मला साथ देशील ना भाग १२ अंतिम
संकल्पना आणि कथाबीज ©जया पाटील
लेखिका © Velvet Kavisha
भाग अकरा वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_17.html
लग्नानंतर देवधर्म, पुजा, गोंधळ सगळं झालं.
लग्नासाठी घेतलेली रजा संपून रुटीन सुरू झालं.
महिन्याभरात धीरजचं त्याची प्रेयसी अनघासोबत लग्न ठरवून ते साध्या पद्धतीने केलं.
त्यानंतर आठ दिवसांनी आसावरीकाकूंचं वर्षश्राध्द झालं.
अनुराजचे आईबाबा रागिणीला आपली लेकच मानत होते.
आई तर सकाळी लवकर उठून टिफीन बनवायला मदत करायची.
सासूसूनेचं छान मेतकूट जमलं.
अनुराज आनंदात होता.
दिवस कसे भराभर जात होते.
लग्नाला दहा महिने झाले आणि तन्वीला मुलगी झाल्याचं कळलं.
अनुराज आणि रागिणी गुपचूप हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले.
तन्वीला आईला भेटायचं होतं पण कसं शक्य होतं ते.
"वहिनी, तू सून असून आई तुला लेकीसारखी वाढवते.
आणि मी तिची स्वतःची लेक असूनही माझं तोंड ही पाहत नाही.
काय चुकलं गं माझं..??
मी लव्ह मॅरेज केलं हीच माझी चूक आहे का..??
सौरभ खुप चांगला आहे गं.. " बोलता बोलता तन्वीचे डोळे भरून आले.
"ताई, चूक कोणाचीच नाही.
आपण पाहतो ना, फार कमी प्रेमविवाह सक्सेस होतात.
बऱ्याचदा त्यात फसवणूक, पिळवणूक होते.
तशी उदाहरणे आपल्या आई-वडिलांना माहिती असतात.
आपल्या मुलांचं आयुष्य सुखात जावं, उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांचा लव्ह मॅरेजला विरोध असतो.
ओळखीत किंवा नात्यात लग्न लावून दिलं की त्यांच्या बाजूने ते बरोबर असतात.."
रागिणीने तन्वीला समजवायचा प्रयत्न केला.
"सगळं मान्य.
त्यांना न सांगता लग्न केलं हे ही चुकलं माझं.
पण त्याची एवढी मोठी शिक्षा का गं मला..??
मला एक रात्र वस्तीला माहेर नसावं..??
माझी नणंद माझं माहेरपण करते पण आपण जिथे लहानाचे मोठे झालो तिथे आपल्याला प्रवेश ही नसावा.
याला काय अर्थ आहे वहिनी..??" तन्वीने पुन्हा विचारलं.
रागिणीला काही कळतंच नव्हतं.
काय बोलावं.
तिने आणि अनुराजने लव्ह मॅरेज केलं होतं.
सरांमूळे सगळं मॅनेज झालं नाहीतर पुढे काय झालं असतं देवच जाणे..
"जाऊ दे ताई. झालं ते होऊन गेलं.
झालेल्या गोष्टी तर आपण बदलू शकत नाही.
पण तुम्हाला त्या घरी सन्मानाने कसं येता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.
फक्त तुम्ही तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर." रागिणीने तन्वीला आश्वस्त केलं.
"वहिनी, परमेश्वराच्या कृपेने माझ्या सासरी लक्ष्मी पाणी भरतेय.
माणसं ही चांगली आहेत.
मला काही म्हणजे काही नको.
फक्त मला माझं माहेर हवंय.
हक्काचं.
बाकी काही काही नको.." तन्वी रागिणीच्या गळ्यात पडून रडत होती.
रागिणीने प्रेमाने तिला थोपटले आणि डोळे पुसत निघून आली.
बारश्याच्या दिवशी मामा मामी म्हणून अनुराज रागिणीने आपलं कर्तव्य पार पाडलं.
तन्वीला तेवढाच एक आधार.
-------------
तन्वीनंतर सहा महिन्यांनी धीरजला मुलगा झाला.
रागिणी, अनुराग, आईबाबा अनघाच्या माहेरी बारश्याला जाऊन आले.
