!! रेडिओ !!
राजू घाडगे, पुणे
भागू शेणाची पाटी भरून उकिरड्यावर टाकायला गेली तेव्हा तांबडं चांगलंच फुटलं होतं. खिंडीतून पूर्वेचा सूर्य डोकावू पहात होता. कोंबड्यांच्या बाग देण्याच्या स्पर्धा लागल्या होत्या. म्हशी येरडीवर सुटल्या होत्या. इकडं तिकडं हुंगत फिरत होत्या. दामूअण्णा मेंढरं घेवून डोंगराकडं निघाला होता. त्याचं काळं कुत्रं ऐटीत सगळ्या मेंढ्यांना रस्ता दाखवत सगळ्यांच्या पुढं चाललं होतं. भागुनं शेणाची पाटी उकिरड्यात टाकली आणि खाली बसून शेणानं भरलेला हात दुसऱ्या हातात माती घेवून साफ करू लागली. दामूआण्णा खोरी आड होईपर्यंत पाठमोऱ्या त्याच्याकडं पाहत राहिली.
परत आली तर आंघोळीच्या दगडावर बसून सोपाना पाण्याचं घंगाळं येण्याची वाट बघत होता. त्यानं सदरा काढला होता आणि तो नुसत्या चट्टेरी पट्टेरी चड्डीवर होता. खिंडीतून वर आलेल्या सूर्याच्या किरणांनी त्याचं गोरं अंग चमकत होतं. भागूला भुलवत होतं.
तिनं घरात पाहिलं तर शेवंतानं चुलीवर चहा ठेवला होता.
"मी दिवू का पाणी आंघोळीला?" भागुनं तिला विचारलं आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता बाहेरच्या चुलीवरचं घंगाळं काढलं आणि सोपाना समोर नेवून ठेवलं.
"इसान घालू का बघा हात घालून?" तिनं त्याला विचारलं.
"नकु. बरोबर हाय." सोपाना तिच्याकडं बघत म्हणाला.
'पाठ घासू का?' असं त्याला विचारण्याचा तिला मोह झाला. विचारू का नको या संभ्रमात ती काही वेळ तिथंच उभी राहिली. तोंपर्यंत त्यानं अर्धं घंगाळं संपवलं होतं. मग तिनं मोह टाळला.
तो नेहमी जेंव्हा जेंव्हा आंघोळीला जायचा तेव्हा ती नेहमी आसपास घुटमळत राहायची. काही ना काही निमित्ताने त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायची. त्याचं गोरं गोरं सर्वांग खसखसा साबण लावून धुवून काढावं, अंग पांढऱ्याशुभ्र टॉवेलने पुसून घ्यावं, पॅराशूट तेल लावून केसाचा कोंबडा पाडावा असं तिला वाटत राहायचं. कधी ना कधी हे प्रत्यक्षात उतरेल याची तिला आशा होती.
ती खरं तर त्याची मेहुणी. शेवंताची मोठी बहीण. गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याकडे राहत होती. छोट्या बहिणीचा संसार करत होती. वयाने चाळिशी ओलांडली तरी चेहरा आणि कांती टवटवीत होती. त्यामानानं शेवंता निस्तेज होती.
शेवंता चहा घेवून बाहेर आली. सोपाना आंघोळ उरकून बाजेवर बसला होता. तंबाखू मळत होता.
"तंबाखू कशाला आत्ता. चहा ढोसा." शेवंता खेकसली तशी सोपानानं बाजूला पडलेली काठी उचलली आणि तिच्यावर उगारली. त्याचा रुद्रावतार पाहून शेवंता आत पळाली. मशेरी लावत असलेल्या भागुला तेवढयातही हसू आलं आणि ती चुळ भरून शेवंता पाठोपाठ घरात शिरली.
शेवंताची बडबड चालूच होती. तिची कालवा ऐकून सोपाना चहा पीत पीत बाहेरूनच ओरडला.
"यिवु का आत? चांगली फोडून काढीन मंग!"
"गप की दोडा. गप्प बसायला काय घिशील? का खायाचाय मार?" भागूनं बहिणीला ढोसली. मग ती गप्प बसली.
सोपाना खरंच राग अनावर झाला की शेवंताला मारायचा. जास्त नाही पण एक फटका तरी द्यायचा. तिला तेवढंच पुरेसं व्हायचं. मग बराच वेळ ती मुसमुसून रडत राहायची. मग भागू तिला समजवायची आणि शांत करायची.
