हे करुन नेमके काय साध्य होते .. ?

हे करून नेमके काय साध्य होते ..?

✍©️जया पाटील 



श्रद्धा एक उच्चशिक्षित सायन्स पोस्टग्रॅज्युएटेड मुलगी. अभ्यासाप्रमाणेच सगळ्याच इतर छंदांमध्ये देखील सर्वगुणसंपन्न अशी तिच्या आईवडिलांची लाडाची लेक. सोज्वळ , सुशील श्रद्धा स्वतंत्र विचारांची असली तरी देखील ती तिच्या आईबाबांच्या मतांचा देखील आदर करणारी होती.


श्रद्धाचे आईवडील दोघेही सुशिक्षित आणि दोघेही चांगल्या पोस्टवर काम करत होते. मोठा भाऊ प्रशांत तो देखील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. थोडक्यात सांगायचे तर अगदी सारेच काही आलबेल असणारे श्रद्धाचे एक सुखी चौकोनी कुटुंब होते.


मुलांचे शिक्षण संपले की प्रत्येक आईवडिलांची चिंता सुरु होते त्यांच्या लग्नाची. कधी एकदा त्यांचे दोनाचे चार हात होतील अशी चिंता त्यांना लागून राहते. अशीच चिंता श्रद्धाच्या आईबाबांना देखील लागून होती. त्यांनी देखील आपल्या लाडक्या लेकीसाठी सुयोग्य अश्या वराच्या संशोधनाला सुरुवात केली होती.


अनेक मुलांचा तपास केल्यानंतर त्यांनी दोन-तीन मुलांना कांदेपोहेच्या कार्यक्रमाला बोलवायचे ठरवले. त्यातून श्रद्धाला जो मुलगा योग्य वाटेल , त्याच्यासोबत बोलून श्रद्धाचे विचार त्याच्या सोबत जुळतील  , तिला मनापासून भावेल अश्या मुलासोबत तिचा विवाह ठरवायचा असे श्रद्धाच्या आईबाबांनी ठरवले.


ठरल्याप्रमाणे श्रद्धाच्या बाबांनी दोन-तीन मुलांना कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले. त्यातलाच एक रोहन नावाचा मुलगा श्रद्धाला खूप आवडला. दोघांच्याही एकदोन भेटी झाल्यानंतर रोहन आणि श्रद्धा दोघांनीही लग्नासाठी होकार कळवला.


लग्न ठरल्यानंतरचे दिवस प्रत्येकाचे आयुष्य  मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे मोहवून टाकणारे असते. श्रद्धा आणि रोहन दोघांचेही आयुष्य अशाच क्षणांनी फुलले होते. एकमेकांसोबत सतत फोनवर बोलणे , वीकएंडला एकमेकांसोबत वेळ घालवणे यात त्या दोघांचा वेळ कसा जात होता दोघांनाही समजत नव्हते. श्रद्धाने तर मनाने संपूर्णपणे रोहनला समर्पित केले होते. ती दोघांच्याही सुंदर भविष्याच्या स्वप्नांत रममाण होती.


श्रद्धा आणि रोहनचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. त्यानंतर काही काळ लोटला आणि मग दोघांच्याही घरी लग्नाची तयारी आणि घाईगडबड सुरु झाली. रोहन आणि श्रद्धाचे आईबाबा आपल्या मुलांचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आतुर होते. 


खरेदी सुद्धा जोरात सुरु झाली होती. पैठण्या , घागरे , दागदागिने सगळ्यांची अगदी रेलचेल सुरु होती. श्रद्धाचे सगळे शॉपिंग अगदीच रोहनच्या आवडीनुसार सुरु होते. रोहनने देखील श्रद्धाला तिच्या आवडीच्या काही वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. रोहन सारखा इतका छान जोडीदार मिळाला , जो मला समजून घेतो , माझ्या आवडीनिवडी इतक्या जीवापाड जपतो म्हणूनच श्रद्धा स्वतःला मनोमन खूप भाग्यवान समजत होती. तिला तिच्या स्वतःच्या सुखाचा हेवा वाटत होता.


