#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_८
©️जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html
भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html
भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_27.html
भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_49.html
भाग सात वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_28.html
मागील भागात आपण पाहिलं की अवंती आणि आदिराजचा विवाह अगदी साधेपणाने पार पडला. लग्न झाल्यावर अवंतीचा देशमुखांच्या घरात गृहप्रवेश झाला. सगळी पाहुणेमंडळी गेल्यावर अवंतीने घराची सगळी जबाबदारी सांभाळून घ्यायला सुरुवात केली. एकनाथराव आणि आदिराजला तिचं खूप कौतुक वाटलं. निर्मलाताईंनी मात्र पहिल्याच दिवशी अवंतीचा तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून अपमान केला. त्यावेळेस एकनाथरावांनी अवंतीची बाजू सांभाळली. अवंती आणि आदिराज दोघांनीही आपले लग्नानंतरचे पहिले वहिले क्षण साजरे केले. निर्मलाताईंचे थोडंस वाईट बोलणं वगळल्यास अवंतीचा देशमुखांच्या घरातील पहिला दिवस खूपच छान गेला. आता पुढे...
आदिराजसोबत अवंतीने घालवलेली रात्र अगदी स्वप्नवत होती. सकाळ होईपर्यंत दोघंही एकमेकांच्या कुशीत सामावलेले होते. सकाळ झाली तसा आदिराजचा तिच्या अंगावरचा हात दूर सावरत ती हळूच बाहेर जायला निघाली. तितक्याच आदिराजला जाग आली.
" अवंती , कुठे निघालीस ग इतक्या लवकर? झोप ना अजून थोड्या वेळ. अजून मन भरलं नाही ग .." आदिराज लाडाने अवंतीला म्हणाला.
" आदिराज ,पुरे झालं आता. आता कायमचं सोबत असू आपण. सकाळ झाली.आईंचा आवाज येतो आहेच किचन मधून. त्यांना मदत करायला हवी. बाबांना पण ऑफिसला जायचं असेल. त्यांच्या चहापाण्याचं पाहावं लागेल." अवंती समजावणीच्या सुरात आदिराजला म्हणाली.
" अरे ऑफिस ...! अवंती सॉरी अग. मी तुला सांगायलाच विसरलो. आज पासून मी पण ऑफिस जॉईन करतो आहे. मला माहिती आहे तुला वाईट वाटत असेल की आपल्या लग्नाला दोनच दिवस झाले आणि मी लगेचच ऑफिस जॉईन करतोय पण मी एका महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. साधारण दोन महिन्यात तो प्रोजेक्ट संपला की मला सुट्ट्या घेता येतील. तेव्हा आपण दोघांनाही कुठेतरी बाहेर फिरायला जाता येईल. सॉरी अवंती ,आपलं नवीनच लग्न झालं आहे आणि तुला कुठे बाहेर न नेता मी असं ऑफिसला जातोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी..तुला राग नाही आला ना?"
आदिराज अवंतीला म्हणाला.
" आदिराज ,अरे सॉरी काय त्यात. वर्क कम्स फर्स्ट. फिरायला जाण्यासाठी आपल्या जवळ संपूर्ण आयुष्य पडलं आहे. करियरपण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तू माझं टेन्शन घेऊ नकोस. मी पण पुढच्या आठवड्यात ऑफिस जॉईन करेन तोवर मी या घरात पण रुळेल. तु आता लवकर उठ आणि आवर. मी चहा नाश्त्याचं पाहते. "
"किती समजुतदार बायको आहे माझी.." असं म्हणत आदिराजने अवंतीला आणखीन मिठीत घेतलं.
" आता बाकी प्रेम रात्री.." इतकं सांगुन अवंतीने स्वत:ला आदिराजच्या मिठीतून सोडवलं. ती स्वतःचा नित्यक्रम आवरून खाली निघून गेली. आदिराजनेही ऑफिसला जाण्याची तयारी सुरु केली. अवंतीने किचनमध्ये जाऊन नाश्त्याच्या तयारीला सुरुवात केली. अवंतीने निर्मलाताईंना विचारून स्वयंपाकाला सुरुवात केली. अवंती निर्मलाताईंशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण निर्मलाताई नेहमीप्रमाणे तिच्यासोबत तुसडेपणानेच बोलत होत्या. अवंतीला वाईट वाटलं पण तरीही तिने निर्मलाताईंना काहीच ऊलट उत्तर दिलं नाही.
नाश्ता झाला. आदिराज आणि एकनाथराव दुपारचा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला निघून गेले. इतक्या वेळात निर्मलाताईंनी अवंतीच्या प्रश्नांना फक्त हो आणि नाही या दोनच शब्दात उत्तरं दिली होती. अवंतीला खूपच वाईट वाटलं पण हळूहळू आई आपल्यासोबत प्रेमाने वागतील अशी तिने स्वतःचीच समजूत घातली.