शेवंता होतीच तशी. तिचा दिमागाचा स्क्रू जरा ढिला होता. सगळं गाव तिला 'बोंगाडी शेवंता' या नावानेच ओळखायचं. तिच्या पहिल्या बाळंतपणात भागू तिच्या बरोबर जी इकडं आली ती तिथंच राहिली. तिला संसारात मदत व्हावी म्हणून.
शेवंता आणि सोपाना शेतात राब राब राब राबायची. चांगली आठ दहा एकर शेती होती. पण भागू कधी रानात जायची नाही. सोपानाच तिला येवू देत नसायचा. 'पाव्हण्या तुमी. कशापायी रानात येता? गाव शाण घालील की तोंडात!" तो म्हणायचा. पाव्हणी म्हणून मान राखायचा. तिच्याशी अदबीने वागायचा. तसा तो शेवंताशी पण नीट वागायचा. पण तिनं चिढवलं की मग तो रागाला यायचा. एरवी तो खूप साधा सरळ माणूस होता.
आणि हाच त्याचा गुण भागुला मोहात पडायचा. संध्याकाळी सोपाना शेतातून आला की त्याला पाय धुवायला पाणी आणून देणे, टॉवेल देणे इत्यादी गोष्टी ती आनंदाने करी. त्याला बोटवं आवडायचं. आठवड्यातून एकदा तरी हमखास ती बोटवं करायची. निम्मित असायचं शेवंताच्या पोरांसाठी केलंय म्हणून पण असायचं सोपानासाठी. तो समरसून खाताना ती त्याच्याकडे बघत राहायची.
ती आत्ता बहिणीच्या संसारात बऱ्यापैकी रुळली होती. तिचा संसार तिनं चांगलाच वठवला होता. शेवंताची तिन्ही बाळंतपणं सहजपणे निभावली होती. शेवंता आणि सोपाना रानात गेल्यावर ती रेडिओ लावून किडुक मिडुक कामं करत राहायची. तिनं घराबाहेर बऱ्यापैकी झाडं लावून बाग फुलवली होती. रेडिओ बरोबर दुपारचं तेच तिचं करमणुकीचं साधन होतं.
तिन्ही मुलं आणि त्या दोघी आत झोपायच्या. सोपाना बाहेर सोप्यात बाजेवर झोपायचा. कधी छोटा मुलगा अर्जुन त्याच्याबरोबर बाहेर असायचा. निजानीज झाल्यावर एखाद्या रात्री दाराची कडी उघडुन तो आत यायचा आणि शेवंताच्या बाजूला झोपायचा. शेवंताची झोप कडक होती. ती लगेच घोरायला लागायची पण भागुचं तसं नव्हतं. थोड्याशा आवाजाने पण ती जागी व्हायची. तो आत आलेला तिला लगेच कळायचं. पण ती निपचित पडून राही. कसलाही आवाज न करता.
बरेचदा तो काम आटोपून लगेच निघून जायचा. सुरुवाती सुरुवातीला तो मधला काळ तिला असह्य व्हायचा. पण नंतर नंतर ती त्यात समाधान मानू लागली. चिडीचूप शांततेत शेवंताचं नितांत आनंदानं चित्कारणं ती आपलं मानू लागली. त्याच्या छातीच्या ठोक्यांचा, वरखाली होणाऱ्या श्र्वासाचा आवाज तिला आनंद देवू लागला. त्यांचा परमोच्च आनंदाच्या क्षणांचा शेवट तिला स्वर्ग सुखासारखा वाटू लागला.
कधीकधी शेवंता त्याला झिडकारायची. दूर ढकलायची. अशा वेळी एक तर तो तिचं तोंड दाबून ठेवून क्षण गाठायचा किंवा चिडून निघून जायचा. अशा वेळी तिला वाटायचं, उठावं, त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या स्वाधीन व्हावं! त्याला स्वर्गीय सुखात मनसोक्त डुंबवावं! मग ती मनातल्या मनात कुढत राहायची. दुसऱ्या दिवशी त्याचा पडलेला चेहरा तिला बघवेनासा व्हायचा.
