#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_५
©️जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html
भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html
भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
मागील भागात आपण पाहिलं की साखरपुडा होण्याच्या आधी अवंती आणि आदिराजचं फारसं बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे आदिराज साखरपुड्याच्या दिवशी अवंतीचा नंबर घेतो. निर्मलाताई त्या दोघांना बोलू न देण्यासाठी अनेक प्रयत्न करतात पण त्या अयशस्वी होतात.
आदिराज आणि अवंतीमधील संवाद वाढीस लागतो. आदिराजची आणि तिची भेट होते. त्यावेळेस तिच्यासोबत बोलून आदिराज खूप खुश असतो. निर्मलाताईंना मात्र आदिराज आपण अवंतीला भेटणार आहोत याबद्दल काहीच सांगत नाही. आधीच अवंती त्यांना सून म्हणून पसंत नसते. त्यातला त्यात ती आपल्या एकुलत्या एक मुलाला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते आहे असा त्यांचा गैरसमज होतो. त्यामुळे त्या अवंतीचा जास्तच दुस्वास करायला लागतात. आता पुढे..
साखरपुडा होऊन बरेच दिवस होतात. हळूहळू अवंती आणि आदिराजचं बोलणं वाढतं. ते एकमेकांना समजून घेतात. तुळशीविवाहाला थोडेच दिवस बाकी असतात त्यामुळे लग्नाच्या मुहूर्ताबद्दल एकनाथरावांसोबत बोलावं म्हणून प्रकाशराव आदिराजच्या घरी जातात. प्रकाशरावांना पाहून एकनाथराव त्यांचे आनंदाने स्वागत करतात.
" या या , प्रकाशराव. असं अचानक कसं येणं केलंत ? या बसा ना.. आदिराजच्या आई जरा चहा पाण्याचं बघता का?"
प्रकाशराव आलेले पाहून मात्र निर्मलाताईंचा चेहरा पडतो. चहापाणी झाल्यावर प्रकाशराव बोलू लागतात..
" एकनाथराव, सगळं काही छान चालू आहे. माझ्या भेटीमागचे प्रयोजन म्हणजे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट विचारायची आहे. आदिराज आणि अवंतीचा साखरपुडा पार पडून आता बरेच दिवस झाले आहेत. मी गुरुजींना विचारून चांगले मुहूर्त काढून घेतले आहेत. "
"तुलसीविवाहानंतर पहिल्याच आठवड्यात उत्तम मुहूर्त आहे. तेव्हा आपणास योग्य वाटत असेल तर पंधरा नोव्हेंबर हीच आपण लग्नाची तारीख ठरवूया. लग्नाला आमंत्रित करायच्या पाहुण्यांची यादी , लग्नाचे ठिकाण ,कपडे खरेदी वगैरे सगळं थोडं आधी पार पडले तर फार बरं होईल कारण मग आपली धावपळ देखील होणार नाही. आदिराज सोबत ऑफिसच्या सुट्टयाबद्दल बोलून , ताईसाहेबांचे मत विचारात घेऊन मला तुमचा निर्णय कळवा. "
एकनाथरावांना प्रकाशरावांचा विचार पटला आणि त्यांनी आदिराजसोबत फोनवर बोलून लगेच होकार सांगितला. त्यावर प्रकाशरावांना आनंद झाला.ते एकनाथराव आणि निर्मलाताईंना उद्देशून म्हणाले...
" एकनाथराव आणि ताईसाहेब लग्नाबाबतीत तुमच्या काही अपेक्षा असतील तर त्या मला सांगा. लग्न चांगल्या प्रकारे करण्याचा मी मला शक्य आहे तितका प्रयत्न करेनच पण तुमच्याही काही अपेक्षा असतील तर सांगा..
प्रकाशरावांच्या या बोलण्यावर एकनाथराव काही बोलतील त्या आधीच निर्मलाताई प्रकाशरावांना म्हणाल्या...
