#नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_४
©️ जया पाटील
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_18.html
मागील भागात आपण पाहीले देशमुख आणि देसाई दोघीही कुटुंबाच्या परस्परसंमतीने अभिनव आणि अंकिताचा साखरपुडा धामधुमीत पार पडतो. सगळेच खूप आनंदी असतात. जुलै मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडतो त्यामुळे तुळशीविवाह झाल्याशिवाय विवाह मुहूर्त नसतात.
कार्तिकी एकादशी झाली की लगेचच काही दिवसात लग्नाचा मुहूर्त काढून विवाहसोहळा आटोपून घेऊ असं दोघांच्याही घरातील जेष्ठव्यक्ती ठरवतात. साखरपुडा होण्याच्या आधी अंकिता आणि अभिनवचे फारसं बोलणं झालेलं नसतं.
अभिनवला अंकितासोबत वेळ घालवायचा असतो, तिला जाणून घ्यायचं असतं म्हणून तो तिला मेसेज करतो पण अंकिता त्याला उत्तर देत नाही. बरेच वेळा त्याचा कॉल उचलत नाही आणि उचलला तरीही अभिनव सोबत ती मोकळेपणाने बोलत नाही. अभिनव या सगळ्या प्रकारामुळे खूप चिंतेत पडतो. त्याला अंकिताच्या मनातील दुविधा दूर करायची असते. त्यामुळे तो तिला भेटायचं ठरवतो. सर्वप्रथम तर अंकिता अभिनवला भेटण्यास नकार देते पण नंतर थोडं समजावल्यावर ती अभिनवला भेटायला तयार होते. आता पुढे ....
ऑफिस सुटल्यावर आपण छत्रपती चौकात भेटूया असं अभिनव अंकिताला कळवतो. अंकिताही होकार कळवते. ऑफिस सुटल्यावर ते ठरलेल्या वेळेस ठरलेल्या ठिकाणी येतात. अंकिताचा ड्राइवर तिला छत्रपती चौकात उतरवतो. तिथून अंकिता अभिनव सोबत जाणार असतात. अभिनव देखील वेळेवर पोहोचतो.
" हाय अंकिता , जवळच्याच आकाश कॅफेला जाऊया का ..? म्हणजे फार उशीर होणार नाही आपल्याला आणि निवांत गप्पापण करता येतील." अभिनव अंकिताला म्हणतो.
" आकाश कॅफे ....ओह ..नो ...किती लोकल कॅफे आहे तो. अजिबात नाही. आपण सीसीडीलाच जाऊया. हवं तर तू बाईक इथेच पार्क कर. मी माझ्या ड्राइवरला सांगते आपल्याला ड्रॉप करायला.." अंकिता अभिनवला सांगते.
अंकिताच्या अश्या बोलण्याचं अभिनवला खूप वाईट वाटतं पण तरीही तिला दुखवायचे नाही म्हणून तो तिला काहीच बोलत नाही. दोघेही कॅफे मध्ये पोहोचतात. अभिनव अंकिताला तिच्या आवडीची कॉफी दोघांसाठीही ऑर्डर करायला सांगतो. दोघांचीही पहिलीचं भेट असते त्यामुळे एकमेकांसोबत नेमकं काय बोलायचं दोघांनाही सुचत नाही.
अंकिता तिच्या हाताच्या बोटांशी खेळत खाली मान घालून बसलेली असते. तिचा नर्वसनेस अभिनवच्या लक्षात येतो. अभिनवची देखील सेम फीलिंग असते. पण असं गप्प बसून कसं चालेल म्हणून तो बोलायला सुरुवात करतो.
" अंकिता , गेली कित्येक दिवस आपण सोबत आहोत. एंगेज आहोत पण अजूनही आपल्या दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी माहित नाही. मला सांगशील तुझ्या हॉबीज काय आहेत..? तुला नेमकं काय आवडतं..?तुझ्याबद्दल सांग. ..मला ऐकायला आवडेल .."
अभिनवने सुरुवात केल्यावर अंकिता बोलू लागते.
" मला मूवी पाहण्याची आणि फिरायची खूप आवड आहे. ट्रेकिंग करायला पण मला खूप जास्त आवडतं. लहानपणी जेव्हा आम्ही सगळे फिरायला जायचो तेव्हा मला प्रत्येक ऍडव्हेंचर करायचे असायचे पण तू अजून लहान आहेस म्हणून मला बाबा नेहमीच काही करू देत नसतं.
" तुला माहिती आहे , दोन वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही मालवणला फिरायला गेलो होते त्यावेळेस स्कुबा डायविंगसाठी जेव्हा मी समुद्राच्या आत गेले आणि मला पाण्याबाहेर यायला जरा उशीर झाला, तेव्हा तर आईने रडून रडून गोंधळ घातला होता. तिला समजावतांना बाबा आणि श्रेणिक दोघांच्याही नाकी नऊ आले होते. अगदीच पॅरासिलिंगच्या वेळेसही माझ्या काळजीने आईला चक्कर आली होती. आईला या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते पण मला मात्र खूप आवडतं हेच सगळं.."
