माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा भाग ७

 


#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_७

©️जया पाटील

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html

भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html

भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_27.html

भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇


मागील भागात आपण पाहिलं की अवंती आणि आदिराजचा विवाह साधेपणाने पार पडला. जड अंतःकरणाने प्रकाशराव आणि सुलोचनाताईंनी अवंतीची सासरी पाठवणी केली. अवंतीचा देशमुखांच्या घरी गृहप्रवेश झाला. सत्यनारायणाची पूजा आणि इतर सोपस्कार पार पडले. अवंती मांडव परतणी साठी माहेरी गेली. आतापर्यंत अवंतीसोबत करवल्या आणि घरात इतर पाहुणेमंडळी होती म्हणून अवंतीचा निर्मलाताईंसोबत एकटीचा संपर्क आला नाही. लग्न थाटामाटात झालं नाही याचा अजूनही निर्मलाताईंच्या मनात राग होता. माहेरी जाऊन आल्यावर एकट्या अवंतीचा सासरी खरा गृहप्रवेश होणार होता. आता पुढे.

सत्यनारायण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथराव आणि आदिराजचे मामा अवंतीला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेले. अवंती सासरी आली. आल्यावर लगेचच तिने आदिराजचे मामा मामी, एकनाथराव आणि निर्मलाताईंचा वाकून नमस्कार केला. तिच्या गोड बोलण्याने तिने घरातील पाहुण्यांचे मन जिंकून घेतले.

दुपारची जेवणं आटोपून आदिराजचे मामामामी आणि बाकीची पाहुणेमंडळी पण स्वतःच्या गावी निघून गेले. दुपारी जास्त लोकांचा स्वयंपाक असल्यामुळे निर्मलाताईंनी तो बाहेरून मागवला होता पण आता घरात फक्त चारच माणसं शिल्लक होती. अवंती-आदिराज, एकनाथराव-निर्मलाताई.

पाहुणेमंडळीला निरोप दिल्यावर अवंतीला जमेल तसा तिने घरातला पसारा आवरला. सगळ्यांना चहा बनवून ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला किचन मध्ये गेली. आज पहिल्यांदाच अवंती सासरी स्वयंपाक करणार होती त्यामुळे तिने डाळ-भात, फ्लॉवर बटाट्याची भाजी, कोशिंबीर , पोळ्या आणि गोडाचा शिरा असा बेत केला.  

अवंती नवीन आहे. तिला किचन मध्ये काही सापडत असेल का ? किंवा तिला काही मदत हवी आहे का ?अश्या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता निर्मलाताई आपल्या खोलीत बसून राहिल्या. आदिराज आणि एकनाथरावांच्या देखील ही गोष्ट लक्षात आली पण पहिल्याच दिवशी घरात वाद नको म्हणून ते दोघंही गप्प राहिले.

रात्री आठ वाजता सगळे डायनिंगटेबलवर जेवायला बसले. निर्मलाताई तेव्हाही काहीच बोलत नव्हत्या. अवंतीने सगळ्यांना ताटं वाढली आणि ती बाजूला उभी राहिली. वातावरण थोडं हलकंफुलकं करायचं आणि अवंतीला पण बरं वाटावं म्हणून एकनाथराव अवंतीला म्हणाले ..

" अवंती , तू पण बस बाळा आमच्या सोबत जेवायला. तू अशी उभी का ? अवंती ,लेक आहेस तू आमची. आजपासून रोज आपण सगळ्यांनी सोबतच जेवायचं. हवा तर तसा अलिखित नियमचं करून टाकूया रोजसाठीचा. तेवढाच वेळ मिळतो आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी.." 

अवंती स्वतःचे ताट घेऊन निर्मलाताईंच्या शेजारी जाऊन जेवायला बसली.  

" अवंती बाळा , खूप छान स्वयंपाक केला आहेस हं तू ...उत्तम ...गोडाचा शिरा तर खूपच चविष्ट. अगदी कमी तुपात आणि कमी गोड बनवला आहे. जसा मला आवडतो तसाच..." 

एकनाथराव अवंतीला म्हणाले..  

"अहो , जास्त तुपाचा शिरा तिने कधी पहिलाच नसेल ना माहेरी. त्यामुळे ती कमी तुपातच बनवणार ना शिरा. त्यात इतकं कौतुक करण्यासारखं काय आहे? हिच्या माहेरी अस्सल साजूक तूप जास्त प्रमाणात आणणं परवडणार तरी आहे का ? त्यामुळे मुळावरचे लाडू पण अगदी कमी तुपाचेच पाठवले तिच्या माहेरच्यांनी. आमच्याकडे तर असे लाडू कोणीच खात नाही."  