त्यानंतर वरवर आनंदी दिसले तरी आतून मात्र अनुराजचे आईबाबा रागिणीकडून गोड बातमी मिळत नाही म्हणून थोडेसे नाखूष होते.
आडून आडून बोलत होते.
नातेवाईक ही लग्नाला दीड वर्ष होत आलं अजून काही बातमी नाही का म्हणून मागे लागले होते.
अनुराजच्या हे लक्षात आलं आणि त्याने रागिणीला सांगितलं.
दोघांनी gynaecologist ची appointment घेऊन तपासणी करून घेतली.
सगळ्या टेस्ट केल्या.
कोणातच दोष नव्हता.
सेकंड ओपिनियन घेतलं. सहा महिने त्यातच गेले.
"आमच्या घरात कोणाला दवाखान्याची गरज पडली नाही."
आईबाबांनी दोन तीन वेळा बोलून दाखवलं.
"एखाद्या जोडप्याला होतात उशिरा मुलं. " अनुराजने सांगितलं.
अशातच एका महिन्यात रागिणीला पाळी चुकल्याचं कळलं.
UPT positive होती.
दोघांना खुप आनंद झाला.
आई-बाबांना न सांगताच दोघांनी हॉस्पिटल गाठलं.
डॉक्टरांनी तपासून प्राथमिक टप्प्यात ओके सांगितलं.
घरी येऊन बातमी सांगितली आणि आईबाबांनी आनंदाने घर डोक्यावर घेतलं.
रागिणीला नोकरी सोडायला लावली.
सासुबाई सुनेची सरबराई करण्यात धन्यता मानत होत्या.
बाबा सूनेसाठी रोज फळं आणत होते.
वेगवेगळी पुस्तकं आणून वाचायला देत होते.
रागिणीची सर्वोतोपरी काळजी घेतली जात होती.
धीरजने बाळंतपणासाठी घरी न्यायचं म्हटल्यावर बाबांनी ठाम नकार दिला होता.
रागिणीचं बाळंतपण इथेच होईल असं निक्षून सांगितलं.
------------
दिलेल्या तारखेआधीच अमोघचा जन्म झाला.
सिझेरियन झालं होतं.
बाळ गुटगुटीत होतं.
अनुराज हॉस्पिटलला असताना तन्वी येऊन भेटून गेली.
बाळाला चैन अन् कपडे दिले.
पुन्हा एकदा रागिणीला तन्वीसाठी वाईट वाटलं.
हे सगळं तन्वीलाही मिळायला हवं होतं.
पण तिच्या वाट्याचं सगळं सुख आपण लाटतोय.
आपले आई-बाबा नसतानाही आईवडीलांचं प्रेम मिळतंय आणि ती बिचारी माहेरासाठी झुरतेय.
तन्वी निघून गेल्यावर तिने अनुराजला तसं बोलूनही दाखवलं.
"मी कितीतरी वेळा बाबांसमोर तन्वीचा विषय काढायचा प्रयत्न केला.
पण पाहिलंस ना ते किती हायपर होतात ते..
तूच सांग कसं बोलणार मग त्यांच्याशी..!!" अनुराजने विचारलं.
"तसं नाही रे. जी चूक तन्वीने केलीय तीच आपणही केलीय.
पण आपण सगळीकडे आपलं कौतुक उपभोगतोय आणि तन्वीच्या वाट्याला तिरस्कार आणि अवहेलना.
हे चूकीचे आहे ना रे..??
आपल्याला लवकरात लवकर काही केलं पाहिजे तिच्यासाठी."
रागिणीने सांगितलं.
"हो. नक्की करू गं काहीतरी. थोडा वेळ दे." अनुराजने सांगितलं.
---------------
अमोघच्या जन्मानंतर वर्षभर घरी राहून रागिणीने पुन्हा नवीन नोकरी जॉईन केली.
हळूहळू अमोघ मोठा होत होता.
आईबाबा त्याला छान सांभाळत होते.
गेल्या वर्षी आईला ॲटॅक आला आणि त्यांना अमोघला सांभाळणं कठीण होऊ लागलं.
म्हणून मग अमोघला डेकेअरला ठेवण्याची सोय केली.
सगळं छान चाललं होतं.
या चार वर्षांत अनुराजने बऱ्याच वेळा तन्वीबद्दल बोलला होता.
पण बाबा काहीच ऐकून घेत नव्हते.