"अरे वा...तू इतकी धाडसी असशील असं वाटत नव्हतं मला अंकिता ..छान ..मला पण आवडतात नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला..त्यातून नवीन काही शिकायला. तू माझा बेस्ट ट्रॅव्हलिंग पार्टनर असशील हे मात्र खरं. हो की नाही ...? दे टाळी ..."
अभिनवने टाळी देण्यासाठी अंकितासमोर आपला हात पुढे केला. अंकिताने त्याच्या हातावर टाळी दिली. अभिनवला झालेला हा तिचा दुसरा स्पर्श होता. त्यानंतर मात्र अचानक तिने आपला हात पटकन मागे घेतला. लाजली असेल असं अभिनवला मनातून वाटून गेले.
अभिनव आणि अंकिता दोघांच्याही बऱ्याच गप्पा रंगल्या. अंकिताने तिचे आवडते डेस्टिनेशन , हॉटेल्स, तिची शॉपिंगची आवड याबाबतीत सांगितलं. तिच्या सगळ्या बोलण्यातून पैशाचे प्रदर्शन होते आहे हे अभिनवला प्रकर्षाने जाणवलं. अंकिता एकसारखी बोलत होती.
अभिनवने हळूच विषय चेंज करायचा म्हणून ऑफिसच्या कामाचा विषय काढला. तो स्वतः कुठल्या टेकनॉलॉजीवर काम करतो त्याबद्दल माहिती सांगितली. अंकिताच्या कामाबद्दल जाणून घेतलं. अभिनवचा विविध क्षेत्रातील अभ्यास आणि त्याचे नॉलेज पाहून अंकिता खूप इंप्रेस झाली. तिने अभिनव कडून त्या नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अभिनवने देखील मोठ्या मनाने होकार दिला.
गप्पांमध्ये बराच वेळ निघून गेला. अभिनवने आता निघूया म्हणून अंकिताला सांगितले. अंकिताला घरी सोडून अभिनव त्याच्या घरी गेला. आजच्या भेटीवरून हळूहळू का असेना अंकिता मोकळी बोलेल असा अभिनवला विश्वास वाटला. त्याने याबद्दल शरदराव आणि सीमाताईंना देखील सांगितलं. अंकिता नवीन आहे. त्यामुळे तुमच्या नात्याला वेळ दे ,असा आईबाबांनी त्याला सल्ला दिला.
त्यानंतर देखील अंकिताचे विचित्र वागणे सुरूच होते. कधी वाटलं तर भरभरून बोलायचं आणि कधीतरी अगदीच तोडून फेकायचं पण हळूहळू सगळं सुधारेल असं म्हणून अभिनव सोडून द्यायचा. अश्यातच सणासुदीचे दिवस सुरु झाले. गणेशचतुर्थी जवळ आली. आपल्या होणाऱ्या सुनेचा पहिलाच गणपती म्हणून अंकिता आणि तिच्या परिवाराला सीमाताईंनी गणपती स्थापनेला आणि दर्शनाला आमंत्रित केले.
काही कारणामुळे अचानक शामकांतराव आणि शैलजाताईंना बाहेर जावे लागले त्यामुळे त्यांनी सीमाताईंना फोन करून तसे कळवायचं ठरवलं. शामकांतरावांनी सीमाताईंना फोन केला.
" ताईसाहेब , अंकिताचा बाबा बोलतोय ..माफ करा तुम्ही इतकं प्रेमाने आणि आदराने आम्हाला गणपती स्थापनेला बोलावलं पण खूप महत्वाचे काम आल्यामुळे मला आणि अंकिताच्या आईला बाहेरगावी जावे लागते आहे. त्यामुळे आम्ही येऊ शकणार नाही. मात्र अंकिताला आम्ही नक्कीच पाठवू. फक्त आमचे नेहमीचे ड्राइवरकाका उद्या रजेवर असल्यामुळे तिला पाठवायला थोडी अडचण येईल. तरी दुसरी काही सोय होते का ते मी पाहतो. "
शामकांतरावांना दिलासा देत सीमाताई म्हणाल्या ..
" तुम्ही अंकिताची चिंता अजिबात करू नका. मी अभिनव आणि त्याच्या बाबांना तिला आणायला पाठवेल. तुम्ही अगदी निश्चिन्त राहा. तुमचं काम आटोपलं की मग आमच्या घरी दर्शनासाठी या. "
सीमाताईंनी आश्वासन दिल्यामुळे शामकांतराव अगदी निश्चिन्त झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या काही वेळ आधी अभिनवने अंकिताला फोन केला..
"अंकिता मी आणि बाबा तुला घ्यायला येतो आहे. तयार राहशील. आपण लगेचच निघूया. योग्य मुहूर्तावर गणपती बाप्पाची स्थापना व्हायला हवी ना ... "
" अभिनय ,नको मी येईल ड्राइवर काकांसोबत .