निर्मलाताई रागात अवंतीला बोलून गेल्या. आपण काही चुकीचं बोलतो आहे याचा काहीच विचार न करता त्या पुन्हा मुकाट्याने जेवू लागल्या.

अवंतीला निर्मलाताईंच्या बोलण्याचं खूपच वाईट वाटलं पण तिने निर्मलाताईंना उलटून काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यातल्या अश्रुंना तिने तिथंच थांबवलं. अवंतीच्या डोळ्यात आलेले अश्रू मात्र आदिराज आणि एकनाथरावांच्या नजरेतून सुटले नाही.

आपल्या आईच्या अश्या वागण्याचा आदिराजला खूपच राग आला. तो काही बोलणार तितक्याच बाजूला बसलेल्या एकनाथरावांनी त्याचा हात दाबला त्यामुळे तो गप्प बसला. अवंतीची बाजू सावरत एकनाथराव म्हणाले..

" अरे मग छानच आहे ना निर्मला. अवंतीने शिरा कमी तुपाचा केला आहे तर. तुझ्या त्या डायटिशियन स्मिता गोखले नाही का ? त्या तर तुला नेहमीच कमी तेलाचा कमी तुपाचा डाईट लिहून देतात. विशेष म्हणजे तु सगळं फॉलो पण करते त्यांच्या सांगण्याप्रमाणे. अग पण तो डाईट लिहून देण्याचे पैसे घेतात ते आपल्याकडून. आपली अवंती तर आपल्याला स्वतःच सगळं व्यवस्थित बनवून देत आहे अगदी डायटिशियन प्रमाणे. ही कौतुकाचीच गोष्ट आहे ना.."  

एकनाथरावांच्या या बोलण्याचा निर्मलाताईंना खूप राग आला. त्या लगेचच तिथून उठून निघून गेल्या. जेवण आटोपून आदिराज आणि एकनाथराव बंगल्याच्या आवारात फिरायला गेले. अवंतीने किचन आवरायला घेतलं. गार्डन मध्ये फिरताना आदिराज एकनाथरावांना म्हणाला..

" बाबा,मघाशी आई अवंती सोबत जे बोलली ते नाही आवडलं मला. तिच्या माहेरच्या परिस्थितीचा आईला आधीपासूनच राग आहे हे माहिती आहे मला. पण या कारणासाठी अवंतीचा  दुस्वास करणं आईने थांबावायला हवं. तुम्ही तेव्हा मला अडवलं म्हणून नाहीतर आईला सांगितलं असतं की तुझं वागणं चुकीचं आहे म्हणून. का अडवलं पण बाबा तुम्ही मला? "  

" आदिराज , आज अवंतीचा या घरात पहिलाच दिवस होता. त्यामुळे मला घरात वाद नको होता. राहता राहिली तुझ्या आईची गोष्ट तर ती चुकीची आहेच पण जर तु तिचा अवंती समोर अपमान केला असता तर ती गोष्ट ती नसती सहन करू शकली. आपला मुलगा त्याच्या बायकोसमोर आपला अपमान करतोय हे कुठल्याच आईला सहन होत नाही. आपण निर्मलाला जरूर समजावून सांगू पण अवंतीच्या गैरहजेरीत." "

"आपण तुझे लग्न ठरवण्यापासून प्रत्येक वेळेस निर्मलाच्या विरोधात जातो आहे ही गोष्ट पण तिला खटकते आहे. आपल्याला या घरात वाद नकोत एकोपा नांदायला हवा आहे. आपल्या घरातील शांतता भंग व्हायला नको हा विचार करूनच या पुढे वाग आदिराज. तुझ्या आईची चिंता तु करू नकोस. तिला मी सांभाळेन. तु फक्त अवंतीला सांभाळून घे. चल आता रूम मध्ये जा पाहू. अवंती वाट पाहत असेल तुझी. "

एकनाथरावांच्या बोलण्याला होकार देत आदिराज त्याच्या रूम मध्ये आला. निर्मलाताई तर नाराज होत्या. आदिराजला चिडवणारे कोणीच भाऊबहीणही नव्हते पण एकनाथरावांनी मात्र आधीच इव्हेंट प्लॅनर्सला सांगून आदिराजची खोली सजवून घेतली होती.

