सॅटिसफॅक्शन

सॅटिसफॅक्शन

©️जया पाटील 


" अनिकेत , काय रे नेहमीच तुझ्या मिटींग्स , प्रेसेंटेशन आणि ऑफिसची कामे. आज देखील तू ओवीच्या शाळेच्या पीटीमला आला नाहीस...का ? "

" आपल्या मुलीच्या भविष्यापेक्षा , आनंदापेक्षा तुझे ऑफिस तुला महत्वाचं वाटते. " 

" आज शाळेत ओवीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे आईबाबा दोन्हीही आलेले होते आणि ओवीसोबत फक्त मी. तिचा बाबा नाही आला म्हणून हिरमुसली होती रे ती खूप ..." 

प्रेक्षा अनिकेतला म्हणजेच ओवीच्या बाबाला प्रश्न करत होती. त्यावर अनिकेत बोलू लागला ..

" नाही मिळत ग वेळ मला प्रेक्षा , मग मी काय करू ...ऑफिसच्या कामाचा किती लोड असतो माझ्यावर... मिटींग्स , डेडलाईन्स ..प्रेसेंटेशन या सगळ्याचा खूप व्याप असतो मला ..आणि प्रत्येक वेळेस ऑफिसचे काम सोडून नाही येता येत मला ..." 

" काय ग , या शाळेतल्या लोकांना पण बाबाच का हवा असतो. आई आलेली असते ते पुरेसे ठरत नाही का त्यांना ... ? " अनिकेत 

" अनिकेत , जॉब तू एकटा करत नाही आहेस ...जॉब मी देखील करते आहे पण माझ्या प्रायॉरीटीज मला कळतात. माझ्या ऑफिसच्या कामापेक्षा देखील जास्त महत्वाची मला माझी मुलगी आहे. " प्रेक्षा 

" हो का... ?  ठिक आहे. तुला जे समजायचं ते समज आणि हा विषय बंद कर इथेच. मला खूप काम आहे. तुझी बडबड ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. 

अनिकेत चिडून प्रेक्षाला म्हणाला आणि खोलीत निघून गेला.

एव्हाना प्रेक्षा आणि अनिकेत दोघांचीही ही भांडणे रोजची झाली होती.

प्रेक्षा आणि अनिकेत एक मध्यवर्गीय जोडपं. प्रेक्षा साळुंखे - एक टॅलेंटेड , स्मार्ट , मॉडर्न , डॅशिंग , स्टायलिश मुलगी...  एका आय टी कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी ... अतिशय फोकस्ड , करियर ओरिएंटेड मुलगी. तीचे स्वप्न म्हणजे सतत पुढे जाण्याचे , यशाचे नवीन क्षितिज गाठण्याचे ...!

त्यातच तिची भेट तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या अनिकेत सोबत झाली. प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने भेटी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही समवयस्क , हुशार त्यामुळेच घरच्यांकडून देखील त्यांच्या लग्नासाठी लगेच होकार मिळाला. दोघांचेही लग्न  थाटामाटात पार पडले. माप ओलांडून प्रेक्षा अनिकेतच्या घरची लक्ष्मी झाली. करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली. 

अनिकेत आणि प्रेक्षा दोघांचाही अगदी सुखाचा संसार सुरु होता. त्यातच प्रेक्षाने गोड बातमी दिली. त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फुल उमलले. त्यांना एक गोड कन्यारत्नाची प्राप्ती झाली. तिचे नाव ओवी. 

ओवीच्या जन्मानंतर प्रेक्षा तिच्या पालनपोषणात गुंतली. छोट्या ओवीच्या बाललीलांमुळे प्रेक्षाचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासे झाले. ओवीचे गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणे, कारणाशिवाय तिचे रुसुन बसणे या सगळ्यात प्रेक्षाचा वेळ कुठे जात असे ते तिलादेखील समजत नसे. नोकरी करून छोट्या ओवीचा सांभाळ देखील ती उत्तम प्रकारे करत होती.  