एक दिवस शेवंताला शिवायचं नव्हतं म्हणून सोपाना बरोबर भागू रविवारच्या बाजाराला गेली होती. सायकल वर मागं बसून त्याचा होणारा स्पर्श तिच्या तनमनात रोमांच फुलवत होता. संपूर्ण दिवसभर ते दोघं बाजारात फिरत होते. भाजीपाला, फळं इत्यादींची खरेदी झाल्यावर दोघांनी उसाचा रस प्यायला. तो संगतीला असल्यानं म्हणा किंवा खूप दिवसांनी पित असल्यानं रस तिला खूपच गोड लागला. अजून एक ग्लास प्यावा असं तिच्या मनात आलं. पैसे देवून बाहेर आल्यावर तशी ती मनातून खट्टू झाली पण दाखवलं नाही. थोडं पुढं आल्यावर तोच म्हणाला.
"वहिनी, आजुन एक गलास प्या की. चला."
तिची मुक संमती होतीच. दोघं अजून एक ग्लास प्यायले. तो पैसे द्यायला गेला. त्याच्या अजून थोडा रस शिल्लक होता. त्याची नजर चुकवून तिनं तो तोंडाला लावला. त्याच्या अप्रत्यक्ष ओठाच्या स्पर्शाने ती मोहोरून गेली! तो दिवस संपूच नये असं तिला वाटलं. त्याच्या हातात हात घालून नवरा बायको सारखं सर्व बाजार भर फिरावं असं तिला राहून राहून वाटलं. पण तो तिच्यापासून अंतर ठेवून चालत होता. नंतर कित्येक दिवस तो उसाचा ग्लास तिच्या मनाला साथ देत राहिला.
सोपाना आणि शेवंता रानात गेली, पोरं शाळेला गेली की मग आपल्या इतर कामात रमायची. साफसफाई करून झाली की बागकाम करायची. त्यात तिच्या साथीला रेडिओ असायचा. मग कुठे बातम्या लाव, गाणी लाव असं करत ती रेडिओची स्टेशन बदलत राहायची. मुंबईच्या बातम्या लागल्या की ती कान देवून ऐकत राहायची. न जाणो का पण तिला मुंबईचं खूप आकर्षण होतं. तिला लग्नासाठी बघायला जो मुलगा आला होता तो मुंबईत राहत होता. तिनं मुंबईची खूप स्वप्नं रंगविली होती. पण तिचं दुर्दैव आडवं आलं. आदल्या दिवशी हळदी झाल्या. दुसऱ्या दिवशी लग्न लागलं. रात्री परत जाताना ड्रायव्हरचा ताबा सुटून घाटात ट्रक झाडावर आदळला. पुढे बसलेली ती वाचली पण नवरा अपघातात गेला.
कोरेगावच्या पोलिस स्टेशनला ट्रक लागला. तिथून तिचं सासर अवघं पाच किलोमीटर. पण पांढऱ्या पायाची म्हणून सासरच्यांनी तिला घरी घेवून जाण्यास नकार दिला. लग्न झालेली ती सासरचा उंबरा न चढताच परत माहेरी आली.
कधी कधी त्या आठवणी तिला नकोशा व्हायच्या. जिवाभावाच्या शेवंताला सांगाव्या तर तिला समज कमी. मग तिनं रेडिओ जवळ केला. तोच तिचा साथी बनला.
तो साधारण १९८४-८५ चा काळ होता. बुधवारी दुपारी रेडीओवर हिंदी गजलचा कार्यक्रम असायचा. ती नितनेमाने तल्लीन होवून ऐकत राही. त्यातले शब्द नाही कळाले तरी भाव आणि आर्तता तिच्या काळजाचा ठाव घ्यायची.
'दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिए !
बस एक बार मेरा कहा मान लीजिए!'
ही गजल ऐकताना तिच्या अंगावर रोमांच उठायचे. बरेचदा हे गाणं ती गुणगुणायची.
शेवंता तेव्हा चाळिशीत होती. एक दिवस शेवंताच्या पोटात अचानक दुखू लागलं. पोटाची गोळी खाल्ली, कडुलिंबाचा पाला घेतला, गरम विटेने पोट शेकलं तरी दुखायचं काही कमी होईना. दोन तीन दिवस दुखणं चांगलंच बळावलं. कोरेगावच्या दवाखान्यात नेलं तर त्यांनी सातारला कॅन्सरची टेस्ट करायला सांगितलं. शेवंताला कुणी काही कळू दिलं नाही. मनातून सोपाना मात्र हादरला.
टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. फक्त गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय झाला. शेवंता घाबरली पण भागूनं तिला धीर दिला. ऑपरेशन होईपर्यंत दहा दिवस येवून जावून छोट्या बहिणीची सेवा केली. सकाळी झाडलोट करून स्वयंपाक बनवून सोपाना जवळ देणं, दिवसभर घरातली कामं उरकणे, संध्याकाळी परत जेवण बनवून पुसेगावला दवाखान्यात जाणे, तिथं रात्रीचं राहून बहिणीची सेवा करणं इत्यादी कामे तिने आनंदाने केली.