"अगदी बरोबर प्रकाशराव. आमच्याही काही अपेक्षा आहेतच. लग्नासाठी एखादे उत्तम रिसॉर्ट पहा , तिथे आमच्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. आमचे साधारणपणे 500 पाहुणे तरी आदल्या दिवसापासूनच म्हणजे हळदीच्या कार्यक्रमापासून मुक्कामी असणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदिक पद्धतीचं लग्न आणि सायंकाळी गोरज मुहूर्तावर लग्न असायला हवं. लग्नात तिघीही कार्यक्रमात आम्ही सांगू तसंच डेकोरेशन आणि जेवणाचा मेनू असावा अशी आमची इच्छा आहे. "
" लग्नाला आदिराजच्या काकू , मावश्या आणि आमचे इतर काही कुटुंबीय येतील त्यांचा तेवढा मानपान व्यवस्थित करावा लागेल. साडी-चोळी ,खण-नारळाची ओटी,एखाद दुसरी चांदीची वस्तू त्यांना द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. अवंती तुमची एकुलती एक मुलगी आहे. तिच्या सासरच्यांच्या एवढ्या इच्छा तर तुम्ही पूर्ण करूच शकतात. "
निर्मलाताईंच्या मागण्या ऐकून प्रकाशरावांचा चेहरा पडला पण ते काहीच बोलू शकले नाही. एकनाथरावांना निर्मलाताईंचं वागणं आवडलं नाही पण व्याह्यासमोर बायकोचा अपमान नको म्हणून ते निर्मलाताईंना काहीच बोलले नाही.
शक्य तितक्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो असं सांगून प्रकाशरावांनी एकनाथरावांचा निरोप घेतला. प्रकाशरावांनी निर्मलाताईंच्या सगळ्या मागण्यांबद्दल सुलोचनाताईंना सांगितलं. त्यावेळी अवंतीही तिथेच उपस्थित होती. निर्मलाताईंच्या मागण्या तिला आवडल्या नाही. ती चिडून प्रकाशरावांना म्हणाली..
" मानपान करायला इतका खर्च करायची काय गरज आहे बाबा ..? चांदीच्या वस्तू दिल्या , भारी साड्या घेतल्या म्हणजे मान असतो का ? "
" प्रेमाने केलेले आदरातिथ्य देखील मानपानच असतो ना ..? मला नाही आवडले आदिराजच्या आईंचे हे सांगणे "..
"अवंती बाळा , अगं प्रत्येक आईबाबांची आपल्या मुलबाळांच्या लग्नाची स्वप्नं असतात. आदिराज च्या आईबाबांची देखील असणारच ना! आणि व्याह्यांनी आपल्या स्वतःसाठी तर काही मागितलं नाही ना ?त्यांच्या पाहूणेमंडळीचा मान तितका सांगितलं तर त्यात काय हरकत आहे , बाळा.."
" अग अवंती , तु आमची एकुलती एक मुलगी आहेस. आमच्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी आम्ही इतक्या छोट्या गोष्टी नाही करू शकत का ? "
" लग्न हा व्यवहार नसतो बाळा , लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही तर दोन परिवाराचे जुळणं असतं. त्यामुळे तु असा विचार करणं सोडून दे, अवंती"
प्रकाशराव तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.
"पण बाबा, आदिराजच्या आईंनी केलेल्या मागण्या आपल्याला पूर्ण करणं शक्य नाही हे माहिती आहे मला. मला माहिती आहे की इतका खर्च आपल्याला शक्य नाही. तुम्ही त्यांना तेव्हाच नकार का दिला नाही? मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटतेय बाबा.."
" या घरात फक्त माझीच जबाबदारी नाहीये. निखिलचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे अजून. माझ्या लग्नावर इतका पैसा खर्च केला तर तो त्याच्यासोबत अन्याय होईल ना बाबा.? "
अवंती प्रकाशरावांना म्हणाली.