दुपारी कॉलनीतील सगळ्या बायका अवंतीला भेटण्यासाठी निर्मलाताईंच्या घरी आल्या. अवंतीने त्यांचं खूप छान स्वागत केलं. त्यांना नाश्ता म्हणून छान पैकी खमण ढोकळा आणि मस्तपैकी लस्सीचा बेत केला. निर्मलाताईंची सून खरंच खूप छान आणि मनमिळाऊ आहे असं प्रत्येक जण निर्मलाताईंना सांगत होतं. मनातून त्यांना हे सगळं छान वाटतही असेल पण सर्वांच्यासमोर त्यांनी ही कबुली दिली नाही.
बराच वेळ सगळ्यांच्या गप्पा सुरु होत्या. दागदागिने, साडी आणि कपड्यांच्या गप्पा झाल्या नाही तर त्या बायका कसल्या! शेजारच्या लेले ताईंनी स्वतःच्या सुनेला त्यांनी कसे दागदागिने घेतले ,कश्या उंची आणि महागातल्या साड्या घेतल्या त्याची बढाई मारायला सुरुवात केली. निर्मलाताईंना मात्र हे सगळं आवडलं नाही म्हणून त्यांनीही लगेचच अवंतीला घेतलेले दागदागिने आणि साड्या अवंतीला सगळ्यांना दाखवायला आणायला सांगितल्या.
अवंतीने सगळ्या साड्या आणि दागिने सगळ्यांना दाखवायला आणले. सगळ्या बायकांना साड्या खूपच आवडल्या. सगळ्या बायका खूपच कौतुक करत होत्या सगळ्या वस्तूंचं. लेलेवहिनींना मात्र आपल्यावर निर्मलाताईंची सरशी झालेली सहन झाली नाही. लेलेताईंचा स्वभावच तसा होता. प्रत्येकात काहीतरी वाईट गुण पाहणे, कधीही दोन लोकांचं चांगलं जमत असेल तर त्यांच्यात जाऊन वादविवाद घडवणं हा त्यांचा छंदच जणू ...
अवंतीने साड्या आणतांना सगळ्या एकदम आणल्या पण त्यातून तिच्या माहेरच्या साड्या काढून तिने रूम मध्ये ठेवल्या नाहीत. त्या साडी किट मध्ये तश्याच होत्या. अवंतीच्या आईबाबांनी तिला घेतलेल्या साड्या फारश्या महागातल्या नव्हत्या. लेलेंताईंची नजर त्या साड्यांवर पडली. हीच निर्मलाताईंचा अपमान करण्याचा मोठी संधी आहे हे त्यांनी अचूक हेरलं आणि त्या म्हणाल्या..
" निर्मलाताई , अहो तुम्ही तर फक्त काहीच महागातल्या साड्या घेतल्या आहेत अवंतीला. ह्या बाकीच्या पहा ना किती साधारण आहेत ह्या साड्या. इतक्या साध्या साड्यांकडे तर आमची जान्हवी पाहायची सुद्धा नाही. अवंती तरी नेसते आहे त्या साड्या."
निर्मलाताईंचं अवंतीच्या बाकीच्या साड्यांकडे लक्ष गेलं आणि त्या रागाने लाल झाल्या. लेलेताई निर्मलाताईंकडे पाहून कुत्सितपणे हसल्या.लेलेताईंच्या अशा बोलण्यामुळे बाकीच्या बायकांचं आपोआप त्या साड्यांकडे लक्ष वेधलं गेलं. निर्मलाताईंना स्वतःचा अपमान सहन झाला नाही. त्यांची बाजू सावरायची म्हणून अवंती लेलेताईंना म्हणाली..
"काकू , अहो त्या साड्या आईंनी नाही तर माझ्या आईबाबांनी घेतल्या आहेत.आणि हो आमच्या आईही मला सगळं आवडेल असंच घेतात. विशेष म्हणजे मी सून असूनही त्या मुलीसारखंच वागवतात मला. मघाशी तुम्ही म्हणाल्या की त्या साड्या हलक्या आहेत पण त्या साड्या पैशाने जरी कमी किंमतीच्या असल्या तरीही त्या खूप मौल्यवान आहेत. प्रत्येक गोष्टीची किंमत पैश्यात मोजायची नसते शेवटी प्रत्येक वस्तूमागे घेणाऱ्याच्या भावना महत्वाच्या असतात. "
अवंतीचे बोलणं ऐकून लेलेताईंचा चेहराच पडला. आलेल्या इतर बायकांनी देखील अवंतीच्या बोलण्याचं कौतुक केलं. निर्मलाताईंनाही मनातून लेलेंताईंचा अपमान झाला म्हणून आनंद झाला.