आदिराजने एकदा स्वतःच्याच खोलीवर नजर फिरवली. लख्ख प्रकाशणाऱ्या दिव्यांनी उजळणारी खोली , सगळीकडे खोलीला सजविण्यासाठी लावलेल्या फुलांच्या माळा, बाजूच्या टेबलवर एका काचेच्या भांड्यात सजवलेल्या फुलांच्या पाकळ्या, त्यात पाण्यावर तरंगत ठेवलेले दिवे, मधोमध गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला पलंग , गुलाबीसर चादरीवर लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी रेखाटलेला बदामाचा आकार खूपच खुलून दिसत होता. गॅलरीतून येणारी हवेची झुळूक सुखावणारी होती. तिथे सजलेल्या हिरव्या झाडांच्या कुंड्या मन प्रसन्न करत होत्या.

ही सगळी सजावट पाहून आदिराज खूपच खुश झाला. हे सगळं बाबांनीच केलं असणार. थँक्यू बाबा...!तुम्ही वडील असूनही अगदी मित्राप्रमाणे समजून घेतात मला. मनोमन एकनाथरावांना थँक्यू म्हणून आदिराज अवंती येण्याची वाट पाहू लागला.  

अवंती किचन मधलं आवरून आदिराज आणि तिच्या रूमकडे जायला निघाली. जिना चढताना तिची हृदयाची धडधड वाढली. नववधू प्रिया मी बावरते. लाजते पुढे सरते ,फिरते....' अशी प्रत्येक नववधूप्रमाणे अवंतीच्या मनाचीही अवस्था होती. आज अवंती आणि आदिराजच्या सहवासाची पहिली रात्र असल्यामुळे दोघांच्याही मनातील धडधड वाढलेली.  

अवंतीने खोलीच्या बाहेरून दरवाजा थोटावला. आदिराजने दरवाजा उघडला. अवंती खोलीच्या आत आली. सजवलेल्या खोलीकडे पाहून अवंतीच्या मनात एकच अनामिक हुरहूर दाटून आली. अवंती हळूच पलंगावर जाऊन बसली. तिच्या मागेच उभ्या असणाऱ्या आदिराजने  दरवाज्याची कडी आतून त्याने हळूच बंद केली तशी अवंतीच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली.  

पिवळ्या रंगाची साडी त्यावर लाल रंगाचे बनारसी काठ , साडीच्या काठालाच मॅच असणारं लाल रंगाचं ब्लॉउज, गळ्यात नाजुकसं मंगळसूत्र, मेंदीच्या हातांवर त्यांचं सौंदर्य खुलवणारे नाजूक कडे , गुलाबीसर हातात नाजूकशी एंगेजमेंट रिंग, वरती पिनअप करून खाली मोकळे सोडलेले केस, ओठावर लावलेली ग्लॉसी लिपस्टिक, डोळ्यातले काजळ आणि स्मोकी आयलायनर हा सगळा साज अवंतीचं सौंदर्य आणखीनच खुलवत होता.  

नव्या नवरीचं तेज होतं अवंतीच्या चेहऱ्यावर. वेगळाच ग्लो आला होता तिच्या चेहऱ्यावर. आदिराज तिचं ते नितळ, आरस्पानी सौंदर्य नव्याने पाहतच राहिला. आदिराज याआधीही अवंतीला अनेकदा भेटला होता पण आज पहिल्यांदाच इतक्या जवळून तो तिला पाहत होता.आज कोणत्याही बंधनाच्या मर्यादा त्याला रोखू शकत नव्हत्या. अवंतीच्या या भाळून टाकणाऱ्या सौंदर्याकडे पाहून आदिराज पूरता घायाळ झाला होता. आदिराज असं पाहत होता. अवंतीला नेमकं कळत नव्हतं काय करावं. ती तशीच उभी राहिली.

अवंतीचं लग्न ठरलं तशी लग्नाच्या काही दिवस आधी तिची आई तिला एकट्यात नेऊन म्हणाली..

" अवंती ,नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेस तू. आता आदिराजचं तुझं आयुष्य असणार आहे. पती परमेश्वर असतो म्हणून त्याला पहिल्यांदा भेटल्यावर त्याचा नमस्कार करायला विसरू नकोस. तुम्हा आजकालच्या मुलींना आमचे हे असले जुन्या जमान्यातले सल्ले आवडत नाही हे माहिती आहे मला पण तरीही सांगितल्याशिवाय राहवत नाही आम्हाला.."  