तू नकोस येऊस मला न्यायला...मी इंडिपेंडंट आहे. सो माझी मी येईल ..."
" अग हो अंकिता ..आय नो ..तू इंडिपेंडंट आहेस पण आज तुमच्या नेहमीचे ड्राइवर काका नाहीत म्हणून बाबांनी आम्हाला सांगितलं. अनोळखी माणसावर कसा विश्वास ठेवायचा म्हणून ..बाकी काही नाही. चल तयार हो. निघतो आम्ही .."
" मी नाही सांगितलं ना ...मला न्यायला येऊ नको. माझी मी येईल. बाय ..."
इतकं बोलून अंकिताने फोन कट केला. अंकिताच्या या वागण्याचा अभिनवला खूप राग आला. पण तरीही त्याने आपला राग त्याच्या आईबाबांच्या लक्षात येऊ दिला नाही.
थोड्याच वेळात गाडी आणि ड्रायवर घेऊन ती अभिनवच्या घरी आली. अभिनव तिच्यासोबत जास्त काही बोलला नाही. पूजा झाल्यावर अंकिता घरी निघून गेली. एकदोन दिवसांनी तिने अभिनवला फोन केला. सगळा राग विसरून अभिनव तिच्यासोबत पुन्हा छान बोलू लागला.
गणपतीच्या दिवसात अंकिताने दारापुढे सुंदर रांगोळी काढली. त्याचे फोटो तिने अभिनवला पाठवले. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगी सुद्धा इतकी सांस्कृतिक आणि क्रिएटिव्ह असू शकते याचं अभिनवला खूप कौतुक वाटलं.
त्याने रांगोळीचे सगळे फोटो सीमाताईंना नेऊन दाखवले. त्यांना देखील अंकिताचे खूप कौतुक वाटले. त्यांनी फोन करून तिचे कौतुक करायचे ठरवले. सीमाताईंनी अंकिताला फोन केला..
"अंकिता , बाळा आताच अभिनवने तू काढलेल्या रांगोळीचे फोटो दाखवले. किती सुंदर रांगोळी काढतेस तू ..तुझ्यातल्या आणखीन एका नवीन गुणाची-कलेची ओळख झाली आम्हाला...अशीच आनंदी राहा. तुझे आवडते छंद जोपासत राहा. "
अंकिताने सीमाताईंना थँक्यू म्हणून फोन ठेवला आणि लगेच थोडा वेळात अभिनवला खूप रागात फोन केला. ती खूप चिडलेली होती.
"हॅलो अभिनव, आजही तू इतका आईच्या आज्ञेत असशील असं वाटलं नव्हतं मला. अजूनही आईच्या पदराखालीच वावरतो आहेस तू. आपल्या दोघांमधल्या प्रायव्हेट गोष्टी तू तुझ्या आईला का सांगितल्या ..? "
" अग अंकिता , इतकं चिडायला काय झालं. तू काढलेल्या रांगोळीचे फोटो तर दाखवले मी आईला. त्यात इतकं चिडायला काय झालं...? मला कौतुक वाटलं तसे तिलाही कौतुक वाटेल तुझं म्हणून आईला दाखवलं. त्यात प्रायव्हेट असं काय आहे ..? "
अभिनव अंकिताला शांत करत म्हणाला पण अंकिता काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. अभिनव तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ती काहीच ऐकून घेत नव्हती. तिच्या मनाला वाटेल ते बोलून शेवटी तिने फोन ठेवून दिला. अभिनवला पण तिचा खूप राग आला. जगात कोणाचाही अपमान मी सहन करू शकेल पणा माझ्या आईबाबांचा मात्र नाही. त्यांची काहीच एक चुकी नसताना तर मुळीच नाही. आता अंकिता स्वतःहून बोलल्याशिवाय मी तिच्यासोबत स्वतःहून बोलणार नाही. तिला माफ करणार नाही असं तो मनोमन ठरवतो.
अंकिता स्वतःहून अभिनवला फोन करेल का ..?
अभिनव अंकिताला माफ करू शकेल का .?
अंकिताच्या अशा विचित्र वागणुकीमागे काही कारण असेल का ..?
अभिनव आणि अंकिताच्या नात्याचं भविष्य काय असेल ..?
हे सगळं जाणून घेण्यासाठी एकाच नाण्याची दुसरी बाजू या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
क्रमश :
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
या कथेचा एक भाग रोज सकाळी अकरा वाजता आमच्या " Velvetkavisha-वेलवेटकवीशा" या फेसबुक पेजवर प्रकाशित होईल. सगळ्यात आधी नवीन भाग वाचण्यासाठी आमच्या या पेजला लाईक आणि फोल्लो करायला विसरू नका.
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Instagram
✍©️ जया पाटील
1 Comments
खूपच छान
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box