युगायुगांचे नाते अपुले ३

 #युगायुगांचे_नाते_अपुले_भाग_३


©️जया पाटील 



भाग एक आणि दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

👉  युगायुगांचे नाते अपुले भाग एक

👉  युगायुगांचे नाते अपुले भाग दोन


" माझी लेडी रॉकस्टार मिहिका आजकाल इतकी शांत शांत का ..? ही मिहिका गोड नाही वाटत. "


मिहीकाचा बाबा नितेश तिला समजावणीच्या सुरात बोलत होता.


" डॅड , मी नाही जगू शकत समीर शिवाय पण तो का समजून घेत नाहीये मला ..?"


" त्याला आपण दोघेही सोबत राहूया म्हणून किती वेळा सांगितले पण लग्न मात्र नको. कारण लग्न म्हणजे कर्तव्य , नाती ..फक्त इतकेच..."


"लग्न म्हणजे फक्त एक सफोकेटिंग बंधन , म्हणून मला लग्न नकोय."


" लहानपणापासून मी अमेरिकेत मोठी झालीय. इकडे कितीतरी लोक लग्न न करताही एकत्र राहतात. ज्यावेळी त्यांच्यातील म्युच्युअल अंडरस्टँडिंग संपते त्यावेळी ते अगदी सहज वेगळे होतात. कुठल्याही नात्यात गुंतून न राहता देखील स्वतःचे आयुष्य खूप आनंदाने जगतातच ना .."


" हेच सगळे मी समीरला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय पण तो मात्र ऐकायलाच तयार नाहीये. तो असे का वागतोय तेच समजत नाहीये डॅड मला .." 


" मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय...."


मिहिका अमेरिकेत राहणारी तेवीस वर्षीय तरुणी. तिचा बाबा नितेश ती नऊ वर्षाची असताना करियर करण्यासाठी तिला अमेरिकेत घेऊन निघून गेला. मिहिकाची आई मिनाक्षी मात्र तिच्या आईला आणि नितेशच्या आईबाबांना सोडून जाण्यासाठी तयार झाली नाही. नितेशने मात्र त्याच्या उत्तम करियर घडविण्याच्या महत्वाकांक्षेला महत्व दिले.


मिहिका तिच्याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या समीरच्या प्रेमात पडली. समीरने तिला लग्नासाठी प्रपोज केले. पण मिहिकाने मात्र लग्नासाठी नकार दिला आणि त्याला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास सांगितले. मिहिकाच्या अश्या मागणीमुळे समीर मात्र दुखावला गेला.  


समीरला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य नसल्यामुळे तो मिहिकाला सोडून निघून गेला. समीरला गमावल्यामुळे मिहिका नाराज होती. तिचे समीर वर खूप प्रेम होते म्हणूनच मिहिकाला समीर तिच्या आयुष्यात परत हवा होता परंतु त्याच्यासोबत लग्न करणे मात्र त्याला मान्य नव्हते.  


मिहिकाला कसे समजवावं हा खूप मोठा प्रश्न मिहिकाच्या बाबासमोर म्हणजेच नितेशसमोर उभा राहिला होता. चौदा वर्ष मिनाक्षीपासून दुर राहून खऱ्या प्रेमाची , कर्तव्याची , नात्याच्या बंधनांचे महत्व त्याला जाणवू लागले होते. त्याने जी चूक आयुष्यात केली ती मिहिकाने करू नये असेच त्याला वाटत होते. मात्र मिहिका त्याचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्याला कारणही तसेच होते.  


नितेशने स्वतःच्या आयुष्यात त्याच्या करियरला त्याच्या आईबाबांपेक्षा , त्याच्या बायको पेक्षा अर्थातच मिनाक्षीपेक्षा नेहमीच जास्त महत्व दिले होते. नितेशनेच स्वतः असा आदर्श मिहिकासमोर घालून दिल्यानंतर मिहिकाकडून अजून काही वेगळे वागण्याची अपेक्षाच तो करू शकत नव्हता.


आपल्या लेकीला ह्या सगळ्या गोष्टींचे महत्व कसे समजवावे ही सगळ्यात मोठी विवंचना नितेशपुढे उभी ठाकली होती.


दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. मिहिका  पुन्हा पुन्हा समीरला भेटण्याचा प्रयत्न करत होती. त्याला वारंवार फोन करून समजवण्याचा प्रयत्न करत होती परंतु समीर मात्र तिची कुठलीच गोष्ट ऐकून घेत नव्हता. हळूहळू मिहिकाची मानसिक स्थिती खराब होत चालली होती. मिहिकाला त्यातून सावरण्याचा प्रयत्न नितेश करत होता परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. भारतातून मिनाक्षी देखील मिहिकासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती. मिहिका मात्र तिच्यासोबत देखील बोलायला तयार नव्हती.


हवापालट करण्यासाठी नितेशने मिहिकाला एका छोट्या ट्रिपला न्यायचे ठरवले. नितेशने त्याचे काही भारतीय मित्रमैत्रिणी , त्यांची मुले या सगळ्यांना या ट्रिपला येण्याचे आमंत्रण दिले. लोकेशन ठरवल्यावर निवासी व्यवस्था आणि इतर बुकिंग देखील करून झाली. मिहिका मात्र या ट्रिपला यायला तयार नव्हती. नितेशने कसेबसे तिला ट्रिपला येण्यासाठी तयार केले.  


ठरल्याप्रमाणे सगळी मित्रमंडळी ट्रीपला जाण्यासाठी निघाले. सगळे मित्र मैत्रिणी मिळून खूप एन्जॉय करत होते. मिहिका देखील तिचे दुःख थोड्या प्रमाणात विसरून सगळ्यांमध्ये रमली होती. दोन दिवसाची ट्रिप संपवून सगळे परतीच्या प्रवासाला निघाले होते. 


त्याचवेळेस रात्रीच्या प्रवासात ड्राइवरला झोपेची डुलकी आली आणि त्याचा बसवरचा कंट्रोल सुटला आणि सगळ्या प्रवाशांनी भरलेली बस बाजूच्या दरीत कोसळली. आतापर्यंत आनंदी आनंद असलेल्या या प्रवांशामध्ये होता तो आक्रोश आणि वेदना....


नितेश आणि मिहिका दोघेही बेशुद्ध पडले होते. दैव बलवत्तर म्हणून त्यांना गंभीर दुखापत झाली नव्हती. सकाळी मिहिकाला जाग आली त्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये होती. आजूबाजूला तिला नितेश कुठेच दिसला नाही म्हणूनच ती नितेशला शोधण्यासाठी रूमच्या बाहेर पडली.  


त्यावेळी तिच्यासोबत असलेले रॉयकाका जखमी असलेल्या रॉय काकूंना आधार देत होते. दोघेही एकमेकांची विचारपुस करत होते . हात सुजला आहे म्हणून गोडसे काकू काकांना स्वतःच्या हाताने चहा बिस्कीट भरवत होत्या. त्यांच्या या प्रेमामुळे एक वेगळेच समाधान गोडसे काकांच्या चेहऱ्यावर चमकत होते. त्या जोडप्यांच्या प्रेमातून वेदनेत देखील प्रेमाची ओढ असते ,  प्रेमाचा आधार असतो याची जाणीव मिहिकाला होत होती.  


हळूहळू पुढे गेल्यावर तिला नितेश दिसला. हतबल , निराश आणि एकाकी बसलेला. नितेशने मिहिकाकडे पाहिलं. त्या दोघांचीही नजरानजर झाली. मिहिकाने पुन्हा एकदा स्वतःची नजर इतरांवर फिरवली. त्याच वेळेस नितेशने तिला जवळ बोलावले आणि तो बोलू लागला ...


" मिहिका , बाळा संकटात असू दे , सुखात असू दे किंवा दुःखात असू दे. सोबत ही लागतेच. आपल्या प्रत्येक आनंदाच्या आणि दुःखाच्या क्षणात आपल्याला सावरण्यासाठी कुणीतरी असावे लागते. अगदी आपलं . हक्काचं...! म्हणूनच लोक लग्न करतात. "  


" आज रॉय , गोडसे या सगळ्या जोडप्यांना एकमेकांची काळजी घेताना पाहून मिनाक्षीची कमतरता मला जाणवते आहे.