आई आजारी पडल्यावर त्याने तिची आणि आईची भेट घालून दिली होती.
बाबांच्या नकळतच.
--------------
आज रागिणीची आणि त्याची anniversary होती.
रागिणीने नेमकं तन्वीच्या माहेरपणासाठीचं गिफ्ट मागितलं होतं.
पार्टी संपवून सगळे आनंदात घरी आले.
अनुराजने रागिणीला वचन दिलं.
लवकरात लवकर तो तन्वीला तिचं माहेर मिळवून देईल.
आजच्या सरप्राइज पार्टीमुळे रागिणी खुश होती.
पण आजारी पडल्याचे खोटं सांगितलं म्हणून तिला रागही आला होता.
"अनु, सरप्राइज देण्यासाठी आजारी पडल्याचे कोण सांगतं का रे..??
किती घाबरले होते मी..!"
त्याच्या मिठीतून दूर होत ती म्हणाली.
ती बऱ्याचदा ते दोघेचं असताना त्याला अनु, अनुराज म्हणे.
"तुम तो मेरी अनुरागिनी है डार्लिंग..!!
गुस्सा नहीं होना आज के दिन..
एक बार गुस्ताखी माफ करना जानेमन..
दोबारा ऐसीं गलती नहीं होगी मालकिन.. "
म्हणत त्याने स्वतःचे दोन्ही कान चिमटीत पकडले.
"बास कर हां तुझी नौटंकी..
तुला माहिती आहे मी नीट रागावू पण शकत नाही तुझ्यावर.." तिने त्याचे हात हातात घेत म्हटलं.
"सॉरी राणू, आयत्या वेळी प्लॅन ठरला त्यामुळे सुचलं नाही काही.
आईकडून तु छान स्वयंपाक बनवलास ते कळलं म्हणून मग अशी पार्टी ठरवली.
केक डान्स आणि सेलिब्रेशन विदाऊट डिनर...
खुप छान बनवले होतेस सगळे पदार्थ..
किती व्हरायटी..
पोट भरलं तरी मन भरे ना..." अनुरागने सांगितलं. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
आजची रात्र दोघांची होती.
गप्पांची मैफिल रंगली होती.
भुतकळाची उजळणी करत भविष्य बांधू पाहत होते.
खुप साधी सरळ स्वप्न होती त्यांची.
रात्र सरली त्यांच्या नेहमीच्या समर्पणातून.
पहाटेच्या वेळेस समाधानाने दोघेही झोपी गेले.
--------------
काही दिवस निघून गेले आणि अनुराजचा वाढदिवस आला.
अनुराजचा आणि बाबांचा वाढदिवस एकाच महिन्यात होता.
अनुराजचा ४ तर त्याच्या बाबांचा बरोबर पंधरा दिवसांनी १८ तारखेला वाढदिवस असायचा.
अनुराज नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठला.
आईने त्याला उठणं लावलं.
आंघोळ करून त्याने देवाला आई-बाबांना नमस्कार केला.
नाश्ता झाल्यावर सगळे गणपतीच्या मंदिरात जाऊन आले.
घरी गोडाधोडाचं जेवण बनलं.
संध्याकाळी केक कापण्यासाठी सगळे वाट पाहत होते.
अनुराजचा पत्ता नव्हता.
आजवर असं कधी झालं नव्हतं.
अनुराज न सांगता कधी बाहेर जात नव्हता.
सासु सून स्वयंपाकात बिझी आणि आजोबा नातू कोणता तरी खेळ मांडून बसले होते.
बहुतेक तेव्हाच तो सटकला होता.
अनुराज घरात नाही हे कोणाच्या लक्षात आलं नाही.
जेव्हा लक्षात आलं तेव्हा असेल इथेच.
येईल इतक्यात असं एकमेकांना सांगत सांगत अर्धातास वाट पाहिली.
आता मात्र बराच वेळ झाला म्हणून रागिणीने दोन तीन वेळा फोन केला तर त्याने उचलला नाही.
शेवटी न राहवून बाबांनी फोन केला.
त्याने फोन उचलला..
"बाबा, मला तुमच्याकडून वचन हवंय." अनुराज.
"कसलं..??" बाबा.
"आज मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल..??" अनुराज
"असं काय मागणार आहेस..??
