मान .. !

 #मान .. !

 ©️जया पाटील 



" ऐका हो ऐका , ऐका हो ऐका 

  शुभमंगल ठरले एकीचे 

  मग परके झाले बाकीचे 

  ही दुनिया असली कसली हो 

  ही मुलगी फसली फसली हो "


  लाला ..लाला ...लाला ...लाला ...


" आली हो आली ही लाली गाली आली हो 

  पण मुलगी परकी झाली हो ...

  धन परक्या घरचे झाली ही ...

  पण आठवण होऊन गेली ही .. "


" सोबत संगत नसेल तेव्हा

  असेल हसणे तिचे इथे 

  कुणास ठाऊक उगाच तिजला 

  शोधत राहू कुठे कुठे .. " 


" ऐका हो ऐका ही नाती गोती खोटी हो 

  एक त्याचेच नाव या ओठी हो ..

  परकेपण आता उरलेले 

  अन दिवसही आमचे फिरलेले .."  


देशमुखांच्या घरातील सगळी भावंडे ईशाला हे गाणे गाऊन छेडण्यात दंग होती कारण कालच ईशाच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला होता.

आणि आज मुलाकडून अर्थातच राजीवच्या घरच्यांकडून ईशाच्या घरी होकार कळविण्यात आला होता. 


राजीवला पहिल्यांदा पाहूनच ईशा त्याच्यावर घायाळ झाली होती. राजीव देखील दिसायला अगदी राजबिंडा , मोठ्या घरातला , चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. थोडक्यात सांगायचे तर सगळेच काही आलबेल होते. इतक्या चांगल्या स्थळाचा आपल्या ईशाला होकार आला म्हणून ईशाच्या घरचे सगळेच खूप खूप खुश होते. सगळ्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता.


लग्न ठरण्याच्या या आनंदात ईशा सगळ्या कार्यक्रमांच्या अर्थातच मेहेंदी , हळदी समारंभ , लग्नविधी , सप्तपदी अशा विविध समारंभाच्या विचारात गढून गेली होती. भविष्यातील स्वप्न तिच्या मनाचा आजच ठाव घेत होती. राजीव आणि तिच्या भावी आयुष्याच्या मोरपंखी स्वप्नांनी ईशाचे मन मोहरून गेले होते.


पुढील बोलणी करण्यासाठी आम्ही योग्य मुहूर्त पाहून लगेच येऊ असे राजीवच्या घरच्यांकडून कळविण्यात आले होते. लेकीच्या लग्नाच्या तयारीत अख्खे देखमुख कुटुंबीय गढून गेले होते.

देखमुखांचे एकत्र कुटुंब. तीन भाऊ आणि त्यांचा सगळा परिवार असा भला मोठा कुटुंब विस्तार होता त्यांचा ...! त्यात ईशा चार भावंडांची एकुलती एक बहीण ..मग तर काही सांगायलाच नको ... ईशा तर सगळ्या कुटुंबाची पंचप्राण होती ... !


आज ईशाला मुलाकडून पसंती आली तरी ईशाच्या आईबाबा , काका काकूंच्या डोळ्यातून  अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. आपली लाडाची लेक ईशा आता कायमची परकी होऊन कुण्या दुसऱ्याच्या घरी निघुन जाणार हा विचारच त्यांना अस्वस्थ करणारा होता. 


पुढील आठवड्यात चांगला मुहूर्त आहे त्यावेळेस नारळाचा कार्यक्रम उरकून टाकू असा राजीवच्या घरच्यांकडून देशमुख कुटुंबियांना निरोप आला.

राजीवच्या बाबांचा ईशाच्या बाबांना फोन आला त्यावेळेस ते सांगू लागले..


" व्याही , अहो आमची ईशाच आमची लक्ष्मी म्हणून देण्या घेण्याचा आम्हाला मोह नाही फक्त नारळाच्या कार्यक्रमाच्या आधी राजीवच्या आई , काकू , मावश्या आणि इतर काही कुटुंबीय ईशाला पाहण्यासाठी येतील त्यांचा तेवढा मानपान व्यवस्थित करा."


" साडी-चोळी , एखाद दुसरी चांदीची वस्तू , त्यांच्या जेवणाची अगदी चांगली व्यवस्था झाली म्हणजे झाले .." 