" लग्न म्हणजे एकमेकांच्या सोबतीला वाढणे असते सतत .." 


" तुला अगदी खरं सांगायचं तर गेल्या चौदा वर्षात सतत मिनाक्षीची कमी मला भासतेय परंतु माणसाचा इगो असतो ना ..तो कधीच त्याला स्वतःला त्याची चूक कबूल करू देत नाही. तसेच माझे देखील झाले. "  


" मी कधीच मोकळेपणाने माझी चूक कबूल करू शकलो नाही पण तू मात्र असे करू नकोस बाळा , समीर सोबत लग्न कर. just love him ...without expecting anything .." 


" माझे आयुष्य मी एकटेपणात घालवले आहे..पण तू मात्र तिच चूक करू नकोस." 


" जा मिहिका , खूप उशीर होण्याआधी समीरला समजाव. ...go......"  


नितेशचे बोलणे ऐकून स्वतःची चूक मिहिकाला उमगली होती. ती तडक समीरला भेटण्यासाठी निघाली आणि त्याच्या घरीच पोहोचली. समीरने दरवाजा उघडला आणि समोर मिहिकाला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो तिला बोलू लागला ...


" पुन्हा एकदा लिव्ह इन मध्ये राहण्याचे सांगून माझा आणि माझ्या भावनांचा अपमान करायचा असेल तर घराचा दरवाजा तुझ्यासाठी उघडा आहे ... तू जाऊ शकतेस ..." 


समीरचे बोलणे शांतपणे ऐकून घेत मिहिका बोलू लागली .....


" समीर , मला मान्य आहे मी चुकली पण प्रेमात आणि युद्धात सगळे मान्य असते ना ...everything is fair in love and war ...! "


" प्रेमाचे महत्व , लग्नाचे महत्व समजायला , खऱ्या प्रेमाची व्याख्या समजायला वेळ लागला मला पण आता समजले आहे मला ...खऱ्या प्रेमाचे महत्व... " 


" लहानपणापासूनच प्रॅक्टिकल वागायचे अशी सवयच लागलेली रे मला ...प्रत्येक वेळी मनाने  नाही तर बुद्धीनेच विचार करायचा असेच ठरवायची मी नेहमी..पण माझ्या बुद्धीच्या आणि मनाच्या युद्धात मी नेहमीच माझ्या बुद्धीचे ऐकले आणि एकदा गमवून बसली आहे रे तुला...पण आता पुन्हा मला तुला गमवायचे नाहीये..."  


" प्लीज , तुझ्या या वेड्या मिहिकाला माफ करशील ...? मी खूप चुका केल्या आहे पण माझे तुझ्यावरचे प्रेम मात्र खरं आहे...प्लीज मला माफ कर.." 


हे बोलत असतानाच मिहिकाचे डोळे भरून आले. समीर मात्र यावर काहीच बोलला नाही. त्याने फक्त त्याचे दोनही हात फैलावले आणि मिहीकाने पुढे येऊन त्याला घट्ट मिठी मारली. दोघांचाही गैरसमज त्या मिठीत विरला होता.


पुढे मिहिका समीरला सांगू लागली ...


" डॅडचा एकटेपणा , मम्माची कमतरता या सगळ्याचे महत्व समजले आहे मला . आणि लवकरच डॅडला घेऊन मला भारतात जायचे आहे."  


" मम्माने डॅड वरच्या प्रेमामुळे मला देखील त्याच्या सोबत पाठवले. आयुष्यभर ती माझ्यासोबत बोलण्यासाठी तरसत राहिली. तिने मला भरभरून प्रेम दिले आणि मी .....मी मात्र तिला दिला तो ... फक्त ..तिरस्कार ...आयुष्यभरासाठीचा ...! "


" मला मम्माला भेटून तिची माफी मागायची आहे. मम्मा आणि डॅडला दोघांनाही पुन्हा एकत्र आणायचं आहे... मला तू यात साथ देशील ना ...समीर ...? " 


समीरने नजरेनेच स्वतःचा होकार दर्शवला. मिहिकाने नितेशची तब्येत बरी होईपर्यंत त्याची खूप काळजी घेतली. नितेशच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर तिने भारतात जाण्यासाठी तिकिट बुकिंग केले. समीर , नितेश आणि मिहिका तिघेही भारतात आले.  


