तो, ती आणि बोका



तो, ती, आणि बोका

© Velvet Kavisha

वेळ सकाळी दहा साडेदहाची. पोर्चमध्ये गाडीचं उघडं बोनेट आणि त्यात डोकं घालून असलेला ओणवा तो. कानापासून सुरु होत भोवऱ्याजवळ संपणारी केसांची चंदेरी झालर. शिडशिडीत अंगकाठी.  वयाची साठी पार करूनही खुप ॲक्टीव्ह. स्वतःची कामे स्वतः करण्यावर भर. म्हणूनच आज तो गाडी का बरं कुरकुरतेय हे पाहण्यासाठी केव्हापासून बोनेट उघडून बसलाय.  

सकाळी नाश्ता करून जो पोर्चमध्ये आलाय इतका  वेळ झाला तरी तो तिथेच.  सकाळची कामं थोडीफार आवरून हा अजून कसा आला नाही या विचारात ती.  गुडघ्यात हलकासा कस काढत त्याला पाहायला निघाली.  ती पंचावन्नची. आडवा बांधा. गोल चेहरा. मानेवर रुळणारा "यु कट"चा झुबका. काळ्या ऑरेंज कलरचे केस. त्याच्यासारखी ती ही मेन्टेन. डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा.  

आधी एकत्र कुटुंब. नंतर स्वतःचा वेगळा संसार. दोन मुलांचं प्राथमिक, उच्च शिक्षण. त्यांची लग्न. त्याचं परदेशी स्थायिक होणं. आणि हे सगळे बदल दोघांनी स्विकारलेले.  परदेशात राहण्यासाठी मुलांचा आग्रह. थोडे दिवस जाऊन पाहून आले. पण कायमस्वरुपी राहणं जमणार नाही. आपण भले आपला देश भला. मुलांच्या करिअरचा प्रश्न आहे, त्यांना राहू देत. वर्षातून एकदा दोन महिने राहून आलं की दहा महिने आनंदात जातात.  

रोज विडिओ कॉलवर बोलणं होतं. नातवंडाना पाहता येतं. दूर असले तरी जवळ असल्याचा भास. कधी कधी आठवणी नको करून सोडतात. कधी खुप एकटं वाटतं. मन बंड करून उठतं. डोळे ऐकत नाहीत. त्यांना वाहायचंच असतं. अशावेळी ती त्याला आणि तो तिला सावरतो.  

मुले परदेशात स्थायिक झाली आणि चढत्या वयातला राजाराणीचा संसार नव्याने सुरु झालेला. जबाबदारीतून थोडंस मोकळे झालेले दोघं. तो वयानुसार प्रगल्भ झाला. ती प्रगल्भता त्याला साठीपर्यंत पुरलीय. सगळ्या पार्श्वभूमीवर तिने मात्र स्वतःतलं लहान, खोडकर मुलं तसंच जपलंय जीवापाड. कदाचित तोच खोडकरपणा जगायची नवी उर्मी देतोय तिला. असो....

तर्रर्र - - पावसाळ्याचे दिवस. थोडं सावकाशीने चालत ती पोर्चमध्ये पोचली. कारजवळ जातच होती तोवर तिचं लक्ष कारच्या टपावर शांत बसलेल्या वाघाच्या मावसभावाकडे गेलं. आता हा प्राणी म्हणजे असा आहे ना.. याला किती ही उंचावरून फेका जमिनीवर तो चार पायांवरच दिसतो. अगदीच ठाम.  