" बाकी ईशाच आमचीच गृहलक्ष्मी त्यामुळे आम्हाला मोह कसलाच नाही. हा बायकांचा पाहण्याचा कार्यक्रम झाला की नारळसुपारीचा कार्यक्रम उरकून टाकूया. "


सगळेच आईवडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी हवे नको ते करायला तयार असतात. ईशाचे बाबा तरी त्याला अपवाद कसे असणार ..? त्यांनी राजीवकडच्या सगळ्या स्त्रियांचे मानपान करण्याचे मान्य केले. 


दोन दिवसांनी राजीवकडच्या 50 पाहुण्या ईशाला पाहण्यासाठी आल्या. ईशाच्या आईबाबांनी , तिच्या काकाकाकूंनी अर्थातच सगळ्या कुटुंबियांनी त्या सगळ्या पाहुणेमंडळीची अगदी चोख व्यवस्था ठेवली.  


आपल्या मुलीला भविष्यात टोमणे ऐकायला मिळू नये म्हणून सगळ्या गोष्टी अगदी रीतीने पार पाडल्या. आलेल्या प्रत्येक स्त्रीची छान अशा पैठणीसाडी सहित खणानारळाने ओटी भरली. प्रत्येकीला एक-एक चांदीचा कुंकवाचा करंडा भेट म्हणून दिला. आलेल्या स्त्रियांसोबतच्या प्रत्येक छोट्या मुलांना कपडे आणि खाऊ सोबत दिला. खूप थाटामाटात हा मानापानाचा कार्यक्रम पार पडला.


मानपानाचा कार्यक्रम तर पार पडला पण त्यात ईशा मात्र थोडीशी नाराज होती. तिच्या कुटुंबीयांनी केलेला इतका जास्त खर्च मात्र तिला आवडत नव्हता.


" मानपान करायला इतका खर्च करायची काय गरज होती बाबा ...? चांदीच्या वस्तू दिल्या , भारी  साड्या घेतल्या म्हणजे मान असतो का ? "


" प्रेमाने केलेले आदरातिथ्य देखील मानपानच असतो ना ..? मला नाही आवडले राजीवच्या बाबांचे हे सांगणे "..  


ईशा चिडून तिच्या बाबांना सांगू लागली.


"ईशा बाळा , अगं प्रत्येक आईबाबांची आपल्या मुलबाळांच्या लग्नाची स्वप्नं असतात. राजीवच्या आईबाबांची देखील असणारच ना ...! आणि व्याह्यांनी आपल्या स्वतःसाठी तर काही मागितले नाही ना ...?  , त्यांच्या पाहूणेमंडळीचा मान तितका सांगितलं ....तर त्यात काय हरकत आहे , बाळा.." 


" अग ईशा , तु आमची एकुलती एक मुलगी आहेस ...आमच्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी आम्ही इतक्या छोट्या गोष्टी नाही करू शकत का ? "


" लग्न हा व्यवहार नसतो बाळा , ..लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे नाही तर दोन परिवाराचे जुळणे असते ..त्यामुळे तु असा विचार करणे सोडून दे .., इशू ..." 


ईशाचे बाबा तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.


नारळ-सुपारी कार्यक्रम जवळ आला , राजीवच्या बाबांनी तो कार्यक्रम देखील ईशाच्या बाबांकडून  मोठ्या थाटामाटात करवून घेतला. आम्हाला काही नको म्हणता म्हणता त्यांनी या कार्यक्रमात देखील ईशाच्या कुटुंबियांना अमाप खर्च करायला भाग पाडला. ईशाला मनोमन हे सगळेच खटकत होतं पण आईबाबा , काका काकू सगळ्यांना वाईट वाटेल म्हणून ईशा आपला राग गिळत होती.  


नारळसुपारीचा कार्यक्रम झाल्यावर त्याचवेळेस सर्व पाहुण्याच्या उपस्थितीत पुढील बोलणी करायची असे ठरविण्यात आले.  त्याचवेळेस  राजीवच्या बाबांनी मोठा साखरपुडा करण्याची मागणी केली. त्यावेळेस ईशाचे बाबा म्हणाले ...


