नणंदबाई तुम्ही तुमचा संसार करा
© Velvet Kavisha
एका बाजूला प्रदिपची आई, मोठा भाऊ, मामा मामी, दोन बहिणी आणि त्यांचे नवरे. दुसरीकडे संगिता, तिचा भाऊ आणि वहिनी. दहा बाय दहाच्या खोलीत दोन्ही पार्ट्या समोरासमोर बसलेल्या. ही बैठक होती न्याय निवाड्याची. संगिता कशी चुकीची आहे हे दाखवण्यासाठीची.
तसं तर संगिता आणि प्रदिपच्या लग्नाला अठरा वर्षे झाली. सोळा वर्षांचा एक मुलगा होता दोघांना. गरीबाघरची पोर म्हणून सासरी ॲडजस्ट करत राहिली. दहा बाय दहाच्या रूममध्ये नऊ माणसे राहत होती. नाही म्हणायला दोन लहानसे पोटमाळे होते झोपायला. पण साडी नेसायची झाली तर घरातली सगळी मंडळी घरातून बाहेर जायची तेव्हाच शक्य....
सार्वजनिक टॉयलेटमध्ये दोन्ही विधी म्हणून मग रात्रभर जायचंच नाही. पहाटे उठून लाईनीत उभं राहून सगळं उरकायचं. संगिता एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. मुलगा सहा वर्षांचा झाला आणि माळ्यावर जागा पुरेना. संगिताने नवऱ्याला सांगितले की, आपण कुठेतरी चाळीत भाड्याने रुम घेऊ. निदान कधी पडावंस वाटलं तर पडता तरी येईल. दोन पाहुणे आले तर त्यांना निदान निवांत बसता तरी येईल.
प्रदीप सगळ्यात लहान त्यामुळे नेहमी आई बहिणींनी सांगितलेलं ऐकायचा.
संगिता कानी कपाळी ओरडून सांगत होती पण प्रदिपच्या डोक्यात काही घुसत नव्हतं. शेवटी संगिताने प्रदिपला अल्टिमेटम दिला तसा त्याने आईकडे वेगळं राहण्याचा विषय काढला. आईने लगेच लेकी जावयांना गोळा केलं. नेहमीसारखाच प्रदीप पुन्हा त्यांच्या बोलण्याने दबला गेला.
मुलगा सोळा वर्षांचा झाला. आता तर माळ्यावर कोणालाच जागा पुरेना. प्रदीप आणि मुलगा किचनच्या ओट्याच्या बाजूला खाली अंथरुण टाकून झोपू लागले. संगिता एकटी माळ्यावर.
"ज्या घरात तुला तुझ्या बायकामुलांसोबत झोपयला जागा नाही तरीही तुला त्याच घरात राहायचे आहे का...?? तर तू रहा. माझा इथे जीव गुदमरतोय." संगिताने प्रदिपला सांगितलं. प्रदिपने पुन्हा आई आणि बहिणींकडे वेगळं राहण्याचा विषय काढला. नेहमीप्रमाणे त्यांनी "इथेच राहून आईला ही सांभाळा सांगितलं."
"आईला आपल्यासोबत नेऊ." संगिता म्हणाली.
पण प्रदिपमध्ये काहीच फरक पडला नाही. तो तिथेच राहण्यावर ठाम राहिला.
दिवसेंदिवस संगीताला तिथे राहणं कठीण होत होतं. मोठ्या जावेची मुलंही मोठी होतं होती. त्यांना सासुबाई सांभाळायच्या म्हणून ती हे घर सोडून जात नव्हती. तिला सासुबाई हव्या होत्या. आणि प्रदिपला आई. माणसांच्या गर्दीत संगिताचा जीव उबगला. एक दिवस तिने धाकट्या भावाकडे आपली खदखद व्यक्त केली.
"इथून लवकर बाहेर निघायचं आहे मला नाहीतर एखाद्या दिवशी मी स्वतःलाच काही करून घेईन. इतका वैताग आलाय."
