माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा भाग ६

 


#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_६

©️जया पाटील

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html

भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html

भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_27.html

मागील भागात आपण पाहिलं की अवंतीचे बाबा लग्नाचा मुहूर्त ठरवण्यासाठी आदिराजच्या घरी गेले तेव्हा निर्मलाताईंनी त्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य होणार नाही अश्या मागण्या केल्या. प्रकाशराव नाराज होऊन घरी आले. घरी आल्यावर जेव्हा ह्या गोष्टी अवंतीला माहिती झाल्या तेव्हा ती नाराज झाली पण प्रकाशरावांनी आणि सुलोचनाताईंनी तिची समजूत काढली. तितक्याच तिथे एकनाथराव आणि आदिराज आले. एकनाथरावांनी निर्मलाताईंनी केलेल्या मागण्यांना नकार दिला. प्रकाशरावांना साधेपणाने लग्न करण्यास सांगितलं. प्रकाशरावांच्या डोक्यावरचं मोठं टेन्शन दूर झालं.  


एकनाथराव आणि आदिराज निर्मलाताईंच्या विरुद्ध गेल्यामुळे त्या खूपच नाराज झाल्या.पैश्यापेक्षा माणसांच्या भावना महत्वाच्या असून आपल्या मुलाच्या लग्नात आपल्याला कोणाचंही मन दुखवायचं नाही असं एकनाथरावांनी निर्मलाताईंना समजावलं. निर्मलाताईंनी तात्पुरता त्यांच्या होकारात होकार मिसळला पण अवंतीबद्दल त्या अजूनही नाराज होत्या. आता पुढे..


प्रकाशरावांच्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली. प्रकाशरावांकडे पैसा कमी असला तरीही त्यांनी आणि सुलोचनाताईंनी आपल्या वागणुकीमुळे खूप प्रेमाची माणसं गोळा केली होती. त्यांच्या कॉलनीतील प्रत्येक जण अवंतीला आपलीच मुलगी मानत होतं त्यामुळे सगळेच अवंतीच्या  लग्नातील कामांची जबाबदारी वाटून घेण्यासाठी उत्सुक होते.  


प्रकाशरावांनी अनेक कार्यालयांचा तपास केला पण कार्यालय भाडेतत्वावर घेणं त्यांना थोडं जड होतं त्यामुळे त्यांचे कॉलनीतील शेजारी आनंदकर काकांनी त्यांना कॉलनीतील मोकळ्या ग्राउंड मध्ये लग्नाचा मंडप टाकूया असा सल्ला प्रकाशरावांना दिला. प्रकाशरावांना देखील हे पटलं. त्यांनी एकनाथरावांना आपला विचार सांगितला. एकनाथरावांनी देखील होकार दिला.


प्रकाशरावांची लगबग सुरु झाली. त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीने कामं वाटून घेतली.  

डेकोरेटर्स,ज्वेलर्स, साड्या, कपडे, चपला, 

आणि मानपानाला द्यायच्या भेटवस्तू सगळ्यांची  खरेदी झाली. अवंतीच्याही पार्लरच्या वाऱ्या सुरु होत्या. सुलोचनाताईं आणि कॉलनीतल्या सगळ्या गृहिणींनी मिळून करंज्या ,चिवडा आणि लाडू बनवले. पारावार द्यायच्या शेवंतीचे पाच लाडू आणि शेवया तयार झाल्या. रुखवतावर ठेवायच्या वस्तूंची सजावट पूर्ण झाली. सगळं महिलामंडळ एकदम बिझी होते.


हौशी मंडळींनी आगतास्वागताची जबाबदारी घेतली. अवंतीला सासरी शगुन म्हणून लाडू द्यायचं ठरलं होतं. म्हणून हळदीच्या आदल्या दिवशी सगळ्या गृहिणींनी मिळून बुंदी गाळून पाकात घालून त्याचे लाडू बांधून ठेवले होते. 


हळदीच्या आदल्या दिवशी अवंतीच्या मैत्रिणींनी अवंतीच्या हातावर मेहेंदी काढली. त्यांनी तिच्यासाठी काही सरप्राईज परफॉर्मन्स सेट केले होते. सगळ्यांच्या साथीने छोटेखानी संगीताचा कार्यक्रम पार पडला.