"व्याही , साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पुन्हा बरेच पैसे खर्च होतील , मला मान्य आहे तुम्हाला या कार्यक्रमाची खूप हाऊस आहे , पण साखरपुडा आणि लग्न दोन्ही खर्च मला थोडे जड पडतील. मी तुम्हाला विनंती करतो की आपण साखरपुडा कार्यक्रम रद्द करून लग्नच केले तर फार बरे होईल .."  


राजीवच्या बाबांना हे सगळे बोलणे पटले नाही परंतु सर्व पाहूणेमंडळी समोर चांगले ठरण्याची संधी त्यांनी सोडली नाही. ते बोलु लागले...


" व्याहीबुवा , अहो विनंती काय करताय , ईशा आमची देखील मुलगीच आहे. मी आधीच तुम्हाला म्हणालो होतो ना ...ईशाच आमची गृहलक्ष्मी.. तिच्याशिवाय आम्हाला आणखी काहीही नको."


" साखरपुड्याचा कार्यक्रम आपण रद्द करूया आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्ही अर्थातच मी आणि राजीवची आई दोघेही निवांतपणी येऊच. तोवर आम्हाला निरोप द्या , येतो आम्ही , नमस्कार " 


असे सांगून राजीवचे बाबा आलेल्या सर्व पाहुणेमंडळी सोबत निघुन गेले.


व्याह्यांनी आपली विनंती मान्य केल्यामुळे ईशाचे बाबा खूप खुश झाले. आपली लेक खूप चांगल्या घरात जाणार आहे , या कल्पनेने ते मनोमन सुखावले.


ईशा आणि राजीव दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत होते. दोघेही त्यांच्या भावी आयुष्याच्या  स्वप्निल स्वप्नांनी मोहरून गेले होते. काही दिवसानंतर राजीवचे आईबाबा लग्नाची बोलणी करण्यासाठी पुन्हा ईशाच्या घरी आले.


ईशाच्या कुटुंबीयांनी त्यांचे खूप चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केले आणि मग लग्नासाठी बुक करायच्या कार्यालय , बँड-बाजा आणि इतर गोष्टींची बोलणी सुरु झाली. ईशा खोलीच्या दरवाज्यातून सगळी बोलणी चोरून ऐकत होती. 


राजीवचे बाबा बोलू लागले....


" व्याही , तुमच्या इच्छेला मान देऊन आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम देखील रद्द केला परंतु आता लग्नाबाबतीत आमच्या काही अपेक्षा आहेत , त्यातरी तुम्ही पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे."  


" लग्नासाठी आम्हाला हायवेवरील नक्षत्र रिसॉर्टच बुक करून हवे आहे , तिथे आमच्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. आमचे साधारणपणे 500 पाहुणे तरी आदल्या दिवसापासूनच म्हणजे हळदीच्या  कार्यक्रमापासून मुक्कामी असणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदिक पद्धतीचे लग्न आणि सायंकाळी गोरज मुहूर्तावर लग्न असायला हवे. लग्नात तिघीही कार्यक्रमात आम्ही सांगू तसेच डेकोरेशन आणि जेवणाचा मेनू असावा अशीच आमची इच्छा आहे. "


"नारळसुपारीच्या कार्यक्रमात जसा मानपान करण्यात आला तसाच लग्नात देखील केला जावा. राजीवच्या आई , बहीण , काकू आणि मावशी सगळ्यांना एक तरी सोन्याची वस्तू भेट  देण्यात यावी. साखरपुडा नाही करू शकले तरी हे मात्र तुम्हाला करावेच लागेल. आम्ही नक्षत्र रिसॉर्टची कॉस्टशीट आणि इतर बुकिंग डिटेल्स सगळे काही सोबत आणले आहे , तरी तुम्ही आताच आमच्या समक्ष बुकिंग करवून घ्या."


राजीवच्या बाबांच्या मागण्या ईशाच्या बाबांना डोईजड होत्या पण लेकीच्या सुखासाठी ते सगळ्या तडजोडी करायला तयार झाले. त्यांनी राजीवच्या बाबांच्या मागण्या मान्य केल्या आणि आज नाही परंतु पुढील आठवड्यापर्यंत पैश्यांची जुळवाजुळव करून नक्षत्र रिसॉर्ट बुक करण्याचे आश्वासन दिले. 