आधी तू घरी ये मग बघू.." बाबा.
रागिणीला अंदाज आला.
अनुराज तन्वीसाठी काही करू पाहतोय.
"जोवर तुम्ही वचन देत नाही तोवर मी घरी येणार नाही." अनुराज.
"काय मुर्खपणा चालवलाय..??
तुम्ही काही लहान नाहीत.
एका मुलाचे बाप आहात आता." बाबांचा आवाज वाढला होता.
अनुराजने फोन कट केला.
"अहो, काय म्हणतोय तो.??
कुठे आहे..??
बोलवा ना त्याला घरी.." आई म्हणाली.
"वचन मागतोय.
मी मागेन ते द्या म्हणून." बाबांचा आवाज उतरला होता.
"तो काय मागणार आहे असं...?
हो म्हणा आणि घरी यायला सांगा.." आईने सांगितले.
खुप वेळ गेला.
आईने रडायला सुरुवात केली तसं बाबांनी त्याला फोन लावून वचन दिलं.
बाबांना थोडासा अंदाज आला होता.
तन्वी बद्दलच असावं काही.
गेली सात वर्षे अनुराजची आई किती वेळा तिच्याबद्दल बोलल्या होत्या बाबांना.
पण बाबांनी नेहमीप्रमाणे दटावलं होतं त्यांना.
बाबांना ही वाटतं होतं लेकीला भेटावसं पण आडमुठेपणा मध्ये येत होता.
आज अनुराजने वचन मागितलं.
त्याने तन्वीबद्दल सांगितलं तर सरळ हो म्हणून टाकू.
म्हणजे आपलं तत्वं आणि इच्छा दोन्ही साध्य होईल.
तसंही किती दिवस लोकांकडून लेकीची खबर काढत राहायची.
तो राकेश पोलिस आहे म्हणून तन्वीबद्दल सगळी इत्यंभूत माहिती पुरवतो.
नाहीतर अनुराजलाच विचारावी लागली असती तिची खुशाली.
सौरभ बद्दल माहिती नव्हती आणि तिने न सांगता लग्न केलं म्हणून रागाबरोबर बोलून गेलो. त्या
नंतर स्वतःच्याच रागाने तिला भेटणं नाकारत राहिलो.
बास्स झालं आता.
ती जशी आपल्या प्रेमाला मुकली तसेच आपणही तिच्या प्रेमाला मुकलोच ना..??
बाबा विचार करत होते.
-------------
अनुराज पाच मिनिटांत घरी आला.
केक कापून सर्वांना नमस्कार केला.
जेवणं उरकली.
सगळे निवांत बसले होते.
बाबा सोफ्यावर बसले होते. अनुराज खाली बसला बाबांच्या पायापाशी.
"बाबा मी आज दोन गोष्टी मागणार आहे." अनुराज.
"हं. बोला." बाबा म्हणाले.
"बाबा पहिली गोष्ट तन्वी." अनुराज.
"तिचं काय..?
मनासारखं लग्न केलंय तिने.
तिचं तर सगळं छान चाललंय ना??
घरची माणसं चांगली आहेत.
नवरा चांगला आहे. पोटी दोन मुलं आहेत. अजून काय हवंय.??"
बाबांना तन्वीबद्दल सगळी माहिती होती.
बाबा न भडकता शांतपणे बोलत होते.
अनुराज आश्चर्यचकित झाला.
त्याने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं.
"तिला माहेर हवंय बाबा.
तिच्या हक्काचं आणि तुम्ही त्यासाठी परवानगी द्यावी.
मला तिला सन्मानाने इथे आणायचं आहे.
एक भाऊ म्हणून.
मी वचन दिलंय तिला तसं.
आईबाबांचे आशिर्वाद मिळवून देईन म्हणून." अनुराज.
"आईवडिलांचे आशिर्वाद नेहमीच असतात रे मुलांच्या मागे.
रागवलो म्हणजे मुलं दुश्मन होतं नाहीत.
त्यामागे काळजी, कळकळ असते.
तन्वीशी बोललो नाही म्हणजे तिच्यावरच प्रेम कमी होत नाही.
काळजी कमी होत नाही.
कोणत्या आई-वडिलांना आपल्या मुलांचं वाईट झालेलं बघवतं??
