प्यार_का_दर्द_है...


प्यार का दर्द है...

© Velvet Kavisha

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "... म्हणून मी सकाळची चालायला जाते. सोबत तीच माझी जिराफासारखी उंच मान आणि भिरभिरणारे डोळे घेऊन. आमच्या एरियात कॉलेज आहे. सकाळीच कॉलेजला जाणारी मुलं-मुली मला दिसतात रोज. या मुलांकडे पाहिलं की समाजातील सगळी रुपं दिसतात आपल्याला.

कॉलेज समोर असणाऱ्या पानाच्या ठेल्यावर  एका सिगारेटवर दुसरी सिगारेट पेटवणारी मुलगी पाहिली की थेट मुंबईच सोफिया कॉलेज आठवत. बावीस वर्षांपूर्वी अशा सिगारेट पिणाऱ्या विद्यार्थीनीं पहिल्यांदा पाहिलेल्या सोफिया कॉलेजच्या परिसरात.  

एका सकाळी अशीच चालायला गेले. अॅक्टिव्हावर चार मुली बसलेल्या. धो धो पावसात भिजत चाललेल्या. रस्त्यावर इतकं पाणी साचलेले. अॅक्टिव्हा फुल स्पीडमध्ये. सरसर पाणी कापत गाडी पळतेय.. चिखलाचं पाणी अंगावर उडतंय. तेवढ्यात गाडी चालवणाऱ्या मुलीने खूप भिजायला होऊ नये म्हणून पाय वर घेतले.

 
आणि गडबड झाली. मागच्या पोरींचा सगळा भार तिच्या वर आला. ती धापकन् सीटवरून खाली, पाय ठेवतो तिथे गॅपमध्ये पडली. नशीब मोठं बलवत्तर की पडता पडता अॅक्सिलेटर नव्हतं ओढलं. पुढची पडली तशी बाकीच्या तिच्या पाठीवर. गाडी कुठल्या कुठे गेलेली. कसाबसा लोकांनी जांगड गुत्ता सोडवला.  

एका सकाळी बाईकवर स्टंट करणाऱ्या एका पोराचा तोल गेला. मागून येणाऱ्या ट्रकखाली पाय सापडला. बापाला फक्त मांडींची हड्डीच दिसली हॉस्पिटलमध्ये. सगळं मांस रस्त्यालाच चिकटून बसलेलं.  

असे बरेच किस्से आहेत सांगण्यासारखे. पण असो...

तर झालं काय.. परवा अशीच निघाले सकाळी चालायला. मी रस्त्याच्या उजवीकडून चाललेले. एका बंद चायनीजच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या बाकावर बसून एक मुलगी रडत होती. खुप ओक्साबोक्शी. नाकातून निघणारा शेंबूड कसाबसा वर ओढणं सुरू होतं. बहुतेक रुमाल विसरली असावी. मी तिच्या जवळ गेले.

"काय ग?? काय झालं ..??" मी तिला रुमाल देत विचारलं. 

तिने मानेनेच "काही नाही" असं सांगितलं...

माझ्या पोटी दोन लेकी.  त्यामुळे कोणीही "मम्मा" म्हणून हाक मारली तरी मी मागे वळून बघतेच. कल्याणात शाळेत जाणाऱ्या एका मुलीच्या लैंगिक शोषणाची केस ताजी होती. किती तरी बलात्काराच्या बातम्या वाचून, ऐकून कसंतरीच होतं. लगेचच माझ्यातलं काळजीवाहू सरकार जागं झालं. आजुबाजुला पाहिलं. एक कुत्रा दिसला पाठमोरा. 

बापरे...!!!  हा कुत्रा चावला की काय हिला. एकदा मला चावलेला.   पहिले म्हणे इंजेक्शन बेंबीत घ्यावे लागायचे. ते ही चौदा. आता पाच इंजेक्शन कमरेवर घेतली की झालं. त्यामुळे इंजेक्शनच इतकं काही नाही पण कुत्र्याच्या दातांच्या व्रणाचा ठणका लागतो. दोन तास नळाच्या धारेखाली धरलंत जखम तरी ठणका थांबत नाही. शेवटी कांदा किसून तो किस लावला जखमेवर तेव्हा कुठे बरं वाटलं... स्वानुभव हो बाकी काही नाही..  

"काय ग, कुत्रा चावला काय तुला?? हल्ली तुम्ही पोरी मोबाईलमध्ये डोकं घालून चालता, रात्रपाळी करून श्वानपथक रस्त्यावर झोपतं. पाय दिलास का ??" आता मी पुर्वीपेक्षा जास्त काळजीने विचारलं.

परत "नकारार्थी" मान.... आणि खुस्सू खुस्सू.. नाकातून आलेल्या शेंबडाने रुमाल भरला. रुमालाकडे पाहिलं, मनात म्हटलं, पोरीचा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. असे छप्पन रूमाल गेले तरी चालतील.