लग्न साधेपणाने करायचं ठरलं असल्यामुळे  कॉलनीतल्या मोकळ्या जागेत मंडप घालण्यात आला. प्रकाशरावांच्या कॉलनीतील प्रत्येक सदस्य अवंतीला आपली मुलगी ,बहिण समजून तिच्या लग्नासाठी झटत होतं. कॉलनीतल्या मुलांनी मंडपाच्या खाबांना रंगाने नक्षी काढली

कॉलनीतल्या अवंतीच्या मैत्रिणींनी मंडपाच्या बाहेर खूप सुंदर रांगोळी रेखाटली. रंगीबेरंगी पताका आणि झिरमिळ्या कपड्यांच्या झालरी लावून मंडप सजला होता.  


स्टेजच्या चारी काॅर्नरला घरातल्याच तांब्याच्या लखलखत्या पितळी हंड्यांच्या उतरंड्या लावल्या होत्या. हंड्याना लाल फुलांच्या माळांनी सजवलेलं होतं. स्टेजच्या मागच्या साईडला  केळीच्या पानांनी सजवले होते. त्या पानांवर पांढऱ्या फुलमाळा सोडण्यात आल्या होत्या. हिरव्या केळीच्या पानांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या फुलांच्या माळा खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत होत्या. कमी खर्चात केलेली ही सजावट मात्र अगदी मन मोहून टाकणारी होती.


लग्नाचा दिवस आला. वरपक्षाकडील मंडळींसाठी प्रकाशरावांचे शेजारी आनंदकर कुटुंबीयांनी आपल्या घराचे दरवाजे उघडे केले. नवरदेव आणि वऱ्हाड यांची व्यवस्था आनंदकर कुटुंबियांच्या घरी करण्यात आली. त्यांना नाश्ता आणि चहा, सरबताची सोय केली होती. जेवणाच्या पंक्तीत मसाला भेंडी , छोल्यांची पातळ भाजी , मसालेभात , पुरी , गुलाबजाम , कोशिंबीर आणि पापड असा मेनू ठरवण्यात आला. नवरदेवाकडच्या मंडळीला काय हवं नको पहायला कॉलनीतली उमदी पोरं कंबर कसून तयार होती. आपल्या कॉलनीतली आपली लेक एका चांगल्या घरी पडतेय याचं सगळ्यांनाच कौतुक होतं.  


लग्नाच्या दिवशी लग्न मुहूर्ताच्या काही वेळ आधी नवरदेवाचं आगमन झालं. एकनाथराव देशमुख आणि त्यांच्या पाहुण्यांचं आनंदकर कुटुंबीयांनी अदबीने आदरातिथ्य केलं. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आदिराजला हळद लागली. त्याची उष्टी हळद अवंतीला लागली. त्या हळदीसोबत आदिराज आता आपल्या आयुष्याचा भाग आहे याची अवंतीला जाणीव  झाली.


हळदीचा कार्यक्रम आटोपून वर वधू तयार होण्यासाठी गेले. ठरल्या मुहूर्तावर बेंजोच्या तालावर नवरदेवाचं अर्थातच आदिराजचं मंडपात आगमन झालं. मंडपाच्या दारात केळीच्या खांबाच्या कमानीपाशी त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकण्यात आला. पायावर पाण्याची धार ओतून त्याला आत घेतलं. 

मान्यवर पाहुणे मंडळी मंडपातल्या खुर्च्यांवर एक एक करत जागा पकडून बसली.  


लग्नपुर्व विधी उरकून भटजींनी नवरदेवाला पाटावर उभं केलं. मुलीच्या मामाने मुलीला मंडपात घेऊन यावं असं भटजींनी फर्मान सोडले.

अवंतीचे मामा अवंतीला घेऊन मंडपात आले.  


