#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_११_अंतिम
©जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html
भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_25.html
भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_27.html
भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_49.html
भाग सात वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_28.html
भाग आठ वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_30.html
भाग नऊ वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/04/blog-post.html
भाग दहा वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/04/blog-post_6.html
भाग अकरा वाचा पुढे....
मागील भागात आपण पाहिलं की अवंतीचं देशमुखांच्या घरातील स्थान रमा आजींच्या लक्षात आलं. अवंतीचा अपमान करू नकोस. तिला सून म्हणून स्वीकार असं अनेक वेळा रमा आजींनी निर्मलाताईंना समजावलं पण निर्मलाताईंनी मात्र काही एक ऐकून घेतलं नाही.अवंतीच्या चांगुलपणाचा निर्मला गैरफायदा घेतेय त्यामुळे आता अवंतीलाच बोलतं करायला हवं म्हणून रमा आजींनी अवंतीची समजूत घातली.
सुरुवातीला निर्मलाताईंना प्रतिउत्तर करून घरातील वातावरण बिघडेल म्हणून अवंतीने रमा आजींना नकार दिला पण स्वतःच्या सासरच्या मानासोबत प्रत्येक मुलीने माहेरचा मान ही जपायला हवा अशी रमा आजींनी अवंतीची समजूत घातली. रमा आजींनी निर्मलाताईंना समज देण्यासाठी एक प्लॅन बनवला आणि अवंती ही या सगळ्यासाठी तयार झाली. रमा आजींनी एकनाथराव आणि आदिराजला देखील आपल्या प्लॅन मध्ये समाविष्ट करून घेतलं. आता पुढे ...
रमा आजींनी ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे ऑफिसच्या कामाचं निमित्त सांगून अवंती सकाळी लवकर उठली नाही त्यामुळे घरातील नाश्ता, जेवण बनवणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी निर्मलाताईंवर येऊन पडली.
निर्मलाताईंनी चिडचिड करत करत नाश्ता बनवला. जेवण बनवण्याच्या तयारीला सुरुवात केली. त्यात निर्मलाताई खूप थकल्या. खरंतर निर्मलाताईंना या कामात मदत करण्यासाठी आधी एक मदतनीस मावशी होत्या पण अवंतीला त्रास व्हायला हवा म्हणून त्यांनी मदतनीस मावशींना कामावरून काढून टाकलं होतं. त्यामुळे एकटीने काम करतांना त्यांची खूपच ओढाताण होत होती. रमा आजी हे सगळं पाहत होत्या.
रमा आजीही निर्मलाताईंची आई होती. त्यामुळे आईची मायाच वेगळी असते म्हणून त्यांना खरंतर निर्मलाताईंना इतकं काम करतांना पाहून त्यांची दया येत होती पण आपल्या लेकीला तिच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून त्या मनावर दगड ठेऊन हे सगळं सहन करत होत्या.
एका आठवडा यातच निघून गेला पण अवंती मात्र किचन मध्ये आलीच नाही. निर्मलाताईंनी दुसरी मदतनीस शोधण्याचा प्रयत्न केला पण मनासारखं कोणीच सापडत नव्हतं. शेवटी चिडून निर्मलाताई अवंतीच्या रूम मध्ये गेल्या, रूमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दरवाजा थोटावत निर्मलाताई म्हणाल्या ...
" अवंती , काय चालवलं आहे..? अजून किती दिवस चालणार आहे तुझं ऑफिसचं काम? माझ्याकडून एकटीने हे सगळं काम करणं शक्य होत नाही. आता तरी कामातून वेळ काढून मला मदत कर,प्लीज ..."
केविलवाण्या शब्दात निर्मलाताईंनी अवंतीकडे मदत मागितली तेव्हा तिला वाईट वाटलं पण रमा आजींनी तिला सांगितलं होतं तुला आयुष्यभराचं सुख हवं असेल,निर्मलाताईंच्या रूपात आई हवी असेल तर तुला खंबीर व्हायलाच हवं. रमा आजींच्या सांगण्यामुळे अवंतीने आज बंडखोरी करायचीच असं ठरवलं. अवंतीची ऑफिसला जाण्याची तयारी झालेली होती त्यामुळे स्वतःची पर्स घेऊन ती बाहेर पडली आणि निर्मलाताईंना खंबीरपणे म्हणाली...