भावाला टेन्शन आलं. त्याला संगिताची परिस्थिती समजत होती. तो एकदा तिच्या ऑफिस बाहेर भेटला. म्हणाला, "मी भाड्याने रुम बघून देतो..तू भावोजी आणि बाळूला घेऊन शिफ्ट हो."
भाऊ प्रदिपशी ही बोलला. तेव्हा प्रदीप म्हणाला, "हो बघा रुम तुम्ही." झालं. चार महिन्यांत बाळ्याची दहावीची परीक्षा संपली आणि आपलं सामान घेऊन संगिता भाड्याच्या घरात शिफ्ट झाली. प्रदीप आलाच नाही की घरातही कोणाला त्याने शिफ्टींगबद्दल सांगितलंच नव्हतं.
संगिताने निघण्याच्या दिवशी सकाळी सासूला सांगितलं आणि दुपारी निघाली.
आपल्या मनाप्रमाणे सगळा संसार मांडला. आई आणि बहिणींनी प्रदिपचे कान भरले. तो घर पहायला ही आला नाही. प्रदिपला वाटलं आपण गेलो नाही तर संगिता झक् मारत पुन्हा येईल मागे. पण तसं काहीच झालं नाही. प्रदिपचा सगळा पगार घरखर्चाला जात होता. घरातला खर्च बिनबोभाट होतोय म्हटल्यावर घरातले सगळे प्रदीपला संगितासोबत जाऊ देत नव्हते.
संगिता ऑफिसला गेल्यावर प्रदीप मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करायचा. रडून दाखवायचा. मार्च ते मे असे तीन महिने मुलगा संगितासोबत राहिला. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रदीपला भेटायला गेलेला बाळ्या पंधरा दिवस झाले तरी यायचं नाव घेईना. संगीताने विचारलं तेव्हा कळलं की प्रदीपने मुलाला पंधरा हजारांचा मोबाईल घेऊन दिला होता. जवळच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून झालं होतं. मुलाला आपल्या बाजूने फिरवण्यात प्रदिप यशस्वी झाला होता.
अडनिड्या वयाच्या बाळ्याला काहीच कळत नव्हतं. त्याच आपलं एकच, " मम्मी तू इथे ये ना माझ्यासोबत राहायला.."
बाळ्याच्या जन्मापासून दहावी होईपर्यंतचा सगळा खर्च संगिताने केला होता. प्रत्येक आईचा जीव जसा आपल्या मुलांमध्ये अडकतो तसंच संगिताचा जीव बाळ्यात अडकलेला. भावाचं कुटुंब जवळ असलं तरी संगिताला मुलाशिवाय करमत नव्हतं.
शेवटी आज अठरा वर्षांच्या संसाराची न्याय निवाड्याची बैठक बसली होती. संगिता स्थीर होती.
प्रदीपच्या मोठ्या मामाने बोलायला सुरुवात केली. संगीताने असं वेगळं घर मांडलं हे कसं चुकीचं आहे हे सांगितलं. त्याचबरोबर प्रदीपच्या परवानगीशिवाय असं राहणं ही चुकीचं आहे असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. तिला वेगळं राहायचं असेल तर मुलगा प्रदीपसोबत राहिलं असं एकतर्फी सांगण्यात आलं.
संगिताने शांतपणे आपल्या बॅगेतून फाईल काढली. एक डायरी काढली. त्यात लग्नानंतर स्वतःसाठी व बाळ्यासाठी केलेला एकूण एक खर्च लिहून ठेवलेला होता. कपडेलत्ते आणि डॉक्टर सहित शिक्षणाचा ही खर्च. बाळ्याचा खर्च परस्पर संगिताकडून होतोय म्हटल्यावर प्रदीप भाच्या पुतण्यांना मोठमोठी गिफ्ट देत असायचा.
"बाळ्याच्या जन्मापासून त्याचा सगळा खर्च, शाळेच्या मिटिंग्ज, दवाखाने सगळं मीच केलंय त्यामुळे आता त्याच्यावर अधिकार सांगू नका... त्याला स्वतःकडे ओढण्यासाठी घेतलेला मोबाईल आणि ॲडमिशन याव्यतिरिक्त एक रुपयाही त्याच्यावर कोणी खर्च केलेला नाही. त्यामुळे तो माझ्या सोबतच राहीलं हे माझ्याकडून फायनल आहे."