ओवीचे पालनपोषण करताना प्रेक्षाच्या मदतीला , तिला सोबत करण्यासाठी अनिकेतचे आईबाबा दोघेही होतेच. प्रेक्षा ऑफिसला गेल्यावर अनिकेतचे आईबाबा विलासराव आणि शोभाताई दोघेही ओवीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत. कितीही झालं तरी ओवी म्हणजेच त्या दोघां-  साठीही दुधावरची साय..!   त्यामुळे ओवीचा सांभाळ ते अगदी उत्तम प्रकारे करत. 

विलासराव आणि शोभाताईंच्या आधारामुळे प्रेक्षाला देखील ओवीची काळजी नसे. आजीआजोबा म्हणजेच नातवांसाठी एक हक्काचं माणूस. आजीआजोबांच्या या भक्कम आधारामुळे प्रेक्षा ओवीच्या बाबतीत अगदी बिनधास्त होती. 

सगळे काही खूप छान चालू होते परंतु अचानक बाहेर गावी असलेल्या अनिकेतच्या बहिणीची अर्थातच स्वातीची तब्येत अचानक बिघडली. तिच्याकडे तिची आणि मुलांची काळजी घेणारे असे कोणीही नव्हते. त्यामुळे विलासराव आणि शोभाताईंना तिच्याकडे जावे लागले. स्वाती कडे जाणे गरजेचे होते पण विलासराव आणि शोभाताईंना मात्र ओवीची चिंता लागून राहिली होती. 

प्रेक्षाला देखील या गोष्टीची चिंता लागून राहिली होती परंतु तिने विलासराव आणि शोभाताईंसमोर तसे दर्शवले नाही. मी इकडे सगळे व्यवस्थित मॅनेज करेल , तुम्ही इथली आणि ओवीची चिंता करू नका , तुम्ही स्वातीताईंची काळजी घ्या असे समजावून विलासराव आणि शोभाताई दोघांनाही प्रेक्षाने स्वातीताईंकडे जाण्यासाठी तयार केले. जड अंत:करणाने त्यांनी आपल्या लाडक्या नातीला ओवीला निरोप दिला.

आईबाबा स्वातीताई कडे निघून गेले आणि प्रेक्षा आणि अनिकेतची खूप धावपळ होऊ लागली. अनिकेतला असंही ओवीला सांभाळायची फारशी सवय नव्हती. त्यामुळे सगळा कामाचा व्याप प्रेक्षावर येऊन पडला होता. 

ऑफिस आणि घर सांभाळता सांभाळता प्रेक्षाची खूप तारांबळ उडत होती. या सगळ्या ताणामुळे प्रेक्षा आणि अनिकेत मधील वाद वाढीस लागला होता. अनिकेत आणि प्रेक्षा दोघेही एकमेकांना दुरावले होते. त्यांच्या या वादाचा परिणाम छोट्याश्या ओवीवर देखील होत होता. 

हळूहळू दिवस पुढे जात होते. स्वातीताईची तब्येत बरी झाली होती. आईबाबा पुन्हा एकदा अनिकेतकडे परत आले होते परंतु परत आल्यावर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की प्रेक्षा आणि अनिकेतचे काहीतरी बिनसले होते. नेहमी आनंदी राहणारे आणि हसून बोलणारे अनिकेत आणि प्रेक्षा दोघेही एकमेकांवर सतत चिडचिड करत होते. 

एक दिवस पुन्हा ओवीच्या शाळेत पीटीम होती आणि अनिकेत शाळेत पोहचू शकला त्यामुळे प्रेक्षा खूप चिडलेली होती. अनिकेत ऑफिस मधून घरी आला अनिकेतला लगेच प्रेक्षाने त्याला विचारले ...

" अनिकेत , हे आता तुझे नेहमीचेच झाले आहे. ओवीच्या शाळेतील कुठल्याच कार्यक्रमाला तू येत नाहीस. आई सोबत बाबा देखील यायला हवा असतो. आपल्या लेकीची जबाबदारी आपल्या दोघांचीही आहे. "

" तू मात्र नेहमीच तुझी जबाबदारी टाळतोस. नोकरी मी पण करते परंतु तरी देखील घर आणि ओवी दोघांनाही मॅनेज करते आहे मी ..."