" आई, आज ऑफिस मध्ये खुप इम्पॉर्टन्ट मीटिंग आहे त्यामुळे मला निघावं लागेल, ब्रेकफास्ट तुम्ही ऑर्डर करा. जमेल तश्या चपात्या बनवून घ्या किंवा मग शेजारच्या काकूंच्याकडे येणाऱ्या मावशींना बोलावून चपाती बनवून घ्या. मला पण आता वेळ नाही त्यामुळे तुमचे तुम्ही मॅनेज करा ..प्लीज .."
आणि निर्मलाताईंचं ऊत्तर ऐकण्याच्या आत अवंती घराबाहेर पडली सुद्धा. रमा आजी सुद्धा समोर उभं राहून हे सगळं पाहत होत्या. अवंती तर निघून गेली पण इकडे मात्र निर्मलाताईंचा पारा चढला. त्या वैतागून रमा आजींना म्हणाल्या ...
" पाहिलंस ना आई , अवंती कसं उलट उत्तर देऊन निघून गेली ते. एक जबाबदारी म्हणून नाही या मुलीला. तिला काही बोलायचं म्हटलं की तिच्या बाजूने वकिली करायला हे आणि आदिराज आहेतच. त्यामुळे तिला काही बोलून पण उपयोग नाही. आदिराजचे बाबा नेहमी मला सांगतात. अवंती कशी गरीब आहे. किती प्रेमळ आहे आणि आज पाहिलं ना कशी सगळं कामं माझ्यावर टाकून निघून गेली ते. "
रमा आजी फक्त गप्प उभ्या होत्या. त्यांना असं शांत उभं पाहून निर्मलाताई पुन्हा रमा आजींना म्हणाल्या..
" आई बोल ना काहीतरी. तू अशी शांत का? की तू पण आदिराजच्या आणि ह्यांच्या टीम मध्ये सामील झालीस.? तुला पण मीच चुकीची वाटते का? "
निर्मलाताईंच्या या बोलण्यावर रमा आजी त्यांना म्हणाल्या...
" अवंतीने तुला इतकं तिरसट पणे उत्तर द्यायला नको होतं हे मान्य आहे मला पण तिच्या अशा वागण्याला कारणीभूत तुच आहेस निर्मले. अवंती जेव्हा या घरात आली तेव्हा ऑफिस सांभाळून ती घरातील सगळ्या जबाबदाऱ्या अगदी योग्य रीतीने पार पाडत होती."
"तेव्हा ऑफिस आणि घर सांभाळताना तिची पण ओढाताण होतचं असेल ना..? त्यावेळेस जर तू तिला थोडी मदत केली असतीस तर तिच्या मनात तुझ्याविषयी सहानुभूती निर्माण झाली असती आणि तुलाही थोडंफार काम करण्याची सवय राहिली असती."
"अवंतीला तू आधी समजून घेतलं नाही त्यामुळे ती आता तुला समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. काय करणार निर्मले ..? रोज इतकं काम करायला जमणार आहे का तुला. त्यापेक्षा मी काय म्हणते अवंतीसोबत थोडं गोड बोल आणि तिला थोडी मदत कर म्हणजे तुझ्या कामाचा भार थोडा कमी कर. मी स्वतःहून अवंतीसोबत का बोलू, तिच्याकडून का मदत घेऊ? ही हेकेखोरी सोड. कारण या वयात नाही झेपणार तुला कामाचा इतका लोड. त्यापेक्षा थोडी माघार घ्यायला काय हरकत आहे. "
रमा आजींनी मारलेला बाण अगदी योग्य निशाण्यावर लागला होता. सायंकाळी अवंती ऑफिसहून घरी आली. त्यावेळी निर्मलाताई अवंतीला म्हणाल्या ...
" अवंती, मान्य आहे तुला ऑफिसची कामं आहेत पण वयापरत्वे सगळं काम मला झेपत नाही ग. त्यामुळे मी सकाळी करायच्या भाज्यांची वगैरे तयारी रात्रीच करून ठेवेन पण प्लीज सकाळी थोडी लवकर उठून मला स्वयंपाकात मदत करशील का ? तेवढाच माझा भार हलका होईल."