लेलेताईंसारख्या मंथरेच्या भूमिकेतील अनेक व्यक्ती आपल्या नशिबात असतात पण त्यांचे बोलणे आपण किती मनावर घ्यायचं हे आपल्याच हातात असते. मानवी स्वभावचं असा आहे की माणसाच्या चांगल्या गोष्टी लक्षात न ठेवता वाईट बाजूच लक्षात ठेवतो आणि तिथेच त्याची खरी चूक होते. खरं तर अवंतीने निर्मलाताईंची बाजू घेऊन लेलेताईंची कानउघाडणी केली ही अवंतीची योग्य आणि खरी बाजू निर्मलाताईंनी लक्षात घ्यायला हवी होती पण त्यांनी तसं न करता अवंतीच्या बाबांच्या माहेरच्या परिस्थितीमुळे त्यांचा अपमान झाला हिच गोष्ट स्वतःच्या लक्षात ठेवली.
सायंकाळ झाली. सगळ्या बायका आपापल्या घरी निघून गेल्या. निर्मलाताई मात्र शांत बसून होत्या. त्यांच्या डोक्यात अजूनही राग होता. अवंतीने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण निर्मलाताई तिच्यासोबत काहीच बोलल्या नाहीत. अवंतीही झालेल्या प्रकारामुळे थोडी नाराजचं होती. निर्मलाताई काहीच बोलत नाही म्हणून अवंतीने स्वतःच किचनचा ताबा घेतला. सायंकाळसाठी तिने कढी आणि खिचडी असा साधासा बेत बनवला.
एकनाथराव आणि आदिराज सोबतचं घरी आले. निर्मलाताई हॉलमध्ये सोफ्यावरचं बसून होत्या. एकनाथरावांनी त्यांना पाहिलं आणि अवंतीला हाक मारली ..
अवंती ,बाळा पाणी आणतेस का ? "
"हो..हो.. बाबा ..लगेचच आणते." असं म्हणून अवंती किचन मधून एकनाथरावांना पाणी घेऊन आली. आल्याबरोबर आपल्यासोबत न बोलता एकनाथरावांनी अवंतीला हाक मारली म्हणून निर्मलाताईंनी अजूनचं डोक्यात राग घालून घेतला. आदिराज पण पाणी पिऊन एका जागी शांत बसला.एकनाथराव पाणी पिऊन निर्मलाताईंच्या शेजारी जाऊन बसले आणि म्हणाले...
" काय ग निर्मला , अग इतकी शांत शांत का बसलीस..? काय झालं ,बरं वाटत नाहीये का तुला ..? "
" मला काय होणार आहे आदिराजचे बाबा ..? मी चांगली धडधाकट आहे ,असं पण माझा नवरा आणि मुलगा दोघांनीही माझ्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवल्यावर मला स्वतःची काळजी तर घ्यावी लागणारच ना ..! मला काही त्रास असला आणि मी तो तुम्हाला सांगितला आणि मी तो तुम्हाला सांगितला तरी त्याने काय असा काय फरक पडणार आहे तुम्हाला? त्यामुळे आपलं आपण गप्प बसलेलंच बरं. "
"आई , असं का बोलते आहेस ? तुला कोणी काही बोलल्यावर त्रास आम्हालाच होणार ना..! काय झालं नेमकं सांगशील का? तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी ? की कोणी काही बोललं का तुला ? " आदिराज गंभीरपणे निर्मलाताईंना म्हणाला.
" आदिराज , काय सांगणार तुला? तुला माझा त्रास समजला असता तर ही वेळच आली नसती. आज तुझ्या बायकोमुळे , तिच्या माहेरच्या परिस्थितीमुळे लेलेवहिनी सगळ्यांच्या देखत माझा अपमान करून गेल्या. कदाचित तू माझ्या सांगण्यावरून तेव्हाच अवंतीला नकार दिला असता तर आज ही वेळच आली नसती. आता अवंतीच्या माहेरच्या परिस्थितीमुळे नेहमीच माझा असा अपमान होत राहिल असं म्हणून निर्मलाताईंनी घडलेला सगळा प्रकार आदिराज आणि एकनाथरावांना सांगितला. सांग आता आदिराज काय करू शकतो तू यावर..?"
एवढं बोलून निर्मलाताईंनी अवंतीला टोमणे मारायला सुरुवात केली. अवंती सगळं ऐकत फक्त एका जागी उभी होती. तिच्या आईबाबांच्या परिस्थितीमुळे त्यांचा पुन्हा पुन्हा अपमान होत होता. त्यामुळे ती तिच्या डोळ्यातल्या अश्रुंना रोखू शकली नाही. आपल्या आईचं असं बोलणं आदिराजला आवडलं नाही. अवंतीची काही एक चुकी नसतांना आपली आई तिचा अपमान करते आहे ही गोष्ट आदिराजला सहन झाली नाही. तो चिडून निर्मलाताईंना म्हणाला ..