प्रकाशराव आणि सुलोचनाताईंनी तिला समजावलं. प्रकाशराव तिला समजावणीच्या सुरात म्हणाले ...
"अवंती , आपल्याला आर्थिक भार होऊ नये म्हणून एकनाथरावांनी साखरपुड्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी स्वतः कडे घेतली आणि आमचा मान राखला , मग आम्ही आता त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तो त्यांचा अपमान ठरेल."
" काही गोष्टी आयुष्यभरासाठी जीवाला घोर लावून जातात. आम्हाला आदिराजच्या आईंचा अपमान करायचा नाहीये त्यामुळे तु काळजी करू नकोस. आम्ही पैश्यांची व्यवस्था करू. त्याचं टेन्शन तु मात्र घेऊ नकोस."
" तु होणारी नवीन नवरी आहेस , त्यामुळे असल्या गोष्टींचे टेन्शन तु नाही घ्यायचं. मस्त आनंदी राहा. असंपण आम्ही जे काही कमावलं आहे ते सर्व तुमच्यासाठीच आहे ना."
" चल हस पाहू एकदा .... smile ...आमच्या अवंतीचं गोड हसू पाहून आमचं टेन्शन कुठल्या कुठे पळून जातं."
प्रकाशरावांचे बोलणं ऐकून अवंतीच्या डोळ्यातून अश्रु येऊ लागले आणि ती तिच्या बाबांना बिलगून रडू लागली.
प्रकाशराव तिला समजावू लागले..
" अवंती , बाळा रडू नकोस ग..तुझं रडणं नाही सहन करू शकत मी. तुझ्या डोळ्यातले अश्रू नाही पाहू शकत मी.."
तितक्याच एकनाथरावांचा आवाज आला...
"अगदी बरोबर बोलताय प्रकाशराव. अवंती बाळा ,तुझ्या डोळ्यातले अश्रू आम्हाला पण नाही सहन होत. लेकीच्या डोळ्यातले अश्रू प्रत्येक बापाला व्यथित करतात अवंती.."
अचानक दरवाज्यात एकनाथराव आणि आदिराजला पाहून प्रकाशराव ,अवंती आणि सुलोचनाताई गोंधळल्या. त्यांनी आदिराज आणि एकनाथरावांचे स्वागत केले. अवंतीने एकनाथरावांचा वाकून नमस्कार केला. सुलोचनाताई चहापाण्याचं बघायला किचन मध्ये गेल्या. एकनाथराव पुन्हा बोलू लागले..
" प्रकाशराव ,आदिराजच्या आईचं बोलणं फारसं मनावर घेऊ नका. ती जरा जास्त महत्वाकांक्षी आहे पण मनाने मात्र चांगली आहे. अहो आमची अवंतीच आमची लक्ष्मी म्हणून देण्याघेण्याचा आम्हाला मोह नाही. आम्हाला इतके सुंदर कन्यारत्न प्राप्त होतेय हे काय कमी आहे का.? त्याहून जास्त आम्हाला काहीच नको. आमच्या कुठल्याही मागण्या नाहीत. तुम्हाला सहज शक्य होईल अशी व्यवस्था तुम्ही करा.अगदी साधे पणाने हा विवाह सोहळा पार पडेल. त्याबाबतीत तुम्ही अगदी निश्चिन्त रहा. "
एकनाथरावांच्या या बोलण्यामुळे प्रकाशरावांच्या मनावरचं ओझं कमी झालं. आपल्या बाबांचा आर्थिक भार कमी झाल्यामुळे अवंतीपण आनंदी झाली.
निर्मलाताईंना जेव्हा माहिती झालं की त्यांनी केलेल्या मागण्यांना आदिराज आणि एकनाथराव अवंतीच्या घरी जाऊन नाकारून आले तेव्हा त्यांना खूप राग आला. त्या चिडून एकनाथराव आणि आदिराजला म्हणाल्या...