निर्मलाताईंचा बदललेला अटीट्युड पाहून एकनाथराव आणि आदिराज दोघंही खूपच आश्चर्यचकित झाले. रमा आजींनी एकनाथरावांना अंगठा दाखवून आपला प्लॅन यशस्वी झाल्याची खुण केली. अवंतीने निर्मलाताईंना मदत करण्यासाठी होकार दिला. दुसऱ्यादिवशी सकाळी अवंतीने लवकर उठून निर्मलाताईंना मदत केली. त्यावेळी निर्मलाताईंनाही थोडं बरं वाटलं. अवंती हे सगळं एकटीने कसं करत असेल याची त्यांना जाणीव झाली. रमा आजी दोघंही सासूसुनांना एकत्र काम करतांना पाहून खूप आनंदी झाल्या.
रमा आजींचा पहिला प्लॅन तर यशस्वी झाला होता. निर्मलाताईंना अवंतीच्या कष्टाची किंमत समजली होती पण तिच्या माहेरच्या परिस्थितीमुळे असलेला किंतु अजूनही त्यांच्या मनात होता आणि तो किंतु त्यांच्या मनातून घालवणं गरजेचं होतं पण सध्या परिस्थिती बदलते आहे ना म्हणून रमा आजींनी सुटकेचा निश्वास टाकला.
अवंतीच्या लग्नाला आता पाच महिने होण्यात आले होते. अवंतीच्या लग्नानंतर अक्षयतृतीयेचा सण आला. प्रथेप्रमाणे प्रकाशराव अवंतीला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिच्या सासरी आले. एकनाथराव आणि आदिराजने त्यांचं खूप छान स्वागत केलं. रमा आजींना भेटून अवंतीच्या बाबांना खूप आनंद झाला. प्रकाशरावांनी रमा आजींना त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि
रमा आजींनी ते विनम्रतेने स्वीकारलं. रमा आजींनी त्यांच्यासोबत निर्मलाताईंना ही अवंतीच्या माहेरी येण्यास सांगितलं पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. अवंती सोबत रमा आजीही अवंतीच्या माहेरी गेल्या. सुलोचनाताईंनी रमा आजींची अगदी चोख व्यवस्था पहिली. त्यांच्या आदरातिथ्याने आणि प्रेमाने केलेल्या सेवेमुळे रमा आजी भावविभोर झाल्या.
अवंती दोन दिवस माहेरी राहून रमा आजींसोबत सासरी परत आली. जातांना प्रकाशरावांनी रमा आजी आणि अवंतीला छानश्या साड्या भेट म्हणून दिल्या. आदिराज, एकनाथ आणि निर्मलाताई तिथे उपस्थित नसल्यामुळे प्रकाशरावांनी रीतीप्रमाणे आदिराज, एकनाथराव , निर्मलाताई सगळ्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे आहेर पाठवले.
सगळ्यांना खूप आनंद झाला पण निर्मलाताई सोडून. कारण निर्मलाताईंना अवंतीच्या कष्टाची जाणीव झालेली असली तरी त्यांची अवंतीच्या माहेरच्या परिस्थितीवरून असलेली नाराजी अजूनही त्यांच्या मनात होती.
प्रकाशरावांनी त्यांना व्यवस्थित आणि योग्य असेच आहेर पाठवले पण त्यांना मात्र प्रकाशरावांकडून अगदी उंची आणि महागातल्या आहेराची अपेक्षा होती पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. त्यामुळे बरेच दिवस त्या काही बोलल्या नसल्या तरी आज मात्र अवंतीने आणलेले आहेर पाहून त्यांच्या मनातील राग बाहेर आलाच. आणि निर्मलाताई पुन्हा चिडल्या. त्यांनी अवंतीला नको नको ते सुनावलं. त्या प्रकाशरावांनी पाठवलेले आहेर अवंतीच्या हातात देत म्हणाल्या...
"अवंती, तुझ्या आईबाबांनी पाठवलेला आहेर त्यांना परत नेऊन दे. आम्हाला नको आहे असा हलक्यातला आहेर. तुझ्या आईबाबांना मुलीच्या सासरी आहेर कसा द्यावा याची सुद्धा समज नाही. ऐपत नव्हती तर इतक्या मोठ्या घरी मुलगी देण्याची हौसच का करावी? जर त्यांना मुलीच्या सासरच्यांचा योग्य मानपान करणं शक्य नव्हतं तर. अवंती, तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या लग्नाबाबतीत असलेले माझे सगळे स्वप्नं धुळीस मिळाले. मला माझी कुठलीच हौसमौस करवून घेता आली नाही. "
निर्मलाताईंच्या बोलण्याचं अवंतीला खूपच वाईट वाटलं पण इतकं होऊनही ती निर्मलाताईंना एक शब्द ही प्रतिउत्तर न देता आपल्या रूम मध्ये निघून गेली पण तिच्या डोळ्यातले अश्रू कोणाच्याच नजरेतून सुटले नाही. अवंतीची ही अवस्था पाहून आदिराज खूपच चिडला पण रमा आजींनी खुणेनेच त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि तो गप्प बसला.