" हे बघ प्रेक्षा , तुझ्या नोकरीचे पद आणि माझ्या नोकरीच्या पदात जमीन अस्मान इतका फरक आहे. "

"जॉब मध्ये सॅटिसफॅक्शन मिळविण्यासाठी अँबिशीयस असावे लागते.  त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात." 

" पैसा ,पद , प्रतिष्ठा हे सगळे मिळवितांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. माझ्या इतक्या जबाबदाऱ्या पेलून पहा मग तुला समजेल सॅटिसफॅक्शन काय असते ते .... ! " 

अनिकेत चिडून प्रेक्षाला म्हणाला. अनिकेतचे हे बोलणे प्रेक्षाच्या जिव्हारी लागले. ती देखील चिडून बोलू लागली ...

" अनिकेत , माझे नोकरीतील पद लहान आहे हे तुला मला बोलतोस...? अरे तुझ्या करियरला गती मिळावी आणि ओवीचे हाल होऊ नयेत म्हणून आजपर्यंत मी मला मिळालेले प्रत्येक प्रोमोशन मी नाकारत आली आणि माझ्या याच निर्णयाच्या बळावर तू तुला मिळालेले प्रोमोशन घेत आलास. " 

" किती स्वार्थी आहे रे तू अनिकेत , जाब मध्ये सॅटिसफॅक्शन मिळविण्याच्या नादात तू तुझ्या नोकरीत इतका गुंतला आहेस की तुला तुझ्या कुटुंबाचाच विषय पडत चालला आहे ...its disgusting .." 

यावरून प्रेक्षा आणि अनिकेतचा वाद वाढत गेला. त्यांचा हा वाद विलासराव आणि शोभाताई दुरूनच ऐकत होतो आणि चिडून विलासराव म्हणाले ...

" प्रेक्षा आणि अनिकेत ..पुरे ...आता एक शब्द जरी तोंडातून काढला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. " 

" अरे काय चालूय दोघांचेही .. सॅटिसफॅक्शन या मुद्द्यावर काय भांडताय दोघेही ..आणि मुळात सॅटिसफॅक्शन म्हणजे काय हे तरी माहित आहे का तुम्हाला.. ? "

" मी आणि शोभाने देखील नोकरी केली पण एकमेकांना सांभाळून , समजूतदार पणाने सगळे काही सांभाळले. " 

" माझी नोकरी फिरतीची असल्यामुळे घरातील सगळे काही शोभाच सांभाळत होती. तुझी आजी , तू , नोकरी आणि घर ..या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिचीही त्रेधा तिरपीत उडत असे हे लक्षात यायचे माझ्या पण तिने मात्र कधीच नाराजी दाखवली नाही. सगळे काही हसत मुखाने करत राहिली ती .." 

" मोठ्या मोठ्या साईट उभारायचे काम करायचो मी ..पण घरी आईबाबा , शोभा किंवा तू आजारी असल्याचा निरोप कधी मिळायचा तर मात्र हताश व्हायचो मी ... अख्खी साईट उभारून मिळविलेले समाधान देखील माझ्या कुटुंबाच्या दुःखापुढे मला कमी वाटायचं. " 

" या सगळ्यात शोभा नोकरी करत असली तरी देखील तिने कधीच नोकरीत बढती घेतली नाही. कारण बढती सोबत ट्रान्सफर मिळत असे."

