्कीच समजून घेतलं असतं."
"आता suicide करायचं एकदा म्हणालीस, पण मनात कितीतरी वेळा हा विचार येऊन गेला असेल तुझ्या."
"प्रत्येक शब्द हा पहिला मनात तयार होतो मग ओठांवर येतो."
"मी मम्मीला पण समजावून सांगते पण तु यापुढे लक्षात ठेव, जेव्हा कधी तुला मम्मीपप्पामुळे मरावसं वाटेल ना तेव्हा सरळ निघून ये माझ्याकडे."
"पुढे बघेन मी काय करयचं ते..."
"प्रिया आजपासून पल्लुला माझी मुलगी म्हणून सांभाळ."
"पिल्लू, आता तु माझी मुलगी आहेस."
"माझ्या डोक्यावर हात ठेवून वचन दे मला."
"काही झालं तरी वाकडा विचार करणार नाहीस."
"तुला तर माहितीयं - तुझी मावशी जगण्यावर प्रेम करते, मरणावर नाही."
एवढं बोलून मी थांबले.
"सॉरी ग मावशी, चुकलच माझं, मी असं नको होतं वागायला.."
असं म्हणत ती बिलगली मला वेड्या कोकरासारखी
आणि
मी ही माझ्या आताच नव्याने जन्मलेल्या मुलीला घट्ट छातीशी कवटाळत जगण्याची उर्मी देतेय.
आज पुन्हा निघालेयं मी...
डोळ्यातील पाण्यासहीत...
स्मितहास्य करत...
त्या जग जिंकलेल्या सिकंदरासारखी!!!
अर्थातच " it's ok" न म्हणताच....
पिल्लू ला थोडा विचार करत राहू देत.
कारण मला कळलयं आता बोलण्याला अर्थ आहे फक्त योग्य ते बोलले पाहिजे.
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google
✍©️ velvet kavisha
2 Comments
खूप छान लिहिलं आहे... मस्त
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहे... मस्त
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box