निर्मलाताईंच्या मनातून अवंती विषयीचा राग अजूनही पूर्णपणे गेला नाही याची रमा आजींना खात्री पटली. निर्मलाताईंचा गैरसमज दूर करायलाच हवा म्हणून रमा आजींनी अजून एक युक्ती करायची ठरवली. त्यांच्या संपूर्ण प्लॅनची कल्पना त्यांनी एकनाथराव ,आदिराज आणि अवंतीला दिली. हा प्लॅन पूर्णपणे यशस्वी करणं हे फक्त अवंतीच्या हातात होतं. सुरुवातीला अवंती थोडी नर्व्हस होती पण रमा आजींनी समजावल्या वर अवंतीने होकार दिला.
निर्मलाताईंना त्यांच्या माहेराचं खूप कौतुक होतं. आदिराज इतका मोठा झाला तरीही अजून पर्यंत एकही अक्षयतृतीयेला माहेरी जाणं निर्मलाताईंनी टाळलं नव्हतं. निर्मलाताईंचे भाऊ शरदराव आणि वहिनी पण नेहमीच निर्मलाताईंचं माहेरपण आनंदाने करत पण यावर्षी मात्र रमा आजीच निर्मलाताईंकडे असल्यामुळे त्यांनी माहेरपणाला गावी जायचा बेत रद्द केला होता.
रमा आजींनी शरदरावांना म्हणजे निर्मलाताईंच्या भावाला सगळी हकीकत सांगितली आणि रमा आजींनी त्यांना एक युक्ती सांगतली. शरदरावांनीही रमा आजींच्या बोलण्याला होकार दिला.ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शरदरावांनी निर्मलाताईंना फोन केला. ते म्हणाले..
" ताई, तु दरवर्षी प्रमाणे या वर्षी माहेरी येऊ शकली नाही म्हणून खूप चुकल्यासारखं वाटतंय ग. पण तुझा आहेर राहायला नको म्हणून तुझ्या हक्काची आणि मानाची साडी कुरियरने पाठवतो आहे. तेवढी गोड मानून घे. आणखीन एक गोष्ट ताई, यावर्षी पीकपाणी तितकं चांगलं आलं नाही. त्यामुळे उत्पन्न पण कमी आलं त्यामुळे तुला खूप महागातली साडी नाही घेऊ शकलो. त्याबद्दल मला माफ कर ताई..."
शरदरावांचं बोलणं ऐकून निर्मलाताई भावनावश झाल्या. डोळ्यातून ओघणारे अश्रू पुसत त्या म्हणाल्या...
" दादा, अरे बाबा गेल्यावर इतक्या वर्षांनी सुद्धा तु मला आठवणीने साडी पाठवतो आहे तेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हलकं भारीचा प्रश्नच उरत नाही. तु पाठवलेली प्रत्येक वस्तू माझ्यासाठी अनमोल आहे. "
इतकं बोलून निर्मलाताईंनी फोन ठेवला. आता कधी आपलं कुरियर येणार आणि आपण दादाने दिलेली प्रेमाची भेट स्वीकारू असं झालं होतं निर्मलाताईंना.आदिराजने कुरियर वाल्याला पैसे देऊन रविवारीच कुरियर देण्यासाठी सांगितलं कारण त्यादिवशी सगळे घरीच असणार. ठरल्याप्रमाणे रविवारी सगळे घरीच होते. कुरियरवाला आला. निर्मलाताईंनी धावतच जाऊन कुरियर घेतलं. निर्मलाताई खूप खुश होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रमा आजी त्यांना म्हणाल्या..
" काय ग निर्मले, काय आहे या पार्सलमध्ये, ज्याच्यामुळे तु इतकी खुश आहेस ?"