ऑपरेशन सुरळीत पार पडलं आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. शेवंता एका मोठ्या जीवघेण्या आजारातून बचावली होती. ऑपरेशन नंतर दोन दिवसानंतरची गोष्ट.
उद्या डिस्चार्ज मिळणार म्हणून त्यांच्या दोन मुलांनी, अर्जुन आणि अलका यांनी आम्ही आज दवाखान्यात राहतो म्हणून हट्ट धरला. त्यांना तिथं सोडून सोपाना व शेवंता घरी आले. येताना वाटेत सोपाना भलताच खुश होता. वारंवार देवीला हात जोडून संकटातून सोडवलं म्हणून आभार मानत होता. तिची तारीफ करत होता. शेवंता किती साधी भोळी सरळ आहे ते भागूला रंगवून रंगवून सांगत होता. त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. भागू पण बहीण सुटली म्हणून देवाचं आभार मानत होती.
दोघे घरी पोहोचले तेव्हां कडूसं पडलं होतं. भागूने चहा करेपर्यंत सोपानाने जनावरांना चारा पाणी घातलं. दोघांनी मग चहा घेतला. धाकली लेक विठाबाई तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला व झोपायला गेली होती.
सोपाना आज खूपच खुश होता. तिनं त्याला आणखी खुश करण्यासाठी त्याचं आवडतं बोटवं केलं होतं आणि भजी तळली होती. जेवायला बसल्यावर बोटव्यामध्ये गूळ घालताना आणि खाताना ती त्याच्याकडे कौतुकाने बघत होती.
जेवणं उरकली आणि सोपाना जनावरांना खावू घालायला गेला. भागू पहिल्यांदाच संसार सुख अनुभवत होती. शेवंताच्या जागी स्वतःची कल्पना करत होती. भांडी घासताना आणि निजेपर्यंत जणू ती हवेत तरंगत होती!
थंडीचे दिवस होते. तिनं अगोदर स्वतःसाठी अंथरूण घातलं. दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं तर सोपाना चूळ भरून बाजेवर झोपायच्या तयारीत होता. तिच्या काय डोक्यात आलं कुणास ठावूक. तिनं परत अंथरूण उलगडून नेहमी सारखं मोठं केलं, दोन उशा बाजुबाजुला लावल्या!
हळूहळू घरोघरीचे कंदील मंदावत गेले. अर्धचंद्र बाहेर डोकावू लागला. त्याचा मंद उजेड आसमंतात भरून राहिला. भागू अंथरुणावर पडली पण तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कसलीतरी अनामिक हुरहुर लागुन राहिली होती. बाहेरचा काळोखातील झाडांच्या पानांची सळसळ, कुठून तरी कुत्र्यांचं ओरडणं, दावणीच्या जनावरांचा आवाज तिला स्पष्ठपणे ऐकू येवू लागली. छातीची धडधड वाढली. दरवाज्याच्या कडीच्या आवाजासाठी कान आतुर झाले. तिची पाळी नुकतीच संपून गेली होती. एरव्ही नाही पण आज तिचं अंग अंग बंड करून उठलं होतं. आज, फक्त आजच काहीतरी घडावं आणि शरीराला शांती मिळावी असं तिला राहून राहून वाटत होतं. एकच, फक्त एकच वेळ यावी आणि उशिरा का होईना आयुष्यातला पहीला परमोच्च सुखाचा अनुभव मिळावा यासाठी ती मनोमन देवाचा धावा करत होती. आड्याकडं पाहता पाहता ती मधून मधून दरवाज्याकडे पाहत होती.
अशा अवस्थेत दोन तीन तास गेले. रात्र गडद होत चालली होती. बाहेर गार वारा सुटला होता. जनावरांचे आवाज जरी बाद झाले होते तरी आंब्याच्या पानांची सळसळ वाढली होती. भागुची बेचैनी वाढली. अंथरुणात तळमळत राहिली. मनाचा हिय्या करुन ती उठली आणि दरवाज्याच्या फटीतून बाहेर पाहिलं. सोपाना बाजेवर पहुडला होता. नेहमी घोरणारा माणूस आज मात्र शांत होता. ती बराच वेळ त्याला पाहत तिथंच उभी राहिली.