वीस बावीस वर्षे मुलींना जपायचं आणि मुलींनी काही महिन्यांच्या प्रेमाखातर आई-वडील नाकारायचे.
दुःख नसेल का होतं त्या जन्मदात्यांना.
तुम्ही शिक्षण सुरू असताना प्रेम वगैरे करत बसलात तर अभ्यास कधी कराल??
आपण चाकरमानी लोकं आपल्याला नोकरी धंद्याची गरज असतेच.
प्रेमाचं भूत वर्ष दोन वर्षांत उतरतं.
संसाराला पैसा लागतो.
म्हणून मी तुम्हांला ओरडत होतो.
डोळस प्रेमाला माझा विरोध नाही.
पण उद्या गरज पडली तर तुमचं शिक्षण, तुमची नोकरीच कामी येणार आहे.
कितीतरी फसलेले प्रेमविवाह पाहिलेत.
न सांगता लव्ह मॅरेज केलेल्या मुलीला माहेरच्यांनी माफ केलं की सासरच्या लोकांच्या मागण्यांनी हैराण झालेले आई-वडील पाहिलेत.
तिच्या सासरी माहेरच्यांची काहीच किंमत नसते.
कारण प्रेमाच्या बहरात पोरीने माहेरच्यांना व्हिलन बनवून ठेवलेलं असतं.
खुप उन्हाळे सोसलेत रे.
बरेच अनुभव आहेत गाठीशी.
कमळा आत्याचंच उदाहरण घे..
मी पाश तोडले नसते तर राजेशने मुंबईत येऊन हातपाय हलवले नसते.
आज तो जो काही आहे ते त्याचं नातं नाकारलं म्हणून.
जिद्दीने उभा राहिला.
तिचं ही चांगलंच आहे की.
दोन मुलं, सुना, लेक, जावई, नातवंड.
सुखी आहे की ती ही.
ज्यांना माझा फक्त राग कळतो पण प्रेम कळतं नाही त्यांना मी काय बोलणार.
दोघींनाही अपेक्षा मी त्यांना समजून घेण्याची..
पण मग त्यांनी मला का नाही समजून घेतलं रे आजवर..??
मी इतका वाईट आहे का..??
की मी माणूसघाणा आहे.. की निर्दयी आहे मी..??
मलाही देवाने मन भावना दिल्या आहेत हे का कोणाला कळत नाही..??
तुला तिला घरी आणायचं आहे.
आनंदाने घेऊन ये.
माझी काही हरकत नाही. हे घर जेवढं तुझं आहे तेवढंच तिचं ही आहे..." बाबा
आज पहिल्यांदा इतकं बोलत होते.
अनुराजही विचारात पडला.
हे बाबांचं कोणतं रुप पाहतोय आपण.
बाबा म्हणतात ते खरंच आहे की, आपण नेहमी बाबांच्या रागाचं बुजगावणं उभं करून घाबरत राहिलो.
पण त्यामागचा काळजी करणारा, हित चिंतणारा बाप ओळखण्यास कमी पडलो.
"बाबा खुप खुप थॅंक्यु..!!
मी तुम्हांला तन्वीबद्दल आधीच बोलायला हवं होतं.."
अनुराजने बाबांचे हात हातात घेत म्हटलं.
"आता दुसरं काय आहे ते ही सांग.
म्हणजे पुन्हा त्यासाठी केक कापण्याच्या वेळेस पार्किंगमध्ये जाऊन थांबायची वेळ येणार नाही.." बाबा.
"तुम्हांला कसं कळलं मी पार्किंगमध्ये थांबलो होतो ते..??"
अनुराजने आश्चर्यचकित होत विचारलं.
"कारण पार्किंगमधून घरी यायला पाच मिनिटंच लागतात.
हा हा हा.." बाबा जोरात हसले.
"आता दुसरं काय ते ही सांगून टाक पटकन."
"बाबा, क्षमा मागायची आहे तुमची.
माफीचं वचन हवंय." अनुराज.
"कशासाठी माफी हवीय तुला..??" बाबा.
"बाबा मी तुम्हांला फसवलंय हो.