" आई ,काही पण काय सांगतेस. आदिराजचा नमस्कार करू आणि मी? खूप फनी नाही वाटणार का त्याला हे सगळं. " अवंतीने आईच्या सांगण्याला अगदी गमतीत घेतलं.

आईच्या सांगण्यावर त्यावेळी मी कशाला आदिराजचा नमस्कार करू? असा विचार करणारी अवंती मात्र आदिराज समोर आल्यावर खरंच त्याचा नमस्कार करण्यासाठी पुढे सरसावली. ती पुढे झाली आणि आदिराजच्या पायाशी ती नमस्कार करण्यासाठी ती झुकली. तिच्या या अश्या वागण्यामुळे आदिराज गोंधळला   

"अगं काय हे..?? मला नमस्कार कशाला करतेस??" म्हणत त्याने तिला हाताला धरून वर उठवली. 

"तुझी जागा माझ्या हृदयात आहे, मनात आहे आणि आजपासून या घरातही आहे. पायाशी नाही.." आदिराज  

" मग आज आपल्या लग्नाची पहिली रात्र. त्याबद्दल काही गिफ्ट तर द्यायलाच हवं ना? बोला मग तुम्हाला काय हवंय राणीसरकार...??" आदिराज तिला मिठीत घेत म्हणाला..

" तुमची साथ आयुष्यभर अशीच माझ्यासोबत असावी आणि तुमच्या उबदार मिठीतचं रोज माझी रात्र सरावी. फक्त इतकंच हवं आहे मला तुमच्याकडून.. " अवंती अगदी प्रेमाने आदिराजला म्हणाली. 

"बास्स..इतकंच?? माझी सोबत तर नेहमीच तुझ्यासोबत असेन आणि किती वेळा सांगितलं आहे तुला ही अहो म्हणण्याची फ़ॉर्मॅलिटी नको. मला सरळ आदिराज म्हणायचं." म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं.  

" बरं आदिराज ..." असं म्हणत अवंतीही त्याच्या मिठीत शिरली. त्यांच्या नात्याची एक नवी सुरुवात झाली होती त्या मिठीने. ही मिठी म्हणजे अवंतीने आदिराजला मनापासून स्वीकारलं होतं याचाच पुरावा होता .आतापर्यंत हलकी असलेली मिठी आदिराजने घट्ट केली. त्या दोघांनीही स्वतःला एकमेकांकडे सुपूर्द केलं.

दोघेही एकमेकांच्या संमतीने थोडेसे चाचपडत पुढे सरकत होते. हळूहळू त्यांच्यातलं अंतर मिटलं. शरीरावरचा एक एक कपड्याचा भार हलका होत गेला. त्याचा तो वेडावणारा स्पर्श तिला सुखावून टाकत होता.  

एकमेकांच्या स्पर्शाने धुंद होत दोघांनी मिलनाचे सारे क्षण अनुभवले. दोघंही या नवख्या प्रेमाची एक अनोखी धुंदी अनुभवत होते. तापलेली शरीरं तरी देखील प्रेमाचा अनोखा गारवा सुखावत होता त्यांना. ओठांची खडाजंगी अन् सुस्काऱ्यांची आवर्तने सावरत वेडावलेले ते दोघे एकमेकांच्या मिठीत बंदीस्त झाले होते तेही आयुष्यभरासाठी!  

एका उत्कट क्षणी त्यांचं आजवरचं प्रेम समर्पणात परावर्तित झालं. अवंती आणि आदिराजचं दोघांचही कण न् कण चेतावणारं एक अनोख मिलन पार पडलं होतं. त्या रात्री आदिराज आणि अवंती मनाने आणि शरीराने एकरूप झाले होते. खुप वर्षांच्या तपश्चर्येनंतर एखादं वरदान मिळावं तसं काहीसं झालं होतं दोघांच्या आयुष्यात. दोघांनी लग्नानंतरचे ते पहिलेवहिले क्षण आनंदाने साजरे केले. उद्याची सकाळही खूपच सुंदर असेल ही आशा ठेवून...

क्रमश:

अवंतीचा आजचा दिवस तर खूप सुंदर होता. निर्मलाताईंचे तेव्हाचं बोलणं वगळल्यास परंतु उद्याचा दिवस कसा असेल? निर्मलाताई अवंतीच्या बाबतीत आपलं मत बदलतील का? त्या तिला आदिराजची बायको आणि देशमुखांची सून म्हणून मनापासून स्वीकारतील का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pinterest/Google 




 


Post a Comment

0 Comments