तो या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. तो पण जागाच होता. दरवाजाला बाहेरून कडी होती. दरवाजा तोडून बाहेर जावं, त्याला घट्ट मिठी मारावी, चुंबनांच्या वर्षावात त्याला न्हावून काढावं, त्याच्या स्वाधीन व्हावं, त्याला पूर्ण प्रहर चरमसुख द्यावं, आपला आत्मा शांत करावा असं वाटलं. पण तसं करण्याची मुभा समाज देणार नव्हता.
भागू परत अंथरूणाकडे वळली. निपचित पडली पण पाठेला जमीन टोचू लागली. उशीतून काटे डोकावू लागले आणि तिची झोप उडवू लागले. दोन एक तास असेच गेले. अस्वस्थ होवून तिने उठून परत दरवाज्याच्या फटीतून बाहेर पाहिलं. सोपाना उठून बसला होता आणि दरवाजाकडेच बघत होता. 'त्यानं मला पाहिलं की काय?' तिला शंका आली आणि घाबरून परत अंथरुणावर जावून पडली. विचार करू लागली.
आत्ता अवघं शरीर बंड करून उठलं होतं. तिला राहवत नव्हतं. 'त्याची पण तीच अवस्था असेल का? म्हणून त्याला झोप येत नाही का?' हा विचार तिला छळू लागला. गेला महिनाभर दुखण्यामुळे शेवंता पडूनच होती. अजून जखम भरून यायला वेळ लागणार होता. 'त्याच्या पण मनात माझ्यासारखेच विचार येत असतील का? म्हणूनच तो दरवाजाकडे बघत असेल का? तो पुढाकार घ्यायला घाबरत असेल का?' तिच्या मनात आलं.
'आत्ता नाही तर कधीच नाही.' तिचं एक मन बोललं. ती मनाचा हिय्या करून उठली. केस बांधले. पदर खोचला आणि दरवाज्याकडे गेली. 'अगं हे बरोबर नाही.' दुसरं मन तिला मागे ओढत होतं. पण तिला ऐकायला धीर होता कुठे?
धडधडत्या काळजाने तिने फटीतून पाहिलं तर तो अजूनही बसला होता. वाजवू की नको या गोंधळात तिनं धीर करून कडी वाजवली.
सोपाना उठला आणि त्यानं कडी उघडली.
"का झोप येत न्हाय का वहिनी शेवंता न्हाय म्हणून?" त्यानं विचारलं. भर थंडीतही ती आतून घामाघुम झाली होती.
"आवं मला पण कवापसनं झोप यिना बघा. शेवंता दिसतीया म्होरं! या बाहेर झोप येत नसल तर." तो म्हणाला आणि बाजेवर जावून बसला. तंबाखूची चंची काढून मळू लागला.
तिच्या काळजाची धडधड हळूहळू कमी व्हायला लागली. ती बाजे जवळ जावून खाली बसली.
"लय भोळी शेवंता. लग्नाच्या अगुदर बघितली न्हवती. वाडवडीलांनी पसंद किली. आपण कसं न्हाय म्हणायचं!" तंबाखू तोंडात टाकत तो म्हणाला. "गोरी पान म्हणून मला पण आवडली आणि बघा तिचा भोळेपणा आजुन आवडतू. ऊद्या डीचार मिळल. कटाळली दवाखान्यात. घरी आली की परत घर भरंल."
तिला अवघडल्यासारखं झालं. तिनं उगी हाताची चुळबुळ केली. गोठ्याकडं पाहिलं. म्हैसी रवंथ करत होत्या आणि त्यांच्याकडेच पाहत होत्या.
"लगीन झालं आणि केली की हिनं सोंगं सुरू. किंचाळायची काय, काय बोललं तर खसकन अंगावर यायची. तिचं डोस्कंच उलटं चालायचं." त्यानं एकवार तंबाखू थुंकली आणि डोंगराच्या कड्याकडं बघत पुढं म्हणाला. "लय काळजीत पडलू. माझा संसार इस्कटतू की काय आसं भ्या वाटायला लागलं. सगळी भावकी, गाव आमच्या संसाराला नावं ठेवायला लागलं. तिचं बाळातपण आलं, तुमी आला संगतीला हिथं आन सारंच बदललं बघा." तो भावूक झाला.
ती शांत बसून राहिली. सारं वारं फिरलं होतं.