खोटं बोललो तुमच्याशी." असं म्हणत अनुराजने रागिणीशी कॉलेजमध्ये झालेली ओळख,
तिचं प्रेम व्यक्त करणं,
त्याने ते नाकारणं,
दोघे चांगले मित्र म्हणून राहणं,
आसावरी काकूंचं आजारपण आणि त्यांनी रागिणीशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवलेली,
मग कोर्ट मॅरेज,
नंतर साने सरांमार्फत तिचं स्थळ येऊन लग्न होणं..
सगळं तपशीलवार सांगितलं.
"बाबा आम्ही तुमचे अपराधी आहोत.
तरीही शिक्षा नको क्षमा हवीय.." अनुराज म्हणाला.
"तुम्हांला कधीच माफ केलंय." बाबा म्हणाले.
"म्हणजे बाबा..??" अनुराजला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही.
"अरे तू जे हे आत्ता सांगितलंस ते मला माहिती आहे. आधीपासूनच..!!
नवं काही असेल तर सांग." बाबा म्हणाले.
"तुम्हांला कसं माहिती..??
साने सरांनी सांगितलं का..??"
अनुराजने आश्चर्यचकित होत विचारलं.
"तु कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात असावास असं मला तुझ्या वागण्यातून वाटतंच होतं.
पण ती मुलगी कोण, काय करते?? काही कळत नव्हतं..
मग साने सर रागिणीचं स्थळ घेऊन आले तेव्हा मी त्यांना तसं सांगितलं की, अनुराजचं काहीतरी प्रेमप्रकरण सुरू असावं असं वाटतंय.
आपण या मुलीला पसंत करू आणि अनुराज आयत्या वेळी नाही म्हणेल.
उगाच त्या मुलीला मनस्ताप नको.
तेव्हा सरांनी सगळं सांगितलं.
रागिणी चांगली मुलगी होती त्यामुळे नाही म्हणायचा काहीच प्रश्न नव्हता.
आज तू सांगितलं नसतंस तर मी ही विचारलं नसतं.
सरांना मी मात्र सांगितलं होतं की त्यांनी हे सगळं मला सांगितलंय हे तुम्हां दोघांना सांगू नका म्हणून.
कारण त्यानंतर तुम्ही कोणावर विश्वास ठेवताना विचार केला असता आणि ते मला नको होतं.. "
बाबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.
"बाबा, u r great..
simply great..
u r not a villian.
u r a hero..
love you.. love you बाबा.
आज तुम्ही मला एकावर एक आश्चर्याचे धक्के दिलेत.
तुम्हांला माझ्याबद्दल, तन्वीबद्दल, कमळा आत्या बद्दल सगळ्यांबद्दल माहिती आहे.
म्हणजे तुम्ही सगळ्यांचं नीट चाललंय यावर लक्ष ठेवून आहात..
बाबा मला काय बोलावं कळतंच नाहीय..
तुमचं वागणं मला झेपतंच नाहीय बाबा..!!
मी काय समजून बसलो तुम्हांला..
खरंच नाही ओळखू शकलो तुम्हांला...
बापमाणूस हा नेहमी टॉपलाच असतो.
मुलांना उगाच वाटत राहतं की, आपण मोठे झालो.
बाबा आज पटतंय, मुलं कितीही मोठी होऊ द्या पण बापापेक्षा मोठी कधीच नाही होणार..
बाबा तुम्ही मला जन्म देऊन ह्या आयुष्याचं गिफ्ट दिलंत आणि आजच्या दिवशी तुमच्या स्वभावाची वेगळी ओळख करून अजून मोठ्ठं गिफ्ट दिलंय बाबा..
आजचा दिवस सार्थकी लागला बाबा...
माझ्याकडून माझा बाबा दुर्लक्षित राहिला होता.
आज मला सापडला तो..
खुप खुप आभार परमेश्वरा तुझे..
उगाचच गळा दाटून येतोय आणि डोळे भरून येऊ लागलेत.
नक्की हे आनंदाश्रुच आहेत."
अनुराज वेड्यासारखा बोलत होता.
खुप वर्षांपासून दाबून ठेवलेलं.
बाबांनी उठून त्याला जवळ घेतलं.
त्याने बाबांना घट्ट मिठी मारली.
लहानपणी त्यांच्या कमरेला मारायचा तशीच.
खुप सारं दुःख, कटुता वाहून जात होती आणि खुप सारा आनंद डोळ्यात साठत होता.
डोळ्यांना मात्र दोन्ही झेपत नव्हतं.