लाल रंगाचा लेहेंगा , त्याला गोल्डन कलरचे कॉन्ट्रास्ट ब्लॉउज , केसांची सुंदर हेअरस्टाईल , त्यावर माळलेले पांढऱ्या रंगाचे गजरे , त्यावर डोक्यावरून सोडलेली नेटची गोल्डन रंगाची ओढणी , सुंदरसा मेकअप , लाईट मरून शेडची लिपस्टिक , गुलाबी हायलायटर लावलेले गुलाबीसर गाल , हलक्या लालसर गुलाबी रंगांची आय शॅडो , केसांच्या मध्यातून केलेल्या भांगातून सजलेली बिंदी , गळ्याला चिकटून एक कुंदन हार , त्यालाच साजेसा लांब एक मोठा जडवाचा नेकलेस, त्यातही गुलाबी कुंदन जडवलेले,

गुलाबी बाजुबंद तिच्या गोलसर दंडाची शोभा वाढवत होती. हिरवा चुडा, त्यात एकत्र केलेल्या लेहेंगाच्या मॅचिंग रंगाच्या बांगड्या ह्या सगळ्या पेहरावात अवंती अगदी महालातली राजकुमारीच भासत होती. तिच्या चेहऱ्यावरचा निरागस पणा , तिची सात्विकता तिच्या सौंदयाला आणखीनच जास्त खुलवत होता. केसात माळलेला शुभ्र मोगरा तिच्या पावित्र्याची प्रचिती देत होता.  


मामासोबत स्टेजवर येणाऱ्या अवंतीला पाहून आदिराज जागीच उभा राहिला आणि तिच्याकडे फक्त फक्त पाहतच राहिला. अवंतीचे ते सुंदर रुप तो डोळ्यात साठवून घेत होता. नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले "Gorgeous"..आणि तो लगेचच भानावर आला. कोणी काही ऐकलं तर नाही ना याची खात्री केली आणि आहे त्या जागी उभे राहून फक्त अवंतीकडे पाहू लागला.

आदिराजची नजर हटत नव्हती अवंतीवरून.  

अप्रतिम ओतप्रोत भरलेलं सौंदर्य...!!


अवंती स्टेजवर आली. तिनेही ओझरतं आदिराजकडे पाहिलं. आदिराज अगदी राजकुमारच भासत होता. अवंतीच्या लेहेंग्याला मॅचिंग गोल्डन कलरचा कुडता ,त्यावर खड्यांचा डिझायनर ब्रोच ,त्याखाली रेडीश मरून कलरचा चुडीदार, त्याच रंगाची सोनेरी लेस लावलेली ओढणी उजव्या हाताच्या मनगटावरून पुढे घेतलेली. डोक्यावर त्याच मरून रंगाचा फेटा. अवंतीराणीला शोभणारा राजकुमारच दिसत होता आदिराज.अवंतीची नजर फिरून फिरून त्याच्यावरच पडत होती.


मुलाच्या आणि मुलीच्या मामाने अंतरपाट धरला. आदिराज अंतरपाटाच्या वरूनही अवंतीला पाहण्याचा प्रयत्न करत होता. ही गोष्ट अवंतीच्या मामांच्या लक्षात आली. आदिराजची खोडी काढायची म्हणून त्यांनी मुद्दामहून अंतरपाट आणखीनच वरती पकडला. मंगलाष्टकांना सुरुवात झाली. "शुभ मंगल सावधान" च्या गजरात लग्न लागलं. यथावकाश सप्तपदी झाली आणि अवंती देशमुख घराण्याची सून झाली. प्रकाशराव आणि सुलोचनाताईंनी कन्यादान केले. आपल्या लाडक्या लेकीचा हात आदिराजच्या हातात देतांना त्यांना भरून आलं. लग्नासाठी आलेली पाहूणेमंडळीही पांगली.  


आता वेळ झाली होती पाठवणीची. प्रत्येक आईबाबांची कसोटी घेणारा हा क्षण प्रकाशराव आणि सुलोचनाताईंच्याही आयुष्यात आला होता. सुलोचनाताईंनी अवंतीची खणानारळाने शेवटची माहेरची ओटी भरली.आईला बिलगून अवंती रडू लागली. प्रकाशरावांजवळ जाऊन अवंतीला जास्तच रडू येऊ लागलं. नेहमी हे घर सोडून तुझ्या घरी जा असं म्हणणाऱ्या निखिलला आज आपल्या लाडक्या ताईला विदा करतांना अश्रू दाटून आले होते. जिजाजी , माझ्या 

ताईला सांभाळा असं आदिराजला सांगतांना त्याला अश्रू अनावर झाले होते.  