"अग आई , या वर्षी अक्षयतृतीयेला माहेरी गेली नाही तरी शरददादा आणि वहिनीने मला आठवणीने माहेरचा आहेर कुरियर केला आहे. " निर्मलाताई खूप आनंदाने रमा आजींना सांगत होत्या.
आपल्याला काहीच माहित नाही असा आव आणत रमा आजी म्हणाल्या ...
" अरे वा , हे तर खुप छान केलं शरद आणि सुनबाईंनी. निर्मले, अग पार्सल उघडून पाहूया का आपण ? शरदने कशी साडी पाठवली आहे ते?"
" हो, हो आई लगेच उघडते मी पॅकिंग.." निर्मला ताई म्हणाल्या.
समोर घडत असलेला सगळा प्रकार एकनाथराव ,आदिराज आणि अवंती पाहत होते. निर्मलाताईंनी लगेचच पार्सल खोलले. त्यातून अगदीच हलकी बाजारातून अगदी स्वस्तात मिळते अशी साडी निघाली. साडीवरची किंमत खूप कमी होती पण निर्मलाताईंचं किमतीकडे लक्षच नव्हतं. त्यांनी ती साडी आपल्या अंगावर टाकली. अवंती हे सगळं पाहत होती. आता खरी अवंतीची बोलण्याची वेळ होती. अवंती निर्मलाताईंना म्हणाली ..
" आई , इतकी हलकी साडी तर आपल्या कडची कामवाली बाई पण नाही घालत आणि इतकी हलक्यातली साडी शरदकाकांनी तुम्हाला आहेर म्हणून पाठवली आहे. शी ...आपल्या नको अश्या साड्या. आणा ती साडी इकडे ..मी त्या शेजारी काम करणाऱ्या मावशींना देऊन येते. "
असं म्हणत अवंती निर्मलाताईंच्या हातातली साडी घेऊ लागली. अवंतीला प्रतिकार करत निर्मलाताई म्हणाल्या...
" अवंती, काय बोलते आहेस तुला तरी कळतं आहे का ? माझ्या माहेरच्या साडीला अशी फेकून देण्याची भाषा करतांना थोडी सुद्धा लाज नाही वाटत तुला. माझ्या भावाने अगदी प्रेमाने पाठवली आहे ती साडी त्यामुळे ती खूप अनमोल आहे माझ्यासाठी आणि तु चक्क या साडीला कामवालीला द्यायला निघालीस ? ती साडी पैशाने जरी कमी किंमतीची असली तरीही ती खूप मौल्यवान आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत पैश्यात मोजायची नसते शेवटी प्रत्येक वस्तूमागे घेणाऱ्याच्या भावना महत्वाच्या असतात. "
" हो आई देऊन टाकूया ही साडी आपण कामवालीला कारण तुम्ही सुद्धा माझ्या माहेरची साडी अशीच कामवालीला द्यायला निघाल्या होत्या. त्यावेळी ती साडी माझ्यासाठी पण तितकीच मौल्यवान होती. आज फक्त एकदा मी शरदकाकांनी तुम्हाला पाठवलेल्या साडीला फेकून देण्याची भाषा केली तर इतका राग आला तुम्हाला..? आणि तुम्ही ? तुम्ही मात्र आदिराज आणि माझं लग्न ठरलंय त्या दिवसापासून प्रत्येक वेळी माझ्या आईबाबांचा अपमान करताय तेव्हा मला कसं वाटत असेल याचा विचार केला आहे का कधी..? "
" आणि हो मघाशी तुम्ही म्हणाल्या ना.प्रत्येक गोष्टीची तुलना पैश्यांनी करायची नसते. मी कधीच कुठल्या गोष्टींची तुलना पैश्यांसोबत केली नाही. तुलना तर फक्त तुम्ही केली तुमच्या परिस्थितीची आणि माझ्या आईबाबांच्या परिस्थितीची.."
" आई, मी पैश्यांसाठी या घरात कधीच आले नव्हते तर आदिराजसारखा उत्तम जोडीदार मिळावा, तुमचं ,बाबांचं प्रेम मिळावं म्हणून मी या घरात आले होते. पैसा माझ्यासाठी कधीच प्रायोरिटी नव्हता कारण माझ्या माहेरी कमी पैसा असला तरी आम्हाला सगळी सुखं देण्याचा प्रयत्न नेहमीच केला माझ्या बाबांनी आणि तो ते आजही करत आहे. मी स्वतः पैसे कमवते तरीही माझ्यासाठी पैश्यांपेक्षा नाती श्रेष्ठ आहेत म्हणून मी आजवर गप्प होते."