" तुमी देवासारखं धावून आला आन मला भरून पावलं. पाहुण्या माणसानं माझा संसार सावारला. पोरा बाळांना शिस्त लावली. आम्हाला माणसात आणलं. शेवंताला आधार दिला. कुटली आपेक्षा न्हाय, कुठली मागणी न्हाय, रुसणं न्हाय. बहिणीच्या संसारात स्वतःला गाडून घेतलं." तो सद्गदित झाला. त्यानं एकवार डोंगरावरच्या लक्ष्मी आईला हात जोडले, उठला आणि तिला काही कळण्याच्या आत तिच्या पायावर डोकं ठेवून लहान मुलासारखा रडू लागला. ती दचकून मागं सरकली!
"नका मागं सरकू. मला पायावर घ्या. देवाच्या वरचं हाय तुमी आम्हासाठी." त्याचे अश्रू तिच्या पायावर ओघळले. तिनं ते तसेच राहू दिले आणि त्याच्या केसांत हात फिरवून मायेनं गोंजारू लागली.
थोडा भर ओसरल्यावर तो म्हणाला. "इतक्या दिस तुमास्नी सांगीन सांगीन म्हणतूय पर धडाच होत नव्हता. कधी एकदा तुमचे आभार मानायचे त्याचा मोका बघत हुतू. आज त्यो दिस चालून आला. कधीपासनं तुमाला सांगायची इच्छा झाली पण कडी उघडणार कसा? तुमाला काय बरं वाईट वाटलं तर? त्यो दोष मला अंगावर घ्याचा नव्हता. म्हणून मी तळमळत हूतू."
"आत्ता मन हालकं झालं बघा." तो परत बाजेवर जावून बसला. तिच्या डोळ्यांतून आत्ता अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. "तुमास्नी कधी काय लागलं तर बिंदास सांगत जावा. जशी शेवंता तशा तूमी. मरेस्तोवर तुमच्यासाठी जगीन. तुमच्या इज्जतीवर डाग लागून देणार न्हाय!" तो भावनिक होवून बोलला.
मध्यान्ह प्रहर संपून पहाट जवळ येवू पाहत होती. थंड हवा सुटली होती. पानांची सळसळ अजून वाढली होती. तिच्यात एक वेगळं चैतन्य येवू घातलं होतं.
थोड्या वेळात तो घोरू लागला. ती घरात आली. नुसता दरवाजा लोटून घेतला. रांजणातून पाणी घेवून बादली भरली. मोरीत जावून ते पाणी कपड्यासह डोक्यावर बदाबदा ओतून घेतलं. एवढ्या थंडीतही गार पाण्यानं ती शहारली नाही. तशीच ओलेत्या कपड्यांवर ती अंथरुणावर पडली आणि झोपी गेली. तिचं शरीर आणि आत्मा तृप्त झाले होते. वाईट विचार थंड पाण्याबरोबर स्वाहा झाले होते! एका नव्या दिशेचा शोध तिला लागला होता.
तांबडं चांगलंच फुटलं होतं. उकिरड्यावरून शेणाची पाटी टाकून परतत असताना येरडीला आलेली म्हैस शेतात शिरलेली तिने पाहिली. 'खावू दे. किती खाईल?' ती स्वतःशी पुटपुटली. दामूअण्णा खोरी आड होईपर्यंत पाठमोऱ्या त्याच्याकडं पाहत राहिली.
परत आली तर सोपाना आंघोळीच्या दगडावर बसला होता. तिनं गरम पाणी त्याला काढून दिलं. खिंडीतून वर आलेल्या सूर्याच्या किरणांनी त्याचं गोरं अंग चमकत होतं.
"पाठान घासू का?" ती म्हणाली.
"घासा की!" म्हणत त्यानं साबण त्याच्याकडं दिला.
आंघोळ झाल्यावर तिनं त्याला चहा दिला. शेवंता दवाखान्यातून परत येणार म्हणून सोपाना भलताच खुश होता तशी भागू ही खुश होती.
त्यानं फटफटीला किक् मारली आणि निघून गेला. ती बाहेर आली. रेडिओ चालू केला. गाणं गुणगुणत झाडलोट करू लागली. विविध भारती वर गाणं लागलं होतं. ती तिथंच थबकली.
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार!
किसी का दर्द मिल सके तो ले उधार!
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार!
जीना इसी का नाम है!
गाणं संपल्यावर तिनं खाली ठेवलेला झाडू उचलला आणि परत झाडलोट कार्याला लागली!
राजू घाडगे, पुणेdisclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
2 Comments
चांगल वळण दिलंय कथेला. आवडली.
ReplyDeleteअनपेक्षित पण चांगला शेवट!
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box