प्रकाशराव एकनाथराव आणि निर्मलाताईंसमोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले...


" एकनाथराव आणि ताईसाहेब आज पासून अवंतीला तुमच्या हाती सोपवतो आहे. जपा तिला  लग्न पण आम्हांला परवडेल असं केलं आम्ही. मुलीचा बाप म्हणून कुठेही मान खाली जाऊ दिली नाही. माझ्या यथाशक्ती सगळं केलं. अवंतीला आमची कमतरता कधीच भासू देऊ नका. तिच्याकडून कधी काही चुक झाली तर आईच्या मायेने पोटात घ्या.."  


" नका काळजी करु प्रकाशराव. आता अवंती आमचीही लेकचं आहे. आम्ही तिचा अगदी मुलीप्रमाणेच सांभाळ करू. एकनाथराव प्रकाशरावांचे हात खाली करत बोलले. 


त्यानंतर प्रकाशराव अवंतीला घेऊन आदिराजजवळ आले. आपले डोळे पुसत त्यांनी अवंतीचा हात आदिराजच्या हातात दिला आणि ते म्हणाले .." लेकीला सांभाला माझ्या. आता ती तुमची झालीय." सगळ्यांनाच गहिवरून आलं.


प्रकाशरावांचे हात दोन्ही हातात पकडून आदिराज म्हणाला..

" आम्ही सगळे आहोत ना बाबा . नका काळजी करू. अवंतीची खूप काळजी घेऊ आम्ही. " 


सुलोचनाताईही खूपच रडत होत्या. सुलोचनाताईंनी हात जोडत निर्मलाताईंना अलिंगन दिले पण निर्मलाताई मात्र इतक्या हळव्या प्रसंगीही काहीच बोलल्या नाही.जड अंतःकरणाने प्रकाशराव आणि सुलोचनाताईंनी अवंतीला विदा केलं.  


अवंतीने माप ओलांडून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश केला. आता ती सौ. अवंती आदिराज देशमुख झाली होती. उखाण्यांची गंमत जम्मत झाली. हळदीकंकण सोडून हळद उतरवली गेली. 

लग्नाच्या सगळ्या विधी झाल्या. तांदुळात नाव लिहिलं गेलं "अवंती-आदिराज" गेम्स झाले. काहींत अवंतीने बाजी मारली तर काहींत आदिराजने.


दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा पार पडली. मांडवपरतणी साठी अवंती आणि तिच्याबरोबरच्या करवल्यांना नेण्यासाठी अवंतीच्या माहेरून तिचे मामा आले. सत्यनारायणाच्या प्रसादाचे वाटप झाले. जेवणं उरकली. मांडव परतणीचा कार्यक्रम पार पडला. अवंती फक्त एक दिवसासाठी माहेरी गेली तरीही आदिराजला अस्वस्थ वाटू लागलं. सगळे कार्यक्रम पार पडले पण या सगळ्यात निर्मलाताईंनी फारसा रस घेतला नाही. आतापर्यंत पाहुण्याची गडबड होती त्यामुळे अवंतीचा निर्मलाताईंसोबत जास्त संपर्क आला नाही पण आता दुसऱ्या दिवशी अवंतीचा निर्मलाताईंच्या हाताखाली एकटीचाच गृहप्रवेश होणार होता.


क्रमश :


कसं असेल अवंती आणि निर्मलाताईंच्या नात्याचं भविष्य?निर्मलाताई अवंतीला खरंच सून म्हणून स्वीकारतील का? निर्मलाताईंच्या अश्या वागण्याचा परिणाम आदिराज आणि अवंतीच्या नात्यावर तर होणार नाही ना?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.


प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞


✍©️ जया पाटील


सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pinterest/Google 



 


Post a Comment

0 Comments