वाटणी .. भाग 1

 #वाटणी ... भाग 1

 ✍©️जया पाटील

 


विनायकराव एका सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत होते. विजय आणि नितेश अशी दोन संस्कारी मुले आणि सुलक्षणी पत्नी रमा असा त्यांचा चौकोनी सुखी परिवार होता. 


मोठा भाऊ विजयचा लहान भावात म्हणजेच नितेशमध्ये खूप जीव होता. विनायकराव अथवा रमाताई प्रत्येक वेळेस मुलांना खाऊ आणत असत. त्यावेळेस आपल्यातला देखील अर्धा हिस्सा विजय नितेशला देत असे. 


विजयला त्याचे आईबाबा नेहमी सांगत ..


अरे विजू , आम्ही दोघेही तुला आणि नितुला सारखाच खाऊ आणतो तरी देखील तु तुझ्यातला अर्धा खाऊ त्याला का देतोस...? तुझ्या वाट्याचा खाऊ तूच खात जा बेटा ....


विजय सांगायचा .. , आईबाबा नितु माझा धाकटा  भाऊ आहे , माझ्यापेक्षा लहान आहे .. माझा अर्धा खाऊ त्याने खाल्ला त्याने काय असा मोठा फरक पडतो ... मला आनंदच होतो याचा .. त्याचे लाड मोठा भाऊ म्हणुन मी नाही पुरवणार तर आणखीन कोण पुरवेल ?


विनायकराव आणि रमाताईंना विजयच्या या समजदारीचे अप्रूप वाटायचे .. तशीच चिंता देखील वाटायची .. पोराच्या अश्या  साध्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणजे झालं .


हळूहळू वेळ पुढे जात होता. विजय आणि नितेश दोघेही मोठी झाली. विजय ग्रॅजुएशन करून एका छोट्याश्या नोकरीला लागला होता. नितु इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. 


विनायकरावांनी विजयसाठी वधूसंशोधनाला सुरुवात केली. जवळच्या नात्यातील अगदीच साधारण कुटुंबातील पितृप्रेमाला पारखी असलेल्या अनुराधाला त्यांनी विजय साठी पत्नी म्हणुन निवडले. विजय आणि अनुराधाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला. 


अनुराधा अतिशय सद्गुणी आणि मधाळ स्वभावाची होती. लहानपणीच पितृछत्र हरविल्यामुळे विनायकरावांच्या रूपात तिला तिचे वडील पुन्हा गवसले होते. अनुराधा खूप मनापासून विनायकराव आणि रमाताईंची सेवा करत असे. नितेश देखील वहिनीचा खूप लाडका होता. अनुराधाच्या मनमिळाऊ स्वभावावर घरातील सगळेच खूप खुश होते. 


लग्नानंतर काही दिवसांनी ह्रिदयविकाराच्या झटक्यामुळे अनुराधाच्या आईचे निधन झाले. ती पूर्णतः पोरकी झाली परंतु विनायकराव आणि रमाताईंनी तिला तिच्या आईबाबांची कमी कधीच  भासू दिली नाही. घरातील लोकांच्या प्रेमामुळे ती लवकरच तिच्या दुःखातून सावरली. 


विजय आणि अनुराधाच्या संसारवेलीवर नवीन फुल उमलले. उभयतांना एक गोड मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव ' यश 'असे ठेवले. 


नितेशचे देखील इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण झाले. एका मोठ्या कंपनीत त्याला चांगली नोकरी मिळाली. त्याचाही सुशिक्षित आणि चांगल्या नोकरीला असलेल्या साक्षी सोबत विवाह झाला.


साक्षी मात्र अनुराधा इतकी समजदार नव्हती. अनुराधाने आईबाबांचे केलेले काम तिला पुढेपुढे वाटायची. सगळ्यांना घालूनपाडून बोलणे , मनमानी करणे हा तिचा स्वभावच होता. नवीन नवीन नितेश तिला खूप समजवायचा परंतु नंतर मात्र गोड बोलून साक्षीने नितेशला पण स्वतःच्या बाजूने वळवून घेतले.


घरात पैसे खर्च करताना देखील साक्षी कायमच आवरता हात घ्यायची. विजय आणि विनायकराव दोघांच्याही ही गोष्ट लक्षात यायची परंतु घरात वाद नको म्हणुन ते गप्प बसायचे.

 

एक दिवस रमाताईंनी साक्षीकडे घरखर्चाला थोडे पैसे मागितले.तिनेच लगेच रमाताईंसोबत वाद घालायला सुरुवात केली.


साक्षी बोलू लागली ..


आई , तुम्ही नेहमीच घर खर्चाला नितेश आणि माझ्या कडून पैसे मागतात ..? विजय भाऊजींकडून तर तुम्ही कधीच पैसे मागत नाही ...? असा फरक का करतात तुम्ही ...?


रमाताई म्हणाल्या , असे काहीच नाही गं ... साक्षी


तुझा काहीतरी गैरसमज होतोय .. अगं विजय देखील घरासाठी खर्च करतोच गं ..पण तुम्ही दोघेही कमावते आहात , नितेशचा पगार पण चांगला आहे , आणि विजयला पैश्यांची अडचण होती या महिन्यात म्हणून फक्त याच महिन्यात  तुझ्याकडून थोडेसे जास्त पैसे मागितले मी ...


साक्षी पुन्हा बोलु लागली ...


अच्छा , म्हणजे आम्ही दोघेही कमवतो .. म्हणुन मग आम्ही फक्त हा घरखर्च करत बसू...? आम्हाला आमचेही काही आयुष्य आहे की नाही ? आम्हालाही आमचे आयुष्य एन्जॉय करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही लोक आम्हाला काही करू देणार तर ना ...


रमाताईंनी साक्षीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तुझा गैरसमज होतोय असे तिला पुन्हा पुन्हा समजावले परंतु साक्षी मात्र काहीही ऐकायला तयार नव्हती.


तिने खूप वाद करत वेगळे राहायचे ठरवले. नितेशने देखील या बाबतीत तिला साथ दिली. सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी करावी अशी मागणी तिने केली. 


विनायकराव , विजय ,अनुराधा , रमाताई सगळेच या गोष्टीमुळे खूप दुःखी झाले परंतु आता नात्यांमध्ये आणखीन दुरावा नको म्हणुन सगळ्यांनी साक्षीची मागणी मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी करायचे ठरवले.


क्रमश:


वाटणीच्या वेळेस साक्षी आणि नितेश कसे वागतात ? विजय आणि नितेशच्या नात्यात काय बदल घडतील जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. 

उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇

वाटणी .. भाग 2

वाटणी .. भाग 3 (अंतिम)


तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 


Post a Comment

1 Comments

  1. Good to have such siblings. One needs to take care of relations. Nice start.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box