घरातल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं..
आजचा दिवस संपला होता.
रागिणी खुप खुश होती.
आईही आनंदात होती.
अनुराज रागिणीच्या मनावरचा ताण हलका झाला होता.
उद्याची पहाट नव्याने उगवणार होती.
--------------
दुसऱ्या दिवशी सकाळीच अनुराजने डायनिंग टेबलवर बाबांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं आहे असं सांगितलं.
पंधरा दिवसांनी बाबांचा ५३ वा वाढदिवस.
या दिवशी तन्वीच्या घरच्यांना आमंत्रित करु असं सांगितलं.
"तुझ्या बहिणीसोबत माझ्या बहिणीला ही आमंत्रण दे जमलं तर..
या घरच्या मुली आहेत दोघी.." बाबा म्हणाले आणि अनुराज उडालाच.
बाबांचा नाश्ता झाल्यावर ते अनुराजच्या रुममध्ये गेले.
"तुझ्या आत्याला तू आमंत्रण दे.
उगाच मी बोलावतोय असा गैरसमज नको व्हायला तिचा. " बाबांनी सांगितले.
"असं का बाबा..??
ती आली तर तुम्हांला चालणार आहे ना..?" अनुराजने विचारलं.
"हो रे.
पण इतक्या वर्षांचे ताणलेले बंध आहेत हे..
त्यांना हळूहळू सैलावू दे. असं वाटतं.
यावेळी मला साथ देशील ना..??" बाबा भावुक होत म्हणाले.
"बाबा फक्त यावेळीच नाही तर आयुष्यभरासाठी साथ देईन.
विश्वास ठेवा." अनुराजने त्यांचे हात हातात घेत आश्वस्त केलं...
--------
ठरल्याप्रमाणे दोन्ही माहेरवाशिणींना आमंत्रण गेली.
१८ तारखेला सकाळीच तन्वी आणि तिच्या मुलांना घेऊन अनुराज आत्याकडे गेला.
दोघीही आज माहेरी येत होत्या.
त्यांच्या घरची मंडळी संध्याकाळी येणार होती.
दिवसभराच्या गप्पाटप्पांनी घर दणाणून गेलं.
बाबा म्हणाले तसं बहिण भावाच्या संवादात अवघडलेपण होतं.
दुपारी बाबा रुममध्ये एकटे असताना तन्वीने त्यांच्या पाया पडत माफी मागितली.
"औक्षवंत हो. सौभाग्यवती भव" म्हणत त्यांनी आशिर्वाद दिला.
"बाबा बोलणार नाही का माझ्याशी" म्हणताच, बाबांनी तिला पोटाशी धरलं.
न बोलताच बरंच काही बोलत होते बाबा.
थोड्या वेळाने बाबांनी डोळे पुसले.
"तू बाहेर जा.
नाहीतर मुलं तुला शोधत येतील." म्हणत तिला बाहेर पाठवून दिलं.
पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून बेडरूमच्या गॅलरीत उभे राहिले.
बेडरुममध्ये काहीतरी घ्यायला आलेली कमळा आत्या पाठमोऱ्या भावाकडे पाहत राहिली.
भाऊ अगदी वडिलांसारखा भासला तिला.
तीस वर्षांनंतर ती अशी जवळून पाहत होती भावाला.
ती त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
"कसा आहेस दादा..??" आत्या.
"कसा दिसतोय..??" बाबा.
"छान..!!" आत्या.
"मग छानच आहे." बाबा.
आत्या जायला वळली.
"तु कशी आहेस..??" बाबांनी विचारलं आणि आत्या थांबली.
"खुप अपराधी वाटतंय.
माझ्यामुळे बाबा गेले.
तु सगळं विकून इकडे आलास.
कितीतरी वेळा तुला भेटावसं वाटलं रे..
पण भिती वाटली. कोणाकोणाकडून खुशाली घेत होते पण तुझ्या घरी यायची हिंमत झाली नाही."
आत्या खाली पाहत बोलली.
"एकदा येऊन पाहायचं होतंस.
परिस्थिती कायम तशीच राहत नाही. काळानुरूप बदलत असते." बाबा म्हणाले.
"तु का नाही आलास कधी भेटायला..??
साधी खुशाली हे विचारली नाहीस कधी.." आत्याने नाराज होत म्हटलं.