राजीवचे बाबा सगळ्या मागण्या सांगून निघुन गेले  परंतु इकडे ईशाचे बाबा आणि इतर कुटुंबीय खूप चिंतेत पडले ...इतक्या पैश्यांची व्यवस्था करायची तरी कशी ...? हा प्रश्न त्यांना पडला.


ईशाला तिच्या कुटुंबीयांची चिंता समजत होती. त्यामुळेच ती तिच्या आईबाबांना आणि काकांना म्हणाली ...


"बाबा , तुम्ही राजीवच्या बाबांच्या मागण्या का मान्य केल्या ? मला माहिती आहे की इतका खर्च आपल्याला शक्य नाही तरी देखील तुम्ही ह्या मागण्या मान्य केल्या ..? का ...?  मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटतेय बाबा , ..."  


" या घरात फक्त माझीच जबाबदारी नाहीये. माझे भाऊ अजून शिकायचे आहेत ..माझ्या लग्नावर इतका पैसा खर्च करून तुम्ही त्यांच्यासोबत अन्याय करत आहात ना ...काका " 


ईशा तिच्या काकांना सांगू लागली.


घरातील सगळ्यांनी तिला समजावले. ईशाचे काका तिला तिला समजावणीच्या सुरात म्हणाले ...


" ईशा , बाळा आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम शक्य नाही असे सांगितल्यावर आमच्या विनंतीला मान देऊन राजीवच्या बाबांनी साखरपुडा रद्द करण्याची गोष्ट लगेच मान्य केली आणि आमचा मान राखला , मग आम्ही आता त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तो त्यांचा अपमान ठरेल."  


" काही गोष्टी आयुष्यभरासाठी जीवाला घोर लावून जातात. आम्हाला राजीवच्या बाबांचा अपमान करायचा नाहीये त्यामुळे तु काळजी करू नकोस. आम्ही पैश्यांची व्यवस्था करू. त्याचे टेन्शन तु मात्र घेऊ नकोस." 


" तु होणारी नवीन नवरी आहेस , त्यामुळे असल्या गोष्टींचे टेन्शन तु नाही घ्यायचे. मस्त आनंदी राहा. असेपण आम्ही जे काही कमवले आहे ते सर्व तुम्हा भावंडांचेच आहे." 


" चल हस पाहू एकदा .... smile ...आमच्या ईशाचे गोड हसू पाहून आमचे टेन्शन कुठल्या कुठे पळून जाते." काकांचे बोलणं ऐकून ईशाच्या डोळ्यातून अश्रु येऊ लागले आणि ती तिच्या बाबा आणि काका दोघांनाही बिलगून रडू लागली. सगळ्यांनी मिळून तिला शांत केले.


ईशाचे कुटुंबीय पैशांची व्यवस्था करण्याच्या व्यापात गुंतले. पैश्यांची रक्कम उभी राहिली पण त्याला मात्र एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस लागले. त्याचा दरम्यान सांगितलेल्या कार्यालयाचे बुकिंग झाले की नाही हे जाणून घेण्यासाठी राजीवचे आईबाबा आणि राजीव ईशाच्या घरी आले.


ईशाच्या बाबांनी नक्षत्र रिसॉर्टच्या कार्यालयात बुकिंग साठी फोन केला परंतु लग्नाचे कमी मुहूर्त असल्यामुळे मागच्याच आठवड्यात कार्यालय बुक झाले आहे असे समजले. ईशाचे बाबा हिरमुसले. त्यांनी सगळी हकीकत राजीवच्या बाबांना सांगितली आणि राजीवच्या बाबांचा राग अनावर झाला. ते चिडून बोलु लागले...


"आमच्या काही छोट्या मागण्या तुमच्याकडून पूर्ण होऊ शकत नाही ... , आम्ही आमच्या सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवले आहेस की आमच्या लेकाचे लग्न ' नक्षत्र रिसॉर्ट ' मधेच होणार म्हणून ... ,  मागच्याच आठवड्यात कार्यालय बुक केले असते तर आमची अशी नाचक्की झाली नसती." 