"अग बोल की तोंड उघडून... का वाजवू तुझ्या कानाखाली सणसणीत.???.. तुला काही सांगायचे नाही तर कशाला इथे रस्त्यावर बसलीस रडतं.???" एका पॉईंट नंतर आपली कपॅसिटी संपते रावं..

बा ऽ ऽ स्स हा डोस पोचला... आत्ता मात्र तोंड उघडलं तिने...

"अहो काकू, या कुत्र्याने काही नाही केलं... तो सुरज कुत्रा आहे ना, त्याने वैताग आणलाय..." ती हुंदकाळत बोलली. 

सूरज.. ?? एकदा उगवणाऱ्या प्रेमळ सुर्याकडे पाहिलं मी.. मस्त तांबूस सोनेरी छटा. मुझे तो सुबह के सुरज पर बहोत प्यार आता है..!!  मी सुर्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच्या प्रेमात पडले त्या वेळेपुरती. प्रेम नेहमी आंधळं असतं म्हणतात. पण हल्ली काही जणांचं प्रेम आंधळं मुकं आणि बहिरं असतं म्हणे.. मी त्या सुर्यावरच्या एकतर्फी प्रेमापोटी "वो सुरज क्या..??" असं सुर्याकडे बोटं दाखवत विचारलं.  

बहुतेक तिची सटकली असावी.."काऽऽ की" असं जोरात ओरडली. ओ ऽ ऽ हो..!!!  ही तर प्यारवाली लव्हस्टोरी.. ती पण सकाळी सकाळीच.... 🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ 

मी नॉर्मल मोडला येत, "काय गं झालं??  काही problem आहे का ?? हा सुरज कोण आहे..?? तुला काही त्रास दिला का त्याने..??" विचारलं.

परत मान "नकारार्थी" 

"तुझ्या class मध्ये आहे का तो.?.? तु कोणत्या क्लासमध्ये आहेस???" मी.

"काकू मी TY ला आहे..." ती

"अच्छा. म्हणजे तो कॉलेजमधला नाही. तो job करत असेल ना?.?" मी.

"नाही हो काकू, तो SY ला आहे." ती.

"म्हणजे चौदावीला ना??" मी

"हो"- ती

"तू पंधरावीला ना??" - मी

"हो" - ती

"अरे देवा!! एक वर्षांनी लहान आहे की ग..." मी

"हो ना काकू...!! वयाचं काय हो... अभिषेक -ऐश्वर्या बच्चन, सचिन-अंजली तेंडुलकर यांनी असं लग्न केलयं..." तिने मला समजावून सांगितले.

बापरे...!! किती भारी भारी उदाहरणे आहेत या नवीन पिढीकडे.. आपण खुपचं मागे आहोत जगाच्या... बरं वाटलं तिच्या दृष्टीकोनातून पाहिल्यावर.  

"खुपच समजुतदार आहेस. पण या प्रेमाने रडवत रस्त्यावर आणलं की ग तुला. आता काय झालंय म्हणून रडतेस ??" मी गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात..

"काही नाही हो काकू, माझा सगळ्यात पहिला boyfriend ब्रेकअप झालं तरी अजूनही माझा चांगला मित्र आहे. दुसरा बॉयफ्रेंड समीर ही इंस्टावर आहे. तर हा सुरज संशय घेतो त्यांच्यावरून. मला म्हणतो फेसबुक, व्हॉट्स ॲप, इंस्टा बंद करून टाक. Telegram इंन्स्टाल करून घे फक्त दोघांसाठी.

खुपच डोकं खायला लागला म्हणून काल सगळे अॅप्स् अनइंस्टाॅल केले. तर आता घरी आईबाबा विचारतात.. Whatsapp का बंद आहे म्हणून ?? आणि मलाही इंस्टा शिवाय करमत नाही. म्हणून आज सकाळीच install केले सगळे अॅप्स् परत... तर त्याला राग आला... तेवढंच धरून बसला. त्यावरून भांडला. काही ऐकून घ्यायला ही तयार नाही. वाट्टेल तसं बोलला. म्हणून रडू आलं मला.." माझ्याशी बोलताना ती मेसेजेस टाईप करत होती. 

किती ते मल्टीटास्किंग..!! एकीकडे रडत रडतच माझ्याशी बोलतेय. मध्येच सेल्फी काढतेय. दुसरीकडे मेसेजेस टायपून टाकणं सुरू.... मी माझ्याच विचारात..

"अग तो एक वर्षाने लहान तुझ्यापेक्षा म्हणजे बालबुध्दीच की ग... मुली नेहमी लवकर मोठ्या होतात. समजुतदार आणि हुशार होतात... म्हणून आमचे आईवडील मुलीपेक्षा मुलगा पाच वर्षांनी मोठा पाहायचे. तेव्हा कुठे जाऊन बुद्धी match होते दोघांची... ज्यांनी classmate शी लग्न केलयं त्यांना विचारून बघ... बिचाऱ्या कशा हैराण झाल्यात ते. कठीणच आहे बाई. तुझं वय २१ तर त्याचं कमीतकमी २४/२५ तरी हवं होतं. तुमच्याकडे तर मुद्दलीतच खोट. त्यात हा तुझा सुरज संशयी... काय ग बाई तरी.. आता काय करणार आहेस पुढे.? आईबाबांना माहिती आहे का???" माझ्या डोक्याचा भूग्गा करत मी विचारलं..  