" मी फिरस्तीवर असल्यामुळे तिने तुम्हा सगळ्यांकडे लक्ष देण्यासाठी स्वतःच्या करियरला एकच ठिकाणी स्थिर केले. " 

" पुढे हळूहळू तुझ्या आजीची तब्येत खराब झाली. त्यातच आजी देवाघरी गेली आणि आजोबांनी  देखील या गोष्टीचा धसका घेतला त्यामुळे त्यांच्या देखील तब्येतीच्या कुरबुरी वाढल्या. "

" तुझे इंजिनीरिंगचे पहिले वर्ष ,त्यात संपूर्ण वेळ कॉलेज , प्रॅक्टिकल या सगळ्यात तू बिझी असल्यामुळे तुझा आम्हाला कसलाच उपयोग झाला नाही. शेवटी शोभाने नोकरी सोडायची ठरवली पण मला मात्र हे सगळे मान्य नव्हते. " 

विलासरावांचे बोलणे पूर्ण होत नाही तितक्यात शोभाताई बोलू लागल्या ...

" हो , घरातील इतकी सगळी संकटे पाहून मी नोकरी सोडायचा विचार केला होता पण अनिकेत तुझ्या बाबांनी मात्र मला तसे करू दिले नाही कारण त्यांच्या दृष्टीने माझे करिअर देखील तितकेच महत्वाचं होतं. " 

" आजोबांच्या आजारपणात मला त्यांची मदत व्हावी म्हणूनच त्यांनी आधीच्या पगाराच्या तुलनेत कमी पगाराची नोकरी स्वीकारली. खरं तर त्यांना नोकरीची निवड करण्यासाठी दोन चॉईसेस होत्या. "

" एक आधीच्या पेक्षाही उत्तम पगाराची नोकरी आणि दुसरा जॉब अगदीच वेगळ्या क्षेत्रातील कमी पगाराचा ....परंतु आजोबांच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कमी पगाराची परंतु एका ठिकाणी स्थिर राहून काम करता येणारी नोकरी स्वीकारली आणि हो आधीच्या पगारापेक्षा कमी पगार असलेल्या नोकरीचा त्यांना अजिबात पश्चाताप नव्हता ही खरी महत्वाची गोष्ट ...! " 

" तुझ्या आजोबांची तब्येत , अनिकेत तुझे शिक्षण आणि कुटुंबाचे स्थैर्य या सगळ्या गोष्टी आम्हाला जास्त महत्वाच्या वाटल्या. 

" आम्ही दोघांनीही आयुष्यातील  सॅटिसफॅक्शनचा संबंध नोकरी ,पद प्रतिष्ठा या सोबत जोडला नाही. एव्हाना हे सगळे कधी आमच्या मनात सुद्धा आले नाही. " 

" तुम्ही मुले , प्रत्येक वेळेस खूप एकांगी विचार करतात. आयुष्य हे अगदी चेंडूच्या खेळासारखे आहे. नोकरी म्हणजेच सॅटिसफॅक्शन अशी व्याख्याच तुम्ही ठरवून टाकतात. " 

" नोकरीचा चेंडू झेलत असताना तुम्हाला स्वतःकडे येणाऱ्या दुसऱ्या चेंडूंचा विसरच पडतो. नोकरी करत असतानाही वय आणि जबाबदाऱ्या वाढत जातात. " 

"मुले , कुटुंब , नाती ह्या सगळ्याच गोष्टी आयुष्यात महत्वाच्या असतात. जीवनात कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे आपले आपणच ठरवायचे असत. " 

शोभाताई आणि विलासरावांचे बोलणे ऐकून अनिकेत आणि प्रेक्षा दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आपण खरंच फक्त किती स्वतःच्याच जगात जगत होतो या गोष्टीची जाणीव त्यांच्या मनाला चटका लावून गेली होती.

त्यांनी स्वतःच्या चुकीबद्दल आईबाबांची माफी मागितली आणि एक नवीन सॅटिसफॅक्शन मिळविण्याचे ठरवले. हीच खरी जुन्या पिढीने नवीन पिढीत घडवून आणलेल्या नवीन बदलाची नांदी होती. 

समाप्त ! 

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Google & Instagram 


✍©️ जया पाटील

Post a Comment

1 Comments

  1. खूप सुंदर 👌👌
    या लेखातून प्रत्येकाने बोध घेण्यालायक..

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box