" तुम्ही दोघांनीही मुद्दाम माझ्या विरुद्ध वागायचं ठरवलं आहे का ..? माझ्या असण्यानसण्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही असंच वागता आहात तुम्ही.? कुठल्याही गोष्टीत माझ्या विरुद्ध जाऊन वागायचं असेल तर आता मी तुमच्या दोघांच्याही मध्ये येणार नाही. आदिराज तुझ्या लग्नासाठी तुझे बाबा आहेत. तुझी बायको आणि तुझा सासरचा परिवार आहे. तितकं पुरे झालं. माझी इतकीच अडचण असेल तर मी लग्नाला सुद्धा उपस्थित राहणार नाही. "
निर्मलाताईंच्या अश्या बोलण्यामुळे आदिराज आणि एकनाथराव नाराज झाले. आदिराज समजावणीच्या सुरात आईला म्हणाला ..
" असं नको बोलूस ना आई. तुझ्याशिवाय मी लग्नाला उभा राहू शकेल का.?तू अशी नाराज झाली तर माझं पण कशातच मन लागणार नाही. तुला वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. "
आदिराजच्याच सुरात सुर मिसळत एकनाथराव म्हणाले..
" तू पण ना निर्मला , अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतेस. मला माहित आहे तुला आदिराजचं लग्न खूपच थाटामाटात पार पडावं असं वाटतंय. अग पण तुझ्या मागण्यांप्रमाणे प्रकाशरावांना लग्न करणं शक्य नाही हे ही तू जाणतेस. मग कशाला असा निरर्थक हट्ट करायचा. माणसाची किंमत कधी पैश्याने होत नाही. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाचे किंवा मुलाचे लग्न थाटात करावं असं वाटत. आईवडील आपल्या परीने मुलांची हौस पूर्ण करतातच पण काही वेळा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचा नाईलाज होतो."
"सगळ्या गोष्टींचे सोंग करता येते पण पैश्याचे मात्र सोंग करता येत नाही. आपण आपली हौस भागवू शकतो ना मग उगाचच का त्यांची पिळवणूक करायची. कोणाला त्रास देऊन मिळालेल्या आनंदाला काहीही अर्थ नसतो निर्मला."
" आणखीन एक गोष्ट , प्रकाशरावांकडे तू केलेल्या मागण्या मी स्वतः पैसे खर्च करूनही पूर्ण करू शकलो असतो पण मी तसं केलं नाही कारण मला माहिती आहे प्रकाशरावांना हे कधीच आवडलं नसतं. त्यांच्याकडे पैसे कमी असले तरीही खूप स्वाभिमानी आहेत ते. मी पैसे देऊन मला त्यांचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता. प्रत्येक आईवडिलांची आपापल्या मुलांच्याबाबतीत काही स्वप्न असतात. मला प्रकाशरावांची स्वप्न पूर्ण होऊ द्यायची आहेत. मला माहित आहे साधेपणाने का असेना पण ते सगळं छान करतील."
" मला तुला पण दुखवायचं नाहीये निर्मला. तुला हौस आहेच तर आदिराजचं लग्न जरी साधेपणाने पार पडणार असलं तर आपण त्यानंतर आपल्या पाहुण्यांसाठी एक स्वागत समारंभ ठेऊ. त्यामुळे आता रागावणं पुरे झालं. चला निर्मलाताई ..अहो वरमाय आहात तुम्ही. सून आणायची आता घरी. त्यामुळे तयारीला लागा. "
अश्याप्रकारे आदिराज आणि एकनाथरावांनी निर्मलाताईंची समजूत काढली.
आदिराज आणि एकनाथरावांनी निर्मलाताईंची समजूत काढली खरी पण खरंच अवंती विषयी निर्मलाताईंचा राग कमी झाला की नाही? निर्मलाताई मनापासून अवंतीला सून म्हणून स्वीकारतील की नाही?अवंती आणि आदिराजचे लग्न निर्विघ्न पार पडेल का ? लग्नानंतर अवंतीचे आयुष्य कस असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
क्रमश :
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
.jpeg)
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box