झाssssलं. तिच्यातलं लहान मुलं जागं झालं. तिने जवळ जात हळूच बोक्याला हात लावला. बोका बिथरला. त्याने एक टप्पा उडी मारली. ती उडी नेमकी बोनेटमध्ये हरवलेल्या त्याच्या पाठीवर. ती मागेच उभी. अचानकपणे झालेल्या हल्ल्याने तो धडपडला. त्याचा धक्का तिला लागला. सगळं इतक्या अनपेक्षितपणे घडत होतं की तिने स्वतःला सावरायच्या आधी तो जमिनीवर उताणा. त्याच्या धक्क्याने ती त्याच्या डाव्या बाजूला पोटावर पालथी पडलेली. त्याची डावी बाजू तिच्या अंगाखाली. तिचा चेहरा त्याच्या कानाजवळ. ओठ मानेपाशी आलेले. उजवा हात त्याच्या छातीवर. काय सीन आहे यार. रोमॅंटिक वगैरे. "असेच ओठ याच्या मानेवर टेकवले तर..??" असा खट्याळ विचार बाजूला सारून, त्या ही परिस्थितीत ती गालात हसली.

त्याने उजव्या हाताने तिला थोडं दूर करायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मोठाच जांगडगुत्ता झालेला. दोघांनाही कळलं नव्हतं हे नेमकं कसं काय झालंय. उठून उभं राहण्यासाठी "कोणी हात देता का हात" या अवस्थेत असतानाच परमेश्वराने ऐकलंच अगदी.  

गेटमधून नेपाळी गुरखा आत येतांना दिसला. कसले तरी पैसे घेण्यासाठी त्याला बोलावलं होतं. आणि त्यासाठीच तो येत होता. गुरख्याला पाहून ती खुश झाली.  तेवढ्यात गुरखा कल्टी मारून पुन्हा माघारी जाऊ लागला. तिने आवाज दिला पण गुरखा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. "मैं बाद में आता हुं मेमसाब" म्हणत गालावर  मारून घेत निघून गेला.  

"असा काय हा. आवाज देतेय तर यायचं ना.. मुर्ख लेकाचा. जरा उठायला हात दिला असता ते नाही." तिने पुटपुटत, वैतागत त्याच्याकडे पाहिलं. 

"अगं पडलोय किती विचित्र अवस्थेत ते बघ आधी.  त्याने भलताच विचार केलाय आपल्याबद्दल." तो ही वैतागला.  

गुरख्याचा तरी काय दोष. त्याची बायका पोरं नेपाळमध्ये. इथं हा चाकरीला. बोक्याने लादलेली तिची आणि त्याची "रोमँटिक पोझ" त्याला काहीशी झेपलीच नाही. गेटपाशी पोहोचेपर्यंत बडबडत होता. " इ ऐसा सीन तो हमने परसों इंग्लिश शिनेमा में देखा था.... पर इ भारत में रहने वालें इंडियन लोगों का कुछ भरोसा नै। इस उमर में, कार के पिछे, दिन दहाडे, खुलेआम... जय भोलेनाथ, जय शिवशंकर मुझे माफ कर दों, मैंने कुछ नहीं देखा... हम कांsssच्या..."  

"मेल्या, तुला जरा हात काय लावला तू डायरेक्ट त्याच्या पाठीवर उडी मारलीस??? तुझ्या त्या एका उडीने काय झालं ते बघ.." तिने बोक्याला सुनावलं.
 
"अच्छा!! म्हणजे तुझा आगाऊपणा हा.." म्हणत  आपटलेला बोका रागाने गुरगुरत घरात निघून गेला.  

तेवढ्यात पावसाची सर आली. मागच्या अंगणात कपडे वाळत घातलेले. भिजून जायच्या आधी काढायला हवेत. आपटून दुखणाऱ्या गुडघ्याला घेऊन ती मागच्या अंगणात पोचली. रस्सीवरून कपडे खेचले आणि वळली. तेवढ्यात सिताफळाच्या झाडावर बसलेला वाघाचा मावसभाऊ पुन्हा दिसला. आता तर रागचं आलेला त्याचा. तिने झाडाची फांदी जोरात हलवली तशी मस्त पिकलेली दोन सिताफळे खाली पडली. एक डोक्यावर आणि एक खांद्यावर. सिताफळ स्पा झालेली ती आणि वाळलेले कपडे घरात आले. 