"मोहनराव कसे आहेत..??"
बाबांनी विचारलं.
मोहनराव म्हणजे आत्याच्या नणंदेचे मिस्टर जे त्यांची परिस्थिती नसतानाही आत्याच्या मुलांसाठी महागडी खेळणी, खाऊ आणि कपडे घेऊन येत असत.
आत्या नेहमी त्यांना म्हणायची की, "तुम्ही कशाला इतके पैसे खर्च करता??" तेव्हा ते म्हणायचे "मुलांच्या मामाने दिले असं समजून घ्या" आणि मग आत्याही गप्प बसायची.
म्हणजे ती खेळणी खाऊ कपडे दादा त्यांच्याकडे पोचवत होता.
आत्याच्या आता लक्षात आलं.
"दादा, म्हणजे तू..?? तुला सगळं कळतं होतं माझ्या घरातलं..??" आत्याने विचारलं.
"हं.. भाऊ होतो ना..!!" म्हणत डोळे पुसले.
"दादा, मी ओळखलंच नाही तुला कधी.
माफ कर मला" म्हणत ती भावाच्या कुशीत शिरली.
"आता कळलं ना तुला मग झालं तर आता पळत जा आणि मस्त तुझ्या हातचा चहा बनवून आण.
खुप वर्षे झाली. ती चव miss करतोय." बाबांनी सांगताच आत्या लहान मुलीसारखी पळतच किचनमध्ये गेली.
रागिणीला सामान विचारून चहा बनवला.
गॅलरीत उभे राहून दोघे बहिण भाऊ चहाचा एक एक घोट घेत होते.
जणू मधली तीस वर्षे एकेका घोटासोबत गिळून टाकत होते.
--------------------
संध्याकाळी सगळी पाहुणे मंडळी आली.
अनुराज रागिणीने काही पदार्थ बाहेरून मागवले होते.
कॅटरर्सकडून सर्व्हिंगसाठी माणसे बोलावली होती.
घरचा हॉल मस्त सजवला होता.
आत्याने, तन्वी ने आणि अनुराजने ही केक आणला होता...
सगळ्यांनी बाबांना औक्षण करून केक कापला.
सौरभ राव भीतभीतच समोर आले.
बाबांना केक भरवला आणि नमस्कार केला.
त्यांच्या आईने बाबांना गिफ्ट दिलं.
बाबांनी सौरभरावांना जवळ बोलावलं
"राग लेकीवर होता तुमच्यावर नाही." असं सांगितलं आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.
राजेश म्हणजे कमळा आत्याच्या मिस्टरांनाही तसंच सांगितले आणि गळाभेट घेतली.
अनुराजला राहून राहून सारखं वाटतं होतं की, हे वचनाचं आपल्याला आधी का नाही सुचलं..??
खुप आधीच ही नाती सांधली गेली असती.
पण आसावरी काकू म्हणायच्या तसं,"प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते.
तेव्हाच त्या गोष्टी नीट होतात."
कदाचित हीच योग्य वेळ असेल.
बाबा खुप खुश होते.
आईसुद्धा नव्या उत्साहाने नव्या पाहुण्यांची उठबस करण्यात गुंतून गेली होती.
हसतखेळत जेवण झाली.
गाण्याच्या भेंड्या रंगल्या.
सगळे आनंदात होते.
घर मुलीजावई, सुना, नातवंडानी परिपूर्ण झालं होतं.
घट्ट झालेले बंध सैलावत होते.
आयुष्याच्या या टप्प्यावर प्रत्येक नातं जपून वागत होतं..
जणू एकमेकांना विचारत होतं....आता शेवटपर्यंत "मला साथ देशील ना..!!"
---------------
समाप्त....
© Velvet Kavisha
वाचकहो, तुम्ही नेहमीच आमच्या कथांवर प्रेम करता. या कथेवर ही केलंत. तुमच्या कमेंट्स आमचा उत्साह वाढवतात. असंच प्रेम असू द्या.
आजचा भाग पोस्ट करण्यासाठी खुप उशीर झाला. त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो...
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील

2 Comments
Great story it is......Baba n cha character faar ch chaan
ReplyDeleteKeep writing such stories
ही कथा आपण अतिशय छान लिहिली आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन.
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box