कधीतरी मात्र दिसते तसे काहीच नसते. आपण पाहतो तो भ्रम सुद्धा असू शकतो अश्याच काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात , आपल्या जवळचाच व्यक्ती आपल्या आयुष्यात असे काहीतरी वादळ निर्माण करतो की तो बदल स्वीकारणे आपल्यासाठी अतिशय कठीण होऊन बसते तसेच काहीतरी श्रद्धाच्या आयुष्यात देखील घडले.


श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाच्या अर्ध्याच्यावर पत्रिका वाटून होतात. श्रद्धाचा मोठा भाऊ प्रशांत देखील त्याच्या मित्रांना आमंत्रित करण्यासाठी बाहेरगावी जातो. तिथेच नेमका त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो.


हॅलो प्रशांत , अरे आशिष बोलतोय ....तुला एक महत्वाचे काहीतरी सांगायचे आहे. श्रद्धाचे लग्न ज्या मुलासोबत ठरले आहे त्या मुलाचे रिना नावाच्या एका मुलीसोबत अफेयर सुरु आहे. त्या दोघांनाही एकत्र फिरताना मी पाहिले आहे. श्रद्धाचे संपुर्ण आयुष्य खराब होईल तु जरा आणखीन या बाबतीत तपास काढ .... कितीही झाले तरी हा श्रद्धाच्या आयुष्याचा प्रश्न आहे.


अरे आशिष , तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू ..? कदाचित तु जे पाहिले तो गैरसमज असू शकतो. रोहन श्रद्धाची किती काळजी घेतो. आजकाल  मुलगा आणि मुलगी यांची मैत्री असून शकते रे ...त्यात लगेच अशी शंका आपण नाही घेऊ शकत .... प्रशांत 


अरे पण प्रशांत , प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. इतका narrow minded मी पण नाही की फक्त एखाद्या मुलीसोबत दिसला म्हणुन  मी त्याच्यावर असे आरोप लावेल परंतु मी रोहनला त्या मुलीसोबत नात्यांच्या मर्यादा ओलांडताना पाहिलं आहे ....


please , श्रद्धा माझी देखील बहीणच आहे रे ..आणि तिच्या आयुष्याची वाताहत होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे ..बाकी तुझी मर्जी ..


आशिषच्या बोलण्यामुळे प्रशांतच्या मनाची चलबिचल वाढली आणि त्याने या प्रकरणाच्या  खोलात जायचे ठरवले. दोन दिवस प्रशांतने रोहन चा लपूनछपून पाठलाग केला. त्यावेळेस रोहन रिनाला भेटताना प्रशांतने पाहिले. रोहन तिथून गेल्यावर प्रशांतने रिनाला गाठले.


प्रशांतने सुरुवातीला जेव्हा रिनाला तिच्या आणि रोहनच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा तिने काहीही सांगण्यास नकार दिला. प्रशांतच्या प्रश्नांची तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी प्रशांतने पोलिसाची धमकी दिल्यानंतर तिने सगळे काही प्रशांतला सांगितले. 


रिना बोलु लागली ..


सॉरी , मी आणि रोहन दोघेही कॉलेजपासून सोबत आहोत. आमचे दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे पण रोहनच्या आईबाबांना लव्हमॅरेज आवडत नाही आणि त्याची आई हार्ट पेशंट असल्यामुळे तो आमच्या नात्याबद्दल घरी सांगू शकत नव्हता.


त्यामुळे त्याने त्याच्या आईबाबांनी ठरवलेल्या मुलीसोबत अर्थातच श्रद्धा सोबत लग्नाला होकार दिला. तिला आपल्या प्रेमात फसवून सगळ्यांच्याच मनात त्याला चांगले राहायचे होते. लग्न झाल्यावर श्रद्धा चारित्र्यहिन असून ती माझ्यासोबत चांगली वागत नाही असे दर्शवून तो तिला घटस्फोट देणार होता. त्यामुळे  आपण पसंद केलेली मुलगी योग्य निघाली नाही तेव्हा साहजिकच रोहनचे आईबाबा त्याची पसंद मान्य करतील आणि आमच्या दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल असा त्याचा प्लॅन होता.