छे..... या बोक्याच्या नादात आज खुपचं उद्योग झाले. पडलो ते काय कमी होतं की अजून दोन सिताफळांचा मार लागावा. आंघोळ केली,  सिताफळाने खराब झालेले कपडे धुतले. तो जेऊन कामासाठी बाहेर गेला. हिने आवरून जेऊन घेतलं. 

तो संध्याकाळी घरी आला. त्यालाही लागलेलं. त्याचा राग एव्हाना बऱ्यापैकी मावळलेला. संध्याकाळ ही कण्हत गेली. स्वयंपाक बनवून झाला. दुपारपासून ती गप्पच होती.  तिच्या शांततेने घर खायला उठलं. रोजच्या पेक्षा लवकरच जेवणाची मांडामांड झाली आणि डायनिंग टेबलवर जेवायला बसले दोघेही.  

"एवढे उद्योग झालेत. उद्या गुरख्यासमोर कोणत्या तोंडाने जायचं..??" त्याचं जेवणं होत आलं तसं त्याने विचारलं

"त्याच तोंडाने की, आता गुरख्यासाठी नवीन तोंड कुठून आणायचं..!!" ती सहज बोलून गेली. आणि तो ताडताड झोपायला निघून गेला. तिच्या आगाऊपणाचा त्याला पुन्हा राग आला. 

पुन्हा सगळं आवरून ती बेडरुममध्ये गेली. जिथे खरचटलं होतं तिथे बिटाडीन मलम लावलं. गुडघा मात्र चांगलाच आपटला होता. काळ्या निळ्या झालेल्या दुखणाऱ्या गुडघ्याला तिने आयोडेक्स लावायला घेतलं.  

गाऊन गुडघ्यापर्यंत वर घेतला. हातात आयोडेक्सची डबी घेतली. इतक्यात बाजुला झोपलेला तो उठला. तिच्या हातातून डबी घेतली. डबी उघडून बोटावर आयोडेक्स घेतलं. गुडघ्यावर हळूवार फुंकर मारून  त्यावर हलक्या हाताने आयोडेक्स लावलं.   

"किती लागलंय बघं. का करतेस गं अशा खोड्या??  एवढ्यावरच निभावलं म्हणून ठीक. जास्त काही झालं असतं म्हणजे..?? आता वय झालंय आपलं. जपायला हवं ना. " असं कळवळून म्हणाला.

त्याचा स्वर कातर झालेला. तिने वाकून त्याच्या मानेवर ओठ टेकवले.   मलम लावणाऱ्या त्याच्या हातावर तिच्या डोळ्यांतील पाण्याचे दोन थेंब पडले. कृतज्ञता, काळजी, प्रेम आणि बरंच काही होतं त्या  कृतीमध्ये.... एक मिठी. डोक्यावरुन हलकेच फिरणारे हात. पुन्हा दोघेच दोघांसाठी. 

तेवढ्यात बेडरुमच्या खिडकीवर पुन्हा तोच बोका बाहेरच्या बाजूने बसलेला..... त्यांच्याकडे पाहत..😂😂😂  तिने त्याच्या कानात हळूच सांगितले बोक्याबद्दल. त्यानेही "असू दे गं" म्हणत हाताची पकड थोडी मजबूत केली...

बाब्बो...!! तुम्ही पण ना..🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ गेले का तिकडे लगेच.  चला फिरा मागं. आणि लक्षात ठेवा. कोणाचीही खोड काढा पण बोक्याची नको.. कळ्ळ्ळ्ळलं....?????

©Velvet Kavisha

टीप: शेअर करावंस वाटल्यास नावासहित करा. कॉपी किंवा निनावी नको. तसं आढळल्यास कायदेशीर कारवाईसोबतच बोक्याच्या मावसभावाला नाव सांगण्यात येईल... धन्यवाद.‌!!

Post a Comment

2 Comments

Please do not enter any spam link in the comment box