" आई , पुरे झालं आता अवंतीला बोलणं. तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून तिला टोमणे मारणे बंद कर कारण आता ती मोहिते नाही तर अवंती देशमुख आहे. झालेल्या प्रकारात अवंतीची काहीच चुक नव्हती कारण लेलेकाकूंसारख्या विघ्नसंतोषी बायकांना हेच हवं असत. त्यांच्या डोक्यात फक्त दुसऱ्यांच्या संसारात विघ्न कस निर्माण करता येईल फक्त हा एकच विचार असतो. त्यामुळे अश्या लोकांसाठी आपण आपल्या लोकांचा अपमान करायचा हे तुला तरी पटतंय का आई ? आई आज तू खूप चुकीचं वागलीस."
" हो..हो.आता बायको आल्यावर मी तुला चुकीचीच वाटेल ना ? आता तुझ्या बायकोच्या अपमानामुळे तू इतका व्यथित होतो आहे पण माझा मान माझा अपमान त्याच्याशी तुला काहीच घेणं देणं नाही." निर्मलाताई आदिराजवर चिडून म्हणाल्या.
आदिराज त्यावर काही बोलणार त्याच्या आतच एकनाथराव निर्मलाताईंना म्हणाले.
" निर्मला ,अग तुझ्या मान अपमानाची काळजी आहे आम्हाला. पण लेलेवहिनींसारख्या बायकांना हेच हवं असतं त्यामुळे त्यांच्या गोष्टींना आपण किती महत्व द्यायचं किंवा नाही हे आपलं आपणचं ठरवायचं असतं. त्यामुळे आता शांत हो पाहू. झालं गेलं सगळं विसरून जा."
"आदिराज आणि तुम्ही आदिराजच्या लग्नानंतर खूप बदलले आहात. तुमच्या देखी माझी काहीच किंमत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला आता बाहेरून आलेल्या अवंतीची किंमत आहे. "
निर्मलाताई रागारागाने बोलत होत्या. आदिराजही त्यांना उत्तर देत होता. शब्दाने शब्द वाढत गेला. शेवटी रागारागात आदिराज आणि निर्मलाताई दोघंही आपापल्या रूम मध्ये निघून गेले. घरातील हे सगळं वातावरण पाहून एकनाथराव खूप व्यथित झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काय होऊन बसले आहे माझ्या गोकुळासारख्या घराचं..! या विचाराने त्यांना खूपच त्रास होत होता. अवंतीला देखील त्यांना पाहून रडू आलं. आपल्या मुळेच हे सगळं घडलं म्हणून ती एकनाथरावांजवळ जाऊन रडू लागली..
" आय एम व्हेरी सॉरी बाबा. माझ्यामुळेच हे सगळं घडत आहे बाबा. आदिराजने मला नकार दिला असता तर हे सगळं झालं नसतं." असं बोलतांना तिला अश्रू अनावर झाले.
तिच्या डोक्यावरून हात फिरवत एकनाथराव म्हणाले ..
"घडलेल्या सगळ्या गोष्टीत स्वतःला दोषी समजं बंद कर अवंती. यात तुझा खरंच काही दोष नाही. आपण यावर नक्की काहीतरी मार्ग काढू. तू रूम मध्ये ताट घेऊन जा. आदिराजला जेवायला सांग. आईचं आणि माझं ताट पण मला आणून दे. मी समजावतो निर्मलाला .."
एकनाथरावांच्या सांगण्यावरून जेवणाची ताटं आणण्यासाठी अवंती किचन मध्ये गेली. तेव्हा एकनाथराव घरातल्या देवघरात गेले. देवापुढे हात जोडून मनोमन प्रार्थना करू लागले..
" देवा , माझ्या गोकुळासारख्या घराला कोणाची दृष्ट लागली? भांडण तर सोडा पण या घरात कोणी ऊंच आवाजात सुद्धा बोललं नाही आज पर्यंत आणि आज मायलेकरा मधला वाद इतका प्रकोपाला गेलास देवा. आई लेकराला असं दुरावू नको रे परमेश्वरा ...! आता तुच काहीतरी मार्ग सुचव या संकटातून बाहेर येण्याचा..."
क्रमश:
एकनाथरावांच्या प्रार्थनेला फळ मिळेल का ?निर्मलाताई आणि आदिराज मधील अबोला दुर होईल का ?मायलेकराच्या नात्यातील दुरावा मिटवण्यासाठी एकनाथराव आणि अवंती काय करतील ? निर्मलाताई आणि अवंतीच्या नात्याचं भविष्य काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
.jpeg)
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box