इतक्या वर्षानंतर  स्वतःच्या घरी आल्यानंतर नितेश खूप भावविभोर झाला होता. त्याच्या हृदयाची गती वाढली होती. हात थरथरत होते. थरथरत्या हाताने त्याने दरवाज्याची बेल वाजवली. दरवाजा उघडला तर समोर मिनाक्षी उभी ....दरवाज्यात उभ्या असलेल्या नितेशला पाहून जागीच थबकली.


दोघेही एकमेकांना पाहून काहीच बोलू शकले नाहीत. नितेश आणि मिनाक्षी दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. नितेश काहीच बोलू शकला नाही. तो फक्त मिनाक्षीसमोर त्याचे दोन्ही हात जोडून उभा राहिला. त्याने हात जोडलेले पाहताच मिनाक्षीने त्याचे जोडलेले हात सोडवले आणि त्याला घट्ट मिठी मारली. एकमेकांच्या मिठीत दोघेही रडत होते. त्याच वेळेस मागुन आवाज आला ...


" मम्मा , डॅड ..दोघांचेही आटोपले असेल तर मला तुमच्या दोघांमध्ये जागा मिळेल का  ? "


मिहिकाला पाहून मिनाक्षीला खूप आनंद झाला. तिने तिचे भरभरून मुके घेतले. त्यानंतर नितेश बोलू लागला ...


" मला माफ कर मिनू , मी तुझा , आईबाबांचा सगळ्यांचा गुन्हेगार आहे. माफी मागण्याची खरं तर माझी लायकी देखील नाही. तरी मला माफ कर ..." 


त्यावर मिनाक्षी बोलू लागली ...


" नितेश , आपल्यात फक्त गैरसमज होते ते आता दुर झाले आहेत आणि हो वाद झाले म्हणून नाती तुटतात का ..? "


" तुम्ही दोघेही माझे आयुष्य आहात. तुम्हा दोघांनाही सोडून मी कशी जगेन .."  


" झाले गेले सगळे विसरून जाऊया. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. हो की नाही नितेश.. अगदी पूर्वी सारखीच .....आपल्या पहिल्या भेटीसारखी ..." 


Hi , I am Minakshi Inamdar  


त्यावर गोड हसत नितेश म्हणाला ...


Hi , I am Nitesh Deshmukh 


आणि तितक्याच मिहिका म्हणाली ...मम्मा आणि डॅड मला पण लक्षात असू देत ...


I am Mihika Minakshi Nitesh Deshmukh ....


सगळे भरभरून हसत होते. आज एकमेकांच्या सोबतीने नव्याने त्यांचे कुटुंब पूर्ण झाले होते....!


मिनाक्षी आणि नितेशला एकट्यात मनमोकळे बोलता यावे म्हणून मिहिका समीरला घेऊन बाहेर निघून गेली. आता होते ते फक्त दोघेच मिनाक्षी आणि नितेश... चौदा वर्षांचा दुरावा खूप काही सांगत होता. दोघांच्याही डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. दोघेही एकमेकांच्या मिठीत विरले होते. आयुष्यातील खरे सुख म्हणजे हेच का..? ती म्हणजे आपल्या जोडीदाराची साथ. त्या दोघांच्याही आयुष्याला पूर्णत्व मिळाले होते एकमेकांच्या सोबतीने ...दोघांच्याही मनातील भावना शब्दात फक्त हेच सांगत होत्या....


हात ह्यो हातात ....


सुर ह्यो श्वासात ....


पाखरांच्या ध्यासात .... 


चिमुकल्या घासात .... 


भरून हे डोळं आलं ....


डोळ्यामंदी सपान झालं ....


भरून हे डोळं आलं ....


डोळ्यामदी सपान झालं ....


तुझ्यामुळं लाभलं रं ...


सारं या जगामदी ..


हो .. जगणं हे न्यार झालं जी ...!


हो .. जगणं हे न्यार झालं जी ...!


समाप्त!


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pinterest 


✍©️ जया पाटील




  





 










Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box