"माझ्या सासऱ्यांना, नवऱ्याला त्रास होऊ नये म्हणून मी आजवर गप्प राहिली आणि माझ्या आईबाबांचा अपमान सहन केला. एकदा मी तुमच्या माहेरच्यांना बोलली तर तुम्हाला इतकं वाईट वाटलं आणि तुम्ही माझ्या विरोधात उभ्या राहिल्या. तुमच्याकडूनच मी हे शिकली."
"आता माझ्या माहेरच्यांचाही मान जपायचा आहे मला. त्यांना असं अपमानित होतांना नाही पाहू शकणार मी. त्यांची चुकी नसतांना त्यांचा अपमान झालेला नाही सहन करू शकणार मी. थँक्यू आई, तुमच्याच कडून मी हे शिकली की माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा."
इतकं बोलतांना अवंतीला अश्रू अनावर झाले तेव्हा तिला सावरत रमा आजी निर्मलाताईंना म्हणाल्या...
" निर्मला, तु माझी लेक असली तरीही तुझ्या चुकांवर पांघरून नाही घालणार मी.अग फक्त अवंतीच्या आईबाबांकडे पैसे कमी आहेत म्हणून तु त्यांना कमी लेखत आली. अग पण पूर्वी तुझ्या माहेरची पण अशीच परिस्थिती होती. आता देवाच्या कृपेने सगळं उत्तम असलं म्हणून माणसाने मागचे दिवस विसरून जाऊ नये."
"एखाद्या व्यक्तीकडे खूप जास्त पैसा असला म्हणजे तो श्रेष्ठ आणि त्याच्याकडे पैसे नसले म्हणजे तो कनिष्ठ असं होत नसतं. पैश्यापेक्षा संस्कार आणि प्रेम हे नेहमीच श्रेष्ठ असतं. पैसे कमी असले म्हणून माणूस म्हणून समोरचा व्यक्ती कमी ठरत नाही."
रमा आजींच्या आणि अवंतीच्या बोलण्यामुळे निर्मलाताईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पण त्या काहीच न बोलता आपल्या रूम मध्ये निघून गेल्या. त्यांच्या अश्या वागण्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. काही वेळात त्या शरदकाकांनी त्यांना पाठवलेली साडी नेसून रूमच्या बाहेर आल्या. त्यावेळी त्या अवंतीला तिच्या बाबांनी घेतलेली साडी रूम बाहेर घेऊन आल्या आणि अवंतीच्या हातात ती साडी देत म्हणाल्या....
" बरोबर आहे अवंती तुझं. आपल्या माहेरचा मान आपणच जपायला हवा. शरददादाने घेतलेली साडी नेसून मी माझ्या माहेरचा मान जपला आहे. आणि तुझ्या बाबांनी तुला घेतलेली ही साडी नेसून तुलाही तो जपायचा आहे. "
निर्मलाताईंचे बोलणं ऐकून अवंतीला रडू आलं आणि ती निर्मलाताईंना जाऊन बिलगली. साससुनेचा नव्हे आई आणि लेकीचा हा प्रेमळ आनंद सोहळा रमा आजी, एकनाथराव आणि आदिराज पहात होते.त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रूंच्या रूपात ओसंडून वाहत होता.
वाचकहो, या कथेत निर्मलाताई अवंती सोबत जे वागल्या त्यावरून असं दिसतं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते पण रमा आजींनी मात्र आपल्या लेकीच्या चुकांना पाठीशी न घालता त्यांनी अवंतीला समजून घेऊन तिला न्याय मिळवून दिला. एका स्त्रीने अन्याय केला तर दुसऱ्या स्त्रीने तो खोडून काढला.
रमा आजींची वागणूक अवंती, आदिराज आणि निर्मलाताईंच्या समोर एका वेगळाच आदर्श ठेऊन गेली. आता रमा आजींना आपला आदर्श मानायचा की निर्मलाताईंना हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपली वागणूक येणाऱ्या पिढीवर मोठी छाप पडून जाते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार वागायला हवं. बाकी जैसी जिसकी सोच...!
समाप्त!
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
.jpeg)
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box