प्रदीप बाळ्याचा खर्च करत नव्हता हे कोणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनी प्रदिपकडे मोर्चा वळवला तसा प्रदीप कबूल झाला. आता तर संगिता अर्धी लढाई जिंकली होती.
"अगं पण असा नवरा सोडून वेगळं राहणं चांगलं नाही." कोणीतरी बोललं.
" मी नवरा सोडलेलाच नाही. तो माझ्यासोबत राहत नाही त्याला मी काही करू शकत नाही. हे भाड्याचं घर पण तो हो म्हणाला तेव्हाच कन्फर्म केलं होतं. आयत्यावेळी त्याने पलटी मारली. मी काहीच करू शकत नाही. माझा ह्या एवढ्याशा खोलीत जीव गुदमरून जातो. आज होईल उद्या होईल करत एवढी वर्षे सहन केलं पण आता लग्नाच्या अठरा वर्षांनंतरही जर परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत असेल तर मी काय करायचं सांगा..??" संगिताने जमलेल्या सगळ्यांना प्रश्न विचारला.
"मुंबईसारख्या ठिकाणी असं दाटीवाटीने राहावंच लागतं. आमच्या लहानपणी आम्ही सोळा जण राहायचो" एका नणंदेच्या नवऱ्याने म्हटलं.
"आणि आईचा काय विचार केलास गं..?? तिला नाही का वाटत आपल्या मुलांसोबत रहावं...?? लोकं काय म्हणतील..?? यांची सून नवऱ्याला सोडून वेगळी राहतेय.. कसं दिसतं ते..?? आम्हांला आईची काळजी वाटते म्हणून तुमच्या या भानगडीत पडलो.. " नणंदेने नवऱ्याला साथ देत म्हटलं...
"तुम्ही सोळा जण राहत होता ती खोली मोठी होती. वर पूर्ण पोटमाळा होता. बाहेर मोठी गॅलरी होती. त्यामुळे तिथे सोळा काय पंचवीस माणसे पण राहू शकली असती. आणि राहिला प्रश्न आईचा तर आम्ही जिथे राहू तिथे आई राहतील. पण त्यांनाच मोठ्या मुलाला सोडून राहायचं नाही त्याला मी काहीच करू शकत नाही..." संगिताने स्पष्टपणे सांगितलं.
" आईला सांभाळणं हे मुलांचं कर्तव्य असतं.... प्रदीपला ते करावं लागेल. " दुसरी नणंद म्हणाली.
संगिताने आपला मोर्चा नणंदेकडे वळवला.
"तुमच्याकडून कर्तव्य शिकण्याची मला गरज वाटत नाही. तुम्ही नवरा बायको वेगळे झालात. नालासोपाऱ्याला फ्लॅट घेतलात. सासु सासरे बिचारे चाळीत राहिले. सासरे वारले तसे सासूला गावी सोडलंत नेऊन. आणि रूम भाड्याने दिलीत. हे कोणतं कर्तव्य केलंत तुम्ही... तुम्ही तर एकच सूनबाई ना त्या माऊलीला. तिला नसेल वाटतं नातवंडामध्ये रहावं. स्वतःच्या सासूला सांभाळायचं नाही आणि वहिनीने मात्र तुमच्या आईला सांभाळायला हवं. हा कुठला न्याय. स्वतः सासुला सांभाळून दाखवा... मी मागचे तीन महिने सोडल्यास सासूला सांभाळतेच आहे. तुम्ही माझ्या संसारात लक्ष न घालता स्वतःचा संसार करा. म्हणजे माझा संसार सुखाचा होईल. मी माझं सासर नीट सांभाळत होते पण तुम्ही दोघींनी माझ्या संसारात नको तेवढं नाक खुपसलं. स्वतःचे संसार मनाप्रमाणे करता आणि वर आईचे आणि भावांचे कान भरता.. ??" संगीताला खुप राग आला होता. ती बोलतच होती.
"आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत ना मी इथे रहावं...?? तर ठीक आहे राहते मी इथेच. पण त्यासाठी एकच करा तुम्ही आज जेवढे सगळे मला जाब विचारण्यासाठी आलात ना.. त्या सगळ्यांनी आजपासून फक्त चार दिवस एकत्र या रूममध्ये राहून दाखवा. मी गेली अठरा वर्षे राहतेय. तुम्हांला चार दिवस राहायला हरकत नाही.. दुसऱ्याला सांगणं सोपं असतं पण स्वतः करणं कठीण. आणि हो समजावण्याची गरज मला नाही प्रदीपला आहे. "
संगीता एवढी वर्षे गप्प होती ते सगळं तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. तिने सरळ बाळ्याचा हात पकडला आणि चालू लागली. भाऊ तिच्यामागे चालत होता. नेहमी शांत असणाऱ्या आपल्या बहिणीला आज इतकं भडकलेलं तो पहिल्यांदाच पाहत होता. पण आई म्हणते तशी गरीब गाईची शेपूट पिरगळलीत तर तीसुद्धा शिंग मारते. इथे तर अठरा वर्षे घुसमट सहन केलेली बहीण होती.
आठवडा निघून गेला आणि रविवारी प्रदीप आणि सासुबाई संगीताच्या घरी आले. प्रदीपने मित्राची एक रूम चाळीतच होती ती वापरायला घेतली. त्याचं जे भाडं होणार होतं ते तो देणार होता. रुम लहानच होती पण निदान झोपा उठायला तरी निवांतपणा मिळाला असता. थंडीच्या रात्रीत ब्लॅडर फुल होऊन सकाळची वाट पाहावी लागणार नाही. नणंदांना चारचौघांत झापल्यामूळे त्या सरळ झाल्या होत्या. संगिता बैठकीतून निघून आल्यावर प्रदीपने शांत डोक्याने विचार केला होता. त्याचंही संगिता वर प्रेम होतंच. फक्त आई आणि बहिणींचं ऐकून संगिताला गृहित धरत होता. त्याच्या आता सगळं लक्षात आलं होतं. आई बहिणी काही आयुष्यभरासाठी सोबत करणार नाहीत. त्याने आईला नीट समजावून सांगितलं. सासुलाही पटलं होतं. कारण आजपर्यंत संगिता सासुशी कधी वाईट वागली नव्हती की उलटून बोलली नव्हती. खरंतर सासूसुनेत वाद नव्हताच फक्त मतभेद होत होते ते ही समजून न घेतल्यामुळे. किंवा मग ज्यांचं सगळं सुरळीत सुरू आहे त्यांचं ऐकल्यामुळे.
वाचकहो, नेहमीच सहन करण्यापेक्षा कधीतरी बोलून टाकावं. तर कधी नेहमीच बोलत राहण्यापेक्षा कधीतरी गप्प राहूनही पहावं. कदाचित नाती कळतील ही आणि जुळतील ही...
पण एक मात्र खरं ज्या नणंदा आपल्या सासुला सांभाळत नाहीत त्यांनी आपल्या वहिनीला शिकवण्याचा शहाणपणा करू नये... तेव्हा नणंदबाई तुम्ही तुमचा संसार करा... आणि वहिन्यांना त्यांचा करू द्या...
.
.
सध्या नात्यांची मालिका लिहितोय. आजुबाजुला खुप नाती पाहतोय. या मालिकेतून मुलगा, जावई, सून, सासू, नणंद, वहिनी या सगळ्या नात्यांच्या कथा जशा पाहिल्या ऐकल्या तशा किंवा त्यात थोडासा बदल करून लिहितोय. तुमच्या मतांचा नेहमीच आदर असेल... 🙏🙏
© Velvet Kavisha

2 Comments
मस्त. बोध पर
ReplyDeleteKhup sunder katha!!nananda astatach maherchya nako tya goshtit ugachach nak khupsaila
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box