I am really sorry ...प्रशांत  


रिनाचे बोलणे ऐकून प्रशांतच जागीच थबकला होता. रोहनच्या अश्या वागण्यामुळे त्याचे आईबाबा आणि श्रद्धाचे आईबाबा दोघांनाही खूप मोठा धक्का बसला पण खऱ्या अर्थाने मनाने खचली ती श्रद्धा ...


आपण ज्याच्यावर खूप मनापासून प्रेम केले , सुखी आयुष्य घालवण्याची स्वप्ने पाहिले त्या रोहनने तिला इतका मोठा धोका दिला हे तिला सहनच होते नव्हते. तिला या मानसिक धक्यातून बाहेर पडणे खूप कठीण होते.  


प्रशांत , तिचे आईबाबा सगळेच श्रद्धाला या मानसिक धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत  होते. घरातील सगळ्यांच्या प्रेमाच्या आधारामुळे ती सावरली पण तिचा प्रेमावरचा विश्वास उडाला तो कायमचाच ......


वाचकहो , रोहन सारखे काही व्यक्ती आजही कोणाचीतरी फसवणूक करून खुलेआम फिरत असतात. जेव्हा आपण कोणाचे चांगले करू शकत नाही , त्याला सुख देऊ शकत नाही तर त्यांना दुःख तरी देऊ नये. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यासोबत खेळण्याचा अधिकार रोहनसारख्या व्यक्तींना नेमका दिला तरी कोणी ..? हे करून त्यांना नेमके काय साध्य झाले ... ?


एखाद्या चांगल्या व्यक्तीची फसवणूक करून काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना नेमके काय साध्य होते असेल ..? याबाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. 


तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील



Post a Comment

1 Comments

  1. ताई,छान आहे कथा.
    माझ्या पाहण्यात एक मुलगी आहे. Class 2 officer. Love कम arrange marriage झाले. नवऱ्याचा स्वतःचा auditing चा व्यवसाय आहे. मुलाच्या मातोश्री या नवरा बायकोची बेडरूम सोडायला तयार नाहीत. आणि नवरोबा इतका मूर्ख बायकोला सांगतो की झोपली तर काय झालं माझी आई. इथे तसलं काही करणार आहेस का तु.
    तिने नुकतंच लग्न झालेलं असल्याने वाद वाढवला नाही. पण याचे पुढे भयंकर परिणाम झाले.
    तिची बदली दूरच्या गावी झाली होती. छोट दीड वर्षाच्या बाळाला घेऊन नोकरीच्या गावी एकटं राहणं शक्य होत नव्हत. तिच्या नवऱ्याने ती जिथे नोकरी करत होती त्या गावी व्यवसाय सुरू केला होता.
    तिची बदली झाल्यावर सासू आली पण नवरोबा मातोश्री ना घेऊन परत यांच्या बेडरूम मध्ये. हिचा असा problem की ही नोकरीच्या गावी मुलीला घेऊन जाऊ शकत नव्हती.आईला hall मध्ये झोपायला सांगितल्यावर नवरोबा मातोश्री सोबत hall मध्ये. म्हणे मी तिला सोबत करतो. नवऱ्याच्या बहिणी पण हीच तऱ्हा. नवऱ्याने एक बाहेर प्रकरण पण केले. तर या तिला हसून दाखवायच्या.
    शेवटी तिने सासूला सरळ विचारले की गावाला तू तुझ्या दीर जावे सोबत राहते. तिथे तू त्यांचे रूम मध्ये झोपते का. यावर मातोश्री गावी सुरू झाल्या. नवऱ्याने तिला खूप त्रास दिला. तुझ्या गरजेपुरते लोकांना वापरते वगैरे.
    आता तिचा नवरा सर्व समजावून गप्प आहे. पण आई आणि बहिणी पिच्छा सोडत नाही. काय करायचं तिने. तिचे आई वडील तुझ तू बघ सांगतात.
    तुम्हाला वाटल तर लिहा यावर कथा.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box