"नाही हो काकू, आईबाबांना कोण सांगतय. हा boyfriend म्हणजे पुढे जाऊन नवरा वगैरे होतं नसतो. याला आता फक्त वर्षभर झेलायचं... College मधून निघालं की मग कोण याला विचारतयं. नंतर थोडा mature मुलगा भेटेलंच की. नाहीतर आईबाबा आहेतच लग्न करून द्यायला.." तिने सांगितल्यावर माझ्या डोक्यात भुसा पेटला..  

माझ्याशी बोलताना तिने बरेच मेसेजेस टाईप केलेले पाहिलेच होते. त्याची उत्तरं आली वाटतं. 

"काकू सुरजचा मेसेज आलाय. निघालाय तो... येईल इतक्यात" तिने सांगितले मला. 

आणि खरचं तो आला हो.. KTM ची Sport Bike घेऊन. ह्या बाईकला मागची सीट का बरं असते हे अजून मला कळलं नाही. कारण बाईकवाला रोड रॅश गेममधल्या रायडरसारखा. अक्षरशः पेट्रोलच्या टाकीवर झोपलेला असतो.  आणि मागच्या सीटवरचा गुढी उभारल्यासारखा ताठ बसून जीव मुठीत घेतलेला.  

 मी सुरजकडे पाहिलं. बाईक पाहिली आणि तिच्याकडे पाहिलं. तिने सॅक पाठीला लावली. मोबाईल जीन्सच्या खिशात ढोसला. स्कार्प काढून तोंडावर बांधला. अर्ध उघडं अर्ध बंद असलेल्या माझ्या तोंडाकडे पाहिलं. माझ्या हातावर थोपटत " take chill pill काकू" म्हणात माझं सांत्वन करत उठून उभी राहिली.  

जाता जाता डोळा मारून म्हणाली, "टेंशन नहीं लेने का काकू... ये प्यार का दर्द है कुछ मीठा मीठा प्यारा प्यारा" आणि त्याच्या मागे बसून निघून गेली. अक्षरशः त्याच्या पाठीवर बसल्यासारखी वाटली हो... 

देवा रे! किती बिनधास्त पिढी ही... पहिला boyfriend मित्र आहे... दुसरा बाॅयफ्रेंड पण मित्रच आहे. तिसरा आहे तो बाळबोध.  तो ही long term नाही. आता इतके बॉयफ्रेंड झालेत करून. हल्ली प्रेमाची प्रसिद्धी करण्याच्या नादात बरेच फोटो, सेल्फी काढलेले असतात... प्रेमाने थबथबलेले मेसेजेस पाठवून झालेले असतील... उद्या या पोरांनी हिच्या विरुद्ध वापरले तर...?? जाऊ दे सकाळी सकाळी डोक्याचं दही झालं. 

छे.. आपल्या काही हे पचनी नाही पडायचं... हाच नवरा सातजन्म मिळावा म्हणून दिवसभर उपवास करून वडाला फेऱ्या मारणारी, समर्पण, त्याग , एकनिष्ठता हे शब्द उराशी घेऊन जगणारी. चुकीच्या स्पर्शानेही अंगभर शिसारी येऊन बादल्याच्या बादल्या डोक्यावर ओतून घेणारी... आमची पिढी. कदाचित या मुलांच्या लेखी मुर्खच किंवा outdated....असो.

भुतदयेपायी तिचं सांत्वन करण्याच्या नादात डोकं भिरभिरवून बसले की हो माझं.... ती निघून गेली तरी मी बाकड्यावरच बसून राहिले विचार करत...  

आता आपलं सांत्वन करायला कोणी यायच्या आत उठून चालायला हवं रावं..... आणि मला पुन्हा डॉक्टरांचे शब्द आठवले " तुमची चरबी वाढलीय.. तुम्हाला चालायला हवं...." 

बाब्बो... !! किती वेळ गेला.. इतका वेळ बसून राहिलेय तर आता चालून कसं चालेल..?? धावायलाच हवं... तेव्हा कुठे वेळ मॅच होईल. आणि पंचवीस नाही तर रोज एकशे पंचवीस मिनिटे चालायला हवं. त्याशिवाय नको तिथे तोंड खुपासयची खोड आणि चरबी झडणारच नाही हो...

जाऊ द्या..  तुम्ही नका लक्ष देऊ...
तुम्ही तुमचं ते नेहमीसारखं करा.... लिखाण आवडलं की कमेंट्स, लाईक आणि follow....

© Velvet Kavisha

Post a Comment

3 Comments

Please do not enter any spam link in the comment box