ईशाचे बाबा विनवणीच्या स्वरात राजीवच्या बाबांना समजावू लागले.


"व्याहीसाहेब , खरंच मला माफ करा. तुमचा अपमान करण्याचा विचार मी स्वप्नात देखील करू शकणार नाही परंतु पैश्यांची व्यवस्था करण्यासाठी थोडा वेळ लागल्यामुळे नक्षत्र रिसॉर्ट चे बुकिंग होऊ शकले नाही. हवे तर दुसरे अजूनही चांगल्यातले रिसॉर्ट आपण शोधूया."  


" आम्हाला नक्षत्र रिसॉर्ट सोडून दुसरे कुठलेच कार्यालय नको आहे. तुम्ही आताच तिकडे फोन लावा आणि जास्त पैसे देऊन का असेना आपले बुकिंग घेण्यास सांगा. बाकीचे मला काहीच ठाऊक नाही." राजीवचे बाबा चिडून म्हणाले.


ईशाच्या बाबांनी पुन्हा कार्यालयात फोन करून रिसॉर्ट बुक करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न फोल ठरला. त्यांनी दुसरे कार्यालय बुक करण्यासाठी पुन्हा एकदा राजीवच्या बाबांना विनंती केली. राजीवचे बाबा मात्र काही एक ऐकून घ्यायला तयार नव्हते.


रागात चिडून ते ईशाच्या बाबांना म्हणाले ..


" मुलीचे लग्न मोठ्या कार्यालयात करण्याची तुमची ऐपत नसेल तर नदीत तंबू गाडा आणि लावा तुमच्या मुलीचे लग्न ....तुमची हीच लायकी आहे." 


आता मात्र ईशाचा राग अनावर झाला आणि क्षणाचाही विलंब न करता ती बोलु लागली.


" बास ... , राजीवचे बाबा .....आज पर्यन्त तुम्हाला पण बाबा म्हणत आली पण तुम्ही बाबा म्हणायला लायक नाहीत. एका मुलीच्या बापाच्या मजबुरीचा गैरफायदा घेताना तुम्हाला लाज नाही वाटत ....? अहो , माझ्या बाबांची लायकी काढणारे तुम्ही ...? कधी स्वतःची लायकी तरी पाहिली आहे का ...? "


" राजीव , तु इतका सुशिक्षित मुलगा असून देखील तुझ्या आईबाबांच्या वागण्याला विरोध करू शकत नाही. असा भित्रट मुलगा मी नवरा म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही. तुझ्यासारख्या व्यक्तिसोबत संसार करण्यापेक्षा मी एखाद्या परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या माणसाचा संसार करण्यात धन्यता मानेल. मीच हे लग्न मोडतेय"  


ईशा तिच्या बाबांना उद्देशून म्हणाली...


" बाबा , तुम्ही माझ्या सुखासाठी हे सगळे करत होतात ना ...पण अशा माणसांसोबत मी खरंच सुखी राहू शकेल ज्यांना माणसांपेक्षा दिखावा जास्त प्रिय आहे ...? माझे सुख म्हणजे तुमचा मान आहे ,  बाबा ... .त्यामुळे हे लग्न करण्यासाठी मला आग्रह करू नका ...मी माझ्या बाबांचा ....माझ्या घरच्यांचा अपमान नाही सहन करू शकत. ...प्लीज .."  


इतका सगळा अपमान झाल्यानंतर राजीव आणि त्याचा परिवार तिथून ताबडतोब निघुन गेला. राजीव आणि त्याच्या कुटुंबीयांनी क्षणिक  सुखासाठी स्वतःचा मान गमावला होता आणि ईशाने खूप काही गमवून आपल्या कुटुंबीयांचा मान राखला होता.


आजही आपल्या समाजात मानपान आणि हुंडा यासारख्या रूढी प्रचलित आहे. यासाठी कायदा असून देखील या रूढी सर्रासपणे सुरु आहेत. ईशा सारख्या प्रत्येक मुलीने या रूढींचा विरोध नक्कीच करायला हवा. जेव्हा समाजातील स्त्री कणखर होईल तेव्हाच खूप मोठा बदल घडेल.


वरील कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा.


फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील











Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box